युकेतील बेकायदेशीर व्हिसा नेटवर्कच्या सापळ्यात भारतीय विद्यार्थी, लाखोंची फसवणूक - 'BBC इनव्हेस्टिगेशन'

- Author, अॅमी जॉन्स्टन
- Role, बीबीसी मिडलॅंड्स इन्व्हेस्टिगेशन्स
इंग्लंड किंवा अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊन किंवा काम करून यशस्वी होण्याचं, श्रीमंत होण्याचं स्वप्न असंख्य भारतीय विद्यार्थी, तरुण पाहत असतात.
मात्र अशा तरुणांच्या आकांक्षांचा फायदा घेत त्यांना मोठ्या रकमेचा गंडा घालणाऱ्या एजंटांच्या असंख्य टोळ्यांचा सुळसुळाट जागतिक स्तरावर झाला आहे.
ते नेमकं कसं फसवतात, त्याचे परिणाम काय होतात आणि त्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या याबद्दल मार्गदर्शन करणारा बीबीसीचा हा खास लेख...
युकेमध्ये काम करण्यासाठी व्हिसा मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रे पुरवून जागतिक पातळीवरील एका नेटवर्कनं त्यांची हजारो पौंडाची फसवणूक केली आहे.
बीबीसीनं या धक्कादायक प्रकरणाचा तपास केला आहे. त्या तपासातून असं आढळून आलं आहे की आरोग्यसेवा क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्यांची लुबाडणूक करण्यात आली आहे.
नोकरी मिळवून देणारा एजंट किंवा मध्यस्थ म्हणून काम करणारे विद्यार्थ्यांना त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांची फसवणूक करतात.
एरवी मोफत असणाऱ्या स्पॉन्सरशिप सर्टिफिकेटसाठी विद्यार्थी प्रत्येकी 17,000 पौंडापर्यंत रक्कम मोजत आहेत.
या विद्यार्थ्यांनी जेव्हा कुशल कामगारांच्या व्हिसासाठी अर्ज केला, तेव्हा गृह खात्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रं बेकायदेशीर किंवा अयोग्य असल्यामुळे नाकारली.


आम्ही ती कागदपत्रं पाहिली. त्यानुसार तैमूर रझा (Taimoor Raza) या व्यक्तीनं 141 व्हिसा कागदपत्रे एकूण 12 लाख पौंडांना विकली आहेत. त्यातील बहुतांश व्हिसा बनावट किंवा निरुपयोगी आहेत.
तैमूर रझानं मात्र काहीही चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे आणि त्यातील काही रक्कम विद्यार्थ्यांना परत केली आहे.
तैमूर रझानं वेस्ट मिडलँड्समध्ये कार्यालयं भाड्यानं घेतली आहेत आणि कर्मचारी देखील ठेवले आहेत. त्यानं डझनावारी विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा क्षेत्रात काम देण्याचं आणि 'स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट' उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
आम्हाला असं सांगण्यात आलं की त्यानं कायदेशीर किंवा वैध व्हिसा उपलब्ध करून देण्यापासून सुरूवात केली आणि काही मूठभर विद्यार्थ्यांना व्हिसा आणि खऱ्या नोकऱ्या मिळाल्या.
मात्र अनेक विद्यार्थ्यांवर बनावट किंवा निरुपयोगी कागदपत्रांसाठी त्यांची संपूर्ण बचत गमवण्याची वेळ आली.
'मी इथे अडकून पडलीय'
वर्क व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात ज्यांनी हजारो पौंड गमावले अशा 17 पुरुष आणि महिलांशी बीबीसी बोललं आहे.
यातील तीन विद्यार्थिनी त्यांच्या विशीत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या एजंटांना एकूण 38,000 पौंडांची रक्कम दिली होती.
त्या भारतीय आहेत. त्या म्हणाल्या, इंग्लंडमध्ये जाऊन काम करून नशीब बदलता येईल अशी स्वप्नं त्यांना भारतात दाखवण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात घडलं उलटंच. आता त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत आणि मायदेशी आपल्या कुटुंबियांना सत्य सांगण्याची त्यांना भीती वाटते आहे.
"मी इथे इग्लंडमध्ये सापळ्यात अडकले आहेत," असं निला नं (नाव बदललं आहे) बीबीसीला सांगितलं.
"मी जर घरी परतले तर माझ्या कुटुंबाची सर्व बचत वाया जाईल."

युकेतील आरोग्यसेवा क्षेत्रात करियरच्या विविध स्वरूपाच्या मोठ्या संधी आहेत. 2022 मध्ये युके मधील आरोग्यसेवा क्षेत्रात विक्रमी 1,65,000 नोकऱ्या किंवा पदं रिक्त होती.
युकेमधील सरकारनं आरोग्यसेवा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अधिक व्यापक केली आहे. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्ज देखील स्वीकारले जात आहेत. त्यामुळे भारत, नायजेरिया आणि फिलिपाईन्ससारख्या देशांमधील लोकांचा या क्षेत्रातील रस वाढला आहे.
कारण तिथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी दिसत आहेत.
या नोकऱ्यांसाठी अर्ज करताना अर्जदाराकडे पात्र किंवा योग्य प्रायोजक (स्पॉन्सर) असला पाहिजे. उदाहरणार्थ, नोंदणीकृत केअर होम किंवा एखादी एजन्सी. त्याचबरोबर या प्रकारच्या नोकऱ्यांसाठी अर्जदारांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी एक पैसाही भरण्याची गरज नाही.
मात्र अचानक वाढलेल्या नोकरीच्या संधीमुळे मध्यस्थ किंवा दलाल या गोष्टीचा फायदा घेत आहेत. जे विद्यार्थी पूर्णवेळ नोकरीच्या शोधात आहेत अशांची ते फसवणूक करत आहेत.
आम्ही ज्या विद्यार्थ्यांशी बोललो त्यांनी कायदेशीर मार्गानं युकेमध्ये राहण्याचे मोठे प्रयत्न केले मात्र आता त्यांच्यावर मायदेशी परत पाठवलं जाण्याची टांगती तलवार आहे.
फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांचे कॉल्स केले ब्लॉक
21 वर्षांची नादिया (नाव बदललं आहे) भारतीय आहे. ती 2021 मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बीए (BA in computer sciences) करण्यासाठी 'स्टुडंट व्हिसा'वर युकेमध्ये आली होती.
वर्षभरानंतर 22,000 पौंडाचं वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्याऐवजी तिनं नोकरी शोधण्याचं ठरवलं.
एका मैत्रिणीनं तिला एका एजंटचा नंबर दिला. त्या एजंटनं नादियाला सांगितलं की आरोग्य क्षेत्रातील नोकरीसाठी तो तिला योग्य कागदपत्रे उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी तिला 10,000 पौंड मोजावे लागतील.
नादिया म्हणाली, एजंटनं तिचा विश्वास संपादन केला आणि तिला असंही सांगितलं की तिला पाहून त्याला त्याच्या बहिणीची आठवण येते.
"तो मला म्हणाला की मी तुझ्याकडून खूप जास्त पैसे घेणार नाही. कारण तू माझ्या बहिणींसारखी दिसतेस, असं वुल्वरहॅम्पटनमध्ये (Wolverhampton) राहणारी नादिया सांगते.
नादियानं लगेचच त्या एजंटला 8,000 पौंड दिले. त्यानंतर वॉलसॉलमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात नोकरी मिळवून देणाऱ्या कागदपत्रांसाठी तिनं सहा महिने वाट पाहिली.

"मी थेट त्या केअर होमलाच कॉल केला आणि माझ्या व्हिसाबद्दल विचारलं. मात्र ते म्हणाले की ते प्रायोजकत्वाचं प्रमाणपत्र (certificates of sponsorship) देत नाहीत कारण त्यांच्याकडे आधीच पूर्ण कर्मचारी आहेत," असं नादिया म्हणाली.
त्यानंतर त्या एजंटनं नादियाचे कॉल ब्लॉक केले. त्यानंतर तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ती खूपच घाबरलेली होती, असं तिनं बीबीसीला सांगितलं.
निला बर्मिंगहॅम मध्ये (Birmingham) राहते. ती म्हणाली, तिच्या कुटुंबाला वाटलं की युके राहण्यासाठी पैसे खर्च केल्यास तिला तिथे कौशल्ये मिळवता येतील आणि भारतापेक्षा अधिक कमाई करता येईल.
"माझे सासरे लष्करात होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला त्यांची सर्व बचत दिली," असं ती सांगते.
ती वुल्वरहॅम्पटनमधील एका प्रशिक्षण देणाऱ्या एजन्सीकडे गेली. जेणेकरून तिला तिच्या विद्यार्थी व्हिसाचं रूपांतर आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्याच्या व्हिसामध्ये करता येईल.

याही बातम्या वाचा :

तिथले एजंट खूप नम्र होते. ते कायदेशीर आहेत आणि बनावट नाहीत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मला ईमेल्स, पत्र आणि व्हिसाच्या प्रती दाखवल्या, असं ती म्हणते.
ती माणसं (एजंट्स) आपलं आयुष्य बदलून टाकतील या गोष्टीची निला आणि इतर विद्यार्थ्यांना पूर्ण खात्री पटली होती.
"पहिल्यांदा ते आम्हाला देवाप्रमाणेच वाटले. त्यांच्या वर्तणुकीतून त्यांनी आमचा विश्वास संपादन केला," असं ती म्हणाली.
तिनं आवश्यक कागदपत्रांसाठी 15,000 पौंड त्या एजंटला दिले. मात्र ती कागदपत्रं अतिशय निरुपयोगी आणि बनावट निघाली. गृह खात्याने (Home Office) ती कागदपत्रं नाकारली. तिच्या कुटुंबानं तिच्या शिक्षणासाठी आधीच 15,000 पौंड खर्च केले होते.
निला म्हणाली की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
"ते फसवणूक करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना कोणतीही भीती नाही," असं ती म्हणाली.
86 विद्यार्थ्यांनी गमावले हजारो पौंड
बीबीसीला माहिती मिळाली आहे की तैमूर रझा (Taimoor Raza) हा एक पाकिस्तानी नागरिक असून तो वुल्वरहॅम्पटनमध्ये राहतो आहे आणि बर्मिंगहॅममध्ये काम करतो आहे. यातील एका बनावट व्हिसा नेटवर्कचा तो मुख्य सूत्रधार आहे.
त्यानं वेस्ट मिडलॅंडसमधील नोकर भरती करणाऱ्या एजन्सींशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तो आरोग्यसेवा क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देऊ शकतो. तसंच त्यांच्या ग्राहकांसाठी व्हिसा अर्जाचं देखील व्यवस्थापन करू शकतो.
रझानं 141 अर्जदारांना पुरवलेल्या प्रायोजकत्वाच्या कागदपत्रांनी भरलेली एक फाईल बीबीसीनं पाहिली आहे.
त्या प्रत्येक अर्जदारानं त्या कागदपत्रांसाठी 10,000 ते 20,000 पौंडाची रक्कम दिली होती. ही सर्व एकूण रक्कम 12 लाख पौंड इतकी आहे.
रझा ही प्रायोजकत्वाची कागदपत्रं पीडीएफ फाईलच्या स्वरूपात व्हॉट्सअॅपवर पाठवत असल्याच्या गोष्टीची आम्ही खातरजमा केली आहे.

यापैकी 86 जणांना बनावट किंवा निरुपयोगी कागदपत्र देण्यात आली होती. गृह कार्यालयानं ती अयोग्य ठरवत नाकारली होती.
तर आणखी 55 जणांना खरोखरंच व्हिसा मिळाला. मात्र आरोग्यसेवा क्षेत्रातील (केअर होम) ज्या नोकरीचं त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, तिथे मात्र अशी नोकरी उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.
या आरोपांसंदर्भात बीबीसीनं तैमूर रझाशी संपर्क केला. तो डिसेंबर 2023 पासून पाकिस्तानात आहे.
त्यावर त्यानं उत्तर दिलं की 'या विद्यार्थ्यांचे दावे खोटे आणि एकतर्फी आहेत'. त्याचबरोबर यासंदर्भात त्यानं त्याच्या वकिलांशी संपर्क केला आहे.
त्याला आम्ही मुलाखत देण्याविषयी विचारलं असता त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही.
अजय थिंड या विद्यार्थ्यानं सांगितलं की त्यानं रझाला केअर होमसाठी कर्मचाऱ्याच्या व्हिसासाठी 16,000 पौंड दिल्यानंतर त्याला रझाकडे नोकरी देण्यात आली होती.

दर आठवड्याला 500-700 पौंड वेतन मिळणाऱ्या सहा जणांपैकी तो एक आहे. कागदपत्रांचं संकलन करणं आणि अर्जदारांसाठी फॉर्म भरणं हे काम त्याला करावं लागत होतं.
थिंड म्हणाला रझानं भाड्यानं कार्यालयं घेतली आहेत. त्यानं त्याच्या टीमला स्वखर्चानं दुबईच्या ट्रिपला देखील नेलं होतं.
एप्रिल 2023 मध्ये थिंडला या सर्व प्रकरणाबाबत संशय आला. त्यानं पाहिलं की गृह कार्यालयाकडून अर्ज फेटाळले जात आहेत. यात त्याच्या काही मित्रांचेही अर्ज होते. त्यांनी एकूण 40,000 पौंड यासाठी मोजले होते.
"मी रझाला सांगितलं. त्यावर तो मला म्हणाला, ताणतणाव हाताळण्याची तुझी कुवत नाही. मी पाहातो काय करायचं ते."
"मला पैशांची गरज असल्यामुळे त्याच्याकडचं काम सोडलं नाही. मी अशा वाईट परिस्थितीत अडकलो होतो," असं थिंड म्हणाला.
थिंड पुढे म्हणाला की त्याचा बॉस असंख्य एजन्सीसाठी काम करत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची रक्कम प्रत्यक्षात 12 लाख पौंडापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.
फसवणूक झालेल्या बहुतांश जणांनी पोलिसात तक्रार केलेली नाही.
"अनेकजण पोलिसांकडे गेले नाहीत कारण त्यांना गृह कार्यालयाची आणि तक्रार केल्यानंतरच्या परिणामांची भीती वाटते," असं ल्युक पायपर म्हणतात. ते वर्क राईट्स सेंटरमध्ये इमिग्रेशन प्रमुख आहेत.

त्याऐवजी या विद्यार्थ्यांनी वेस्ट मिडलँड्समधील शीखांच्या एका गुरुद्वाऱ्याकडे मदत मागितली. स्मेथविक येथील गुरुद्वारा बाबा संग जी हा तो गुरुद्वारा आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या एजंट्सकडून व्हिसा मिळालेला नाही किंवा आश्वासनांची पूर्तता झालेली नाही त्यांच्यासाठी गुरुद्वाऱ्यातील सदस्य संघर्ष करत आहेत. काहीजणांचे पैसे परत मिळवण्यात त्यांना यश देखील आलं आहे.
गुरुद्वाऱ्यातील वडीलधाऱ्यांनी तर रझाला नोव्हेंबर 2023 मध्ये बैठकीसाठी देखील बोलावलं. असं सांगितलं जातं की तिथं तो पैसे परत करण्यास आणि त्याचं हे काम थांबवण्यास तयार झाला.
कोरोनाच्या संकटकाळात लोकांना मदत करण्यासाठी गुरुद्वाऱ्याचं शीख सल्ला केंद्र (Sikh Advice centre) सुरू करण्यात आलं होतं. या केंद्रानं त्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक पातळीवर सामना करून हरमनप्रीत या एका तरुण मातेचे पैसे परत मिळवून दिले.
हरमनप्रीत म्हणाली की व्हिसा मिळवण्याच्या तिच्या कटू प्रसंगामुळे ती आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलली गेली होती.
"मी आत्महत्या करण्याचा विचार करत होती. माझी मुलगी आणि शीख सल्ला केंद्रामुळेच मी माझं आयुष्य नव्यानं सुरू करू शकले," असं ती म्हणाली.
माँटी सिंग हे शीख सल्ला केंद्राचं काम करतात. ते म्हणाले शेकडो लोकांनी त्यांना मदतीसाठी संपर्क केला आहे.
ते आणि त्यांच्या टीमनं 2022 मध्ये या प्रकरणांना हाताळण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात गुंतलेल्यांना निशाण्यावर घेतलं. त्यांचं नाव समोर आल्यानं आणि त्यांच्यावर टीका झाल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ नये असा इशारा लोकांना मिळेल असं त्यांना वाटत होतं.
त्या पोस्ट पाहिल्यानं अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले.

फोटो स्रोत, Monty Singh
सिंग म्हणाले की त्यांच्या लक्षात आलं की हे एजंट्स पिरॅमिड स्कीम प्रमाणे काम करत होते.
"या एजंट्सच्या असंख्य छोट्या टीम आणि टीम प्रमुख आहेत. त्यातील काही जणांना या कामाबद्दल बहुधा कमिशन मिळतं," असं ते म्हणाले.
काही छोटे एजंट्स तर हेअर स्टायलिस्ट आणि बस ड्रायव्हर होते. त्यांना यात पैसे कमावण्याची संधी दिसली, असंही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की रझानं 2,58,000 पौंड परत केले. शीख सल्ला केंद्रानं ही रक्कम आता नॅशनल क्राईम एजन्सीच्या ताब्यात दिली आहे.
इतर एजंट्सनी देखील पैसे परत केले. शीख सल्ला केंद्र अशा एजंट्सच्या कुटुंबाशी संपर्क साधतात आणि त्यांना त्या एजंटने केलेल्या कामाची कल्पना देतात. त्यानंतर अनेक कुटुंब अशी रक्कम परत करण्यास तयार होतात.
कारण यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठं गालबोट लागलं होतं. त्यांची बदनामी झाली होती.
"कोणाही व्यक्तीसाठी कुटुंबाचा मान-सन्मान सर्वकाही असतो. आम्ही ओळख पटवतो, तपास करतो आणि तिथे असलेल्या पुराव्यांची पडताळणी करतो," असं माँटी सिंग म्हणाले.
"एकदा का आम्हाला सर्व माहिती मिळाली की आम्ही त्यांच्या कुटुंबाशी बोलतो. यामुळे त्यांच्या कुटुंबाला लाज वाटते. त्यांना फसवणूक झालेल्याचे पैसे परत करायचे असतात आणि या प्रकरणातून त्यांच्या कुटुंबाचं नाव मोकळं करायचं असतं," माँटी सिंग सांगतात.
व्हिसा अर्जांमध्ये प्रचंड वाढ
युकेमध्ये कामासाठी व्हिसा मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या अर्जांमध्ये सहा पट वाढ झाली आहे. जून 2022 ते जून 2023 दरम्यान या अर्जांची संख्या 26,000 च्या वर होती. त्याआधीच्या वर्षी ती 3,966 होती.
मागील वर्षी जुलै मध्ये गृह खात्याने त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा केली होती. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी कामासाठी व्हिसा मिळण्यापासून प्रतिंबध करण्यासाठी नियमात बदल करण्यात आले होते.
मात्र शीख सल्ला केंद्राचं म्हणणं आहे की पोलीस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कडक कारवाईनंतरच व्हिसाचा बेकायदेशीर धंदा बंद होईल.
जास कौर या मॉंटी सिंगबरोबर काम करतात. त्या म्हणाल्या, सरकारनं धर्मगुरू किंवा धार्मिक नेत्यांशी संपर्क केला पाहिजे.
"जर तुम्ही प्रत्यक्षात लोकांशी बोलत नसाल तर तिथे नेमकं काय घडतं आहे याची तुम्हाला कल्पना असणार नाही," असं त्या म्हणाल्या.

गृह कार्यालयाचा प्रवक्ता म्हणाला की "बनावट किंवा खोट्या व्हिसा अर्जाची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी अतिशय कडक प्रणाली होत्या."
"या फसवणूक करणाऱ्या लोकांना बळी पडणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हे माहित असणं आवश्यक आहे की जर प्रायोजकत्व प्रमाणपत्र खरं किंवा वैध नसेल तर त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही."
परदेशातील आलेल्या कामगारांची फसवणूक करणाऱ्या, त्यांचं शोषण करणाऱ्या किंवा त्यांना त्रास देणाऱ्या कोणत्याही अप्रामाणिक कंपन्या आणि एजंट्स विरोधात कठोर कारवाई करणं आम्ही सुरूच ठेवू, असं ते पुढे म्हणाले.
वर्क राईट्स सेंटरचे पायपर म्हणाले, सरकारनं या पीडितांना किंवा फसवणूक झालेल्या लोकांना मदत केली पाहिजे.
"त्याचबरोबर फसवणूक झालेल्या व्यक्तीनं निव्वळ त्याच्या कंपनीचं किंवा कार्यालयाचं नाव गृह कार्यालयाला कळवलं असल्यामुळे गृह कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या प्रती-कारवाई होण्याची भीती न बाळगता सुरक्षितरित्या तक्रार करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला पाहिजे."
ब्रिटनमध्ये नशीब आजमावण्याचं स्वप्नं
बनावट किंवा निरुपयोगी व्हिसा कागदपत्रांसाठी एजंट्सना पैसे दिल्यानं फसवणूक झालेल्या लोकांची अधिकृतपणे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.
"याबाबतीत एवढीच गोष्ट स्पष्ट आहे की देशभरातील लोकांकडून आम्हाला जे ऐकायला मिळतं आहे त्यावरून जे घडतं आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आहे," असं पायपर पुढे म्हणाले.
स्मेथविकमधील शीख सल्ला केंद्राला आशा आहे की त्यांच्या या कामाचा विस्तार इतर गुरुद्वाऱ्यांमध्येही होईल. त्याचबरोबर शिक्षणासाठी किंवा कामासाठी देश सोडताना असलेल्या जोखमीबद्दल भारतातील लोकांना जागरुक करण्यास त्यांनी सुरूवात केली आहे.
"लोकांना जागरुक करताना काही कटू सत्याची जाणीव करून द्यावी लागते. ती अशी की काही मोजक्या लोकांच्या यशाचा अर्थ असा नव्हे की तसं प्रत्येकाच्याच बाबतीत होईल," असं माँटी सिंग म्हणाले.
"त्याचबरोबर यामध्ये लोकांना या गोष्टीची देखील जाणीव करून दिली पाहिजे की फक्त ब्रिटन किंवा अमेरिकत गेल्यावरच त्यांना यश, आर्थिक समृद्धी मिळेल ही धारणा देखील चुकीची आहे."
(या लेखातील काहींची नावं बदलण्यात आली आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











