क्लारा झेटकीन : महिला दिन सुरू करणारी 'बंडखोर' नायिका, जिनं हिटलरच्या उघड विरोधाचं धाडस केलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रदीप बिरादार
- Role, बीबीसी मराठीसाठी
आज 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून वाजतगाजत साजरा केला जात असला तरी या ऐतिहासिक दिनामागचा क्रांतीक्रारी इतिहास बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उगम हा खरंतर महिला काममार चळवळीच्या संघर्षात दडलेला असून एका साम्यवादी महिलेनं महिला कामगारांचं शोषण रोखून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली होती.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा हा प्रस्ताव पहिल्यांदा मांडणारी ही क्रांतीकारी महिला म्हणजे क्लारा झेटकीन.
1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत क्लारा झेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यावेळी अमेरिकेतील महिला कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाची नोंद घेत क्लारा झेटकीन यांनी हे पाऊल उचललं होतं. पण यामागे त्यांनी बरीच वर्ष महिला आणि कामगारांच्या लढ्यासाठी खर्ची घालत रचलेला सैद्धांतिक पाया देखील तितकाच महत्त्वाचा होता.
त्या अर्थाने अमेरिकेतील महिला कामगारांचं आंदोलन हे फक्त एक निमित्त ठरलं. कामगारांचे प्रश्न सोडवल्याशिवाय महिलांना न्याय मिळवून देणं शक्य नाही, हे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं क्लारा झेटकीन यांनी ठासून सांगितलं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात
1907 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कामगारांंनी विविध मागण्यांसाठी एक संप पुकारला. मुख्यतः तिथल्या कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या या महिला कामगार होत्या.
वेतनवाढ, कामाच्या तासांचं नियमन आणि कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार या तीन प्रमुख मागण्यांसाठी सुरू झालेला हा संप बघताबघता एका राष्ट्रीय आंदोलनाचा भाग बनला.
1909 साली तर या आंदोलनात न्यूयॉर्क शहरातील कापड उद्योगामधील तब्बल 20 हजार कामगारांनी 13 दिवसांचा संप पुकारला. या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली.
त्यातूनच प्रेरणा घेत कोपनहेगन परिषदेत कामगारांचे हक्क आणि महिलांचा समतेचा अधिकार अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव क्लारा झेटकीन यांनी मांडला.
यानंतर प्रत्येक वर्षी युरोपात 8 मार्च रोजी कामगार व महिलांचे भव्य मोर्चे निघायला सुरूवात झाली. ही फक्त एक सामाजिकच नव्हे तर राजकीय चळवळ बनली.
कामगार प्रश्न हा चळवळीचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच 1917 साली रशियात घडलेल्या साम्यवादी क्रांतीतही या चळवळीचं योगदान महत्वाचं ठरलं. त्यावेळी नेमका पहिल्या महायुद्धाचे चटके सोसणाऱ्या रशियाची स्थिती फारच हलाखीची बनली होती.
युद्धातील संहारात झालेल्या अपरिमित हानीमुळे लोक उपासमारीने ग्रस्त होते. अशावेळी 1917 च्या 8 मार्च रोजी निघालेल्या आपल्या मोर्चात महिला कामगारांनी अन्नाच्या अधिकारासाठी सुद्धा हाक दिली आणि तिथूनच रशियन राज्यक्रांतीची ठिणगी पेटली. या सगळ्या घडामोडींमागे क्लारा झेटकीन यांची भूमिका महत्त्वाची होती.
राजकीय कारकीर्द
क्लारा झेटकीन यांचा जन्म 15 जुलै, 1857 रोजी जर्मनीतील सॅक्सॉन गावात झाला. तरुण वयात जर्मनीतील लेपझिक शहरात शिक्षण सुरू असताना रशियातून हकालपट्टी करण्यात आलेल्या मार्क्सवादी विद्रोही बंडखोरांच्या त्या संपर्कात आल्या.
इथेच त्यांची मार्क्सवाद आणि साम्यवादी विचारधारेशी ओळख झाली आणि या विचारांंनी त्या प्रभावीत झाल्या. ओसिप झेटकीन हे सुद्धा रशियातून निष्कासित करण्यात आल्यानंतर जर्मनीत आश्रयाला आलेल्या या राजकीय बंडखोरांपैकी एक होते.
क्लारा आणि ओसिप यांचं नंतर सूत जुळलं आणि ते दोघे एकत्र आले. अर्थात या दोघांचा कधी अधिकृत विवाह झाला नसला तरी आयुष्यभर या दोघांनी एकमेकांची जोडीदार म्हणून साथ दिली.
या दोघांना दोन अपत्य देखील होती. विवाह झालेला नसला तरी नंतर क्लारा यांनी आयुष्यभर झेटकीन हेच आडनाव धारण केलं.
रशियातील या मार्क्सवादी गटासोबत क्लारा झेटकीन जोडल्या गेल्यानंतर पुढच्या काही काळातच जर्मनीचे तत्कालीन चान्सलर ओट्टो व्हॉन बिस्मार्क यांनी देशात साम्यवाद विरोधी कायदा लागू केला.
या कायद्यांतर्गत साम्यवादी विचार बाळगणंच मोठा गुन्हा होता. त्यामुळे क्लारा व ओसिप झेटकीन यांना जर्मनीतून पलायन करावं लागलं.


आपल्या बंडखोर विचार आणि राजकीय भूमिकांमुळे झेटकीन जोडप्याला कायमच त्रास सहन करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही. 1880 साली या जोडप्यानं जर्मनीतून पलायन करत आधी स्वित्झर्लंड व नंतर फ्रान्समध्ये आश्रय घेतला. पण तिथे सुद्धा आपल्या विद्रोही राजकीय पार्श्वभूमी आणि बंडखोरीमुळे विपरीत परिस्थितीच राहावं लागलं.
कुठलंही आर्थिक व सांसारिक स्थैर्य न लाभल्यामुळे गरिबीत आजारपणाला बळी पडून 1889 साली ओसिप झेटकीन यांचा मृत्यू झाला. पण जोडीदाराच्या मृत्यूनंतरही क्लारा झेटकीन मागे हटल्या नाहीत आणि त्यांनी आपला क्रांतीचा लढा तसाच नेटाने सुरू ठेवला.
1890 साली जर्मनीतील साम्यवादावरील बंदी उठल्यानंतर क्लारा झेटकीन आपल्या मायदेशी परतल्या. जर्मनीत परतल्यानंतरही त्यांनी आपलं साम्यवादी विचारधारेशी समर्पित कार्य तितक्यात नेटाने सुरू ठेवलं. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या जर्मनीतील आघाडीच्या समाजवादी पक्षाच्या त्या सदस्य बनल्या.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या वक्तृत्व, लेखन आणि संघटना कार्यातील कौशल्यामुळे त्यांनी लवकरच पक्षावर मोठी छाप पाडली. देशभरात सोशल डेमोक्रॅटिक पक्षाची ताकद वाढवण्यात त्या यशस्वी झाल्या.
डे ग्लेचिएट या पक्षाच्या दैनिकाच्या त्या संपादक बनल्या. पक्षाच्या दैनिकाच्या संपादक म्हणून पुढील 25 वर्ष ही जबाबदारी त्यांनी अतिशय यशस्वीरीत्या पार पाडली.
यादरम्यान संपादक म्हणून त्यांनी केलेलं वर्तमानपत्रीय लिखाण अतिशय महत्वाचं आहे. आपल्या लिखाणातून जर्मनीतील महिला कामगारांना पक्षात समावून घेण्यात त्या यशस्वी झाल्या.
याशिवाय आपल्या ओघवत्या वकृत्व कौशल्यामुळे अनेक सार्वजनिक व्यासपीठावरून त्या वेळोवेळी देत असलेल्या धारदार भाषणामुळे देखील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाची लोकप्रियता आणि जनसहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय जर्मनीतील अनेक कामगार संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार संघटनांची एकत्र मोट बांधून समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या प्रश्नांवर संप न आंदोलनं त्यांनी जर्मनीत उभारली.
यातून कामगारांचे विशेषत: महिला कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आणले. या राजकीय आणि संघटनात्मक कार्यातून त्यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता आणि जनसहभाग वाढवला. या कार्यात त्यांना रोझा लक्झेमबर्ग आणि कार्ल लेबनेश्तसारख्या लोकांची तगडी साथ मिळाली.
कामगारांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत भांडवली व्यवस्थेविरोधात वर्गलढा उभारण्याला त्यांचं प्राधान्य होतं. आपल्या वाढत्या प्रभाव आणि लोकप्रियतेमुळे लवकरच त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्या बनल्या.
राष्ट्रवादाला नाकारत दिली युद्धबंदीची हाक
पण 1914 साली पहिलं महायुद्ध सुरू झाल्यावर क्लारा झेटकीन, रोझा लक्झेमबर्ग आणि कार्ल लेबनेश्त यांनी युद्धाविरोधी भूमिका घेतली.
त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षानं आपल्या देशाला युद्धात समर्थन देण्याची राष्ट्रवादी भूमिका घेतली. पण युद्ध नकोच अशा आपल्या पक्षाविरोधी भूमिकेवर क्लारा झेटकीन ठाम होत्या.
यासाठी त्यांनी 1915 साली स्वित्झर्लंडमध्ये महिलांची आंतरराष्ट्रीय शांतता परिषद बोलावली. जगभरातील साम्यवादी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन या युद्धाला विरोध करावा, असं अपील त्यांनी आपल्या भाषणात केलं.

फोटो स्रोत, Getty Images
"हे महायुद्ध वसाहतवादी राजवटी वसाहतींवर कब्जा मिळवण्यासाठी लढत आहेत. दोन राष्ट्रांमध्ये होणाऱ्या या युद्धात फायदा हा दोन्हीकडील भांडवलदार वर्गाचा आणि तोटा दोन्हीकडील कामवर्गाचा होणार आहे.
हे युद्ध लढून शस्त्रनिर्मिती करणारे भांडवलदार खोऱ्याने नफा कमावतील. त्यांना आपलं रक्त सांडावं लागणार नाही. कारण ते कधी युद्धभूमीवर उतरणार नाहीत. उलट दोन्ही देशांतील कामगार व सामान्य गरिब लोकांनाच एकमेकांच्या जीवावर उठवून त्यांचं रक्त सांडलं जाईल.
दुसऱ्या राष्ट्रांना आपल्या वसाहती बनवून त्यावर कब्जा मिळवण्यासाठी हा भांडवलदार वर्ग आपल्यावर युद्ध लादत आहे. त्यांना या वसाहतींमधून नैसर्गिक साधनसंपत्ती उकळायची आहे आणि आपल्या उत्पादनासाठी अधिकचा नफा कमवायला नवीन बाजारपेठ निर्माण करायची आहे.
त्यामुळे भांडवदार वर्गाच्या या नफ्याच्या मोहीमेत कामगारांनी सहभागी होता कामा नये. जगभरातील कामगारांनी एकत्र येत या युद्धाला विरोध करावा आणि आंतरराष्ट्रीय शांततेला प्राधान्य द्यावं," अशी स्पष्ट भूमिका क्लारा झेटकीन यांनी घेतली होती.
पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे सोशल डेमोक्रॅटिक पार्टीनं क्लारा झेटकीन व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
आपल्या आंतरराष्ट्रीय कामगार एकजुटीच्या साम्यवादी भूमिकेतून मग त्यांनी 1917 साली इंडिपेंडंट सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या नव्या पक्षाची स्थापना करत वेगळी मोट बांधली.
1919 साली त्या जर्मनीतील नव्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य बनल्या व त्यावेळेच्या जर्मन संसदेत प्रतिनिधी म्हणून देखील काम केलं. पण सोशल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आल्यावर युद्धाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्टांचा उठाव ठेचून काढण्याची मोहीम सरकारनं चालवली.
लक्झेमबर्ग आणि लेबनेश्त या त्यांच्या सहकाऱ्यांना तत्कालीन जर्मन सरकारनं राजद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली. खुद्द क्लारा झेटकीन यांनादेखील युद्धाला विरोध केल्याबद्दल कारावासाची शिक्षा झाली.
ज्या पक्षाला इतकी लोकप्रियता त्यांनी जर्मनीत मिळवून दिली त्याच पक्षानं सत्तेत आल्यावर क्लारा झेटकीन यांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबलं.
कामगार लढ्याला केंद्रस्थानी ठेवत स्त्रीवादाची मांडणी
महिलांच्या प्रश्नांवर क्लारा झेटकीन यांनी सातत्यानं आवाज उठवला. मात्र महिलांच्या शोषणावरील त्यांचं आकलन हे मार्क्सवादी होतं.
त्यामुळे त्यावेळच्या मुख्यप्रवाहातील बुर्ज्वा स्त्रीवादाशी फारकत घेत त्यांनी महिला प्रश्नाला वर्गीय लढ्याशी जोडत स्वतंत्र विचार मांडला.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार असावेत, याबाबत दोन्ही स्त्रीवादी गटांमध्ये एकमत असलं तरी महिलांच्या शोषणाचं प्रमुख कारण हे भांडवलशाही आहे, असं क्लारा झेटकीन यांचं ठाम मत होतं.
महिलांच्या शोषणावर साम्यवादी विचारधारेतून तोडगा काढण्यासाठी क्लारा झेटकीन यांनी फ्रेडरिक एंगेल्स आणि ब्लादिमिर लेनिन यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. भांडवली अर्थव्यवस्था कशाप्रकारे महिलांचं व्यवस्थात्मक शोषण करते, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
"भांडवली व्यवस्थेतील वर्गीय हितसंबंध हा सर्व प्रकारच्या शोषणाचं मूळ आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर पुरुष कामगार विरूद्ध महिला कामगार असं चित्र उभा करणं मूर्खपणाचं ठरेल.
पुरुष विरूद्ध स्त्री अशा लढ्याऐवजी दोघांनी एकत्र येऊन समस्त कामगार वर्गाचं हित जोपासण्यासाठी भांडवलाचा विरोध केला पाहिजे. भांडवली व्यवस्थेत कामगार विरुद्ध भांडवलदार हाच लढा केंद्रस्थानी असून बहुसंख्याक कामगारांबरोबरच बहुसंख्याक महिलांचं शोषण करणारा प्रमुख शत्रू हा भांडवलदार वर्गच आहे. त्यामुळे फक्त महिलांना नावापुरता पुरूषांप्रमाणे समान अधिकार मिळावा, इतक्यापुरतीच आपली लढाई मर्यादीत नाही.
स्त्रिया जरी कायद्याच्या भाषेत पुरुषांच्या बरोबरीत आल्या तरी ही भांडवली व्यवस्था तशीच कायम राहिल्यास पुरुषांप्रमाणेच महिला कामगारांचंही शोषण तसंच कायम राहील.
कामगार म्हणून होणाऱ्या या शोषणाव्यतिरिक्त कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाचा आधारही पुन्हा ही भांडवली व्यवस्थाच आहे. कारण खासगी संपत्ती हा या पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा आधार आहे.
आपल्या वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या या खासगी संपत्तीचं जतन करण्यासाठी भांडवली व्यवस्था पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा पुरस्कार करते. कौटुंबिक अथवा आर्थिक रचनेत स्त्रियांना दुय्यम स्थान हे फक्त पितृसत्ताक वृत्तीमुळे नाही तर भांडवली व्यवस्थेमुळे दिलं गेलंय. त्यामुळे ही भांडवली व्यवस्था उलथवून लावत समाजवाद निर्माण झाल्यावरच स्त्रियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल," अशी स्पष्ट मार्क्सवादी भूमिका क्लारा झेटकीन यांनी घेतली होती.
अनेक वर्ष वर्तमानपत्रांमधून केलेल्या आपल्या लिखाणात आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून दिलेल्या आपल्या भाषणात त्यांनी हे सगळे मुद्दे सातत्याने लावून धरले होते.
कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स आणि ब्लादिमिर लेनिन यांनी रचलेल्या मार्क्सवादी सिद्धांतांना प्रमाण मानत स्त्री मुक्तीची उदारमतवादापासून वेगळी वाट क्लारा झेटकीन यांनी चोखाळली.
स्त्रियांचे प्रश्न मांडताना त्यांनी बहुसंख्याक कामगार विरुद्ध अल्पसंख्याक भांडवलदार ही वर्गलढ्याची भाषाच कायम ठेवली. भांडवली रचनेतील वर्गीय हितसंबंध लक्षात न घेता स्त्री प्रश्नावरील बुर्ज्वा चर्चा त्यांना निरर्थक वाटत असे.
बुर्ज्वा स्त्रीवादातून स्त्रियांचे प्रश्न तात्पुरते सुटणार असले तरी पुन्हा नव्याने अधिक गंभीर स्वरूप धारण करतील आणि शोषणाचं हे चक्र असंच चालू राहील, असं त्या मानत असतं. उदारमतवादी मांडत असलेला स्त्रीवाद एकाच वर्गातील स्त्रियांना त्यांच्याच वर्गातील पुरुषांच्या बरोबरीने स्थान मागण्यापुरता मर्यादीत आहे.
याउलट वर्गव्यवस्था नाकारून सगळ्याच आर्थिक स्तरातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क असावेत, अशी भूमिका क्लारा झेटकीन यांनी घेतली.
त्याकाळात म्हणजे 100 वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी मताचा व समान वेतनाच्या अधिकाराबरोबरच स्त्रियांच्या प्रजननाच्या हक्कासाठी आवाज उठवत त्यांनी स्त्रियांसाठी गर्भपाताच्या अधिकाराची मागणी केली होती. यावरूनच क्लारा झेटकीन यांच्यामधील दूरदृष्टी आणि पुरोगामित्व दिसून येतं.
सोव्हियत रशियात याच मार्क्सवादी भूमिकेतून स्त्री प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी लेनिन सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं.
या विषयी लेनिनसोबत त्यांच्या झालेल्या चर्चा व मुलाखती अतिशय प्रसिद्ध आहेत. कम्युनिस्ट राजवटीखालील सोव्हियत रशियामध्ये महिला संबंधित जी धोरणं राबवली गेली त्यात क्लारा झेटकीन यांचाही मोठा वाटा होता.

स्त्रीप्रश्नावरील क्लारा झेटकीन यांचं त्याकाळचं मार्क्सवादी आकलन त्यावेळच्या इतर उदार स्त्रीवादी आकलनापेक्षा किती व्यापक आणि प्रभावी होतं, याचं एक उदाहरण म्हणजे स्कॉट्सबोरो बॉयज खटला.
1932 साली चालत्या रेल्वेत दोन श्वेतवर्णीय महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अमेरिकेतील अलाबामामध्ये 9 कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. नंतर वर्णद्वेषातून हे खोटे बलात्काराचे आरोप या कृष्णवर्णीय मुलांवर लादले गेल्याचं सिद्ध झालं.
रेल्वेत कृष्णवर्णीयांना आपल्यासोबत प्रवेश मिळू नये म्हणून श्वेतवर्णीय प्रवाशांनी त्यांच्यावर बलात्काराचा खोटा आळा घातला होता.
पण तोपर्यंत अमेरिकेच्या वर्णद्वेषी न्यायव्यवस्थेनं घाईने हा खटला चालवून या निर्दोषांना शिक्षा देखील सुनावून टाकली होती.
या मुलांची शिक्षा रद्द व्हावी यासाठी क्लारा झेटकीन यांनी त्यावेळी आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली. अशी मोहीम चालवणारा साम्यवादी पक्ष हा त्यावेळी अमेरिकेतील एकमेव पक्ष होता.
अन्यथा इतर सर्व पक्ष व स्त्रीवादी संघटना ही शिक्षा योग्यच असल्याचा घाईचा निष्कर्ष काढून मोकळ्या झाल्या होत्या. पण या खटल्यात वर्णद्वेष आणि वर्गद्वेषाचंही गमक दडलेलं आहे, हे हेरून 'कथित' आरोपींची शिक्षा रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या क्लारा झेटकीन या जगातील एकमेव स्त्रीवादी होत्या.
वर्ण आणि वर्ग संबंध समजून घेतल्याशिवाय स्त्रीप्रश्नाला भिडणं किती मारक ठरू शकतं, याचं ही घटना म्हणजे बोलकं उदाहरण आहे.
फासीवादाला उघड आव्हान देण्याची धमक
इटलीत 1922 साली मुसोलीनीची सत्ता आल्यानंतर फासीवादाविरोधात देखील त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली.
यानंतर जर्मनीवर देखील फासीवादाची धोक्याची घंटा टांगलेली असल्याचं त्यांनी वेळीच ओळखलं. यावर 1923 साली फायटिंग फॅसिझम नावाचं पुस्तक देखील त्यांनी लिहीलं.
फॅसिझमच्या उदयाची कारणं आणि फॅसिझमचा पाडाव करण्यासाठीची उपाययोजना त्यांनी या पुस्तकात विस्ताराने मांडली.
फासीवाद फोफावण्यासाठी अनुकूल परिस्थिती जर्मनीत निर्माण होत असून कामगार लढा उभारून वेळीच त्याचा पाडाव केला नाही तर हा भस्मासूर कधीही आपलं डोकं वर काढू शकतो, अशी धोक्याची सूचना त्यांनी 1923 साली जर्मनीला देऊन ठेवली होती. आणि 9 वर्षांनी 1932 साली जर्मनीत हिटलर सत्तेत आला.
यावरून क्लारा झेटकीन यांची दूरदृष्टी आणि अभ्यास लक्षात येतो. अतिरेकी राष्ट्रवाद, कामगार चळवळीवर होणारी आक्रमक कारवाई, त्यासाठी पोलीस व लष्करी बळाचा वाढता वापर, भांडवलाचे हितसंबंध जोपासण्यासाठी सरसावलेली राज्यव्यवस्था ही सगळी फासीवादाच्या आगमनाची चिन्ह असल्याचा इशारा क्लारा झेटकीन यांनी 1923 सालीच दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images
घसरत्या अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यात अपयश आल्यानंतर भांडवली व्यवस्था लोकांचा रोष मूळ मुद्द्यावरून भरकटवत भांडवलाचं हित जोपासण्यासाठी 'खोटा' शत्रू उभा करणाऱ्या फासीवादाचा आश्रय घेते, असं त्या मानायच्या.
नाझी पक्ष सत्तेत आल्यानंतरही जीवाची पर्वा न करता हिटलरला उघड विरोध करण्याची हिंमत क्लारा झेटकीन यांनी दाखवली.
30 ऑगस्ट 1932 रोजी आयुष्याच्या उत्तरार्धात तब्येत साथ देत नसताना जर्मन संसदेत जाऊन सत्ताधारी नाझी पक्षावर उघड टीका करत तब्बल एक तासाचं धारदार भाषण त्यांनी दिलं.
कम्युनिस्ट पक्षाच्या संसदेतील सर्वात ज्येष्ठ प्रतिनिधी या नात्याने दिलेल्या या आपल्या शेवटच्या भाषणात देखील कामगारांनी एकत्र येऊन समाजवादी क्रांती घडवून आणावी आणि फासीवादाचा पाडावा करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
वृद्धापकाळाने जवळपास अंध आणि चालताही येत नसताना नाझींची सत्ता असलेल्या संसदेत जाऊन कामगारांचं राज्य आणण्याचं स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं. अर्थात पुढच्या काही दिवसातंच हिटलरची जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली. आणि चान्सलर बनताच हिटलरने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली. क्लारा झेटकीन यांनी रशियात आश्रय घेतला.
नाझींच्या सत्तेखालील जर्मन संसदेत हे धारदार भाषण दिल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यात त्यांचा वृद्धापकाळाने 20 जून 1933 रोजी मृत्यू झाला.
पण क्लारा झेटकीन यांनी जवळपास 100 वर्षांपूर्वी महिलांचे प्रश्न, कामगारांचे शोषण, युद्धाची निरर्थकता आणि फासीवादाचा धोका अशा अनेक विषयांवर करून ठेवलेली मांडणी आजही तितकीच संयुक्तिक व दिशादर्शक आहे.
आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी फक्त उत्सवीकरणात न अडकता हा दिवस नेमका साजरा कशासाठी केला जातो, याचा विसर न पडू देणं हीच क्लारा झेटकीन यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











