अमेरिकेमुळे भारताचे ‘सूर बदलले’ असं जस्टिन ट्रुडो का म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताबाबत पुन्हा एकदा त्यांच्या देशात भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले की, अमेरिकेच्या जमिनीवर शीख नेते गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या हत्येच्या कटात सहभागी भारतीय नागरिकाचं नाव आल्यावर कॅनडाप्रति भारताने नरमाईची भूमिका घेतली आहे.
ट्रुडो कॅनडाच्या ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनसाठी बोलताना म्हणाले, “मला असं वाटतं की आता सामंजस्याचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. भारताला हे समजलं आहे की ते अशा पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही. सहकार्याच्या भूमिकेत आता एक प्रकारचा खुलेपणा आला आहे. त्याआधी ते इतके मोकळेपणी बोलत नव्हते.”
ते म्हणाले की अमेरिकेने आरोप केल्यावर भारत सरकार नम्रपणाची भूमिका घेत आहे.
ट्रुडो म्हणाले, “आता कदाचित असा समज झाला आहे की कॅनडावर हल्ला केल्यामुळे ही समस्या सुटू शकत नाही.”
ते म्हणाले, “आम्ही सध्या भारतात कोणाशीही भांडण करू इच्छित नाही. आम्ही यावर काम करू इच्छितो. आम्ही हिंद- प्रशांत रणनीतिवर पुढे जाऊ इच्छितो. मात्र लोकांच्या अधिकारासाठी, त्यांची सुरक्षा आणि कायद्याच्या राज्यासाठी उभं राहाणं कॅनडासाठी अतिशय गरजेचं आहे. आम्ही हेच करणार आहोत.”
ते म्हणाले की अमेरिकेने केलेल्या आरोपांमुळे अधिक शांत भूमिका घेण्यासाठी भारताला राजी केलं आहे. कॅनडाविरुद्ध लागोपाठ हल्ला केल्यामुळे ही समस्या दूर होणार नाही असंही वाटत आहे.
ट्रुडो यांनी ब्रिटिश कोलंबियात 18 जूनला खलिस्तानी फुटीरतावादी नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येप्रकरणी भारतीय एजंटच्या ‘तथाकथित’ अलिप्ततेचे आरोप सप्टेंबर महिन्यात लावले होते. भारताने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत त्यांना खारिज केलं होतं.
त्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध अतिशय तणावपूर्ण झाले होते. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं.
अमेरिकेने काय म्हटलं?
यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने दावा केला आहे की भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांनी न्यूयॉर्कमध्ये एक शीख नेत्याच्या हत्येसाठी एका व्यक्तीला जवळजवळ 83 लाखांची सुपारी दिली होती. निखिल गुप्तांचं वय 52 वर्षं आहे.
“निखिल गुप्तांना भारत सरकारचे एक कर्मचारी आदेश देत असत,” असा दावा अमेरिकेत सादर केलेल्या कागदपत्रात केला होता. मात्र या कर्मचाऱ्याचं नाव सांगण्यात आलेलं नाही.
भारताने यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. अमेरिकेने त्याचं स्वागत केलं होतं.
या शीख नेत्याचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. मात्र काही प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचं नाव गुरपतवंत सिंह पन्नू असल्याचं सांगितलं होतं.
हे प्रकरण भारताने गांभीर्यानं घेतल्याचं सांगितलं होतं आणि त्यात भारतीय अधिकाऱ्याचं नाव नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “अमेरिकेबरोबर द्विपक्षीय सुरक्षा चर्चेदरम्यान अमेरिकेने काही इनपूट दिले होते. ते संगठित गुन्हेगारी, दहशतवादी आणि शस्त्रांच्या कारभाराबाबतच्या नेक्ससबाबतीत होते. भारताने त्याच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे.”
अमेरिकेने ज्या निखिल गुप्तांवर आरोप केले होते त्यांनी काही दिवसांआधी एक रिट याचिका दाखल केली होती.
निखिल गुप्ता यांनी सुप्रीम कोर्टात मागणी केली होती की भारत सरकारला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगावं.
निखिल गुप्ता जून महिन्यापासून चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे अटकेत आहेत.
पंतप्रधान मोदी पन्नू प्रकरणावर काय म्हणाले?
मोदी यांनी फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की पुरावे बघितले जातील, मात्र त्यामुळे भारत अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही.
पीएम मोदी यांनी फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना एका मुलाखतीत म्हटलं, “आम्हाला कोणी माहिती दिली तर आम्ही त्यावर नक्की विचार करू. आमच्या नागरिकांनी काही चांगलं वाईट केलं तर आम्ही त्याकडे नक्की लक्ष देऊ. आम्ही सर्व कायद्यांशी बांधिल आहोत.”
पन्नू सिख फॉर जस्टिसचे प्रमुख आहेत. भारताने ही संस्था दहशतवादी संस्था असल्याचं याआधीच जाहीर केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मोदी यांनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की भारताच्या बाहेर सुरू असलेल्या कारवायांमुळे चिंतित आहेत.
ते म्हणाले, “ हे फुटीरतावादी लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धमक्या देतात आणि हिंसाचार करतात.”
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि भारत संबंधाचा हवाला देताना सांगितलं की "सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा भाग आहे.”
पंतप्रधान म्हणाले, “मला नाही वाटत की दोन घटनांना राजनैतिक संबंधांशी जोडायला पाहिजे.”
कॅनडाने काय आरोप केले होते?
यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर गंभीर आरोप केले होते.
शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. भारतने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं की कॅनडाने त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत पन्नूच्या हत्येनंतर भारताचं नाव आलं तर भारताची प्रतिक्रिया एकदम वेगळी होती.
भारताने या संदर्भात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. अमेरिकेचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी भारताचा दौरा करून गेले आहेत.
दोन्ही देशांच्या भूमिकेत अंतर निर्माण झालं आहे त्याबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले, “कॅनडा आणि अमेरिकेचं प्रकरण वेगळं आहे. अमेरिकेने आम्हाला पुरावे दिले आहेत.”
गेल्या आठवड्यात ट्रुडो म्हणाले की, “भारतावर दबाव टाकल्यावर आणि कॅनडाच्या भूमीवर अशा हल्ल्यांना थोपवण्यासाठी अनेक दिवस राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सार्वजनिक पातळीवर हे आरोप लावले होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








