सुटकेसमध्ये सापडला काँग्रेसच्या कार्यकर्तीचा मृतदेह, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फोटो स्रोत, PTI/Facebook
काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर हरियाणामध्ये खळबळ उडाली आहे. मृत महिला ही रोहतक काँग्रेसची कार्यकर्ता होती.
या घटनेमुळे राज्यातील जनता हादरली असून यावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमानी नरवाल असं या मृत युवतीचं नाव असून ती 22 वर्षांची होती. हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये रोहतक बस स्टँडपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ आढळून आला होता.
भारतीय युवक काँग्रेसने 'एक्स'वर न्याय देण्याची मागणी करत लिहिलं आहे की, ही महिला "युवक काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ती होती" आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्येही ती सहभागी होत असत.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी काँग्रेस कार्यकर्तीची निर्घृण आणि गूढ हत्या निंदनीय आहे. राज्यातील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळं गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत," असं आयडब्ल्यूसी महिला (IWC) संघटनेनं 'एक्स'वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
या घटनेनंतर हरियाणा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठप्प झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
तर दुसरीकडे भाजपनं मात्र हिमानीच्या आईचा हवाला देत काँग्रेसवरच पलटवार केला आहे. हिमानीच्या आईनं आपल्या मुलीच्या हत्येसाठी पक्ष आणि पक्षाशी संबंधित लोकांवर संशय व्यक्त केला आहे.
"माझ्या कार्यकाळात हिमानी या रोहतक ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्षा होत्या. त्यांनी पक्ष आणि संघटनेच्या इतर कार्यक्रमात सहभागी होत आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती," असं युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.


त्यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "रोहतकमध्ये महिलेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये मिळाला. अत्यंत निर्घृणपणे गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. या बातमीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे."
दरम्यान, हिमानीच्या आईनं काँग्रेसशी संबंधित काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझी मुलगी मागील 10 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचं काम करत होती, असं हिमानीच्या आईनं 'एएनआय'ला सांगितलं.
हरियाणामध्ये नगर परिषदेसाठी रविवारी मतदान झालं. त्याच्या बरोबर एक दिवस आधी हे हत्याकांड उघडकीस आल्यानं राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शनिवारी सकाळी रोहतक येथील सांपला बस स्टँडपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ एक बेवारस सुटकेस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचं पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचलं, तेव्हा त्यांना सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र, या महिलेच्या मृतदेहावर कसल्याही खुणा नव्हत्या.
'इंडियन एक्स्प्रेस'नुसार, सांपला पोलीस ठाण्याचे प्रभारी बिजेंद्र सिंह म्हणाले की, "हे हत्येचं प्रकरण आहे आणि आम्ही याचा तपास करत आहोत. मृत महिलेची ओळख पटली आहे. ती मूळची रोहतकची आहे."

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC
सांपलाचे पोलीस उपअधीक्षक रजनीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं की, माहिती मिळाल्यावर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना एक सफारी सुटकेस तिथं दिसली. या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह होता.
"त्यानंतर नातेवाईकांना बोलावण्यात आलं आणि मृतदेहाची ओळख पटली."
या प्रकरणाच्या तपासासाठी आपल्या नेतृत्त्वात एक एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची आई आणि भाऊ हे दिल्लीत राहतात. त्यांनी कोणत्याही एका ठराविक व्यक्तीवर संशय व्यक्त केलेला नाही.
पोलिसांना एक मोबाइल फोन सापडला होता. याप्रकरणी सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक विभागाची मदत घेऊन आरोपी शोधण्यात त्यांना यश मिळालं आहे. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे.
कोण आहे आरोपी?
सचिन असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, आरोपी सचिन दीड वर्षांपासून मृत पीडितेच्या घरी येत होता आणि दोघे सोशल मीडियावर संपर्कात होते.
"ती मुलगी एकटीच राहत होती. 27 फेब्रुवारी रोजी आरोपी सचिन रात्री 9 वाजता हिमानीच्या घरी गेला होता आणि रात्री तिथेच राहिला. 28 तारखेला हिमानी आणि सचिनमध्ये भांडण झालं ज्यामध्ये सचिनलाही थोडी दुखापत झाली."

फोटो स्रोत, ANI
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "हत्येनंतर, आरोपीने या मृत महिलेच्या मौल्यवान वस्तू (दागिने, लॅपटॉप) चोरल्या आणि त्या त्याच्या दुकानात लपवल्या. त्यानंतर तो परत आला आणि त्याने रात्रीच्या वेळी तिचा मृतदेह बस स्टँडवर फेकून दिला."
पोलिसांनी सांगितलं की, सचिनने हिमानीचे हातपाय साखळीने बांधले होते आणि मोबाईल चार्जरने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने हिमानीचा मृतदेह रजाईमध्ये बांधला आणि सुटकेसमध्ये पॅक केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीने एका ऑटोमधून ही सुटकेस दिल्ली बायपासवर नेली आणि तिथेच सांपला बस स्टँडजवळ ती फेकून दिली."
30 वर्षीय सचिन हा हिमानीचा एक वर्षांपासून फेसबुकवरचा मित्र होता. तो झज्जर जिल्ह्यातील खेरामपूर गावचा रहिवासी आहे. त्याला दोन मुलेही आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हिमानीच्या आईनं काय म्हटलं?
राजकारणामुळं माझ्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप हिमानीच्या आईनं केला आहे.
'एएनआय'ला त्यांनी म्हटलं की, "काँग्रेस पक्षासाठी माझ्या मुलीनं आपला जीवही धोक्यात घातला. निवडणूक आणि पक्षामुळंच तिचा मृत्यू झाला आहे."
त्या म्हणाल्या, "या हत्येमागं काँग्रेस पक्षाशी संबंधित किंवा एखादा जवळचा व्यक्ती असू शकतो. ती पक्षातील अनेकांच्या डोळ्यात सलत होती.
ती रात्री दोन-दोन वाजेपर्यंत निवडणुकांचं काम करत असे. हे हुड्डासाहेब आणि त्यांच्या पत्नी आशा हुड्डा यांनाही माहीत आहे. परंतु, अजूनही ते घरी आले नाहीत."

फोटो स्रोत, Facebook/Himani Narwal
मागील दहा वर्षांपासून माझी मुलगी घर आणि अभ्यासाकडं दुर्लक्ष करुन केवळ पक्षाच्या कामातच व्यस्त होती.
त्या म्हणाल्या, "ती भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या पत्नी आशा हुड्डांच्या खूप जवळची होती. मला त्यांना सांगायचं आहे की, जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही."
एवढ्या लहान वयात पक्षात पुढं आल्यामुळं पक्षातील लोकांमध्ये तिच्याबद्दल ईर्षा निर्माण झाली होती, असंही त्या म्हणाल्या.
वर्ष 2011 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाची हत्या झाली होती. त्या घटनेतही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही, असं त्या म्हणाल्या.
माझ्या धाकट्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला बीएसएफ कॅम्पमध्ये घेऊन गेले होते, असं त्यांनी सांगितलं.
"निवडणुकीनंतर माझ्या मुलीचा पक्षाबद्दल भ्रमनिराश झाला होता. तिला नोकरी करायची होती. पक्षासाठी आणखी काम करायची तिची इच्छा नव्हती. तिने लग्नालाही होकार दिला होता आणि आता ती एलएलबीचं शिक्षण घेत होती," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, ANI
मी 27 फेब्रुवारी दुपारी चार वाजेपर्यंत मुलीबरोबर रोहतकमध्ये होते. त्यानंतर मी दिल्लीला गेले, असं मृत महिलेच्या आईनं सांगितलं.
"रात्री मी तिच्याशी बोलले होते. उद्या माझा एक कार्यक्रम आहे. मी बोलू शकणार नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॉल करेन, असं ती म्हणाली. मी दिवसभर तिच्या फोनची वाट पाहिली."
"जेव्हा मी रात्री तिला फोन केला. तेव्हा तिचा फोन बंद होता. मी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला. तेव्हा दोन वेळा तिचा फोन चालू होता आणि कॉल फॉरवर्ड होत होता.
नंतर फोन पुन्हा बंद झाला. त्यानंतर दुपारी तीन वाजता मला पोलिसांचा फोन आला," असं त्या म्हणाल्या.
भूपिंदर सिंह हुड्डा यांनी काय म्हटलं?
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी ही घटना वेदनादायक असल्याचं म्हटलं. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये हरियाणा संपूर्ण देशभरात पहिल्या क्रमांकावर आहे. या घटनेबाबत मी पोलिसांच्या संपर्कात आहे.
याबाबत माझी पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जावी आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
महिलेच्या हत्येप्रकरणात काँग्रेसशी संबंधित एका व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले की, "तपासानंतर आपल्याला कळेल की दोषी कोण आहे. दोषी मग तो पक्षातील असो की बाहेरचा त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे."
ते म्हणाले की, "त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या आणि कधी-कधी पक्षाच्या कार्यक्रमांना येत असत. परंतु, घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही."

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले की, "मृतदेह अद्याप शवागारमध्ये असून काँग्रेस कार्यकर्ते तिथे गेले आहेत.
त्यांच्या घरी कोणी नाही. जेव्हा ते लोक येतील, आमचे स्थानिक आमदार भारतभूषण बत्रा त्यांना भेटण्यासाठी जातील."
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "महिलेचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
हरियाणात कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्टच राहिलेली नाही. गुन्हेगार बिनधास्त आहेत आणि महिलांची सुरक्षा संकटात आली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे."
भाजपनं काँग्रेसला घेरलं
भाजपचे राष्ट्रीय आयटी सेलचे निमंत्रक अमित मालवीय यांनी काँग्रेसवर महिला कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी 'एक्स'वर लिहिलं आहे की, "मुलीची हत्या तिच्या एखाद्या मित्रानं किंवा काँग्रेस नेत्यानं केली असावी, असं महिलेच्या आईचं म्हणणं आहे."
"ते म्हणतात की, त्यांची मुलगी भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या पत्नी आशा हुड्डा यांच्या जवळ होती. पण आता त्या फोन उचलत नाहीत.
तंदूर कांडनंतर आता सुटकेस कांड, महिला कार्यकर्त्यांचं शोषण आणि हत्या ही काँग्रेसची ओळख बनली आहे," असंही अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
"गुन्हेगार एखाद्या पक्षाचे असोत किंवा सामान्य व्यक्ती असो, त्यांना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पोलीस कारवाई करत असून लवकरच ते लोक तुरुंगात असतील," असं हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सचिव प्रवीण अत्रे म्हणाले.
काँग्रेसवर आरोप करत ते म्हणाले की, "पीडितेच्या आईने काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे."
"काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याविरोधात जघन्य अपराध घडतो, तिचे कुटुंबीय पक्षाच्या लोकांवरच शंका व्यक्त करतात. यावरून काँग्रेस कोणत्या प्रकारच्या अंतर्गत परिस्थितीला तोंड देत आहे हे दिसून येतं," असंही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











