संतोष देशमुख हत्या प्रकरण: सरपंचाचे अपहरण-हत्या ते मंत्र्याचा राजीनामा, आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम?

संतोष देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Sandeep Kshirsagar

फोटो कॅप्शन, संतोष देशमुख
    • Author, प्रियांका जगताप
    • Role, बीबीसी मराठी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज (4 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.

त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागच्या काही दिवसांंमध्ये महाराष्ट्रात अनेक आंदोलनं देखील झाली होती.

9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं.

तेव्हापासून संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांकडून तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

दरम्यान 3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली.

या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. आरोपी हे त्यांना मारहाण करत असताना हसताना दिसत आहेत.

हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत.

या क्रूर हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यावर त्यांच्या कुटुंबीयांनी भाष्य केलं होतं.

संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे देखील होते. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवराज देशमुख यांनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला.

संतोष देशमुख आणि आरोपी
फोटो कॅप्शन, संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार, "घटना घडली त्या दिवशी दुपारी 2.30 च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमधे भेटले. त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते. शिवराज देशमुख गाडी चालवत होते, तर संतोष देशमुख त्यांच्याशेजारी बसले होते."

"दरम्यान डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं. त्या गाडीतून 5-6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले.

"नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले."

संतोष देशमुख

फोटो स्रोत, sureshdhas/facebook

फोटो कॅप्शन, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विविध नेत्यांनी मस्साजोग गावाला भेटी दिल्या आहेत

पुढे त्यांनी सांगितलं की, "या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीटजवळ आला, तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरणकर्ते सरपंच संतोष देशमुखांना घेऊन गेले होते."

या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले, सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले. त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला.

शिवराज देशमुख पुढे सांगतात की, "या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं. त्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटांत शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले.

"दरम्यान, अपहरणाच्या जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली."

हत्येमागचं कारण काय?

सरपंच संतोष देशमुख यांच्या या निर्घृण हत्येमागं काय कारण असावं, याबद्दल बोलताना धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात देखील हा उल्लेख आहे.

धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणं, "6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती.

"त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती."

त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला.

धनंजय देशमुख गावकऱ्यांसोबत

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, धनंजय देशमुख यांचं सांत्वन करताना गावकरी

धनंजय यांनी एका मुलाखतीत टीव्ही 9 मराठी म्हटलं होतं की, "केज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेता तीन तास टाईमपास केला. जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली.

"पोलिसांनी लवकरात लवकरात तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई सुरू केली असती, तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता," असंही ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरील कारवाईवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केलं आहे."

वाल्मिक कराडांवरून राजकीय गदारोळ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती.

संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली.

तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं की, "राज्यात कायदा सुव्यस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो. वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जातंय, त्या नेत्याला मंत्रिपद दिलं जातं."

महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले.

महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते

फोटो स्रोत, Facebook/Ambadas Danve

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहिती आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलीही घेतली जात नाही. चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात."

तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी समाजमाध्यमावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

त्यांनी म्हटलं की, "आज विधिमंडळ परिसरात केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या संदर्भाने न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासले तर यातील सत्य पुराव्यासह पुढं येईल."

संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांनी देखील यांनी या आरोपांना उत्तर दिलं.

धनंजय मुंडे म्हणाले की, "स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे. हे हत्या प्रकरण राजकारणातून नव्हे तर कामाच्या व्यवहारातून झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकरणात राजकारण आणि जातपात आणून कोणीही आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचं म्हटलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येसंदर्भातील काही लोकांवर कारवाई केली तर काहींचं निलंबन केलं तर काहींना घरी पाठवलं आहे. 3 आरोपी सापडले आहेत तर 4 आरोपी लवकरच सापडतील. शिवाय हे प्रकरण आता सीआयडीला दिलं आहे."

आरोपपत्रात काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

तर आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक दोनमध्ये विष्णू चाटेचा उल्लेख आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचंही यात म्हटलं आहे.

वाल्मिक कराडने विष्णू चाटेचा मोबाईल वापरून आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसंच 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरूनही कराडने खंडणी मागितली होती.

वाल्मिक कराड

फोटो स्रोत, Facebook/Walmik Karad

फोटो कॅप्शन, पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुखांच्या गावामध्ये सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेंशी अवादा पवनचक्की प्रकल्पावरती वाद घडला होता.

या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याचं समोर येत आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हीडिओही सीआयडीकडे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आता या प्रकरणी सुनावणी होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड मुख्य आरोपी असेल.

आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम

  • 9 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली. पवनचक्की वादावरून पेटलेल्या या प्रकरणामुळे संतोष देशमुखांना त्यांचा जीव गमवावा लागला.
  • 10 डिसेंबरला म्हणजे हत्येच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. संतप्त ग्रामस्थ आणि त्यांच्या कुटुंबाकडून या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी ते सुमारे 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गवर आंदोलन देखील करण्यात आलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्या ठिय्या आंदोलनात सहभागी देखील झाले. त्यानंतर मध्यस्थी करून त्यांनी हे आंदोलन मागे घ्यायला लावलं. नंतर त्याच दिवशी या प्रकरणातील दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्या दिवशी संतोष देशमुखांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर हे प्रकरण देशमुखांचे कुटुंबीय, मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थांच्या मागणीमुळे सीआयडीकडं सोपवलं गेलं.
  • 11 डिसेंबरला या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात देशमुखांचं अपहरण आणि हत्या केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदिप क्षीरसागर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके या दोघांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या भेटी दरम्यान संदिप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराडवर आरोप केले. त्यानंतर वाल्मिक कराड, अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं. मात्र सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या फरार आरोपींचा शोध चालूच राहतो.
  • 12 डिसेंबरला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपींच्या 'आका'वर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तेव्हापासून धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात चर्चेचा विषय बनत गेलं.
  • 13 डिसेंबरला बीड जिल्ह्यात बंद पुकारला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून सीआयडीचे महासंचालक प्रशांत बुर्डे बीडमध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये दोन दिवस थांबले.
  • 14 डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं तर आरोपी विष्णू चाटेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, नव्या सरकारच्या नागपूरातील पहिल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाबाबत बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड आणि नमिता मुंदडा यांनी न्यायाची मागणी केली.
  • त्यानंतर 18 डिसेंबरला फरार आरोपी विष्णू चाटेला अटक झाली.
धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 4 मार्चला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
  • 19 डिसेंबरला संतोष देशमुखांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील आला. त्यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळल्याचं आणि मारहाणीत त्यांच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
  • 20 डिसेंबरला बीडचे एसपी अविनाश बारगळ यांच्या तात्काळ बदलीबाबत आणि बीडमधील इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात माहिती दिली.
  • 21 डिसेंबरला नवनीत कॉवत यांची बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारतात. या दिवशी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनीत कॉवत देशमुख कुटुंबाची भेट घेतात.
  • 24 डिसेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या खंडणी आणि मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला.
  • 28 डिसेंबरला वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्यदिव्य मोर्चा निघाला. इथून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.
  • 30 डिसेंबरला याच कारणासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
  • 31 डिसेंबरला वाल्मिक कराड दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सीआयडीला शरण आला. त्या दिवशी त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं कराडला 14 दिवसांसाठी कोठडीत पाठवलं.
  • 4 जानेवारीला या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाली.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 जानेवारी रोजी केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यावर मकोका लावून त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. मात्र, त्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत निदर्शनं करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, 3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसले. त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढताना दिसले. त्यांना मारहाण करत असताना हसताना दिसले.

त्यामुळे अखेर 4 मार्चला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

पुढील सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)