गुजरात : 2002 सालच्या दंगलीतील हे 2 चेहरे काय करत आहेत?

- Author, विकास त्रिवेदी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अहमदाबादचं शहापूर. मी तिथंच असणाऱ्या एका दुकानाच्या शोधात होतो. त्या दुकानाचा फोटो पाहिला की तुमच्या लक्षातही काहीतरी येईल.
साधं चपला- बुटांचं हे दुकान. आता हे दुकान अस्तित्वात असो वा नसो, मात्र या दुकानाच्या मालकाचा चेहरा तुमच्या आठवणीत असावा. मागच्या 20 वर्षांच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने हा चेहरा तुम्ही नक्कीच पाहिला असेल.
दुकान सापडत नाही म्हटल्यावर, तिथंच टेम्पो दुरुस्त करणाऱ्या एका मॅकेनिकला विचारलं, चप्पल दुरुस्त करणाऱ्या अशोक परमारांचा पत्ता सांगाल का? त्या मेकॅनिकने 'नाही माहीत' असं म्हणत मान हलवली. पण तिथंच बाजूला बसलेला एक मुलगा म्हणाला, 'अरे हा तर त्या बातम्यांमध्ये येणाऱ्या फेमस मोचीला शोधत असणार.'
हातात रॉड, कपाळावर पट्टी आणि चेहऱ्यावर दिसणारा राग. अशोक परमारांचा हा फोटो 2002 च्या गुजरात दंगलीचं प्रतीक म्हणून दाखवला जातो. मी परमारांच्या दुकानाजवळ पोहोचलो पण तिथं कोणीच नव्हतं. तिथं जमिनीवर एक मळलेला गालिचा होता. मी शेजारून जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलं की, अशोक भाई कुठे गेलेत?
तो व्यक्ती म्हटला, तुम्ही मीडियातून आलाय ना? एका महिन्यापासून बिचारा वैतागलाय. अशोक परमार ज्या फूटपाथवर चपला दुरुस्तीचं काम करतात, तिथं इतर लोकही हेच काम करताना दिसतील. तेवढ्यात अशोकचा मित्र धर्मेंद्र तिथं आला.
धर्मेंद्र म्हणाले, गोध्रा कांडचा ऍम्बेसिडर भाजप कार्यालयाबाहेर बसलाय पण त्याला कोणीच काहीच विचारेना.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA
ज्या फुटपाथवर अशोक परमार काम करतात, तिथं लागूनच एक भिंत आहे. ही भिंत भाजपच्या कार्यालयाला लागून आहे. मी अशोकची वाट पाहत होतो, इतक्यात 'हर हर मोदी, घर घर मोदी' अशा निवडणूक प्रचाराच्या घोषणा ऐकू यायला लागल्या.
त्याच दरम्यान अशोक येताना दिसले. जवळ आल्यावर त्यांना जसं समजलं की, आम्ही मीडियातून आलोय, त्यांचा आवाज वाढला.
मी विचारलं- अशोक भाई कसे आहेत? काही टेन्शनमध्ये आहात का?
हे ऐकून अशोक जरा नरमले. ते म्हटले, "काय सांगू? मला माझं काम करता येईना. जेव्हा बघावं तेव्हा मीडियातले लोक कॅमेरा आणि माईक घेऊन समोर येतात. या निवडणुकांचं आम्हाला काय करायचंय?
"माझं तर एकच मत आहे. आणि बाकीचं तर जनता ठरवेल, मी आपलं रोज धंदा करून माझं पोट भरतोय. फक्त इंटरव्ह्यूच देत बसलो तर काम कधी करणार. एक तारखेपासून बघतोय, कोणी पण येतंय.
"तेव्हापासून माझ्यावर 600 रुपयांचं कर्ज झालंय. काम सुरू असतं तेव्हाच हे मीडियावाले येतात. कोणी हे विचारत सुद्धा नाही की, अशोक भाई तुम्ही जेवलाय का?"
थोडा वेळ गेला तसे अशोक भाई थोडे शांत झाले.

तिथंच जवळ एक रिक्षा उभी होती. त्या रिक्षात बसत बसत अशोक भाई म्हणतात, "मीडियावाल्यांना तरी काय म्हणावं, ते त्यांचं त्यांचं काम करतायत. त्यांच्या चॅनेल्सला इंटरव्ह्यू हवे असणार. गुजरातच्या बाबतीत माहिती करून घ्यायची आहे इथपर्यंत ठीक होतं. पण आता तर लाईनच लागलीय. धंदा पण आता थोडा मंदावलाय.
अशोक परमार सांगतात की, त्यांना शिक्षण घेऊन काहीतरी करायचं होतं. पण आईवडील लवकरच गेले. एका मुलीवर प्रेम होतं, पण ती दुसऱ्या जातीची होती. अशोकचं लग्न झालेलं नाहीये. 2002 च्या दंगलीनंतर तर अशोक भाई सिनेमा बघायला थिएटरमध्ये सुद्धा गेलेले नाहीत. ते मोबाईलवरच सिनेमा पाहतात.
सर्वांचे प्रश्न एकसारखेच...
सरकारी आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीत 790 मुस्लिम आणि 254 हिंदू मारले गेले. 223 लोक बेपत्ता तर 2500 लोक जखमी झाले होते. शिवाय शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
2022 च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दोन चेहरे चर्चेत आलेत. त्यात एक म्हणजे अशोक परमार आणि दुसरे कुतुबुद्दीन अन्सारी. 2002 च्या दंगलीला आज 20 वर्ष उलटली. या काळात या दोन्ही व्यक्तींच्या मतांमध्ये काही बदल झालाय का ? या आशयाच्या बातम्या येऊ लागल्या.
अशोक सांगतात, "गोध्रा प्रकरण, निवडणुकांचे निकाल काय लागणार याबद्दलच सर्वजण विचारत राहतात. मी त्या दंगलीचा पोस्टर बॉय झालोय म्हटल्यावर, काय झालं, कसं झालं, सरकारचा यात सहभाग होता का? हे विचारायला ते लोक येतात. आता कोणता पक्ष सत्तेवर येईल हे सुद्धा विचारत राहतात.
"अरे यार, तेच तेच विचारलं तर कोणीपण वैतागणारच ना. मला पण तेच तेच उत्तर देऊन कंटाळा आलाय. मला तर कधीकधी असं वाटतं, एखादी कॉन्फरन्स घेऊन सगळ्या मीडियाला बोलवावं, सगळ्यांना एकदाच उत्तरं देऊन टाकीन. कोण सकाळी येतंय, कोणी रात्री येतंय, नुसती रांग लागली आहे प्रश्न विचारणाऱ्यांची."

गुजरात निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप रिंगणात आहेत. आम आदमी पार्टीसहित अनेकांच्या जाहीरनाम्यात मोफत गोष्टी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. यावर परमार म्हणतात, "मोदी सरकारने पण 15 लाख देऊ असं आश्वासन दिलं होतं, निदान 5 लाख तरी मिळाले का कोणाला? हे लॉलीपॉप आहे, इंटरव्ह्यू देणं नेत्यांचा धंदा आहे, आमचा नाही." काही वर्षांपूर्वी अशोक परमार यांना आर्थिक मदत मिळाली होती. यातूनच त्यांनी फुटवेअरचं दुकान सुरू केलं. या दुकानाचं नाव होतं 'एकता चप्पल घर'. त्यानंतर कुतुबुद्दीन अन्सारी सुद्धा अशोकच्या दुकानात आले होते.
पण काही आर्थिक अडचणींमुळे हे दुकान बंद करावं लागलं. आम्ही ज्या रिक्षात बसून बोलत होतो, तिथंच आजूबाजूला लोक जमा होऊ लागले. त्यातलाच एक मुलगा येऊन फाटलेल्या जोड्यांकडे लक्ष वेधतो. 'थोडा ब्रेक घेऊ' असं म्हणत अशोक त्या रिक्षातून खाली उतरतात आणि चप्पल शिवायला जातात. तिथं आलेल्या काहीजणांच्या चपला शिवून ते परत रिक्षात येऊन बसतात.
अशोक आपलं बोलणं पुन्हा सुरू करतात. "गुजरातमध्ये माझं कोणी नाहीये, तर मी बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार. आरएसएस, व्हिएचपी, बीजेपी, बजरंग दल यातलं कोणीच माझ्याकडे आलं नाही. तिथं माझ्या दलित समाजातले लोक पण काम करतात, ते सुद्धा कधी मदतीला आले नाहीत."

"जर धर्माचा ठेका चालवणारे आपले झाले नाहीत, तर बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची. मी केरळमध्ये गेल्यावर मला समता, मानवता जाणवली. मी आता हिंदू धर्माचं पालन करणं बंद केलंय," अशोक पुढे सांगतात.
रिक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाला अशोक वैतागले आणि गुजरातीमध्ये रिक्षा ड्रायव्हरला म्हणाले की, जरा पुढे घेऊन चल.
कुतुबुद्दीन अन्सारींचे पाणावलेले डोळे
गुजरात दंगलीतील फोटोंमध्ये आणखीन एक फोटो होता. हात जोडलेले, डोळ्यात पाणी असा हा फोटो होता कुतुबुद्दीन अन्सारी यांचा. त्यांचा हा फोटो फक्त मीडियानेच नाही तर राजकीय पक्षांनीही अनेकदा वापरलाय.
मागच्या बऱ्याच दिवसांपासून कुतुबुद्दीन अन्सारी मीडियात दिसत आहेत. त्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाहीत.
पुन्हा फोन केल्यावर कुतुबुद्दीनशी बोलणं झालं. ते म्हणतात, "भाऊ, मी खूप वैतागलोय. पण तुम्ही असे एकमेव आहात जे असं बोलताय. मी इतर कोणाला घरी बोलवत नाही पण तुम्ही घरी या, मला आनंद होईल."
मी कुतुबुद्दीन अन्सारींच्या घराच्या दिशेने निघालो. अहमदाबादच्या या भागात आल्यावर असं जाणवतं की हा गुजरात मॉडेलचा एक भाग असू शकतो. आणि असं ही या मॉडेलची चर्चा देशात, जगात सगळीकडेच होत असते.
गल्ल्यांमध्ये घाणीचं साम्राज्य, बंदिस्त अशा जागा, खिडक्या कम दरवाजे.
कुतुबुद्दीनची पत्नी त्यांना हाक मारते - ऐका. कोणीतरी भेटायला आलंय.
लुंगी घातलेले कुतुबुद्दीन पहिल्या मजल्यावर काम करत होते. आवाज दिल्याबरोबर ते पायऱ्यांवरून खाली आले. ते मला आत घेऊन गेले. दंगलीच्या आठवणी साठवलेले त्यांचे डोळे आता शांत आणि आनंदी दिसत होते.

'किती दिवस दंगलीचा मुद्दा धरून ठेवणार?'
कुतुबुद्दीन विचारतात की, "दंगलीचा मुद्दा किती दिवस धरून ठेवणार?" तुम्हाला याच्या पुढं जावं लागेल. कित्येक लोक इंटरव्ह्यूसाठी येतात. त्यांनाही त्यांचं काम करावं लागतं. काही लोक चांगलेही असतात. त्यांच्या मार्फत लोकांपर्यंत चांगल्या गोष्टीही पोहोचतात. पण आता आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यात पुढं निघून आलोय.
"कुतुबुद्दीन घरीच काम करतात. त्यांचा मुलगा आणि आणखीन दोन जण कापड शिवण्याचा कारखाना चालवतात.
कुतुबुद्दीन सांगतात, "माझ्याकडे फक्त एक मत आहे. माझ्यामागे माझं कुटुंब आहे. काहीजण सांगतात की, आम्ही खूप लांबून आलोय, मग हे ऐकून त्यांना नाही कसं म्हणायचं? काहीवेळा मीडियाचे लोक अशा लोकांमार्फत येतात ज्यांना आम्हाला नाही म्हणून चालत नाही. काल पण एकजण आले होते. पण मी कॅमेरावर बोलणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं तेव्हा ते नाराज झाले."
मी त्यांची माफी मागितली."कुतुबुद्दीन सांगतात, "आजकाल कोणी फोन केला तर आम्ही उचलत नाही. कारण माहिती असतं की समोरून मीडियामधल्याच कोणाचा तरी फोन असणार. आता या निवडणुका संपल्या की, थोडं कमी होईल हे सगळं. पण आम्ही जर हेच करत बसलो तर, आम्ही ज्यांच्यासोबत धंदा करतो ते लोक पण विचारायला लागतात. व्हिडिओ व्हायरल होतात."
आम्ही बोलत असताना कुतुबुद्दीनने दंगलीतले काही किस्से सांगितले. यात एकबाजूला हिंदू-मुस्लिम द्वेष तर एका बाजूला प्रेम दिसतं.
2002 सालच्या त्या फोटोविषयी बोलताना कुतुबुद्दीन म्हणाले, "तो फोटो कोणी कोणी वापरलाय याचा पत्ताच नाही? फोटो काढणारे फोटोग्राफर ओर्को दत्ता यांनाही प्रश्न पडला होता की, फोटो काढून आपण बरोबर केलंय का? तो एक क्षण होता. रस्त्यांवर दोन दोन दिवस मृतदेह पडून होते. कुत्रे येऊन वास घेऊन निघून जायचे."
जेव्हा दंगल उसळली तेव्हा कुतुबुद्दीनला चार वर्षांची मुलगी होती. त्यांच्या मुलीला आज चार वर्षांची मुलगी आहे.
ती तिथंच असलेल्या एका पलंगावर खेळत होती. तिला बघून तिच्या आजोबांच्या म्हणजेच कुतुबुद्दीन यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं.कुतुबुद्दीनचं कुटुंब पाहून मी अशोक परमारचा विषय काढला.
यावर कुतुबुद्दीन म्हणाले, "अशोक आमच्या घरी अधून मधून येत असतो. पण मला वाटतंय की तो खूप एकटा पडलाय. लग्न वैगरे झालं असतं तर तो सेटल झाला असता.
आता तो फुटपाथवर राहतोय. रात्री तिथंच कुठंतरी झोपतो. एकटाच असतो त्यामुळे थोडा चिडचिडाही झालाय."
आपलं एकाकी आयुष्य फूटपाथवर काढणाऱ्या अशोकच्या चेहऱ्यावरची चिडचिड दिसून येते. तेच आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या कुतुबुद्दीन अन्सारींकडे बघून सौम्यता आणि शांतता दिसते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ही शांतता भंग पावली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








