'पैसे परत कर, नाहीतर लग्न कर' म्हणणाऱ्या महिलेची भर रस्त्यात हत्या, नेमकं प्रकरण काय?

- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या परिसरातील एका पुलावर भरदिवसा एका महिलेची तिच्या प्रियकराने धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. आर्थिक व्यवहार आणि प्रेम प्रकरणातून ही दुर्दैवी घटना झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीमा कांबळे असं नाव असलेल्या महिलेनं राहुल भिंगारकर नावाच्या तिच्या प्रियकराला काही पैसे मदत म्हणून दिले होते. मात्र या आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले. दरम्यान पैसे परत कर नाहीतर लग्न कर, अशी मागणी केल्यानं संतापलेल्या राहुलनं सीमा कांबळेंची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मात्र, या हत्येमुळे अंबरनाथमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेऊयात.
'त्या' दुपारी काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीच्या दुपारी राहुलनं सीमा कांबळेंना पैसे परत करण्याच्या बहाण्यानं भेटायला बोलावलं होतं. ठरल्याप्रमाणं अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या परिसरातील एका पुलावर ते दोघं भेटले देखील.

त्यावेळी त्या दोघांमध्ये पैसे परत करण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त राहुलनं दिवसाढवळ्या सीमा कांबळे यांच्यावर धारदार चाकूनं सपासप वार केले आणि तिथून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ तपास सुरू केला आणि या घटनेच्या अवघ्या काही तासांच्या आतच आरोपी राहुल भिंगारकरला ताब्यात घेतलं.
दरम्यान रक्तानं माखलेल्या सीमा कांबळे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.


प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर हे एकमेकांवर प्रेम करायचे. गेल्या काही वर्षांपासून सीमा आणि राहुल हे दोघंही अंबरनाथमधील बारकूपाडा भोईर चाळ परिसरात राहत होते.
एकाच परिसरात राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती. कालांतरानं या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यान राहुलला काही पैशांची गरज असल्यानं सीमा यांनी त्याला आर्थिक मदत केली.
सीमा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा यांनी राहुलला जवळपास 2 लाख 60 हजार रूपयांची मदत केली होती. हा आर्थिक व्यवहार पैसे परत करण्याच्या बोलीवर झाला होता.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून सीमा राहुलला आपले पैसे परत करण्यास सांगत होत्या. मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.
दरम्यान उसने दिलेले पैसे परत कर नाहीतर लग्न तरी कर असा तगादा सीमा कांबळे यांनी राहुलच्या मागे लावला. यामुळे संतापलेल्या राहुलनं सीमा यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
सीमा कांबळे या एकल पालक होत्या. आपल्या मुलीसोबत त्या राहायच्या, असं पोलिसांनी सांगितलं.
'पैसे घे नि मिटवून टाक'
सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक व्यवहाराच्या कारणांमुळे जे वाद सुरू होते त्याची कल्पना सीमा यांच्या कुटुंबीयांना होती. सीमा कांबळे हत्या प्रकरणावर त्यांच्या बहीण नंदा यांनी भाष्य केलं आहे.
एबीपी माझाशी बोलताना त्यांनी म्हटलंय, "त्या राहुलनं माझ्या बहिणीकडून उसने पैसे घेतले होते. 2 लाख 60 हजार माझ्या बहिणीनं त्याला दिलेले. प्रेमात त्यानं तिची फसवणूक केली. आपण प्रेम करायचं, लग्न करायचं असं म्हणायचा.
"परंतु जेव्हा मला माझे पैसे परत पाहिजेत अशी मागणी माझ्या बहिणीनं त्याला केली तेव्हा पैसे देतो म्हणाला. परंतु घरी गेल्यावर तिला म्हणाला की मी तुझी विकेट पाडेल," असं नंदा यांनी सांगितलं.

"तुला जर लग्न करायचंय तर अजून पाच लाख रुपये दे, तरच मी लग्न करेन. त्याच्यासोबत कालच हे सगळं बोलणं झालं होतं. परंतु आज तो तिला म्हणाला तू दुपारी भेटायला ये, तुला मी अडीच लाख रुपये देतो," असं नंदा यांनी सांगितलं.
दरम्यान सीमा कांबळे यांनी त्यांच्या बहिणीला ही सगळी हकीकत सांगितली होती. तेव्हा त्यांच्या बहिणीनं त्यांना हे प्रकरण मिटवून टाकायला सांगितलं होतं. यावर खुलासा करताना त्यांनी म्हटलंय, "मी तिला म्हणाले की तो पैसे देतोय तर तर पैसे घे, नी मिटवून टाक. पण नंतर तो तिला म्हणाला की मी तुला नाही सोडणार आणि तुझ्या पोरीला पण नाही सोडणार.
"राहुलची आई सीमाला म्हणाली की माझ्या पोराचं तुझ्या पोरीसोबत लग्न लावून दे, तेव्हाच मी तुझे पैसे परत देईन. त्याची आईपण त्याला मिळालेली आहे. त्याने तिला पैशाच्या बहाण्यानं बोलावलं आणि तिचा मर्डर केला," असंही पुढं त्यांनी सांगितलं.
पोलीस काय म्हणतात?
पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "प्राथमिक तपासात आम्हाला आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं आढळून आलं आहे. आरोपीनं पैसे परत न केल्यानं त्या दोघांमध्ये खूप वाद झाले होते.
"आरोपी काही काम करत नव्हता, त्याची पैसे परत करत करण्याची क्षमता नसल्यामुळे तसेच सीमा कांबळे यांनी वारंवार त्यासाठी तगादा लावल्यामुळे हा प्रकार घडलाय," असं गोरे यांनी सांगितलं.

दरम्यान राहुलनं सीमा कांबळेंची हत्या कशी केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती कशी मिळाली याबाबत खुलासा करताना म्हटलंय की, "आरोपीनं सीमा यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूनं वार केले आहेत. अंबरनाथमध्ये रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका पुलाजवळ ही घटना घडली," डायल 112 ला एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून या घटनेची माहिती दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
दरम्यान सीमा कांबळे हत्येप्रकरणात अटकेत असलेला आरोपी राहुल भिंगारकर याला 4 फेब्रुवारीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 7 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











