राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत स्वयंपाक केला ते धाराशिवचे शाहू पाटोळे कोण आहेत?

फोटो स्रोत, facebook/rahulgandhi
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"दलितांच्या घरात काय शिजतं हे कुणालाही माहिती नसतं," दलित किचन्स इन मराठवाडा या इंग्रजी पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांचं हे वाक्य.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि शाहू पाटोळे यांचा एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.
कोल्हापुरातील अजय सनदे आणि अंजना सनदे यांच्या घरी जाऊन, राहुल गांधींनी शाहू पाटोळेंसोबत लसूण ठेचलं, पळीने भाजी शिजवली आणि दलितांच्या घरात शिजणाऱ्या अन्नासोबतच दलितांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावर सुमारे दीड तास चर्चा केली.
राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर या प्रसंगाचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
राहुल गांधींना दलितांच्या स्वयंपाकघरात घेऊन जाणारे शाहू पाटोळे हे नेमके कोण आहेत? त्यांची आणि राहुल गांधींची ओळख कशी झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
सुमारे आठ वर्षांपूर्वी दलितांच्या खाद्य, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाबाबत धाराशिव जिल्ह्यात खामगावमध्ये जन्मलेल्या शाहू पाटोळे यांनी 'अन्न हे अपूर्णब्रह्म नावाचं' पुस्तक लिहिलं.
दोन महिन्यांपूर्वी हे पुस्तक 'दलित किचन्स इन मराठवाडा' नावाने इंग्रजीत प्रकाशित झालं आणि हे पुस्तक वाचूनच राहुल गांधींनी शाहू पाटोळे यांची भेट घेऊन दलितांच्या खाद्यसंस्कृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.


शाहू पाटोळे भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस)निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी संरक्षण दलातील जनसंपर्क खात्यात (डिफेन्स पीआरओ), पीआयबी, आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या संस्थांसाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे.
विशेषतः नागालँडमध्ये बरीच वर्षे राहून काम केल्याने त्यांचा ईशान्य भारतावर देखील अभ्यास आहे. याच विषयावर त्यांनी 'कुकणालीम' नावाचं एक मराठी पुस्तकही लिहिलं आहे.

फोटो स्रोत, facebook/rahulgandhi
राहुल गांधींशी काय चर्चा झाली?
शाहू पाटोळे म्हणाले की, "मागच्या दोन महिन्यांपासून राहुल गांधींच्या टीमसोबत माझा संवाद सुरू होता. ते म्हणाले होते की मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यानुसार राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यात आमची भेट घडवून देण्यात आली."
शाहू पाटोळे म्हणाले की, "मी म्हणालो की आम्ही तुमचे मतदार कधीच नव्हतो. कारण माझं गाव आणि आमचा पट्टा हा शेतकरी कामगार पक्षाचा होता. भाजपला आम्ही कधीच मतदान केलं नाही, आणि यापुढे देखील कधी त्यांना मत देणार नाही."
राहुल यांनी मला विचारलं की, "तुमच्या घराशेजारचे लोक तुमच्या घरी चहासुद्धा पित नाहीत का?" या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो की, माझं गाव देशातल्या लाखो गावांसारखंच आहे. फक्त माझं घरच नाही तर देशभरातील जेवढ्या दलितांच्या वस्त्या आणि घरं असतील त्यांच्या वरच्या जातीतील शेजारी अजूनही दलितांच्या घरी जाऊन चहा घेत नाहीत. इथे मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलत नव्हतो पण एडिटिंगमुळे त्यात ते राहून गेलं आहे."

फोटो स्रोत, facebook/rahulgandhi
शाहू पाटोळे यांनी राहुल गांधींनी गावांची रचना सांगितली ते म्हणाले की, "मी राहुलना म्हणालो की, 'एका गावात दोन गावं असतात आपल्याकडे.' यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत विचारलं की, "असं कसं होऊ शकतं?" मी त्यांना म्हणालो की, एक गाव मुख्य गावातलं असतं आणि दुसरं एक गाव गावकुसाबाहेचं असतं. आम्ही मुख्यतः अन्न आणि पुस्तकांवर बोललो. पण आपल्याकडे राजकारणात अन्न आणलेलं आहे. आधी ते समाजकारणात होतं आणि म्हणून ही भेट मला महत्त्वाची वाटते."
"राहुल गांधी आणि माझ्या बोलण्याची सुरुवात मणिपूर आणि नागालँडपासून झाली कारण आमच्या बोलण्याचा मुख्य विषय होता अन्न. त्यांच्या टीमने मला अन्नावरच जास्त बोलायला सांगितलं पण राहुल म्हणाले की त्यांना बोलू द्या मला ईशान्येकडील राज्यांबाबत अधिक समजून घ्यायचं आहे. मी नागालँडला तीन वर्षे नोकरी केली आहे. मी मणिपुरवर 'कुकणालीम' नावाचं पुस्तक लिहिलं आहे."
"मणिपूरमध्ये सुरु असलेला संघर्ष कुठलाही राजकीय पक्ष थांबवू शकत नाही. हा संघर्ष कधी थांबणार हे संपूर्णतः मैतेई आणि कुकी समुदाय ठरवतील. कारण तिथली माणसंच असे निर्णय घेतात." असं शाहू पाटोळे यांनी राहुल गांधींना सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
राहुल गांधींनी भाज्या निवडल्या, लसूण ठेचून दिला
शाहू पाटोळे म्हणाले की, "सध्या नवरात्र सुरु आहे, त्यामुळे मी मुद्दाम शाकाहारी भाज्या घेऊन गेलो होतो. मला यावरून कसलाच वाद नको होता. ज्या भाज्यांना फोडणीची गरज नाही अशा पारंपरिक भाज्या मी निवडल्या होत्या. या भाज्यांना तेलच लागत नाही. "
"घरून जाताना मी माझ्या आईकडून खर्डा (हिरव्या मिरचीचं वाटण) घेऊन गेलो होतो. यासोबतच हरभऱ्याची पानं घेऊन मी गेलो होतो. तिथे गेल्यावर मी कांद्याची पात आणि काटेरी वांगे आणायला लावले. गावाकडची चव यायला हवी म्हणून मी तांबडं तिखटसुद्धा घेऊन गेलो होतो."

फोटो स्रोत, facebook/rahulgandhi
शाहू पाटोळे म्हणाले की, "सनदे कुटुंबाचं घर थोडं प्रशस्त असल्यामुळे त्याची निवड झाली होती. मी आणि राहुल गांधींनी साधारणतः दीड तास गप्पा मारल्या. हे सगळं करत असताना, मी राहुल गांधींना भाज्या निवडायला देखील लावल्या होत्या. मी त्यांना डाळ-वांगं आणि कांद्याची पात पळीने घरटायला लावली होती. त्यांनी ती व्यवस्थित घरटल्यावर मी त्यांना सांगितलं की आता ही भाजी नीट बनली आहे. त्यांना कांद्याची पात आणि डाळ-वांग्याची भाजी त्यांना आवडली. विशेष म्हणजे ते स्वतःहून भात नको म्हणाले, ते म्हणाले की मला तांदूळ नकोय, तुम्ही जे खाताय ते मी खाईन."

बरेच राजकीय नेते दलितांच्या, आदिवासींच्या घरी जाऊन जेवण करतात याबाबत बोलताना ते म्हणाले की, "राहुल गांधींना मी म्हणालो की मी ऐंशीच्या दशकात निघालेल्या बाबा आमटेंच्या पहिल्या भारत जोडो यात्रेत देखील होतो. त्यांनी त्याविषयीचं पुस्तक माझ्याकडून घेतलं. त्यांना मी नंतर म्हणालो की तुमच्या भारत जोडो यात्रेत देखील मी सहभागी झालोय. मी तुमचा मतदार आहे. सध्या आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा कोणताच राजकीय पर्याय उरलेला नाही, असा पर्याय भविष्यात निर्माण होऊ शकतो पण तो होईल तेव्हा काय करायचं हे आम्ही बघू."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शाहू पाटोळे पुढे म्हणले की, "दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वागण्याबोलण्यात सहजपणा होता. एकमेकांशी हस्तांदोलन केलं की लगेच कळतं की पुढचा माणूस मनापासून भेटतोय की नाटक करतोय. आमच्या भेटीत आणि व्हीडिओतसुद्धा मीच जास्त बोललो आहे आणि राहुल गांधी मला ऐकून घेत होते. उलट ते मला अधिक बोलण्यास प्रोत्साहन देत होते."
जातिभेदांबाबत शाहू पाटोळे म्हणाले की, "महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्राला सामाजिक चळवळींचा वारसा आहे. पण मागच्या दहा वर्षांमध्ये जातीय अस्मिता अधिक टोकदार झाल्या आहेत. कारण, सरकार कुणी काय खावं? कुणी कुठले कपडे घालावेत? याबाबत निर्णय घेत आहे. सरकारने यात पडू नये. वैदिक परंपरेत आमचे देव निराकार होते, त्यांना कसलाच आकार नव्हता, ते आमच्याकडून काहीच मागायचे नाहीत. आमच्या देवांना त्यांचं मंदिर बांधलं म्हणून किंवा नाही बांधलं म्हणून कशानेही फरक पडत नाही. मला राहुल गांधी प्रामाणिक वाटले. त्यांच्या बोलण्यात मी एक मोठा राजकीय नेता आहे असा अविर्भाव नव्हता."
'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक काय आहे?
दलित समुदायाच्या खाद्यसंस्कृतीविषयी शाहू पाटोळे यांनी 'अन्न हे अपूर्णब्रह्म' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातल्या दलित समाजात वर्षानुवर्षे कोणते पदार्थ बनवले जायचे? त्यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमी काय होती? याविषयी पाटोळेंनी सविस्तर लेखन केलं आहे. दोन महिन्यांपूर्वी हे पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, facebook/shahupatole
या पुस्तकाबाबत बोलताना शाहू पाटोळे म्हणतात की, "'अन्न हे अपूर्णब्रम्ह' या पुस्तकातून मी माझ्या जातीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये केवळ खाद्यसंस्कृतीच नाही, तर आमचं राहणीमान, आमच्या पूर्वजांचं आयुष्य याचा घेतलेला शोध म्हणजे माझं हे पुस्तक आहे. तो परिपूर्ण असल्याचा दावा मी करणार नाही कारण माझ्या पूर्वजांच्या आयुष्याबाबतचे संदर्भच कुठे सापडत नाहीत."
शाहू पाटोळे पुढे म्हणाले की, "आम्ही जातीने मांग आहोत. मांगांच्या इतिहासाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्या मला मान्य नाहीत. यातलीच एक गोष्ट म्हणजे असं सांगितलं जातं की प्रसेनजीत नावाचा एक राजा बुद्धाचा अनुयायी होता आणि हा राजा जातीने मांग होता. किंवा मांगांचे मातंगऋषी म्हणून कुणी होते. असं सांगितलं जातं पण मला असा प्रश्न पडतो की जर आम्ही एवढे महान होतो तर मग आमच्यावर असं वाईट मटण खाण्याची, वाईट आहाराने पोटाची भूक भागवण्याची वेळ का आली?"
'आमच्या पूर्वजांना मेलेलं जनावर खावं लागायचं'
शाहू पाटोळे यांची बहीण शामल शिंदे म्हणतात की, "समजा गावात एखादं जनावर मेलं तर आमचे दोन्ही वाडे म्हणजे महारवाडा आणि मांगवाडा, या दोन्ही वाड्यांमध्ये राहणारे लोक जिथे जनावर मेलं आहे तिथे जायचे. त्यानंतर त्या मेलेल्या जनावरांचा एकएक अवयव पकडून प्रत्येकाने बसायचं आणि ठरवायचं की हा अवयव माझा, हा तुझा. आणि मग त्यानुसार त्या मेलेल्या जनावरांचं धूड वाटून घ्यायचे."

शामल म्हणतात की, "पावसाळ्यात आमच्या समाजाची फार अडचण असायची. त्याकाळी पावसाळ्यात जर एखादं जनावर मेलं तर अशाच पद्धतीने वाटून घ्यावं लागायचं. त्याकाळात स्वच्छतेचं आणि इतर गोष्टींचं आम्हाला काहीही पडलेलं नसायचं, पोटाची भूक भागवण्याची गरज जास्त असायची. आमच्या घरासमोर ते मांस वाळवलेलं असायचं आणि ते माझी आजी डब्यात भरून ठेवायची, त्याभोवती माशा घोंगावत असायच्या. ते मांस शिजवण्याची पद्धत देखील वेगळी होती. वेगवेगळे अवयव वेगवेगळे शिजवले जायचे. प्रत्येकाला प्रत्येक अवयवाचा समान भाग मिळावा म्हणून तसं करावं लागायचं."

फोटो स्रोत, facebook/shahupatole
मेलेले प्राणी का खावे लागायचे? या प्रश्नाचं उत्तर देताना शाहू पाटोळे म्हणतात की, "त्याकाळात आमच्याकडे जमिनी नव्हत्या, अजूनही नाहीत, त्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता नसायची. आणि त्यामुळे ते मेलेलं जनावर आम्हाला खावं लागायचं. आमचं पोट त्यावरच अवलंबून होतं. आता आमच्याकडे काहीप्रमाणात पैसे आलेत म्हणून आम्ही मेलेलं जनावर खात नाही. याउपर व्यवस्थेनं असं आमच्या मनावर बिंबवलं होतं की, आम्हाला आमच्या मागच्या जन्मात केलेल्या पापामुळे हे मेलेल्या जनावरांचं मांस खावं लागत आहे. आणि म्हणून आमचा समाज गपगुमान ते खात होता."

दलितांच्या शाकाहाराबाबत बोलताना शाहू पाटोळे म्हणतात की, "आम्ही ज्या भाज्या खायचो त्या लावल्या जायच्या नाहीत, तर पावसाळ्यात या भाज्या आपोआप उगवायच्या. त्यात तरवट, फांजीची भाजी, रानशेपूची भाजी, चिगूर, कुर्डू अशा सुमारे पंधरा ते वीस भाज्या अशा आहेत ज्या फक्त पावसाळ्यात उगवून येतात. कोवळ्या असतानाच त्या खाता येतात, नंतर त्या खाण्यायोग्य राहत नाहीत."
शाहू पाटोळे पुढे सांगतात की, "तांदुळजा, घोळ आणि घागराघोळ या तीन भाज्या मात्र पाटाच्या कडेला उगवतात. पूर्वी पिकांना पाटाने पाणी दिलं जायचं आणि त्या पाटाच्या कडेकडेने या भाज्या उगवायच्या. यामुळे या भाज्या बाराही महिने मिळायच्या, पुढे पाट गेले आणि पाईपलाईन आली आणि आम्हाला या भाज्या मिळणं बंद झालं."
अन्नावर आधारित जातीव्यवस्था कशी आहे?
शाहू पाटोळे म्हणतात की, "अन्नाला जातीशी जोडलेलं आहे. ज्याची जात उच्च त्याचं अन्न उच्च असं मानलं गेलं आहे. आपल्याकडे धर्म, जात आणि त्यानुसारचा उच्च-कनिष्ठ दर्जा यांची सरमिसळ केली गेली आहे. केवळ अन्नाचंच नाही तर भाषेवरून देखील ठरवलं जातं की तुम्ही जशी भाषा बोलता तसा तुमचा सामाजिक स्तर ठरवला जातो."

फोटो स्रोत, facebbok/rahulgandhi
शाहू पाटोळे सांगतात की, "भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये अजूनही प्रत्येक गोष्ट जातीवर घासून तपासून बघितली जाते. तुम्ही जन्माला आले की तुम्हाला जात चिकटते. भारतीय समाजात मी धर्मांतर करू शकतो पण काहीकेल्या जात्यांतर करू शकत नाही. मी मुस्लीम होऊ शकतो पण ब्राह्मण होऊ शकत नाही हे वास्तव आहे."
शाहू पाटोळे यांच्या पुस्तकांमध्ये केलेली मांडणी वाचकांना केवळ दलितांच्या स्वयंपाकघरात घेऊन जात नाही, तर वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिलेल्या माणसांच्या जगण्याची हकीकत हे पुस्तक सांगत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











