महाराष्ट्रातील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात, कोमातल्या लेकीजवळ जाण्यासाठी पालकांना करावी लागतेय व्हिसासाठी कसरत

फोटो स्रोत, gaurav kadam
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकेत शिकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील 35 वर्षीय नीलम शिंदे या विद्यार्थिनीचा 14 फेब्रुवारीला एका वाहनाच्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर नीलमची प्रकृती गंभीर असून ती कोमामधे गेली आहे.
तिच्यावर सध्या सॅक्रामेंटो शहरातील यू. सी. डेव्हिस मेडिकल सेंटर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती मिळाल्यापासून ते अमेरिकेला जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळावा म्हणून धडपड करत आहेत.
मात्र मागच्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात यश आलेलं नाही.
बीबीसी मराठीने मुंबईतील अमेरिकन दुतावास आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला आहे, त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आली नाही.
नीलमच्या कुटुंबीयांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील उंब्रज हे नीलम शिंदेचं गाव. नीलमनं पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.
त्यानंतर ती अमेरिकेतील सॅक्रामेंटो शहरातील कॅलिफोर्निया विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी गेली होती. मात्र सगळं काही सुरळीत चालू अचानक असताना हा अपघात झाला.


अपघात कसा झाला?
या अपघाताबाबत बीबीसी मराठीनं नीलम शिंदेंच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यावेळी नीलमचे मामे भाऊ गौरव कदम यांनी सांगितलं की, "नीलमचा अपघात 14 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियातील वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास झाला.
"तिच्या रूमपासून जवळपास 100 मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी ही घडली. त्या दिवशी संध्याकाळी ती सॅक्रामेंटो शहरातील कॅलिफोर्निया विद्यापीठालगत असलेल्या रस्त्यानं तिच्या मोपेड बाइकसोबत विद्यापीठातून तिच्या रूमच्या दिशेनं चालत निघाली होती. त्यावेळी तिच्या पाठीमागून एक भरधाव कार आली आली आणि तिला जोरात उडवलं," असं गौरव यांनी सांगितलं.
पुढं ते म्हणाले, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार माझी दीदी त्यावेळी 40 फुट उंच उडून खाली पडली इतका मोठा तो अपघात होता.
"त्या अपघातात तिच्या दोन्ही पायांना आणि डाव्या हाताला गंभीर जखम झाली आहे तर डोक्याला खुप जास्त मार लागला आहे. आत्तापर्यंत तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळं रक्तस्राव थांबला आहे मात्र ती तेव्हापासून कोमातच आहे," असं गौरव यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर दोन दिवसांनी नीलमच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली.
यावर बोलताना गौरव कदम यांनी सांगितलं की, "हा अपघात झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 16 फेब्रुवारीला सकाळी पावणेसहाच्या सुमारास नीलम दीदीचे मामा म्हणजे माझे वडील संजय कदम यांना तिच्या एका मैत्रिणीचा अमेरिकेवरून फोन आला होता.
"तिनं फोनवर आम्हाला सगळं काही सांगितलं. ती सुद्धा महाराष्ट्रातलीच आहे, तिकडं त्या दोघी एकत्र एका रूममध्ये राहतात," गौरव यांनी सांगितलं.
तिच्या अमेरिकेतील मित्रमैत्रिणींची आम्हाला या कठीण काळात खूप मदत होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
गौरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम ही गौरव यांच्या आत्त्याची मुलगी आहे. गौरव यांच्या आत्त्याचं म्हणजे नीलमच्या आईचं एक वर्षापूर्वी ब्रेन ट्युमरनं निधन झालं आहे. तेव्हापासून नीलमचे वडील नैराश्यात आहेत.
नीलम अमेरिकेला असते तर तिचा भाऊ पुणे शहरात राहतो. त्यामुळे नीलमचे वडील तानाजी शिंदे हे गौरव कदम यांच्या गावात त्यांच्या घराजवळच राहतात.
आधीच नैराश्यात असलेले नीलमचे वडील तिच्या अपघाताची माहिती मिळाल्यापासून मानसिकदृष्ट्या अजूनच खचून गेले आहेत.
त्यामुळे हे सगळं प्रकरण गौरव कदम आणि त्यांचे वडील म्हणजे नीलमचे मामा संजय कदम हाताळत आहेत.
श्रीनिवास पाटलांचं पत्र गेलं अन् अमेरिकेतून फोन आला
गौरव यांनी सांगितलं की, "नीलम दीदीच्या अपघाताची माहिती मिळाल्यावर आम्हाला खूप धक्का बसलेला. मात्र लवकरात लवकर या धक्क्यातून सावरून आम्ही आमच्या भागातले माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली. त्यांना सगळ्या प्रकरणाची कल्पना दिली."
त्यांचं ऑफिस आमच्या जवळ असल्यानं आम्हाला त्यांची लगेच जाऊन भेट घेणं सहज शक्य झालं."
"अशा प्रसंगी काय करावं हे काही आम्हाला समजत नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांची मदत घ्यायचं ठरवलं होतं. दरम्यान आम्ही भेटल्यानंतर श्रीनिवास पाटलांनी एक पत्र लिहून ईमेलद्वारे ते केंद्र सरकारला पाठवलं.
"ते पत्र अमेरिकेला गेलं आणि त्याच रात्री आम्हाला दीदी अमेरिकेत ज्या 'यु सी डेव्हिस मेडिकल सेंटर' रुग्णालयात अॅडमिट आहे, त्यांच्याकडून आम्हाला फोन आला. कारण श्रीनिवास पाटलांनी त्या पत्रात आमची सगळी माहिती दिली होती."

फोटो स्रोत, श्रीनिवास पाटील
रुग्णालयामधून फोन आल्यानंतर त्यांनी नीलम शिंदे यांच्या कुटुंबीयांची सगळी चौकशी केली.
ते सांगतात, "दीदीवर उपचार करताना रुग्णालयाला आमच्याकडून विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला भारतातून तिच्या उपचारासंदर्भात ठामपणे निर्णय घेणारी एक व्यक्ती हवी आहे असं सांगितलं.
"तिचे वडील कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे माझे वडील म्हणजे तिचे मामा तिच्या उपचारासंदर्भात सगळे निर्णय घेतात. त्या दिवसापासून रुग्णालयाकडून तिच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यासाठी आम्हाला रोज फोन येतात," असं गौरव यांनी सांगितलं.
'अमेरिकेतून मिळतेय अनेकांची मदत'
नीलमच्या उपचाराबाबत सगळे निर्णय घेणारे तिचे मामा संजय कदम यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "नीलमवर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णालय प्रशासन आम्हाला सगळं काही समजून सांगतं. त्यासाठी ते आम्हाला दुभाषिक देतात. मग ती व्यक्ती आम्हाला उपचारात येणाऱ्या अडचणींची कल्पना देखील देते. आमची परवानगी घेऊनच जे काही करायचंय ते करतात."
"आम्हाला सुद्धा नीलमवर उपचार करून घेण्याची गरज असल्यामुळं आम्ही रुग्णालय प्रशासनावर विश्वास ठेऊन त्यांना सांगतो की जे जे गरजेचं आहे ते सगळं करा. आम्ही गावाकडची कमी शिकलेली साधी माणसं आहोत. काय करायचं काय नाही आम्हाला तर काही कळत नाही.
"आम्ही तिकडं नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर विश्वास ठेवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही," असं नीलमचे मामा संजय शिंदे सांगतात.

पुढं संजय कदम यांनी सांगितलं की, "नीलमच्या कॉलेजकडून आम्हाला एक वकील देखील देण्यात आला आहे. तसेच एक समाज सेवक देखील आमच्या मदतीला अमेरिकेकडून देण्यात आला आहे. तिथलं महाराष्ट्रीयन मित्रमंडळ देखील आम्हाला शक्य ती मदत करत आहे.
ते आम्हाला सांगतात की, "अशा परिस्थितीत तुम्हाला लवकरात लवकर व्हिसा मिळवण्यासाठी तुमच्याच सरकारची मदत घ्यावी लागेल. तसं तर अमेरिकेतून अनेक लोकांची मदत मिळत आहे."
अमेरिकेत नीलमच्या उपचारांचा खर्च कोण करत आहे याबाबत विचारलं असता गौरव कदम यांनी सांगितलं की, "उपचारांच्या खर्चाविषयी रुग्णालयानं आम्हाला अजून तरी कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी केलेली नाही. आम्हालाही अजून हे स्पष्ट झालेलं नाही की तिच्यावर होणाऱ्या उपचाराचा सगळा खर्च कोण करत आहे."
अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात अडचण काय?
जवळपास गेल्या दहा दिवसांपासून कोमामध्ये असणाऱ्या नीलमकडे जाण्यासाठी गौरव कदम हे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इतक्या दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांना 28 फेब्रुवारीला व्हिसा ऑफिसला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं आहे.
मात्र मागच्या काही काळात व्हिसा मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. याबाबत ते बीबीसी मराठीला सांगतात की, "दीदी कोमात असल्यामुळे रुग्णालयानं आम्हाला अमेरिकेत बोलवलं आहे."
"माझ्याकडं आणि तिच्या वडीलांकडं पासपोर्ट असल्यामुळे आम्ही दोघांनीच अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला लवकरात लवकर व्हिसा मिळावा म्हणून रुग्णालयानं आम्हाला एक पत्र देखील पाठवलेलं आणि ते व्हिसा ऑफिसला दाखवायला सांगितलं होतं.
"आम्ही ते पत्र घेऊन सरळ मुंबईतलं यूएस कॉन्सिलचं ऑफिस गाठलं. मात्र तिथं आम्हाला कोणतीच मदत झाली नाही," असं गौरव सांगतात.

फोटो स्रोत, gaurav kadam
गौरव यांनी सांगितल्यानुसार, केंद्र सरकारकडून मदत मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते सांगतात, "17 फेब्रुवारीला श्रीनिवास पाटलांनी आणि मी स्वतः देखील परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना मेल केला, परंतु त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही."
पुढं ते म्हणाले, "त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं म्हणून मी त्यासाठी एक्स (ट्विटर) या समाज माध्यमावर अकाऊंट काढून त्याच्यावर ट्विट केलेलं. त्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस.जयशंकर, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांना टॅग केलेलं, मात्र तरीही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही."
"परंतु गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं मदत करायला सुरूवात केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी फोन करून सगळी माहिती घेतली आणि या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन देखील दिलं. त्यानुसार त्यांनी एक ट्विट देखील केलं होतं," असंही पुढं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आमचे कराडचे आमदार अतुल बाबा भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे यांनी आमची मदत केली असल्याचं ते सांगतात.
"महाराष्ट्र सरकारने आणि इतर नेत्यांनी यात लक्ष घातलं आणि त्यामुळेच 28 फेब्रुवारीला मुंबईतील अमेरिकन दूतावासात आम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं आहे," असंही गौरव कदम यांनी सांगितलंय.
बीबीसी मराठीनं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि मुंबईतील अमेरिकन दूतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. बीबीसी मराठीने दोन्ही कार्यालयाशी इमेलद्वारे संपर्क केला आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर या ठिकाणी ते अपडेट करण्यात येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











