आल्फ्रेड हिचकॉक: भूत-आत्मा नाही, तर साध्या साध्या गोष्टींतून प्रेक्षकांना भीती दाखवणारा दिग्दर्शक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
29 एप्रिल 1980 या दिवशी अल्फ्रेड हिचकॉक या ब्रिटिश-अमेरिकन दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतला. प्रत्येक कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे काही लोक असतात.
काही त्याही पलीकडे जाऊन असे ठरतात की त्यांना स्वीकारल्याशिवाय किंवा त्यांना ओलांडून गेल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येऊ शकत नाही, चित्रपटांच्या संदर्भात हे वाक्य अल्फ्रेड हिचकॉक यांना लागू पडतं.
ज्या दिग्दर्शकांचा जागतिक चित्रपटसृष्टांवर प्रभाव पडला आहे त्यात हिचकॉक यांचं नाव घ्यावं लागेल. सस्पेन्स किंवा थ्रिलरची व्याख्याच हिचकॉक यांनीे बदलून टाकली आहे.
हिचकॉक म्हटलं तर सर्वांत पहिले आठवतो तो त्यांचा 'सायको' हा चित्रपट. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी तशीच भीती कायम वाटत राहते.
हिचकॉक यांचा पहिला चित्रपट 1925 साली आला आणि शेवटचा चित्रपट 1976 ला.
80 वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी 50 हून अधिक फुल फीचर लेंथ फिल्मस् बनवल्या, नाझी कॅम्प सारख्या गंभीर विषयावर डॉक्युमेंट्री बनवली, टीव्हीसाठी शोज प्रोड्युस केले, लिहिले किंवा दिग्दर्शित केले.
त्यांच्या चित्रपटांना आतापर्यंत एकूण 46 ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली आहेत, त्यांना स्वतःला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पाच वेळा नामांकन मिळालं आहे, 6 चित्रपटांना ऑस्कर, त्यातला एक उत्कृष्ट चित्रपट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिचकॉक यांना पाच वेळा नामांकन मिळून उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळू शकला नाही, पण त्यांच्या कामाची यादी पाहून थक्क व्हायला होतं आणि प्रॉलिफिक-जिनिअस असे शब्द आपसूकच निघतात.
इंग्लंडमधील ग्रीनगॉसर (भाज्यांचे दुकान) कुटुंबामध्ये जन्मलेले हिचकॉक हॉलिवूडला कसे पोहचले, तिथे त्यांनी कसं आपलं नाव कमावलं, त्यांचं चित्रपट निर्मितीचं तंत्र कसं होतं, आताच्या काळातही हिचकॉक इतर चित्रपटांवर त्यांचा कसा प्रभाव पडला आहे या गोष्टी आपण या लेखातून पाहू.
चित्रपटांची लांबी किती असावी?
'The length of a film should be directly related to the endurance of the human bladder.'
असं हिचकॉक यांचे फार प्रसिद्ध वाक्य आहे.
जितका काळ एखाद्या माणसाला बाथरुमला जाणं थांबवता येतं तितकाच काळ चित्रपटाची लांबी असावी, असा याचा अर्थ आहे.
हिचकॉक यांची विनोदबुद्धी तीक्ष्ण होती, ते हजरजबाबी होते म्हणून त्यांनी हे म्हटलं असावं अशी एक शक्यता आहे आणि दुसरं असं की इतकं नियोजनबद्ध ते काम करत की मानवी शरीराची क्षमता न समजून घेता ते काही निर्णय घेतील यावर निदान माझा तरी विश्वास बसणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पण त्याचं आणखी एक कारण देखील आहे. त्यांना त्यांच्या चित्रपटावर इतका विश्वास होता की तो संपेपर्यंत प्रेक्षक त्याची जागा सोडून हलणार देखील नाही. ते थोडेसे चूक असतील याबाबतीत.
कदाचित कारण त्यांचे चित्रपट तुम्ही घरी खुर्चीवर बसून पाहत असताल तर अचानकच तुम्ही उठून उभे राहू शकता, कधी कधी क्लायमॅक्स इतका इंटेन्स असतो की तो सोडून जाण्याचा विचार पण शिवत नाही.
कधी कधी तुम्ही निवांत कॉटवर पडून चित्रपट पाहत आहात आणि समोर इतकी भीतीदायक स्थिती येते की आपोआपच तुम्ही बसून तुमच्या दोन्ही हातांनी स्वतःलाच पकडलंय असं जाणवतं.
व्हर्टिगो, सायको, बर्ड्स अशा या चित्रपटांच्या कथानकांबद्दल मी एकही वाक्य तुम्हाला सांगणार नाही.
कारण नुसतं हे चित्रपट कशाबद्दल आहे असं सांगणं देखील स्पॉयलर देणं आहे. ते नसतील पाहिले तर ते स्पॉयलर सारखं होईल आणि तुम्ही हे पिक्चर्स पाहावेत असं मला वाटतं.
पण असे काही चित्रपट आहेत त्यांच्याबद्दल आपण सरळ बोलू शकतो अर्थात ते बोलणं स्पॉयलर फ्री असेल याची मी काळजी घेईन. फक्त त्यांच्या चित्रपटाचं वैविध्य याठिकाणी लक्षात यावं म्हणून मी सांगतोय.
'एक कथा जी तुम्हाला दिसते ती आणि दुसरी तुमच्या अनुभवांची'
अमेरिकेतील मॅसेच्युसेटस विद्यापीठाने युट्युबवर सर्वांसाठी खुल्या केलेल्या एका कोर्समध्ये चित्रपट समीक्षक प्रा. डेव्हिड थॉरबर्न म्हणतात की हिचकॉक यांच्या 'चित्रपटाच्या दोन कथा सुरू असतात. एक ती स्क्रीनवर दिसणारी आणि दुसऱ्या तुमच्या अनुभवांची.'
या गोष्टीची मला खात्री तेव्हा पटली होती जेव्हा मी पहिल्यांदा 'डायल एम फॉर मर्डरर' पाहिला होता. अनेक सस्पेन्स चित्रपट पाहिले असतील पण एका सेकंदाचाही ब्रेक घ्यावा वाटला नाही असा हा कदाचित पहिलाच पिक्चर असेल.
जसा तो चित्रपट सुरू होतो तेव्हा काही मिनिटातचं आपल्यावर तो चित्रपट ताबा मिळवतो आणि आपलं सर्व लक्ष आपण त्या चित्रपटात घालतो.
कुठल्याही चित्रपटातलं पात्र काही करत असेल तर आपण विचार करत बसतो की आता नेमकं पुढे काय होईल. म्हणजे पिक्चरचा क्लायमॅक्स काय होईल हे तर सोडून द्या पण पुढच्या क्षणाला आणि त्यांनतरच्या पुढच्या क्षणाला.
'कदाचित हा तर पहिला बॉंडपट नाही ना?'
लाईफबोट या चित्रपटात जेव्हा एक मोठं जहाज नाझी सैनिकांकडून बुडवलं जातं तेव्हा त्या जहाजावरील जिवंत उरलेले लोक एका लाईफ बोटची मदत घेत सुरक्षित स्थळी जाणार असतात.
पिक्चरची सुरुवात इथून होते मग अनोळखी लोक बोटवर येतात.
आणि प्रत्येक जण काय बोलतोय आणि त्याचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आपले प्राण अगदी कानाशी येतात. अथांग समुद्र ओलांडून सुरक्षित स्थळी जायचंय म्हणजे किती अशक्य गोष्ट वाटते.
त्यात ते लोक एकमेकांना न ओळखणारे, युद्धजन्य स्थिती, अशा अनेक गुंतागुंतीमधून चित्रपट पुढे सरकतो तशीतशी ती धडधड वाटत जाते आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिल्लक राहते.

फोटो स्रोत, Getty Images
'रेबेका'ची कथा तर अतिशय सरळ आहे असं म्हणता येईल. एक साध्या कुटुंबातील मुलगी एका गर्भश्रीमंताशी लग्न करते आणि त्या घरात आपल्याला कसं स्वीकारलं जाईल याचाच विचार करत असते.
पण हळूहळू चित्रपटात आणि तिच्या कथेत आपण गुंतत जातो की पुढच्या क्षणी तिचं काय होईल, ती काय करेल, असं आपल्याला होत जातं.

फोटो स्रोत, Getty Images
'नोटोरियस' तर एक प्रेमकथा आहे. गुप्तहेरांची. एक अमेरिकन एजन्सी एका जर्मन वंशाच्या मुलीला एका मिशनसाठी सिलेक्ट करतात. त्या मुलीच्या प्रेमात तो एजंट पडतो ज्याने तिला आणलेलं असतं.
परिस्थिती अशी ओढवती की तिला पुढील माहिती हवी आहे तर लग्न करावं लागणार असतं, या सर्व गोष्टी काही मिनिटांत स्पष्ट होतात पण त्यांचं काय होईल याची भिती आपल्याला वाटत राहते. या सर्व गोष्टी करत असताना तिच्या मनाची काय अवस्था होत आहे याची चित्रण अतिशय हळुवारपणे केलेलं आहे.
'रिअर विंडो'त तर फक्त एका खिडकीत बसून हिरो खुनाचा छडा लावतो. नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट तर कंप्लिट मसाला इंटरटेनर आहे.
'द स्ट्रेंजर्स ऑन ट्रेन' अतिशय सुंदर चित्रपट आहे. थरारपट आहे पण त्यातही विनोद आहे. इतक्या अवघड परिस्थितीत कुणी असा विनोद तयार करू शकतं याची कल्पना करूनच हसू येतं.

फोटो स्रोत, Getty Images
असंही म्हटलं जातं की हाच पहिला बॉंड चित्रपट आहे. याचं कारण असं आहे की भव्यता आणि रहस्य, थरार यांचा संगम या चित्रपटात पहिल्यांदा पाहायला मिळाला. हा चित्रपट 1959 ला आला होता आणि पहिला बॉंड चित्रपट 1962 मध्ये आला.
चित्रपट निर्मितीचे तंत्र कसं केलं आत्मसात
हिचकॉक यांना मूकपटांचा काळ पाहिला, मग बोलपटांचा काळ पाहिला, मग रंगीत असे एक-एक बदल ते उत्तमरीत्या हाताळत गेले. 52-53 वर्षं त्यांनी व्यावसायिक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे त्यातूनच त्यांच्या तंत्राची कल्पना येऊ शकते.
जर नवीन तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात नसतं केलं तर ते इतका प्रदीर्घ काळ कसे टिकले असते? पण चित्रपट एक कला आहे आणि त्याला असं तंत्रात, नियोजनात, चौकटीत तुम्ही बसवू शकत नाहीत असं म्हटलं जायचं.

फोटो स्रोत, Getty Images
पण ते चित्रपटाच्या सेटवर पोहोचण्याच्या आधीच सर्वकाही त्यांच्या डोक्यात फिट असायचं. फक्त डोक्यातच नाही तर त्यांच्या स्टोरी बोर्डवर, शेड्युलमध्ये सर्व गोष्टी आखलेल्या असायच्या.
डेव्हिड थॉरबर्न म्हणतात की "त्यांना सेटवर जवळून पाहणारे म्हणायचे की हा जणू काही सगळा पिक्चरच यांच्या डोक्यात चालतोय."
फक्त सेटवरच नाही तर एडिटिंग टेबलवर देखील त्यांचा सर्व काही ठरलेलं असेल. शूटच्याच वेळी त्यांनी हे ठरवलेलं असायचं की नेमकं काय आपल्याला शेवटच्या आवृत्तीत वापरायचंय. हिचकॉक यांनी रॉयल नेव्ही इंजिनिअरिंगमध्ये तंत्रज्ञाचं शिक्षण घेतलं होतं.
त्याचं कधी काम त्यांना पडल्याचं माहित नाही पण ते चित्रपट निर्मतीचे कुशल तंत्रज्ञ झाले. प्रकाश व्यवस्था, ध्वनी, वातावरण, सेट्स, यातलं तंत्र त्यांनी आत्मसात केलं पण ते समजून त्यांनी चित्रपट प्रेक्षकाच्याच नजरेतून बनवला आणि प्रेक्षकाला खिळवून कसं ठेवता येईल असे चित्रपट तयार केले.
प्रत्येक तंत्रातून कथा कशी पुढे सरकवता येईल याचा त्यांनी किती विचार केला आहे याची प्रचिती त्यांचे इंटरव्यू पाहिल्यावर येते.
'नाट्य चित्रपटात असावं, सेटवर नाही'
त्यांची चित्रपटसृष्टीतील सुरुवातच मुळातच तंत्रज्ञ म्हणून झाली. 1906 मध्ये पहिल्यांदा एक तासाचा चित्रपट बनवण्यात आला होता. त्याआधीच्या गोष्टी तर तुम्हाला माहीत आहे की कधी रेल्वेचं शुटिंग, कधी काही सेकंदांचं शूटिंग यासाठी किती खटाटोप करावा लागयचा.
फिल्म म्हणजे व्हिडिओ कॅमेरातील त्या रीळा बदलणं मग शूट करणं अतिशय किचकट कामं तेव्हाच्या दिग्दर्शकांना करावी लागायची. मग त्यामुळे त्यांना सगळ्याचं प्रकारची तंत्र आत्मसात करावी लागायची. हिचकॉक हे चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा 1919 ला आले ते टायटल ट्रॅक तयार करणारे म्हणूनच.
हॉलिवूडच्या पॅरामाउंट कंपनीने लंडनमध्ये एक फिल्म स्टुडिओ उघडला. त्याठिकाणी अमेरिकेतून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं त्यांचं काम करण्याच्या सूचना होत्या पण जे ब्रिटिश आहेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नवीन गोष्टी पण शिका.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजे उद्या याचा वापर तुम्हाला इथली चित्रपटसृष्टी बळकट करण्यात होईल. ते एक-एक गोष्ट समजून घेत राहिले आणि त्यासोबतच लिखाणही सुरू होतं.
चार-पाच वर्षांनंतर त्यांना एक चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली आणि 1925 ला त्यांचा पहिला चित्रपट आला. त्यानंतर तब्बल 15 वर्षं त्यांनी लंडनमधूनच चित्रपट बनवले.
1938-39ला डेव्हिड सेल्झनिक या निर्मात्याने त्यांना हॉलिवूडला येण्याची गळ घातली आणि त्यांचा अमेरिकेतील पहिला चित्रपट 'रेबेका' हिट तर झालाच पण त्याने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करही पटकवला.
एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते गमतीने आपल्या तंत्राबद्दल सांगतात की 'मी अमेरिकेत गेल्यावर फक्त एकदाच दुसऱ्या दिग्दर्शकाच्या सेटवर गेलो आहे. तिथे जे काही सुरू होतं पाहून लक्षात आलं की सगळं नाट्य हे सेटवरच दिसतंय स्क्रीनवर तर ते काहीच दिसणार नाही.'
भीती ही प्रेरणा कशी बनली?
हिचकॉक यांच्या व्यतिरिक्त कुणी भयपट बनवलेच नाहीत असं नाही. थरार, वेग, सर्वांना धक्का देण्याचं तंत्र या अनेक गोष्टींचा वापर करुन अनेकांनी चांगले चित्रपट निर्माण केले आहेत.
पण हिचकॉक यांनी भयपटांना एक वेगळी उंची दिली. त्यांनी दाखवून दिली की केवळ भूत-प्रेत-आत्माच नाही तर अगदी साध्या साध्या गोष्टी तुम्हाला भीती दाखवू शकतात.
प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. आपल्या प्रियजनांना काही होऊ नये ही देखील भीती असते. याचा वापर कथानक बनवण्यासाठी त्यांनी केला.
'शॅडो ऑफ डाऊट'मध्ये आपल्या मामाबद्दलच एक विदारक सत्य समजल्यानंतर सतत भीतीच्या छायेत वावरत असते.

फोटो स्रोत, Getty Images
ही गोष्ट आपल्या आईला कळली तर काय होईल आणि मामा जर घरातच थांबून राहिला तर काय होईल या भीतीने तिच्याच नाही तर आपल्या देखील पोटात गोळा उठतो.
हिचकॉक यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा सातत्याने भितीच्याच छायेत वावरताना दिसतात. ते लोक भित्रे आहेत असं नाही पण ते अशा स्थितीमध्ये आहेत की ती त्याची कल्पनाच त्यांनी आधीच्या आयुष्यात केलेली नसते.
काही पात्रं हे नवीन गोष्टींचा शोध घेणाऱ्यांपैकी असतात, काही नवीन गोष्टी करू पाहणाऱ्यांपैकी. ते त्यांचं त्यांचं काम करताना कथेला असं वळण मिळतं की सगळं वातावरण भितीने भरून येतं.
कधी कुणी अचानकच लटकलेला दिसेल, कुणी कोंडून पडलेला, कधी आजू-बाजूला समुद्र, कधी खुनाचा चुकीचा आरोप लागलाय आणि ती व्यक्ती आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाचा आकांत करताना दिसते.
कधी-कधी क्लायमॅक्स आणि त्यानंतर अॅंटिक्लायमॅक्स असं सगळं वापरुन ते एक धीरगंभीर वातावरण तयार करून टाकतात.
'प्रेक्षकांना घाबरवणाऱ्या हिचकॉक यांना वाटायची पोलिसांची भीती'
हे असं का? असा प्रश्न आपल्याला पडतो.
त्याचं उत्तर त्यांनी एका त्यांच्या एनबीसीच्या मुलाखतीत दिलंय. ते म्हणतात, "कारण मी एक भित्रा माणूस आहे. मला पोलिसांची प्रचंड भिती वाटते. माझ्याकडून एखादं कायद्याबाह्य काम होईल आणि मला तुरुंगात टाकलं जाईल अशी भिती मला वाटते.
"त्यामुळे मी खूपच काळजी घेतो. समोर अधिकारी व्यक्ती असल्यावर मी भितो. आपल्याकडून ते दुखावले जाऊ नये आणि त्यातून आपल्यावर संकटं ओढावू नये असं मला वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images
पण पोलिसांची इतकी भिती का? याचं उत्तर त्यांनी फ्रेंच दिग्दर्शक फ्रॅंकाईस ट्रिफॉइट यांच्या दीर्घ मुलाखतीत दिलं आहे.
ते सांगतात की जेव्हा ते अगदी लहान होतो. चार-पाच वर्षांचा तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं. त्या पोलिसाने त्यांना पाच दहा मिनिटांसाठी कोठडीत ठेवलं आणि तो पोलीस म्हणाला, 'पाहिलंस का खोडकर मुलांसोबत आम्ही काय करतो?'
असं वडिलांना का केलं विचारल्यावर ते म्हणतात, 'मला काहीच कल्पना नव्हती.'

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांची भीती वाटणे आणि त्यातून ती भीती, ती सुप्त ऊर्जा एकदम वेगळ्या ठिकाणी तिचे वहन करून काहीतरी सृजनात्मक घडवणे असं त्यांनी केल्याचं दिसतं.
त्यांनी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, 'खरंतर अनेक लोकांचा हा गैरसमज आहे की माझ्या चित्रपटांचे विषय असे असतात की ते पाहून एखाद्याला वाटेल मी अगदी राक्षसी प्रवृत्तीचा आहे पण प्रत्यक्षात मी अतिशय शांत आहे, कायद्याला भिणारा आणि विनोदबुद्धी असलेला माणूस आहे.'
हिचकॉक यांचा जगभरातील दिग्दर्शकांवर प्रभाव
हिचकॉक यांचा जगभरातील दिग्दर्शकांवर, सिनेमावर काय प्रभाव पडला असेल?
हा प्रश्न मला पडतो न पडतो तितक्यातच मनात येतं खरं तर हे असं म्हणण्यासारखं आहे की न्यूटननंतर विज्ञानावर काय परिणाम झाला आहे. किंवा डॉन ब्रॅडमनचा क्रिकेटवर काय प्रभाव पडला?
अगदी तसंच हे असू शकतं. पण काही गमती नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. स्टिवन स्पिलबर्ग यांचा 'जॉज' असेल किंवा नंतर आलेला रिडले स्कॉट यांचा 'एलियन' पाहा.

फोटो स्रोत, Getty Images
रहस्य आणि भितीने आपल्याला व्यापून टाकलंय असं होतं. हे असं का होतंय, नेमकं कारण काय, असे प्रश्न तुम्हाला एखादा पिक्चर पाहताना पडत असतील ना तर समजून घ्या हे तिथूनच आलंय.
अतिशय धीरगंभीर स्थितीत विनोदाची पेरणी, कारण नसताना लक्ष भटकवण्यासाठी टाकलेले काही दृश्यं अतिशय मख्ख चेहऱ्याचे पण रहस्यमय असलेली छोटी-मोठी पात्रं, हे जर तुम्ही एखाद्या चित्रपटात पाहिलं तर समजून घ्या की त्यांनी याचे धडे कुणाकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतले आहेत.
अलीकडील काळातील हॉलिवूडच्या सिरिज पाहतो जसं की ब्रेकिंग बॅड, बेटर कॉल सॉल त्यात कॅमेऱ्यांच्या विविध अॅंगल सोबत आपल्या दिग्दर्शक खेळताना दिसतो. हिचकॉक असे प्रयोग भरपूर करायचे. व्हर्टिगो या चित्रपटात त्यांनी एक शॉट वापरला आहे त्याचं नावच नंतर व्हर्टिगो शॉट पडलं.
'थिएटरमध्ये भीतीने किंचाळला तर त्यांचे आभार माना'
भारतातील अनेक दिग्दर्शकांवर हिचकॉकचा प्रभाव दिसून येतो. रामगोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप तर त्यांच्या चित्रपटांबद्दल अनेक ठिकाणी आपले विचार मांडताना दिसतात.
अनुराग कश्यपने सांगितलं होतं की मी आधी केवळ हिचकॉक यांचे प्रसिद्ध चित्रपट पाहिले होते. खरा खजिना तर तेव्हा हाती आला जेव्हा मी त्यांचे मूकपट पाहिले.
राम गोपाल वर्मांच्या अनेक चित्रपटांमध्ये असे प्रसंग दिसू शकतात की जे थेट हिचकॉक यांच्या चित्रपटाशी नातं सांगितलं.
अनेक वेळा राम गोपाल वर्माने ट्वीट करून त्यांच्याबद्दल लिहिलंय. सायको चित्रपटाला पन्नास वर्षं पूर्ण झाल्यावर राम गोपाल वर्माने फिफ्टी इअर्स ऑफ सायकोइंग हा ब्लॉग लिहिला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांनी म्हटलं होतं की 'जेव्हाही तुम्ही थिएटरमध्ये किंवा घरी एखादा भयपट पाहून किंचळताल तेव्हा हिचकॉकला धन्यवाद द्या'. (अर्थात तेव्हा बाकी जगाची आठवण राहिली तर.)
अंदाधुंद, जॉनी गद्दार, एक थी हसीना सारखे थ्रिलर बनवणारे श्रीराम राघवन देखील आपल्या चित्रपटाच्या आवडीचं आणि निर्मितीची प्रेरणा ही हिचकॉक यांच्याकडूनच घेतल्याचं सांगतात.
आपल्या प्रेक्षकांना जितकी शक्य आहे तितकी माहिती देणं, हे पद्धत मी हिचकॉक यांच्याकडून घेतल्याचं ते सांगतात.
काही दिग्दर्शक आपल्याच चित्रपटात पाहुण्या कलाकारासारखे झळकताना दिसतात. भारतातल्या दिग्दर्शकांपैकी म्हटलं तर सुभाष घईंचे पिक्चर पाहा अगदी काही सेकंदासाठी येऊन जातील पण येतीलच.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी ही गोष्ट हिचकॉक यांच्यापासून प्रेरणा घेऊन केली असं त्यांनी कुठे सांगितल्याचे माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात वाचनात नाही आले, पण जेव्हा हिचकॉक यांचे कॅमिओ पाहिले तेव्हा मला सुभाष घईंच्या कॅमिओची आठवण झाली.
हिचकॉक यांची आपल्या प्रत्येक चित्रपटात झळकण्याची शैली होती. अगदी काही सेकंदांसाठी. अगदी आले कधी आणि गेले कधी कळणार नाही.
पण एकदा का तुम्ही त्यांचे चित्रपट पाहू लागला तर ते केव्हा येतील याची उत्सुकता लागून राहते. टेंशनने भरलेल्या चित्रपटात त्यांचं काही सेकंदांसाठी येणं हे एक कॉमिक रिलिफसारखं बनतं.
व्यावसायिक यश, प्रेक्षकांचं प्रेम आणि समीक्षकांचं कौतुक, पण..
अल्फ्रेड हिचकॉक हे अशा मोजक्याच चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांना प्रेक्षकांचं प्रेम, समीक्षकांकडून कौतुक आणि व्यावसयिक यश या गोष्टी एकाच वेळी मिळाल्या असतील. पण हिचकॉक यांची गणना महान दिग्दर्शकांत होऊ लागली ती त्यांच्या मृत्यूच्या नंतरच.
कारण, महान चित्रपट दिग्दर्शक आणि एक निखळ मनोरंजन देणारा दिग्दर्शक या दोन्ही गोष्टी एकत्रच असू शकतात असं तेव्हा समजलं नाही जायचं. पण त्यांच्या मृत्यूनंतर जागतिक अर्थव्यवस्था बरीच बदलली.
मनोरंजनासाठी व्हिडिओ कॅसेट आणि व्हीसीआर मिळू लागले, मग टीव्ही, खासगी वाहिन्या, सीडीज, डीव्हीडी, ब्लू रे आणि इंटरनेट यामुळे तर जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्याला व्यक्तींपर्यंत ती पोहचू लागली.

फोटो स्रोत, Getty Images
आयमीडीबी आणि रोटन टोमॅटो सारख्या साइट्स असतील किंवा अनेक पॉप्युलर कल्चरच्या वेबसाइट असतील त्यांनी तर टनाने त्यांच्याबद्दलची माहिती डॉक्युमेंटेड करून ठेवली आहे. आयएमडीबीमुळे सामान्य व्यक्तीला देखील आपली समीक्षा लिहिता येण्याची आणि ती प्रसिद्ध करता येण्याची सोय झाली.
या साइट्स तर समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या दोघांच्या मतांचा आधार देऊन चित्रपटांना रॅंकिंग देतं. त्यावरून आयएमडीबीने जगभरातील टॉप 250 चित्रपटाची यादी बनवली आहे.
त्या रॅंकिंगमध्ये सायको चित्रपट हा 33व्या क्रमांकावर आहे आणि रोटन टोमॅटोतर जगभरातील वेगवेगळ्या माध्यमसंस्थांमध्ये प्रकाशित, न्यूज अॅग्रिगेटर्सने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेले रिव्ह्यूजचा डेटा घेतं आणि त्यामुळे जगभरातील प्रकाशनं एखाद्या चित्रपटाबद्दल, दिग्दर्शकाबद्दल समजतं.
नंतर आलेल्या इंटरनेट, ब्लॉगिंग आणि मायक्रोब्लॉगिंने तर विविध प्रकारातील चित्रपटांचे दालन तर खुले झाले पण त्याबाबत चर्चा देखील करता येऊ लागली.

फोटो स्रोत, Getty Images
हिचकॉक यांच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनतर त्यांच्या 'व्हर्टिगो' या चित्रपटाने ब्रिटिश फिल्म इंस्टिट्युटच्या ऑल टाइम ग्रेटच्या यादीत पहिला क्रमांक पटकवला आहे.
खरं तर जेव्हा हा चित्रपट आला होता तेव्हा फार चालला नव्हता. निर्मितीवरील खर्च निघून कमाई झाली होती पण जसे 1958 पर्यंत त्यांच्या चित्रपटाला गर्दी खेचली जात असे तितकी नव्हती पण आता हा चित्रपट जगातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक समजला जातो.
फक्त एखाद्या संस्थेनी एखादा चित्रपट चांगला आहे म्हटलं म्हणून नाही तर लोकांनी हिचकॉक यांच्या चित्रपटांना जसं या ही काळात डोक्यावर घेतलं आहे त्यावरुन त्यांच्या महानतेची जाणीव आपल्याला होऊ शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








