गटबाजी ते दुरावलेला दलित समाज, हरियाणात काँग्रेसच्या पराभवाची 'ही' आहेत 5 कारणं

काँग्रेस

फोटो स्रोत, ANI

    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भाजपानं चमत्कार करून दाखवला आहे, तर दुसरीकडे विजयाची खात्री असलेला काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राजकीय विश्लेषक, सर्वसामान्य नागरिक, प्रसारमाध्यमं, एक्झिट पोल असं सर्वच स्तरात काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात असताना आलेल्या या अनपेक्षित निकालांमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. हे नेमकं कसं घडलं याचं सखोल विश्लेषण करणारा हा लेख :

हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की एखाद्या पक्षानं लागोपाठ तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपानं दणदणीत विजय मिळवत हॅट्रिक केली आहे.

हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळणार असा काँग्रेस पक्षाचा दावा होता. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. पाच ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.

या निवडणुकीत भाजपाच्या तुलनेत काँग्रेस पक्षाची बाजू वरचढ असल्याचं सांगितलं जात होतं.

जाणकार देखील म्हणत होते की हरियाणात मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात लाट आहे आणि निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकेल असा त्यांचा दावा होता.

याशिवाय पाच ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर देशातील अनेक प्रसारमाध्यमांनी 'एक्झिट पोल' च्या आधारे काँग्रेस पक्षाचा विजय होणार असल्याचे म्हटलं होतं.

'एक्झिट पोल' मध्ये फक्त काँग्रेसचा विजयच दाखवण्यात आला नव्हता तर हरियाणा विधानसभेतील 90 जागांपैकी जवळपास 60 जागा मिळण्याचाही दावा करण्यात आला होता.

हरियाणात विविध कारणांमुळे सर्वसामान्य लोक भाजपा सरकारवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. यात शेतकऱ्यांचे प्रश्न, अग्निवीर योजना यासारखे अनेक मुद्दे होते.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे राजकीय विश्लेषक किंवा जाणकारांपासून 'एक्सिझ पोल' पर्यंत सर्वांचेच अंदाज चुकले आहेत.

इतकंच नाही तर हरियाणात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

मात्र या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?

वरिष्ठ पत्रकार हेमंत अत्री यांना वाटतं की, "या निकालामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजपाचं मायक्रो मॅनेजमेंट. हरियाणात भाजपानं बिगर जाट मतं मोठ्या हुशारीनं स्वत:कडे वळवली आहेत. त्याचा परिणाम असा झाला की हुड्डा यांचा बालेकिल्ला असलेल्या सोनीपतमधील पाचपैकी चार जागांवर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आहे."

1. जाट विरुद्ध बिगर जाट

हेमंत अत्री यांच्या मते, काँग्रेस पक्षाची अशी लाट होती की जागोजागी त्यांचेच उमेदवार विजयी होणार असं दिसत होतं.

हरियाणातील राजकीय विश्लेषक, सर्वसामान्य नागरिक आणि एक्झिट पोल सर्वजण काँग्रेस जिंकणार असल्याचं म्हणत होते. मात्र भाजपाच्या मायक्रो मॅनेजमेंटनं निवडणुकीचे निकालच बदलून टाकले.

हरियाणातील राजकारणावर बारकाईनं लक्ष ठेवणारे वरिष्ठ पत्रकार आदेश रावल यांच्या मते, हरियाणात जवळपास 22 टक्के जाट मतं आहेत. हे मतदार उघडपणे त्यांची भूमिका मांडतात.

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

बिगर जाटांना वाटलं की "काँग्रेस पक्ष जिंकल्यास भूपिंदर सिंह हुड्डाच हरियाणाचे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे त्यांनी शांतपणे भाजपाला मतदान केलं आहे."

आदेश रावल यांच्या मते, हरियाणातील विधानसभा निवडणुकीत मतांची विभागणी, जाट आणि बिगर जाट या आधारे झाली. मतांच्या या विभागणीचा थेट फटका बसत काँग्रेसचा पराभव झाला आहे.

अनेक मतदारसंघांमध्ये बिगर जाट आणि जाट मतांचं गणित जुळवण्यात भाजपा यशस्वी ठरली. राज्यातील अनेक जागांवर अटीतटीच्या लढती होत भाजपाच्या उमेदवारांनी अगदी थोड्या फरकानं काँग्रेसच्या उमेदवारांना हरवलं आहे.

यामध्ये आसंध, दादरी, यमुनानगर, सफीदों, समलखा, गोहाना, राई, फतेहाबाद, तोशाम, बाढडा, महेंद्रगड आणि बरवाला या मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा अगदी थोड्या फरकानं पराभव झाला आहे.

2. पक्षांतर्गंत गटबाजी

हरियाणात काँग्रेसच्या पराभवामागे पक्षातील अंतर्गत गटबाजी हे देखील एक प्रमुख कारण आहे.

जाणकारांचं म्हणणं आहे की राज्यात काँग्रेस उमेदवारांमध्ये भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या गटाचे उमेदवार आणि कुमारी शैलजा यांच्या गटाचे उमेदवार अशी विभागणी झाली होती.

इतकंच नाही तर काँग्रेसचे अनेक उमेदवार हे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे उमेदवार असल्याचे म्हटलं जात होतं.

हेमंत अत्री यांना वाटतं की हरियाणातील पक्षांतर्गंत गटबाजी आणि तिकिट वाटपात झालेल्या चुका यामुळे काँग्रेस पक्षाचा जवळपास 13 जागांवर पराभव झाला आहे.

काँग्रेस

फोटो स्रोत, ANI

यामध्ये भूपिंदर सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या पसंतीच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे.

काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांच्यासंदर्भात देखील विविध गोष्टींची चर्चा होत राहिली. अगदी असंही म्हटलं जात होतं की काँग्रेसच्या नेत्यांचं निवडणुकीपेक्षा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यावरच अधिक लक्ष होतं.

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की या निवडणुकीतून मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे अती आत्मविश्वास बाळगता कामा नये. अर्थातच त्यांचा इशारा काँग्रेसकडेच होता.

हरियाणात काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये आघाडी करण्यासाठी वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालं नव्हतं.

3. तिकीट वाटप

यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपानं 25 जागांवर उमेदवार बदलले होते.

बदललेल्या उमेदवारांपैकी 16 उमेदवार विजयी झाले आहेत. तर ज्या मतदारसंघात आधी भाजपाचे आमदार होते अशा 27 जागांवर त्यांचे उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. तर जवळपास 22 नवीन जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे.

हेमंत अत्री म्हणतात, "काँग्रेसनं त्यांच्या कोणत्याही आमदाराचं तिकीट कापलं नाही. परिणामी त्यांच्या अर्ध्या उमेदवारांचा पराभव झाला. उमेदवारांमध्ये बदल न करणं हे देखील काँग्रेसला मोठा फटका बसला आहे."

हरियाणा विधानसभा निकाल

फोटो स्रोत, ANI

2019 मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपानं 90 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे 40 उमेदवार निवडून आले होते. यावेळेस भाजपानं 89 जागी त्यांचे उमेदवार उभे केले होते. 2019 ला काँग्रेसला 90 पैकी 31 जागांवर विजय मिळाला होता.

यावर्षीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये काँग्रेसला 43 टक्के मतं मिळाली होती. तर भाजपाला 46 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये फारच थोडा फरक होता.

4. दलित मतं काँग्रेसपासून दुरावली

लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणातील जवळपास 44 विधानसभा मतदारसंघांमधून सर्वाधिक मतं मिळाली होती. तर काँग्रेस 42 विधानसभा क्षेत्रांमध्ये आघाडीवर होती. या प्रकारे देखील दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमधील फरक फारच थोडा होता.

जाणकारांच्या मते, लोकसभा निवडणुकीत दलित मतं मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मिळाली होती. मात्र या विधानसभा निवडणुकीत ही मतं काँग्रेसपासून दुरावल्याचं दिसतं आहे.

या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला हरियाणात फक्त एक टक्का मतं मिळाली होती. मात्र या विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

इतकंच नाही तर मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस आम आदमी पार्टीला राज्यात मिळालेल्या मतांमध्ये देखील जवळपास एक टक्क्याची वाढ झाली आहे.

भूपिंदरसिंह हुड्डा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भूपिंदरसिंह हुड्डा

उदाहरणार्थ हरियाणातील आसंध विधानसभा मतदारसंघातील मतं मोजणी संपल्यानंतर भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा 2,300 मतं जास्त मिळाली आहेत. तर त्याच मतदारसंघात बीएसपीला 27 हजारांहून अधिक मतं मिळाली आहे. या मतदारसंघाच्या अधिकृत निकालाची घोषणा अद्याप बाकी आहे.

आदेश रावल सांगतात, "यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील दलितांनी काँग्रेसला मतदान केलं होतं. काँग्रेसनं या गोष्टीचा आत्ममंथन केलं पाहिजे की असं काय झालं की फक्त तीनच महिन्यात ही दलित मतं त्यांच्यापासून दूर गेली."

5. भाजपाचं मायक्रो मॅनेजमेंट

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे बारकाईनं पाहिल्यास 10 पेक्षा अधिक जागांवर छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांमुळे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला यश मिळालेलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. मात्र छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीमुळे काँग्रेसला फटका बसला ही बाब स्पष्ट दिसते.

हेमंत अत्री यांच्या मते, ज्या मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकण्याची शक्यता कमी होती आणि काँग्रेस उमेदवाराचा विजयही निश्चित वाटत नव्हता, त्या सर्व जागांवर भाजपानं काँग्रेस विरोधी उमेदवाराला मदत केली.

उदाहरणार्थ, दादरी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारानं फक्त 1,957 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार संजय छापरिया यांना 3,713 मतं मिळाली आहेत.

हरियाणा विधानसभा निकाल

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय आणखी दोन उमेदवारांचा विजय देखील अशाच फरकानं झाला आहे. तिथे अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मतं भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारामधील फरकापेक्षा अधिक आहेत.

म्हणजेच जर या मतांची विभागणी अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या उमेदवारांकडे झाली नसती तर तिथे काँग्रेसचे उमेदवार जिंकले असते.

अशीच परिस्थिती सफीदो मतदारसंघाची आहे. तिथे भाजपाच्या उमेदवारानं काँग्रेसच्या उमेदवाराचा 4,000 मतांनी पराभव केला आहे. तर तिथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अपक्ष उमेदवाराला 20 हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत.

तर फतेहाबाद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेस उमेदवारापेक्षा 2,252 मतं जास्त मिळाली. तर याच मतदारसंघातून उभे राहिलेल्या इतर चार उमेदवारांना अडीच हजार ते जवळपास 10 हजार मतं मिळाली आहेत.