अर्धनग्न करून बॅटने मारहाण; थरारक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

व्हायरल व्हीडिओमध्ये दिसतंय की, एका व्यक्तीला दोन ते तीन जणांनी पकडलं आहे तर दुसरी एक व्यक्ती तिला बॅटने अतिशय अमानुषपणे मारहाण करते आहे.
    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

संतोष देशमुख हत्याकांडामुळे राज्यभरात खळबळ माजलेली असताना आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हीडिओ समोर आला आहे.

एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करतानाचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओमध्ये दिसतंय की, एका व्यक्तीला दोन ते तीन जणांनी पकडलं आहे, तर दुसरी एक व्यक्ती तिला बॅटने अतिशय अमानुषपणे मारहाण करत आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

सतीश भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, मारहाण करत असलेला व्यक्ती हा सतीश भोसले असून तो भाजपचा पदाधिकारी आहे. स्वत: त्यानेच 'आपण रागातून मारहाण केली असल्याचं' एका व्हीडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

विशेष म्हणजे ही व्यक्ती भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मारहाणीचा व्हीडिओ 'एक्स'वर शेअर करत 'हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का?' असा सवाल केला होता.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आदेशाने शिरूर पोलिसात आज (6 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सतीश उर्फ खोक्या याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे

संबंधित आरोपी सतीश भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात नुकतीच आणखी एक तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे.

हेदेखील अशाच स्वरुपाचं अमानुष मारहाणीचं प्रकरण आहे.

मात्र, या परिसरात त्याची इतकी दहशत आहे की, कुणीही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पुढे येत नाही, असं स्थानिक लोक सांगतात.

गेल्या महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी त्याने अशाच पद्धतीने शेतकरी दिलीप ढाकणे आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली होती.

सतीश भोसले उर्फ खोक्या
फोटो कॅप्शन, सतीश भोसले उर्फ खोक्या

या मारहाणीत दिलीप ढाकणे यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून समोरील भागाचे दात तुटले आहेत. तर मुलगा महेश याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.

अखेर आज दिलीप ढाकणे यांनी शिरूर पोलिसात तक्रार दाखल केली. याआधी देखील सतीश भोसलेच्या विरोधात अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अलीकडेच आणखी एका व्यक्तीला गंभीर मारहाण

दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश ढाकणे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत बीबीसीशी बातचित केली. त्यांनी सांगितलं, "शिरूर कासार तालुक्यातील बावी गावात आमची जेमतेम अडीच एकर शेती आहे. आरोपी सतीश भोसले हा वारंवार आमच्या शेतात हरीण पकडायला जाळे टाकत होता."

"अनेकदा सांगून देखील तो ऐकत नव्हता. मात्र 19 फेब्रुवारीच्या सकाळी माझे वडील दिलीप ढाकणे शेतात गेले असता त्यांना तिथे जाळे दिसले. त्यामुळे त्यांनी हे जाळे का टाकले असं विचारलं."

"असं विचारताच सतीश भोसले आणि त्याच्या भावांनी माझ्या वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यात मारले. तितक्यात मी पोहचलो आणि ओरडायला लागलो, तर त्यांनी मलाही जबर मारहाण केली, त्यात माझे पाय फॅक्चर झाले," असंही महेश ढाकणे यांनी नमूद केलं.

भाजप आमदार सुरेश धस यांच्यासमवेत सतीश भोसले
फोटो कॅप्शन, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासमवेत सतीश भोसले

महेश ढाकणे यांनी पुढे सांगितलं, "तशाच रक्तबंबाळ अवस्थेत आम्ही बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलो. मात्र, आम्हाला 'पहिले उपचार घ्या आणि मग तक्रार दाखल करायला या', असं सांगण्यात आलं."

"पुढे आम्हाला रुग्णालयात असतानाच जीवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या. त्यामुळे आम्ही घाबरून आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता," असं देखील महेश सांगतात.

सुरेश धस यांची कबुली

मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

काही फोटोंमध्ये तो भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत दिसतो आहे. काही रीलमध्ये तर तो आपल्या आलिशान गाडीत लाखो रुपये डॅशबोर्डवर फेकताना दिसतो. त्यामुळे, सुरेश धस यांचा सतीश हा कार्यकर्ता असल्याचं सांगून त्यांच्यावरही टीका होते आहे.

सुरेश धस यांचा सतीश हा कार्यकर्ता असल्याची टीका त्यांच्यावर होतीय.

फोटो स्रोत, Facebook/Suresh Dhas

फोटो कॅप्शन, सुरेश धस यांचा सतीश हा कार्यकर्ता असल्याची टीका त्यांच्यावर होतीय.

याबाबत बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं, "सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता आहे. सोशल मीडियावर आलेले व्हीडिओ मी पाहिले. आता संबंधित पोलीस स्टेशनला मी फोन केलाय. ही घटना दीड ते दोन वर्षे जुनी असून कोणत्या तरी कारखान्यावरती ही घटना घडली आहे."

"मुलीच्या छेडछाडीमधून ही घटना घडली असून यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. कायदेशीर कारवाई करावी याबाबत मी पोलिसांसोबत बातचीत केलीये", असं सुरेश धस यांनी म्हटलं.

'राग आला म्हणून मारहाण केली'

मारहाणीचा हा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्यावर त्याविषयी अधिकच चर्चा होऊ लागली. तसेच, सुरेश धस यांच्यासोबतच्या कनेक्शनमुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळताना दिसतंय. या पार्श्वभूमीवर आता सतीश भोसलेचा एक व्हीडिओ समोर आला आहे.

या व्हीडिओमध्ये तो म्हणाला, "हा व्हीडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेलाय. हा व्हीडिओ 2 ते अडीच वर्षांपूर्वीचा आहे. त्या व्हीडिओची खरी पार्श्वभूमी अशी की, माझे मित्र माऊली खेडकर यांचा फोन आला की, 'माझ्या घरी प्रॉब्लेम आलाय, तू जा'."

"मी घरी गेल्यावर मला कळालं की, संबंधित व्यक्तीने खेडकर यांच्या घरच्यांची छेड काढली होती. त्यावेळेस मला राग आला आणि मी रागाच्या भरात त्याला मारहाण केली," असा दावा त्याने केला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांच्याशी बीबीसीने संपर्क केला असता ते म्हणाले, "व्हायरल व्हीडिओसंबंधी आम्ही 'सुमोटो' गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्ती कोण आहे, त्याला कुठे आणि का मारहाण झाली हे ते पीडित व्यक्ती समोर आल्यानंतरच कळेल. संबंधित व्यक्तीचा शोध आम्ही घेत आहोत."

तर ढाकणे पिता-पुत्रांना झालेल्या मारहाणीबद्दल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून आम्ही त्याला शोधण्यासाठी दोन पथकं रवाना केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)