आंतरराष्ट्रीय महिला दिनाला महत्त्व का आहे? जाणून घ्या, त्यामागचा इतिहास आणि यंदाचा रंग अन् मुद्दा

गेल्या शतकभरापासून जगभरातील लोक 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या शतकभरापासून जगभरातील लोक 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात.

जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरुकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे.

पण हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे? या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? हे जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) हा कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला.

1908 मध्ये 15,000 महिलांनी कामाचे तास कमी व्हावेत, चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा काढला होता.

वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस 'राष्ट्रीय महिला दिन' म्हणून घोषित केला.

त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. क्लारा झेटकिन या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या.

या दिवसाला एक आंतरराष्ट्रीय सोहळा बनवण्याची कल्पना त्यांची होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च रोजीच का?

1910 मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या कामगार महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेन) त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

या परिषदेत उपस्थित असलेल्या 17 देशांतील 100 महिलांनी एकमतानं त्यांना जोरदार पाठिंबा दिला.

ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये 1911 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

1977 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं देखील त्याला अधिकृत मान्यता दिली. 1911 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेली पहिली थीम ही 'भूतकाळाचं सेलिब्रेशन,भविष्याचं नियोजन' अशी होती.

क्लारा झेटकिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्लारा झेटकिन यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी क्लारा झेटकिन यांची मूळ कल्पना कोणत्याही एका विशिष्ट दिवसाशी संबंधित नव्हती.

1917 मध्ये युद्धकालीन संपात रशियन स्त्रियांनी "ब्रेड आणि शांती" ची मागणी केल्यानंतर 8 मार्च या तारीखेची निवड करण्यात आली.

संपाच्या चार दिवसांनंतर झारला सत्ता सोडावी लागली आणि तात्पुरत्या सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.

त्यावेळी रशियात वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारीपासून महिलांचा संप सुरू झाला. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ती तारीख 8 मार्च आहे.

कसा साजरा होतो आंतरराष्ट्रीय महिला दिन?

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. चीनमध्ये स्टेट काऊन्सिलच्या सल्ल्यानुसार अनेक महिलांना अर्ध्या दिवसाची सुटी दिली जाते.

जगभरात मोर्चे, चर्चा, मैफिली, प्रदर्शनं आणि वादविवाद असे हजारो कार्यक्रम होतात.

2024 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फ्रान्सच्या राज्यघटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करण्यात आले होते.

इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला "फेस्टा डेला डोना" म्हणतात. तिथं या दिवशी "मिमोसा ब्लॉसम" ही लोकप्रिय फुलं भेट म्हणून दिली जातात.

रशियात फुलांची विक्री साधारणपणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपास दुप्पट होते.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला "फेस्टा डेला डोना" म्हणतात. त्यांच्याकडं या दिवशी "मिमोसा ब्लॉसम" ही लोकप्रिय फुलं भेट म्हणून दिली जातात.

1984 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणाऱ्या युगांडामध्ये सरकार दरवर्षी एक वेगळी थीम निवडतं.

सर्बिया, अल्बानिया, मॅसेडोनिया आणि उझबेकिस्तानसह काही देशांमध्ये मदर्स डे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन एकाच दिवशी येतात.

अमेरिकेत मार्च हा महिलांच्या इतिहासाचा (वुमन्स हिस्ट्री)महिना म्हणून साजरा केला जातो. अमेरिकन महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जारी करण्यात येणाऱ्या अध्यक्षीय घोषणेत महिलांचा गौरव करण्यात येतो.

मादागास्कर आणि नेपाळमध्येही या दिवशी महिलांसाठी अधिकृत सुट्टी असते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी रंग आणि थीम

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाइटनुसार जांभळा, हिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.

त्यात म्हटलं आहे की, "जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतिक आहे, हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो."

या रंगांचा वापर 1903 मध्ये ब्रिटनमधील महिलांच्या मतांसाठी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वुमन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन (डब्ल्यूएसपीयू) या गटानं केला होता.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वेबसाइटनुसार जांभळा, हिरवा आणि पांढरा हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे रंग आहेत.

2025 साठी संयुक्त राष्ट्रांची थीम "सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता, सबलीकरण" ही आहे. याचं उद्दीष्ट पुढील पिढीला शाश्वत बदलासाठी सक्षम करणं हे आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकेतस्थळानं #AccelerateAction ही थीम निवडली आहे.

ही संस्था जगभरातील लोकांना #IWD2025 आणि #AccelerateAction हॅशटॅग वापरण्यास प्रोत्साहित करत आहे.

तसेच महिला आणि मुलींसोबत ऐक्य दर्शविण्यासाठी या महत्त्वपूर्ण उत्सवाबद्दल सकारात्मक संदेश प्रसारित करत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची गरज काय?

हा दिवस स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी कृतीचं आवाहन करत असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.

2023 मध्ये लैंगिक हिंसाचाराच्या 3,688 घटनांमध्ये वाढ झाल्याची पुष्टी संयुक्त राष्ट्रांनी केली आहे. ती 2022 च्या तुलनेत 50% नं वाढली आहे. यात 95% टक्के पीडित महिला आणि मुलींचा समावेश आहे.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 119 दशलक्ष मुली शाळेत जात नाहीत.

जागतिक बँक समूहाच्या 2024 च्या अहवालानुसार पुरुषांना मिळणाऱ्या कायदेशीर अधिकारांपैकी केवळ दोन तृतियांश अधिकार महिलांना मिळतात.

बीबीसी 100 वुमेननं नोंदवलं की, 2024 मध्ये जगातील जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येच्या (3.6 अब्ज लोकांच्या) मोठ्या निवडणुका होत्या. पण त्यात 20 वर्षांपासून महिला प्रतिनिधित्वाच्या वाढीचा दर सर्वात कमी होता.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युनिसेफच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 119 दशलक्ष शाळकरी मुली शाळेत जात नाहीत.

यूएन वुमेन 2024 जेंडर स्नॅपशॉटच्या अंदाजानुसार, सर्व महिला आणि मुलींना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणखी जवळपास 137 वर्षे लागतील.

2023 मध्ये 20-24 वयोगटातील 5 पैकी 1 महिलेचा विवाह 18 वर्ष पूर्ण होण्याआधी झाला होता.

जगभरात 2023 मध्ये सुमारे 51,100 महिला आणि मुलींची त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील इतर जवळच्या सदस्यांकडून हत्या करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे का?

1990 पासून 19 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघानं मान्यता दिलेली नसली, तरी ब्रिटनसह जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, हा दिवस "पुरुषांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जी सकारात्मक मूल्य रुजवातात" त्यावर केंद्रीत आहे."

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1990 पासून 19 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो.

पुरुषांच्या कल्याणाबद्दल जागरुकता वाढविणे आणि सकारात्मक आदर्श अधोरेखित करणे हा या मागचा उद्देश आहे.

गेली अनेक वर्षे कॉमेडियन रिचर्ड हेरिंग यांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नसल्याबद्दल संतापलेल्या लोकांना एक्सवर (ट्विटरवर) उत्तर देऊन प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिनी घरगुती हिंसाचाराविरोधात मदतीसाठी दान म्हणून हजारो पौंड गोळा केले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.