'बेटा, जेवलीस का? असं विचारणारंही कुणीच नाहीय इथे' - कॅनडातून बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट

- Author, सरबजीत सिंग धालीवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, कॅनडा
"मनात येतं की, आता भारतात जाऊन बाबांना घट्ट मिठी मारावी आणि मनसोक्त रडावं, मला खूप आठवण येते त्यांची."
हे बोलत असतानाच अर्पणचे डोळे पाणावतात आणि बोलता बोलता ती एकदम गप्प होते.
काही क्षण शांततेत जातात आणि मग ती पुन्हा बोलू लागते, "इथे कोणी कुणाचं नाहीये. सगळे फक्त धावतायत. मी कॅनडाबद्दल जो विचार केला होता त्याच्या बरोबर उलटं होतंय इथे सगळं."
आपली स्वप्न साकार करण्याची इच्छा उरात घेऊन अर्पण दोन वर्षांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून कॅनडात आली होती.
अर्पण पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील आहे आणि तिचे आई-वडील शिक्षक आहेत.
दोन वर्षं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता अर्पणला वर्क परमिट मिळालेलं आहे आणि ती सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करत आहे.
अर्पणप्रमाणेच इतर हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने स्टडी व्हिसा घेऊन कॅनडात येतात. पण इथे त्यांची परिस्थिती त्यांच्या स्वप्नातल्यापेक्षा खूपच विपरित असल्याचं त्यांच्या लक्षात येतं.
आपल्या मनातलं दुःख माझ्यापाशी मोकळं करताना अर्पण म्हणाली, "मला आता आई-वडिलांची खूप आठवण येते. तेव्हा कशी आई जेवण स्वतःच्या हाताने रांधून मला वाढायची. मी खेळत असायचे. कुठलीच जबाबदारी, दडपण नसायचं."
"इथे कुणीच नाहीये, जो प्रेमाने विचारेल की, मुली जेवलीस का? इथे सगळं आपलं आपल्याला करायला लागतं."
अर्पण सांगते की, खरं तर तिचा कॅनडात शिकायला यायचा असा काही प्लॅन नव्हता. ती कॅनडाचे चकचकीत व्हीडिओ पाहून खरं तर खूप प्रभावित झाली होती.
पंजाबमध्ये सगळेच जण कॅनडाबद्दल चांगलं बोलत असलेलं तिने पाहिलं होतं. या देशात विद्यार्थ्यांकडेही मोठमोठ्या कार असतात आणि मोठाली घरं असतात. शिवाय हा देश मुलींसाठीसुद्धा सुरक्षित आहे, हे तिने ऐकलं होतं.
अर्पण सांगते, "तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना मी या सगळ्या गोष्टींमुळे चांगलीच प्रभावित झाले आणि मग विचार केला की, आपणही कॅनडात जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी ग्रॅज्युएशन करून घ्यावं, पण काही लोकांनी मला सांगितलं की, जितक्या लवकर कॅनडात जाता येईल तितकं चांगलं. तितकी लवकर सेटल होशील म्हणून."
आता 24 वर्षांची असलेली अर्पण 3 वर्षांपूर्वी कॅनडात आली होती.
"हे सगळं ऐकून मी बारावी पास झाल्यावर खूप कमी वयातच कॅनडात आले. कॅनडात राहणाऱ्या माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी मला इथल्या समस्यांविषयीसुद्धा सांगितलं होतं. पण कॅनडा जाण्याचं भूत डोक्यात एवढं बसलं होतं की, मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही."
कॅनडाचं स्वप्न आणि तिथलं वास्तव
अर्पण सांगते की, 2021 मध्ये ती पहिल्यांचा कॅनडात पोहोचली, तेव्हाच तिला अंदाज आला की, ती एका वेगळ्या दुनियेत आली आहे, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. टोरांटो हे तिला तिचं स्वप्नातलं शहर वाटू लागलं.
अर्पणने सांगितलं, "एजंटचा एक परिचित मला एअरपोर्टवर घ्यायला आला होता. आणि नंतर त्यानेच मला एका घराच्या बेसमेंटमध्ये एक कॉट भाड्याने घेऊन दिली. याच जागेत मी पुढचे सात महिने राहिले."
"हे बेसमेंट म्हणजे एक हॉल होता. तिथे कुठली खोली नव्हती. जमिनीवरच गाद्या घातलेल्या होत्या. तिथे आणखी काही मुलीही राहात होत्या. बेसमेंटला एकही खिडकी नव्हती. पहिले सात महिने इथल्या अशा अंथरुणावर राहण्याचा माझा कॅनडाचा अनुभव भयंकर वाईट होता."
अर्पणचं म्हणणं आहे की, भारतात मुलांना कॅनडात जाण्याविषयी जी स्वप्नं दाखवली जातात, त्याच्या अगदी उलट वास्तवातलं चित्र आहे. एजंट हे सांगत नाहीत की तुम्हाला बेसमेंटमध्ये राहावं लागणार आहे. अभ्यासाबरोबर तुम्हाला कामही करावं लागणार आहे, विद्यार्थ्यांचं असं शोषण होतं हे कुणीच सांगत नाही. याविषयी कोणीच माहिती देत नाही. फक्त कॅनडाबद्दल सगळं काही छान छान बोललं जातं.

अर्पणच्या म्हणण्याप्रमाणे, इथलं विद्यार्थी आयुष्य संघर्षपूर्ण असतं. मानसिक तणाव, कुटुंबापासून दूर राहण्याचा अनुभव, काम मिळणार नाही याचा दबाव हा सगळा विद्यार्थी जीवनाच्या संघर्षाचा भाग आहे.
अर्पणने सांगितलं की, सध्याच्या काळात सगळ्यात मोठी समस्या काम मिळवणं ही आहे. थंडीच्या दिवसात जॉब फेअर लागतात तेव्हा नोकरीसाठी विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागतात.
यातल्या काहीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. कॅनडातलं हे वास्तव भारतात सांगितलं जात नाही. रोजचा जगण्याचा खर्च, कॉलेजची फी आणि नोकरीचा भरवसा नाही यामुळे दररोज मनात चिंता असतेच.
कॅनडात राहतानाच्या या समस्यांबद्दल ती पालकांना फारसं सांगत नाही. मोजकीच माहिती देते, जसं की माझं शिक्षण पूर्ण झालंय, आता नोकरी मिळाली आहे आणि बँकेत पगार जमा झाला आहे.
ती घरच्यांना तिच्या समस्यांविषयी का सांगत नाही, असं विचारल्यावर तिने उत्तर दिलं की, उगाच त्यांना काळजी वाटेल. आणि बहुतेक वेळा मुलं हेच करतात.
"मी काही खाल्लेलं नसेल तरी, आई-वडिलांना खोटं सांगते जेवले म्हणून. कारण मी हे सांगू शकत नाही की - कामवरून यायला इतका उशीर झाला की, मी काहीच खायला बनवू शकले नाही."
24 वर्षांची अर्पण सांगते की, माझ्यातलं बालपण मरून गेलं आहे. कमी वयातच कॅनडात आल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी पडली.
अर्पणचं लक्ष्य आता कॅनडाचं नागरिकत्व मिळवणं हेच आहे आणि यानंतरच ती आता आई-वडिलांकडे भारतात परत जाईल.
अर्पणचं म्हणणं आहे की, कॅनडा हा एक चांगला देश आहे आणि इथे कुठलाहा भेदभाव केला जात नाही. प्रगती करण्यासाठी चांगली संधी मिळते. पण इथलं विद्यार्थीजीवन खूप खडतर असतं आणि भारतात राहताना यची कल्पनाही येऊ शकत नाही.
इमिग्रेशन रेफ्युजी आणि सिटिझनशिप विभाग, कॅनडा (IRCC)यांच्या 2023 च्या आकडेवारीनुसार, या वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 29 टक्के वाढ झाली आणि सर्वाधिक स्टडी परमिट भारतीय विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आले आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकाडवर चीन आणि तिसऱ्यावर फिलीपिन्सचे विद्यार्थी आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी येतात पंजाब आणि गुजरातमधून. याशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि हरियाणामधूनही सध्या कॅनडात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत आहेत. भारतीयांमध्ये सर्वाधिक संख्या पंजाबी विद्यार्थ्यांची आहे.
उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन लाखो भारतीय विद्यार्थी गेल्या काही वर्षांत कॅनडात आले आहेत. टोरांटो एरिया(GTA)म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांचं केंद्र मानलं जातं. त्यातही ब्रॅम्पटनला मिनी पंजाब म्हणून ओळखलं जातं.
अक्रमची गोष्ट
पंजाबच्या बरनाला जिल्ह्यातल्या धूलकोट नावाच्या गावातून आलेल्या अक्रमची कहाणीसुद्धा अर्पणसारखीच आहे.
28 वर्षांचा अक्रम 2023 मध्ये स्टडी परमिटवर कॅनडात आला होता आणि सध्या तो ब्रॅम्पटनच्या एका खासदी कॉलेजात प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. अक्रम सांगतो की, त्याच्या वर्गात 32 विद्यार्थी आहेत आणि त्यातील 25 भारतीय आहेत, उरलेले अन्य देशातले आहेत.
त्याच्या वर्गात मूळचा कॅनडाचा असलेला एकही विद्यार्थी नाही.
कॅनडातल्या आपल्या आयुष्याविषयी सांगताना अक्रम म्हणतो, "कॅनडातलं आयुष्य म्हणजे एक सुंदर तुरुंग आहे. इथे तुम्हाला सगळं काही मिळतं पण पूर्ण आयुष्य तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही."
अक्रमच्या म्हणण्यानुसार, "सध्या इथे आम्ही मशीनसारखं काम करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाला जुंपलेले असतो. हे कोळ्याचं जाळं आहे. इथून बाहेर पडू शकत नाही."
अक्रमचं कॉलेज आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळचे दोन तास असतं.
अक्रम मजूर कुटुंबातून आला आहे आणि 22 लाखांचं कर्ज घेऊन तो कॅनडात आला होता.
हे कर्ज चुकवायचं आणि बरोबरीने आपलं स्वप्न साकार करण्यासाठी कमवायचं. यासाठी त्याला दोन दोन शिफ्टमध्ये काम करावं लागत आहे.
तो सांगतो की, भारतात दाखवलं जातं ते संपूर्ण सत्य नव्हतं, हे त्याला कॅनडात पोहोचल्यावरच लक्षात आलं.

अक्रम एक प्रतिभावान आणि साहित्याची आवड असलेला मुलगा आहे. पंजाबात असताना तिथल्या साहित्यिक कार्यक्रमात तो आवर्जून सहभागी होत असे. तिथल्या वर्तुळात त्याचा वावर सुरू झाला होता.
कॅनडात आल्यावर त्याच्या शायरीची भूमिका बलली आहे. अक्रमच्या कवितांमध्ये आता पंजाबच्या मातीची ओढ आणि कॅनडाच्या कठीण परिस्थितीची झलक दिसते.
खर्च भागवण्यासाठी सतत काम, भविष्याी चिंता हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यातून आपसूक दिसतं.
कर्जाचे हप्ते, कॉलेजची फी आणि राहण्या-खाण्याचा खर्च भागवण्यासाठी अक्रम आता दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट-टाइम काम करतो.
दिवसा तो एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये काम करतो आणि रात्री सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतो. फक्त पाच तास त्याला झोपायला मिळतात.
अक्रम सांगतो, "इथली चिंता कधीच कमी होत नाही. फक्त घरच्यांशी बोलतो ते दोन क्षण मला मानसिक तणावातून थोडं मोकळं होता येतं."
अक्रमनेदेखील अर्पणप्रमाणेच कॅनडातील समस्यांबाबत आपल्या आई-वडिलांना काही कल्पना दिलेली नाही.
अक्रम सध्या त्याच्या इतर पाच साथिदारांसह भाड्याने घेतलेल्या बेसमेंटमध्ये राहतो. हॉलुनमा बेसमेंटमध्ये दोन कॉट आहेत बाकी गाद्या जमिनीवर अंथरलेल्या आहेत.
त्याच्या बेसमेंटमलं एक अंथरुण रिकामं आहे. त्याबद्दल तो म्हणतो की, दुसऱ्या एका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याची तो वाट पाहतोय जो मेमध्ये भारतातून येणार आहे.
त्याच्या बेसमेंटलाही कुठलाही झरोका नाही. केवळ एक मोकळा हॉल आहे.
मानसिक ताणाला सामोरे जाणारे विद्यार्थी
निर्लेपसिंग गिल ब्रॅम्पटनमध्ये पंजाबी समुदायाच्या आरोग्यसेवेसाठी काम करतात.
भारतीय - विशेषतः पंजाबी विद्यार्थ्यांपुढच्या समस्यांमध्ये मदत करायचं काम गिल करत आहेत.
निर्लेपसिंग सांगतात, "कॅनडामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे ते तणावग्रस्त आहेत. यातली कित्येक मुलं मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. विशेषतः लहान वयात कॅनडात आलेले (बारावीनंतर पुढच्य अभ्यासासाठी आलेले)विद्यार्थी त्यात आहेत.

निर्लेपसिंग सांगतात की, लहान वय असल्याने अशा विद्यार्थ्यांचा पुरता मानसिक विकासही झालेला नसतो.
ताणाला कसं सामोरं जायचं हे त्यांना माहीतच नसतं. आई-वडील काही सांगतही असतील तरी ते काय समजावतायत हे या मुलांना पुरतं उमजतही नाही.
गिल पुढे सांगतात, "ही समस्या सगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भेडसावते असं नाही. यातूनही काही जण पुढे जातात. पण त्यांची संख्या कमी आहे."
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना तणावाला सामोरं जावं लागतं यामागची कारणं सांगताना ते सांगतात की, बरीच कारणं आहेत त्यामागे.
अनपेक्षित जबाबदारी
याचं सगळ्यात पहिलं कारण आहे की, भारतात मुलं आरामदायी आयुष्य जगत असतात याचा अर्थ त्यांचे आई-वडील त्यांची प्रत्येक बाबतीत काळजी घेत असतात. त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी नसते. पण कॅनडात अशी मुलं येतात तेव्हा त्यांच्यावर अचानक जबाबदारी येऊन पडते. त्यांची त्या दृष्टीने मानसिक तयारी झालेली नसते.
नशेच्या आहारी जातात
"कॅनडात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात. भारतातही ड्रग्ज असतात पण कॅनडात 55 ते 70 प्रकारचे वेगवेगळे ड्रग्ज मिळू शकतात. ड्रग्जच्या आहारी गेल्याने विद्यार्थी मानसिक आणि शारीरिक रोगांचे शिकार होतात", ते सांगतात.
याशिवाय ड्रग्ज ओव्हरडोसमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढत आहे.
निर्लेपसिंग सांगतात की, कॅनडात भारतीयांची संख्या मोठी आहे. फक्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रमाण का वाढतंय हा एक प्रश्न आहे.
यातले बहुतेक मृत्यू हार्ट अटॅक असल्याचं निष्पन्न होतं.
याशिवाय अनेक कारणांनी मानसिक तणावग्रस्त असल्याने आत्महत्या करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढते आहे.
पीआर मिळवण्याचा दबाव
तणाव आणि चिंता कॅनडात राहताना विद्यार्थ्यांच्या सतत मागे असतात.
समोरच्या समस्येचं निराकरण कसं करावं हे कळलं नाही तर विद्यार्थी नैराश्यग्रस्त होतात. शिवाय या देशाचं नागरिकत्व आणि पीआर मिळवण्यासाठी त्यांच्यावर मानसिक दबाव असतोच.
कॅनडात विद्यार्थ्यांचे मृत्यू
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदायाबाबत एक गोष्ट सगळ्यात जास्त धक्कादायक आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांचे मृत्यू. याविषयी माहिती घ्यायला बीबीसीने ब्रॅम्पटनच्या एका खासगी फ्युनरल होम किंवा स्मशानाचे व्यवस्थापक हरमिंदर हांसी यांच्याशी बातचित केली. ते गेली 15 वर्षं हे फ्युनरल होम चालवतात. या फ्युनरल होममध्ये मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्कार केले जातात.
हरमिंदर हांसी यांनी सांगितलं की, गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमध्ये बरीच वाढ झाली आहे.
बहुतेक वेळा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेला असतो. पण सध्या जास्त मृत्यूंमागचं कारण आत्महत्या असल्याचं लक्षात येत आहे.

याशिवाय ड्रग्ज ओव्हरडोसनेसुद्धा मृत्यू होत आहेत. नशेत गाडी चालवल्यामुळे अपघातात मृत्यू होतात. हेही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं.
हांसी यांनी सांगितलं की, ते महिन्याला साधारण चार-पाच मृतदेह भारतात पाठवतात. याशिवाय काही लोक कॅनडातच अग्निसंस्कार अंत्यविधी करतात. याचा आकडा उपलब्ध नाही.
हंसी यांच्या नुसार, हा फक्त एका स्मशानभूमीचा आकडा आहे आणि जीटीएमध्ये अशी अनेक अंत्यविधी केंद्र आहेत. संपूर्ण कॅनडाची आकडेवारी एकत्र केली तर कितीतरी मोठी संख्या बाहेर येऊ शकते.
डिसेंबर 2023 मध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी म्हटलं होतं की, 2018 पासून डिसेंबर 2023 पर्यंत 403 भारतीय विद्यार्थ्यांचा विदेशात मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यूसंख्या -94 - ही कॅनडातली आहे.
त्यांनी दिलेल्या उत्तरात पुढे असंही सांगितलं की, यातले काही नैसर्गिक मृत्यू होते तर काही अपघाामुळे झालेले होते. डिसेंबर 2023 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटलं होतं की, भारतातून कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर देशांच्या मानाने बरीच अधिक आहे.
कॅनडा वर्क परमिटमागचं सत्य काय आहे?
दर वर्षी लाखो भारतीय विद्यार्थी स्टडी परमिट घेऊन कॅनडात जातात. कॅनडा सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सक्रिय विद्यार्थी व्हिसाची संख्या 29 टक्क्यांनी वाढून 10 लाख 40 हजार झाली आहे.
यातील साधारण चार लाख 87 हजार भारतीय विद्यार्थी आहेत. 2022 च्या तुलनेत ही संख्या 33.8 टक्क्यांनी अधिक आहे.
सर्वसाधारणपणे कॅनडाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना तिप्पट अधिक फी भरावी लागते.

कॅनडा सरकारच्या 2022 च्या एका रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी इथल्या अर्थव्यवस्थेत 22 अब्ज कॅनडियन डॉलर एवढं योगदान दिलं आहे आणि याशिवाय साधारण 2.2 लाख नवे रोजगार निर्माण केले आहेत.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत का महत्त्वाचे आहेत हे यातून प्रतीत होतं. भारतासह जगभरातले विद्यार्थी कॅनडात दरवर्षी शिक्षणासाठी येतात. यात अर्थातच भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
याच कारणाने कॅनडातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देत आहेत. कित्येक महाविद्यालयं फक्त नावाला कॉलेज आहे. त्यांच्याकडे मैदान नाही की कँपस नाही. फक्त दोन खोल्या घेऊन त्याला कॉलेजचं नाव दिलेलं आहे. कॅनडा सरकारने आता अशा कॉलेजांविरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
ओंटारियोच्या महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या एका रिपोर्टनुसार, 2012 पासून 2021 पर्यंत या भागातील खासगी महाविद्यालयांतील स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या 15 टक्क्यांनी कमी झाली आहे.
याउलट आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या 342 टक्क्यांनी वाढलेली दिसत आहे. यात 62 टक्के संख्या भारतीय विद्यार्थ्यांची होती.
कॅनडातील शिक्षणाचा स्तर
कॅनडात शैक्षणिक गुणवत्ता नेमकी कुठल्या स्तरावर आहे?
याविषयी टोरांटोमध्ये बराच काळ पत्रकारिता केलेल्या जसवीर शमील यांचं म्हणणं आहे की, गेल्या दहा वर्षांत कॅनडात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
जसवीर शमील यांनी सांगितलं, "स्टडी परमिट हा कॅनडात येण्याचा एक मार्ग आहे. इथे आल्यावर बहुतेक विद्यार्थी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ट्रक ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, डिलिव्हरी वर्कर, हॉटेल वर्कर अशा स्वरूपाची कामं करायला सुरुवात करतात.
शमील सांगतात की, बहुतांश विद्यार्थी यातच अडकून राहतात. ज्या विषयाचा अभ्यास केला आहे, त्याच्याशी संबंधि नोकरी करआहे.णाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यांच्या मते, कॅनडात सध्या तरी नोकरी मिळण्याची परिस्थिती अगदी अवघड आहे. विद्यार्थ्यांचं सोडा, स्थानिक नागरिकांनाही नोकरी मिळवणं अवघड झालं आहे.

शमील यांच्या मते, कॅनडाच्या खासगी महाविद्यालयांमध्ये भारतीय विद्यार्थी भरलेले आहेत. कित्येक कॉलेजांमध्ये तर 95 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी भारतीय आहेत.
त्यांनी सांगितलं की, आता 2024 पासून कॅनडा सरकार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्येवर काही निर्बंध घालत आहे.
आंततराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार दोन वर्षांसाठी परदेशी विद्यार्थ्यांची संख्या 35 टक्क्यांनी घटलेली आहे. याशिवाय कॅनडा सरकराने फक्त मास्टर्स किंवा डॉक्टरेट करायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या पती किंवा पत्नीलाच यापुढे व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
पदव्युत्तर शिक्षणापूर्वीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या जोडिदाराला स्पाउज व्हिसावर कॅनडात निमंत्रित करू शकणार नाहीत. कॅनडात निवासासाठी समस्या निर्माण झाल्यामुळे कॅनडा सरकारने ही पावलं उचलली आहेत. कारण तिथे आता घरांची समस्या निर्माण झाली होती.
कॅनडा सरकारचे आकडे सांगतात की, संपूर्ण देशात या वेळी 3 लाख 45 हजार घरांची कमतरता आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना बेसमेंटमध्ये राहण्यावाचून पर्याय नाही.
धार्मिक स्थळं आणि फूड बँक यांचा आधार
कॅनडामध्ये नोकऱ्यांची कमतरता असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नाही.
वाढती महागाई आणि त्यात रोजगार नाही, या कारणाने अनेक विद्यार्थ्यांना दोन वेळचं जेवण मिळणंही दुरापास्त होत आहे.
अशात मग अनेक विद्यार्थ्यांना गुरूद्वारा आणि फूड बँकेचा आधार मिळत आहे.
विशाल खन्ना ब्रॅम्पटनमध्ये फूड बँक चालवतात.
खन्ना सांगतात, “कॉलेजची फी, राहायला घर, त्यासाठीचं भाडं आणि त्यात रोजगार नाही यामुळे विद्यार्थ्यांचं जीणं मुश्कील झालं आहे.”

खन्ना यांच्यानुसार, ते दर महिन्याला 600 ते 700 विद्यार्थ्यांना कच्चं सामान किंवा कोरडा किराणा माल उपलब्ध करून देऊन मदत करतात. गुरुद्वारांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची गर्दी नेहमीची झाली आहे. कधी कधी हे विद्यार्थी केवळ लंगरसाठी गुरुव्दारात येतात.
गुरुद्वारांचे प्रबंधनदेखील अशा गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
कॅनडातून परत का येत नाहीत विद्यार्थी?
अक्रमला जेव्हा विचारलं की, इथे इतकं खडतर आयुष्य आहे तर तो भारतात परत का नाही जात? त्यावर त्याचं उत्तर होतं – “गाववाले काय म्हणतील? नातेवाईकांना काय उत्तर देऊ?”
“आम्हाला लाख वाटलं परत जावं तरी आम्ही परतू शकत नाही. नातेवाईक आणि समाजाच्या दबावामुळे आम्ही पुन्हा भारतात जाऊ शकत नाही.”
आता असं अर्धवट सोडून परत गेलो तर त्या कॅनडातल्या स्वप्नांचं काय होणार, जी त्यांनी भारतात असताना पाहिली होती... असा विचार विद्यार्थी करतात.
अक्रम सांगतो की, “स्वदेशात परतलो तर आमच्याकडे नकारात्मक नजरेने पाहिलं जाईल. कॅनडात बस्तान बसवायचा मार्ग आत्ता खडतर नक्की आहे, बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण तरीही हा मार्ग आमच्या लक्ष्यापर्यंत नक्कीच घेऊन जाणार.”

अक्रमच्या कवितेतून हे लक्ष्य साध्य करण्याचा पंजाबात परतण्याचा वारंवार उल्लेख येतो.
अर्पणसुद्धा कॅनडातल्या जगण्यावर वैतागली आहे. तिच्याही मनात पंजाबात परत जावं, आई-वडिलांना भेटावं असं सतत येत असतं. पण कॅनडाचं नागरिकत्व अशाने मिळणार नाही आणि ते तिचं उद्दिष्ट आहे.
एकदा कॅनडाचं नागरिकत्व मिळताच भारतात परत जाण्याची अर्पणची इच्छा आहे.
अर्पणप्रमाणेच हजारो मुलं आपलं घर, परिवार, मित्रमंडळी यांना सोडून दूर गेले आहेत आणि वेळेआधीच मोठे झाले आहेत. पण परदेशात बस्तान बसवायचं त्यांचं सोनेरी स्वप्न इथे पुरं होईल कां?
की पंजाबचे कवी सुरजीत पातर यांच्या या काव्यपंक्तींसारखी अवस्था येईल...
जो विदेशन च रुल्दे ने रोज़ी लई
देश अपने परतनगे जद वी कदी
कुज तां सेकनगे माँ दे सीवे दी अगन
बाकी कबरां दे रुख हेठ जा बहनगे











