शौचाला बाहेर गेलेल्या कुपोषित तरुणीवर बलात्कार, असहायतेचा गैरफायदा घेत मारहाण आणि लैंगिक अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी प्रतिनिधी
स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यातून आणखी एक घटना समोर आली आहे.
सायंकाळी बाहेर शौचास गेलेल्या 23 वर्षीय आदिवासी तरुणीवर बलात्कार झालेला आहे. तसेच तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.
गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीपासून काही अंतरावर असलेल्या शिवणी गावातली आदिवासी समाजाची ही तरुणी 2 मार्चला सायंकाळी 5 वाजता बाहेर शौचास गेली होती.
पण, एक तास होऊनही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीय मुलीला शोधायला बाहेर पडले. तेव्हा मुलगी शौचास गेलेल्या ठिकाणापासून 20 मीटर अंतरावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तसेच तिच्या शरीरावर मारल्याच्या जखमा होत्या. तिच्या गुप्तांगावरही जखमा होत्या.
कुटुंबीयांनी लगेच तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
यावेळी ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तिनं पोलिसांना अनोळखी व्यक्तीनं फरफटत नेऊन मला मारलं इतकीच माहिती त्यावेळी पोलिसांना दिली आणि पुन्हा बेशुद्ध झाली.

फोटो स्रोत, Getty Images
पीडित मुलगी 23 वर्षांची असली तरी ती कुपोषित असल्यानं 15-16 वर्षांची दिसत होती. तसेच तिची तब्येतही ठीक नव्हती. त्यामुळे ती घरात झोपूनच असायची. ती अतिशय अशक्त असून बलात्कार आणि मारहाण झाल्यानं ती आणखीनच अशक्त झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तिच्या शरीरावर जखमांचे व्रण आहेत. गडचिरोली जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पीडित तरुणीला नागपुरातील शासकीय रुग्णालयातल्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोबत निगराणीसाठी एक महिला पोलीस सुद्धा असून त्या मुलीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण, दोन दिवसांपासून तिचा जबाब पोलिसांना नोंदवता आला नव्हता. कारण, पीडित मुलगी बोलण्याच्या स्थितीत नव्हती. 4 मार्चला सांयकाळी पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला.
आपण शौचास गेले असताना अनोळखी तरुणानं जबरदस्तीनं अतिप्रसंग केल्याचं तिनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. त्यानुसार नागपुरात अनोळखी व्यक्तीविरोधात नागपुरात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा गडचिरोली पोलिसांकडे वर्ग करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर गडचिरोली पोलिसांत गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक केली जाईल, अशी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे.
पीडिता शौचास गेली असताना या प्रकरणातील अनोळखी आरोपी दबा धरून बसला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण देखील केली. यामध्ये तिच्या गुप्तांगाला देखील जखमी झाली आहे.


पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
जबाब नोंदवला नसल्यानं पोलिसांनी दोन दिवस गुन्हा दाखल केलेला नव्हता. पण, घटना घडली तेव्हाच पाच संशयितांना ताब्यात घेतलं होतं. अनिल उसेंडी (वय 23 वर्ष) असं या संशयिताचं नाव असून चौकशीदरम्यान हाच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना होता.
पण तरुणीचा जबाब नोंदवायचा बाकी असल्याने त्याला अटक केली नव्हती. आता नागपूर पोलिसांकडून गुन्हा वर्ग करून घेतला असून गडचिरोली पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
त्याच्यावर कलम 64 (1), कलम 64 (2) एल , कलम 115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
हा आरोपी छत्तीसगढ राज्यातील रहिवासी असून तो काही दिवसांपूर्वी पीडितेच्या शिवणी या गावाजवळ राहायला आला होता.
त्यापैकी एक जणाची कसून चौकशी केली असता तोच आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हा संशयित शेजारच्या गावातला असून तो पीडितेच्या शिवणी गावात कामासाठी येत होता.
गडचिरोली पोलिसांकडे गुन्हा वर्ग होताच त्याला अटक केली जाईल.
काही दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झाला लैंगिक अत्याचार
गेल्या 25 फेब्रुवारीला एका 26 वर्षीय तरुणीवर बस डेपोमध्येच शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती.
ही पीडित तरुणी पुण्यातून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडेनं स्वतः कंडक्टर असल्याचं भासवून 'ताई' म्हणून तिचा विश्वास संपादन केला.
बस इथं नाहीतर दुसरीकडे लागते असं सांगून तिला शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि पूर्णपणे रिकामी असलेल्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. गाडे शिरूर तालुक्यातील असून त्याच्यावर आधीही गुन्हे दाखल आहेत.

हा बलात्काराचा गुन्हा केल्यानंतर तो मोबाईल बंद करून फिरत होता. पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो शिरूर तालुक्यातल्या गुनाट इथं ऊसाच्या शेतात लपला होता. पण, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्वारगेटच्या या घटनेनंतर राज्यभरातून महिला सुरक्षेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता गडचिरोलीतही बलात्कार करून तरुणीला फरफटत नेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबद्दल आणखी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











