हम्पीत इस्रायली महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप आणि हे कृत्य करण्यापासून रोखणाऱ्याची हत्या

महिला अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कर्नाटकमध्ये इस्रायली पर्यटकासमवेत दोन महिलांवर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पुरुषाची हत्या झाली आहे.

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पीमध्ये ही घटना घडली आहे.

महिलांवर बलात्कार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची हत्या आरोपींकडून करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीमधून एका पुरुषाचा मृतदेह सापडला. ही व्यक्ती मूळची ओडिशाची असून दोन महिलांना बलात्कारापासून वाचवण्याच्या प्रयत्न करत होती.

त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली आहे. या दोन महिलांपैकी एक महिला ही इस्रायलची आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बिभाष (26) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यासमवेत डॅनियल नावाचा एक अमेरिकन व्यक्ती तसेच पंकज पाटील नावाचाही व्यक्ती होता. या तिघांवरही तीन आरोपींकडून हल्ला करण्यात आला आणि त्यांना तुंगभद्रा नदीमध्ये ढकलून देण्यात आलं.

या तीन आरोपींनी त्यांच्यासोबतच्या दोन महिलांवर बलात्कार केला. त्यातील एक महिला ही इस्रायलची पर्यटक असून दुसरी केरळची आहे. तर दुसरी महिला ही केरळ येथे होमस्टेमध्ये केअरटेकरचे काम करते.

पोलिसांनी काय सांगितलं?

सध्या या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या अटकेविषयीची माहिती देताना कोप्पल जिल्ह्याचे एसपी राम. एल. अरासिद्दी यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला बिभाषचा मृतदेह नदीच्या प्रवाहात सापडला आहे. खुनाच्या प्रकरणात आम्ही खूनाचा प्रयत्न आणि बलात्काराचेही आरोप जोडले आहेत."

ही घटना सहा मार्च रोजी रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हे पाचही जण हम्पीजवळील सानापूरच्या दुर्गाम्मा मंदिराजवळ रात्रीच्या आकाशातील तारे पाहण्यासाठी गेले होते.

मूळची केरळ असणाऱ्या महिलेने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. हे तीनही आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळी आले आणि त्यांनी पेट्रोल कुठे मिळू शकेल, अशी विचारणा केली.

त्यावेळी, केरळच्या या महिलेने त्यांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या तीन आरोपींनी या पर्यटकांकडून शंभर रुपये मागितले. त्यांनी यास नकार दिला तेव्हा त्यांनी त्यांच्याशी भांडणास सुरुवात केली आणि त्यांच्यावर हल्लाही केला.

महिला अत्याचार

फोटो स्रोत, Getty Images

दोन आरोपी अटकेत

केरळच्या या महिलेने सांगितलं की, "त्यांनी डॅनियल, पंकज आणि बिभाषला कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ढकलून दिलं. तिसऱ्या एका व्यक्तीनं मला दगड फेकून मारला. मला प्रचंड मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. तिघांपैकी दोघांनी मिळून मला ओढत कालव्याच्या कडेला नेलं आणि माझे कपडे फाडले. त्याच प्रकारे, त्यांनी तिलाही (इस्रायली पर्यटकाला) ओढून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला."

कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पीमध्ये ही घटना घडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पीमध्ये ही घटना घडली आहे.

"हे तीनही आरोपी कन्नड आणि तेलुगू भाषेत बोलत होते," असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, "कदाचित या महिलांकडून पैसे हिसकावून घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा. या प्रकरणातील सगळे आरोपी हे कोप्पलमधील गंगावती तालुक्याचे रहिवाशी आहेत."

"अटक करण्यात आलेले दोघेही बिल्डींग कंस्ट्रक्शनचे काम करणारे गवंडी आहेत. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरु आहे. तोदेखील गवंडीच आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)