तृतीयपंथी सेक्सवर्कर अलिशा जेव्हा आरोग्यदूत बनते...

- Author, प्रियांका धिमान आणि शर्मिला शर्मा
- Role, बीबीसी पंजाबी आणि गुरगांव की आवाज
नटून थटून रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी राहिलेली, गाड्यांच्या आत डोकावणारी अलिशा एक सेक्स वर्कर आहे. रस्त्यावर उभी असताना मागून कोणीतरी आवाज देईल, तिला बघून कोणीतरी गाडी थांबवेल याची ती वाट पाहत असते. प्रत्येक रात्री ती याच रस्त्यांवर उभी असलेली दिसते.
त्याच रस्त्यावर मी अलिशापासून थोड्या दूर अंतरावर उभी राहिले होते. पत्रकार असून देखील माझ्या मनात थोडी भीती होतीच. आणि रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी उभं राहण्याची भीती कोणत्याही मुलीला वाटली असती.
पण मग अलिशा आमच्यापेक्षा वेगळी आहे का? भीतीचा लवलेश चेहऱ्यावर येऊ न देणाऱ्या अलिशाच्या मनात भीती नसेलच का?
रात्र सरली आणि दिवस उजाडल्यावर जेव्हा हाच प्रश्न अलिशाला विचारला तेव्हा ती म्हणाली की, "भीती तर वाटतेच. आम्ही रात्री जेव्हा एखाद्यासोबत जातो तेव्हा पुन्हा घरी जिवंत येऊ की नाही याची शाश्वती नसते."

सेक्स वर्कर असलेल्या अलिशाच्या गुंता झालेल्या आयुष्याचा हा एक पैलू आहे. तिला या कामाची लाज वाटत नाही पण तिला हे काम करणं आवडतही नाही. मागील बऱ्याच वर्षांपासून हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणारी अलिशा एक ट्रांसजेंडर आहे. आशूची ती अलिशा झाली जेणेकरून तिला मोकळेपणाने जगता यावं. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिला सेक्स-वर्कर होऊन किंमत मोजावी लागली. पाटण्यात असलेल्या अलिशाला अगदी लहान वयातच घर सोडावे लागलं. एकट राहून तिला तिच्या उदरनिर्वाहाचं साधन शोधावं लागलं.
BBCShe या प्रकल्पातील या गोष्टीसाठी बीबीसीने द ब्रिज संस्थेसोबत काम केलं आहेत. वाचकांची आवडनिवड, प्राधान्य अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणं या प्रकल्पाचा उद्देश आहे.
BBCShe बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ना तू मुलांमध्ये मोडतोस, ना तू मुलींसारखा आहेस...
घर सोडताना मनाला खूप वेदना झाल्या. मम्मीची साडी नेसणं, लिपस्टिक लावणं, नेलपॉलिश लावणं, बांगड्या घालणं, मुलींसोबत खेळणं अलिशाला आवडायचं. पण तिच्या मम्मीला हे सर्व आवडत नव्हतं.
मम्मीच्या नजरेत तर तिला मुलगा झाला होता आणि त्याचं नाव तिने आशु ठेवलं होतं. आणि त्याने नॉर्मल मुलांसारखं वागावं अशी तिची अपेक्षा होती.
पण अलिशा सांगते की, तिच्या मनात सुरुवातीपासूनच मुलींसारख्या भावना होत्या. तिच्या आईला कदाचित हे सर्व कळलं देखील असेल पण इतर कोणाला ही गोष्ट कळू नये असं तिला वाटायचं म्हणून ती मला नेहमी सांगायची की आशू, मुलांसारखं वाग. पण माझ्या मन मला खात होतं पण मग आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे सगळं सहन करण्यापलीकडे गेलं होतं.
ती 13 वर्षांची असताना तिच्या ट्यूशन टीचरने तिच्यावर जबरदस्ती केली. सोबतच तिच्या वागण्याबोलण्याचीही खिल्ली उडवली.
अलिशा सांगते, "माझे टीचर म्हणाले, तुला माहित आहे की तू काय आहेस? ना तू मुलांमध्ये मोडतोस, ना तू मुलींसारखा आहेस. तुझ्या सारख्या लोकांना समाज झिडकरतो."
अलिशाच्या सांगते, त्या टीचरने तिच्यासाठी अपशब्द वापरले आणि जर तिने याबद्दल कोणाला काही सांगितलं तर तिच्या घरचेच तिला हाकलून लावतील अशी धमकी दिली. एकीकडे लैंगिक शोषण झाल्याची वेदना, दुसरीकडे टीचरने वापरलेले अपशब्द आणि
कुटुंबियांकडून सुरू असलेला द्वेष यामुळे ती पुरती हादरून गेली होती.
अलिशाला खूप दुःखात होती. तिने तिच्या आईला आणि बहिणीला एक-दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला पण उघडपणे काहीच सांगता आलं नाही. अखेर घर सोडण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता.

आशू ते अलिशाचा प्रवास...
मुलाच्या शरीरात बंदिस्त असलेल्या आशूला तिची नवी ओळख तयार करायची होती. तिला स्त्री व्हायचं होतं, पण यासाठी खूप पैसा मोजावा लागणार होता.
मित्राच्या भरवशावर तिने दिल्ली गाठलं. इथंच तिची भेट तिच्या गुरुशी झाली.
ट्रान्सजेंडर लोक जेव्हा आपलं घरदार सोडून एकटे राहतात तेव्हा ते गुरुला शरण जातात.
अलिशा सांगते, "आम्ही त्यांना आमच्या आई-वडिलांप्रमाणे मानतो, त्यांच्यामुळेच मी आज माझ्या पायावर उभी आहे. मी जेव्हा दिल्लीत आले तेव्हा त्यांनी मला सेक्स वर्कर म्हणून कामाला लावलं."
अलिशाला जेव्हा पहिल्यांदा सेक्सवर्कसाठी पाठवण्यात आलं तेव्हा तिने 4 हजार रुपयांची कमाई केली.
अलिशा सांगते, "मी आयुष्यात पहिल्यांदाच इतके पैसे पाहिले होते. 10 मिनिटांच्या कामासाठी मला इतके पैसे मिळाल्यामुळे मी खूप खूष होते."
पण आयुष्य हे खाचखळग्यानी भरलेलं असतं. आम्हाला सतत भीतीचा सामना करावा लागतो.
मागच्या 14-15 वर्षांपासून या कामात असलेली अलिशा सांगते, "अनेकदा ग्राहक आमच्याशी गैरवर्तन करतात, मारहाण करतात, अपशब्द उच्चारतात आणि कधी कधी आमची पर्सही चोरतात."
हळूहळू मी इतके पैसे साठवले की सर्जरी करून आता मी स्त्री होऊ शकत होते. 3 वर्षांपूर्वी सर्जरी करून आशू अलिशा बनली.
आता आयुष्याला अर्थ देण्याचं काम शिल्लक होतं. ट्रान्सजेंडर आणि सेक्सवर्कर ओळखीच्या पलीकडेही नाव करायचं होतं.

ओळखीचा शोध
अलिशाने दुसरं काही काम शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता असंही काही नव्हतं. याच दरम्यानच्या काळा भारतात ट्रान्सजेंडर समुदायाला मान्यता मिळाली, त्यांना त्यांचे अधिकार मिळाले.
2014 मध्ये एक ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली होती.
ट्रान्सजेंडर्स मागासवर्गीय असल्याने त्यांना आरक्षण द्यावं, त्यांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले होते.
राज्यघटनेतील कलम 14, 16 आणि 21 नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, रोजगार आणि सामाजिक मान्यता मिळण्याचा समान अधिकार मिळतो. त्यानंतर 2019 मध्ये संसदेने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऑफ राइट्स कायदा लागू केला.
पण वास्तवात आजही काही बदललेलं नाही. अलिशाला नोकरी मिळवणं अगदीच अशक्यप्राय झालं.
अलिशाने लहान वयातच घर सोडलं, त्यानंतरही तिच्या मागचा संघर्ष संपला नाही. तिने तिचं शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं.
अलिशा सांगते, "तुम्ही कुठेही गेलात तर सर्वात आधी तुमच्याकडे ट्रान्सजेंडर असल्याचं प्रमाणपत्र मागितलं जातं. सिक्युरिटी गार्ड तुम्हाला बघता क्षणी बाहेर काढतो."
पण एके ठिकाणी तिला संधी मिळाली. तिच्या गुरूने तिला ट्रान्सजेंडर्सच्या आरोग्य आणि लैंगिक समस्यांवर काम करणाऱ्या एनजीओची ओळख करून दिली होती.

अलिशाचं वागणं बोलणं बघून, तिचा आत्मविश्वास बघून त्यांनी तिला नोकरी दिली. त्यामुळे आज ती हेल्थ वर्कर म्हणून काम करते. आणि हे काम एखाद्या लीडरपेक्षा कमी नाहीये.
अलिशा सांगते की, "जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःसाठी लढत नाही तोपर्यंत तुमचा आवाज दडपण्याचं काम सुरूच राहतं."
आज ती ट्रान्सजेंडर्स समुदायामध्ये, सेक्स वर्कर्सना "एड्स" आणि अनेक आजारांबद्दल माहिती देते, औषधे मिळवून देते. शिवाय त्यांना हॉस्पिटलमधील उपचार मिळवून देण्यात मदत करते.

सोसायटी फॉर सर्व्हिस टू व्हॉलंटरी एजन्सीज या गुरूग्राम स्थित एनजीओमध्ये काम करणाऱ्या अलिशाला हे एनजीओ तिच्या कुटुंबासारखच वाटतं. ट्रान्सजेंडर्स दररोज इथं येतात, त्यांचं सुख दुःख शेअर करतात.
अलीशा सांगते, "जसे टोमणे गावी ऐकायला मिळायचे, अगदी तसेच टोमणे शहरातही ऐकायला मिळतात. रस्त्यावरून चालताना लोक आम्हाला हिजडा, छक्का अशा हाका मारतात."
मी अलिशाची मुलाखत घेत असताना मला जाणवलं की, लोक तिच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात.
कदाचित त्यामुळेच अलिशा स्वतःच्याच नजरेत अपूर्ण आहे. "ना मी मुलांच्या लाईनमध्ये येते ना मुलींच्या. देवाने मला जन्म तर दिलं पण पूर्णत्व दिलं नाही. आपण निसर्गाच्या हातातल्या बाहुल्या आहोत."
जगण्यासाठी धैर्य लागतं आणि ते मिळवण्यासाठी ती कृष्णाला आपला सखा मानते.
ती ताठ मानेने चालते पण देवासमोर नतमस्तकही होते. समाजाने तिला अपूर्ण असल्याची जी जाणीव करून दिली आहे ती देवाने पूर्ण केल्याचं अलिशा सांगते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









