शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि पालकांचा जीव टांगणीला

नील आचार्य

फोटो स्रोत, Purdue Exponent Org

फोटो कॅप्शन, 19 वर्षांचा नील आचार्य पर्ड्यू युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये मृतावस्थेत आढळला.
    • Author, सविता पटेल
    • Role, सॅन फ्रान्सिस्कोहून

अमेरिकेतील विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याचं आकर्षण भारतीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आहे. अमेरिकेतील शिक्षणानंतर करियरचा महामार्ग खुला होतो. साहजिकच मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अमेरिकेत जात असतात. मात्र अलीकडच्या काळात झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचाच हा आढावा...

निराश, हताश! अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातील जे. सुशील या विद्यार्थ्याच्या मनातील या भावना आहेत.

फेब्रुवारी महिन्यात अमरनाथ घोष या विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं हादरलेला सुशील अजूनही त्यातून सावरलेला नाही. अमरनाथ हा भारतातून अमेरिकेत आलेला 34 वर्षीय क्लासिकल डान्सर होता. स्थानिक पोलीस या मृत्यूचा हत्येचे प्रकरण म्हणून तपास करत आहेत.

सुशील सांगतो, त्याला घोषच्या मृत्यूबाबत त्याच्या विद्यापाठाकडून काहीही कळण्याआधी भारतातील एका मित्राकडून कळालं.

"त्यांनी आम्हाला दोन दिवसांनंतर कळवलं. या घटनेत एकंदरीत मिळालेल्या प्रतिसादाबद्दल विद्यार्थी नाराज आहेत. भारतीयांना काय वाटतं याची कोणाला तमा आहे, या पद्धतीचं हे वागणं आहे."

कॅम्पसच्या मागील बाजूस शहरातील एका रस्त्यावर घोषला गोळी मारण्यात आली होती. या बाबतीत विद्यापीठाचं म्हणणं आहे की पोलिसांकडून विद्यार्थ्याची ओळख पटल्यानंतरच आणि त्या विद्यार्थ्यांच्या जवळच्या व्यक्तीनं परवानगी दिल्यानंतरच ते विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत कळवतात. या प्रक्रियेला वेळ लागतो.

सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सच्या कुलगुरू ज्युली फ्लोरी यांनी या घटनेचं वर्णन 'भीतीदायक शोकांतिका' असं केलं. त्या म्हणतात, "या घटनेबद्दल जितक्या लवकर शक्य होईल तितकं आम्ही विद्यापीठातील लोकांना कळवलं. अमरनाथच्या जवळच्या लोकांच्या इच्छेनंच हे करण्यात आलं."

सेंट लुईसच्या पोलीस विभागानं सांगितलं की "मयताची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेसाठी 48 तास लागतात. काही प्रकरणांमध्ये तर हा कालावधी याहूनदेखील अधिक असतो."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यावर्षी अमेरिकेत आतापर्यंत मृत्यू पावलेल्या 11 भारतीय किंवा भारतीय मूळ असलेल्या विद्यार्थ्यांपैकी घोष हा एक आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हायपोथर्मिया पासून ते गोळीबारापर्यत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते या वेगवेगळ्या घटनांमध्ये लक्षात येण्यासारखं कोणतंही सूत्र नाही. प्रत्येक घटनेचे कॅम्पसमध्ये पडसाद उमटत असताना विद्यार्थी त्यांचा रोजचा दिनक्रम सुरू ठेवत आहेत. भय आणि शैक्षणिक उपक्रमाची आवश्यकता यांचा ताळमेळ साधला जातो आहे.

"अंधार पडल्यानंतर बाहेर जायचं आम्ही टाळतो. संध्याकाळनंतर शहरात असुरक्षित असलेल्या जागा आमच्या लक्षात आल्या आहेत. याव्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो?" असं सुशील विचारतो.

त्याच्याप्रमाणेच इतर विद्यार्थीदेखील या गोष्टीची तक्रार करतात की विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दलची माहिती लगेच दिली जात नाही. त्यांना भारतीय प्रसारमाध्यमं किंवा भारतातील नातेवाईकांकडून या बातम्या कळतात.

मोहम्मद अब्दुल अरफथ हा क्लीव्हलॅंड स्टेट विद्यापीठाच्या 25 वर्षांचा विद्यार्थी या महिन्याच्या सुरुवातीला मृतावस्थेत सापडला होता. मार्च महिन्यापासून ते बेपत्ता होता.

नाव गोपनीय ठेवू इच्छिणाऱ्या आणि अरफथ सोबतच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की अरफथच्या मृत्यूबद्दल त्याला त्याच्या पालकांकडून व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळालं होतं.

"मी या धोक्यापासून सावध राहायचं आहे याची माझ्या पालकांनी मला आठवण करून दिली," असं तो विद्यार्थी म्हणाला.

अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये 2022-23 या वर्षांत जवळपास 2,67,000 भारतीयांनी प्रवेश घेतला आहे. 2030 पर्यत ही संख्या 10 लाखांपर्यत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

"भारतात अमेरिकेतील विद्यापाठातील पदवीबद्दलची इच्छा आणि आकर्षण फारच तीव्र आहे आणि भारतीय कुटुंबांना ते खूप महत्त्वाचं वाटतं," असं न्यूयॉर्कस्थित शैक्षणिक तज्ज्ञ असलेल्या राजिका भंडारी सांगतात.

अमरनाथ घोष

फोटो स्रोत, Nitya Vedantam

फोटो कॅप्शन, शास्त्रीय नृत्यात संशोधन करणाऱ्या अमरनाथ घोष यांची फेब्रुवारी महिन्यात सेंट लुईस येथे हत्या करण्यात आली होती

न्यू जर्सीतील ड्रीव विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असणारे संगय मिश्री म्हणतात, "या सर्व मृत्यूंना एकमेकांशी जोडणारा कोणताही स्पष्ट पॅटर्न दिसून येत नाही. त्याचबरोबर हे सर्व विद्यार्थी भारतीय असल्यामुळे त्यांच्या बाबतीत ही गोष्ट होते आहे या विचारांच्या सापळ्यात न अडकणं हे खूप महत्त्वाचं आहे."

"हे मृत्यू वांशिकतेतून किंवा वंशाच्या आधारावर हल्ले केल्यामुळे झाले आहेत असं दाखवणारी कोणतीही बाब मला अद्याप आढळलेली नाही."

भारतीय पालक सांगतात की ते त्यांच्या अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या मुलांबरोबर नियमितपणे संपर्क ठेवून असतात.

मिनू अवाल ज्यांचा मुलगा दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकतो, त्या म्हणतात, "दूर भारतात राहून जेव्हा आम्ही या प्रकारच्या बातम्या ऐकतो तेव्हा आम्हाला भीती वाटते."

मिनू अवाल म्हणतात की त्यांनी त्यांच्या मुलाला सूचना दिल्या आहेत की अगदी दरोडा किंवा चोरीचा प्रसंग ओढवला तरी त्याला प्रतिकार करायचा नाही. मी त्याला सांगितलं आहे की "अशावेळी रोकड किंवा चीजवस्तू देऊन टाकायची आणि तिथून निघून जायचं."

जयपूरच्या नीतू मारडा सांगतात की त्या न्यूयॉर्क विद्यापीठात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीशी दररोज बोलतात आणि तिच्या मैत्रिणींचे फोन नंबरदेखील त्यांनी समोरच ठेवले आहेत. "मी तिला अनोळखी लोकांबरोबर बाहेर न जाण्यास सांगितलं आहे."

विविध विद्यापीठांमधील विद्यार्थीदेखील त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात.

अनुष्का मदन आणि इशिका गुप्ता या मॅसेचुसेट्समधील टफ्ट्स विद्यापीठात असोसिएशन ऑफ साऊथ एशियन्सच्या सह-अध्यक्षा आहेत. त्या म्हणतात त्यांनी सामाईक सुरक्षा तयार केले आहेत. त्यामध्ये रात्रीच्यावेळी कॅम्पसमध्ये एकट्याने पायी जाणे टाळणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

"बोस्टन ही एरवी तशी खूपच सुरक्षित जागा आहे, मात्र सध्या आसपासची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अधिक काळजी घेत आहोत," असं गुप्ता सांगतात.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2022-23 मध्ये जवळपास 267,000 भारतीयांनी अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आणि 2030 पर्यंत ही संख्या दहा लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

शारीरिक सुरक्षिततेबरोबरच विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांची देखील जाणीव आहे.

"आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्या वाढत असल्याचे स्पष्ट दिसतं आहे. आर्थिक गोष्टींचा दबाव आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दबाव या गोष्टी एकत्रितपणे विद्यार्थ्यांवर परिणाम करत आहेत. व्हिसाशी संबंधित गोष्टींवर परिणाम होऊ नये याची विद्यार्थ्यांना काळजी घ्यावी लागते आहे," असं शिक्षणतज्ज्ञ भंडारी यांनी सांगितलं.

"घरापासून विद्यार्थी जेव्हा हजारो मैल दूर असतात तेव्हा त्यांच्यावर प्रचंड मानसिक दडपण असतं."

लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशातील अनुभव वेगवेगळा असतो.

"आंतरराष्ट्रीय विद्यार्थी जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा आधार सोडून इथं शिकायला येतात आणि नवीन संस्कृतीमध्ये रुळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना वेगळ्याच प्रकारच्या तणावाला सामोरे जावं लागतं," असं सीएसयू येथील कम्युनिकेशन्सच्या कार्यकारी संचालिका रीना अरोरा सॅंकेझ सांगतात.

अमेरिकेतील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत. त्याचबरोबर भारतीय दूतावास या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणं ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीनं सत्रांचं आयोजन करत असतो.

जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंडिया क्लबचे अध्यक्ष असणारे प्रथम मेहता सांगतात, इन्स्टिट्यूटमधील अनेक भारतीय विद्यार्थ्यांपर्यत ते पोचले आहेत.

कॅम्पसमध्येच मिळणाऱ्या विविध थेरेपींची सेवा तिथं उपलब्ध आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावं यासाठी भारतीय वकिलातीशी संपर्क करून देण्यात क्लब मदत करतं. त्याचबरोबर सीएसयूकडून विद्यार्थ्यांसाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे ज्याच्या माध्यमातून विद्यापीठातील पोलिस विभागाशी संपर्क करून दिला जातो. त्याशिवाय कॅम्पसमधील आणि जवळपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेफ्टी एस्कॉर्ट सेवादेखील पुरवली जाते.

शिक्षणासाठी कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांसमोर सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था हा नेहमीच महत्त्वाचा घटक असतो असं तज्ज्ञ सांगतात.

फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे भारतातील राजदूत इरीक गार्सेटी म्हणाले होते की "अमेरिका हे शिक्षणासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे याबद्दल भारतीयांना खात्री वाटावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

मात्र अलीकडच्या काळात झालेल्या मृत्यूंमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

"अमेरिकन विद्यापीठांना हे माहीत आहे की परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी विविध इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत. मात्र त्याचबरोबर ही गोष्टीचीदेखील जाणीव आहे की विद्यार्थ्यांची वैयक्तिक सुरक्षा ही खूप चिंतेची बाब आहे." असं भंडारी सांगतात.

अनिश्चितता असूनदेखील अमेरिका हेच विद्यार्थ्यांना सर्वात हवंसं वाटणारं ठिकाण आहे.

जयपूरचा स्वराज जैन ऑगस्टमध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाकडे रवाना होणार आहे. अमेरिकेत जाण्यासाठी तो अत्यंत उत्साही आहे आणि त्याचबरोबर समोर असणाऱ्या आव्हानांचीदेखील त्याला स्पष्ट जाणीव आहे.

"प्रत्येकजण बंदूकीतून होणारा गोळीबार आणि गुन्ह्यांबद्दल बोलतो आहे. मला अतिशय सावध राहावं लागणार आहे," असं तो म्हणतो.