'मी शरीरसुखासाठी नकार दिला, त्यानं माझं अख्खं शरीर कटरनं फाडलं'; जीवघेण्या हल्ल्यात महिलेला 300 टाके

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
( सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
"मला तुझ्यासोबत झोपू दे, नाहीतर तुला मारुन टाकीन, असं म्हणत त्यानं माझ्या सगळ्या शरीरावर कटरनं वार केले."
एका 36 वर्षीय महिलेनं 'सेक्स' करण्यास नकार दिल्यामुळे एका 19 वर्षीय तरुणानं तिच्या पूर्ण अंगावर कटरनं वार केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
पीडित महिलेवर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावातल्याच एका 19 वर्षीय तरुणानं या महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. पण, या महिलेनं त्याला नकार दिला आणि त्यानंतर या तरुणानं महिलेवर जीवघेणा हल्ला केला.
यात या महिलेला जवळपास 300 टाके पडल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.
याप्रकरणातील आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं या महिलेवर उपचार सुरू आहेत, त्या दवाखान्यात आम्ही पोहोचलो, तेव्हा महिलेच्या नाक, मान, गळा आणि कपाळावरील जखमा स्पष्ट दिसत होत्या.
घडलेल्या घटनेविषयी विचारल्यावर पीडितेनं बोलायला सुरुवात केली.


त्यांनी सांगितलं, "रविवारचा (2 मार्च) दिवस होता. त्यानं दुपारी मला फोन केला आणि तो माझ्याशी विचित्र बोलायला लागला. एकतर तू माझ्याबरोबर झोप किंवा तुझ्या जावेशी माझं जमवून दे, असं तो म्हणाला."
"मी त्याला नकार दिला. मी तुझ्या आईसारखी आहे, तुला लाज वाटते का असं बोलायला, असं म्हणत मी त्याला नकार दिला. तसेच फोट कट केला. त्याला खडसावल्यामुळे मी याबाबत घरी काही सांगितलं नाही. मला वाटलं पुन्हा भांडणं होतील म्हणून घरच्यांना सांगितलं नाही."
"रविवारी संध्याकाळी मी शेतातून घराकडे निघाले. रस्त्यातील ओढा पार करून मी येत होते. तितक्यात तो माझ्या पाठीमागून आला आणि त्यानं माझे केस धरले. त्यानं एका मोठ्या दगडावर माझं डोकं आपटलं. मला झांज आल्यासारखं झालं."
"तू माझ्यासोबत राहत नाही, तर मी तुला जिवंत मारुन टाकतो, असं तो म्हणत होता. यावेळी अचानक मला काही कळायच्या आत त्यानं हातातल्या कटरनं सपासप माझ्या अंगावर वार केले."
"त्याने डोकं, तोंड, पाठीवर, पायावर, मांडीवर सगळीकडे वार केले. मानेपासून पाठीपर्यंत कटरनं चिरून काढलं. एक मोठा दगड उचलला आणि माझ्या मांडीवर आणि अवघड ठिकाणी मारला. कटरनं माझ्या पोटऱ्या साळून काढल्या."
पीडितेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले
या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपीचं नाव अभिषेक नवपुते आहे. तो छत्रपती संभाजीनगरच्या घारदोन गावात राहतो.
या घटनेनंतर पीडितेनं पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चिखलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "याप्रकरणी पीडित महिलेनं जबाब नोंदवला असून तीच फिर्यादी आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी हा 19 वर्षांचा मुलगा असून त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये."
"पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. महिलेवर हल्ला करताना आरोपीनं वापरलेले कपडे रक्ताने माखलेले होते. ते त्यानं जाळून टाकल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून हल्ल्यावेळी त्यानं गाडी वापरली होती ती जप्त केली आहे. पुढचा तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक पंडित यांनी दिली.
'300 टाके पडलेत'
पीडितेसोबत तिचे नातेवाईक रुग्णालयात आहेत. पीडितेच्या बहिणीनं सांगितलं, "महिन्याभरापूर्वी माझ्या बहिणीचा मुलगा अंघोळ करत असताना आरोपीनं त्याचे नग्न फोटो-व्हीडिओ काढून गावात व्हायरल केले. सोशल मीडियावर पोस्ट केले."
"त्यावेळीही दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. पण, पुढे महिनाभर काही वाद झाला नाही. रविवारी मात्र त्याचा फोन आला आणि पुढे हे सगळं घडलं."
"त्यानं माझ्या बहिणीच्या पूर्ण अंगावर वार केलेत. आता सर्जरी केल्यामुळे ती व्यवस्थित आहे. मात्र काही बारीक जखमा आहेत, त्या तशाच आहेत. तिला जवळपास 300 टाके पडले. तिचं रक्त खूप वाया गेलं. आतापर्यंत चार-पाच बॉटल रक्त लावलं आहे," अशी माहिती पीडितेच्या बहिणीने दिली.

फोटो स्रोत, kiran sakale
आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या बहिणीने केली. त्या पुढे म्हणाल्या, "याला तसं सोडलं, तर हा परत कुणा दुसऱ्यासोबत अत्याचार करायला मोकळा होईल. आज माझ्या बहिणीला भीती वाटते. ती म्हणते त्याचं काय झालं? मला दवाखान्याच्या बाहेर नेलं, तर तो अजूनपण मला मारू शकतो, अशी तिला भीती वाटते."
पीडित महिला अल्पभूधारक शेतकरी आहेत. सध्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन उपचार सुरू असल्याचं पीडितेच्या भावानं बीबीसी मराठीला सांगितलं.
पीडित महिलेचा भाऊ म्हणाला, "आमची मागणी आहे की, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यानं एवढं क्रूर कृत्य केलेलं आहे. पुन्हा दुसऱ्यानं अशी हिंमत करायला नको. कारण आज त्याला शिक्षा भेटली नाही, तर उद्या हाच काय दुसरेपण हिंमत करतील. प्रशासनानं आम्हाला मदत करावी. हे प्रकरण दाबलं जाऊ नये."
ही विकृती येते कुठून?
माध्यमांमध्ये दररोज महिलांवरील लैंगिक अत्याच्यारांच्या बातम्या येत आहेत. त्यात महिलांवर क्रूरपणे शारीरिक आणि लैंगिक हल्ले केले जात असल्याचं समोर येत आहे.
पण, ही अशी विकृत मानसिकता कशी तयार होते? या प्रश्नावर बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील मानसशास्त्रज्ञ डॉ. संदीप सिसोदे सांगतात, "कुठलं तरी व्यसन असल्यावर अशाप्रकारचं कृत्य केलं जातं. हे लोक अतिचंचल, आततायी असतात. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, अशी त्यांची मानसिकता असते."
"दुसरं म्हणजे, व्यक्तिमत्व विकृती असणारे लोक अशाप्रकारचं कृत्य करू शकतात. मी करतो तेच खरं, मला वाटतं तेच बरोबर, अशा विचारांनी ही माणसं पछाडलेली असतात. याला वैद्यकीय भाषेत नार्सिजम म्हटलं जातं. अशा लोकांकडून यापद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते."

फोटो स्रोत, sandeep sisode
"महिलांवरील अत्याचाराची कृत्ये आपल्याकडे माध्यमांमध्ये अत्यंत सामान्यपणे दाखवली जातात. ही कृत्ये दृश्य स्वरुपात सहज दिसत आहेत. त्यामुळे त्याचाही परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. पण, अशाप्रकारची कृत्यं केल्यामुळे त्याचे परिणाम काय होतील याचं भान राहिलेलं नसल्यामुळे ही प्रकरणं सातत्यानं घडत आहेत," असंही डॉ. सिसोदे यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











