एका जादूगाराची कथा, ज्याने नाझी सैन्याला चकवण्यासाठी सुएझ कालवा गायब केला...

जॅस्पर मास्केलीन
फोटो कॅप्शन, जॅस्पर मास्केलीन , असा जादूगार ज्याने दावा केला की तो सुएझ कालवा गायब करू शकतो

कोणत्याही युद्धात त्याकाळी उपलब्ध असलेल्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इतकंच काय, काही संशोधकांचं असंही मत आहे की आजवर मानवाला जे-जे नवीन तंत्रज्ञान वापरायला मिळालं, किंवा त्याचा शोध लागला, तो युद्धामुळेच लागला.

याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे इंटरनेट. पण ते नंतर कधीतरी.

तर वर म्हटलेल्या तत्त्वाला दुसरं महायुद्ध तरी कसं अपवाद राहील? या युद्धात नवीन तंत्रज्ञानाचा वापर तर केला गेलाच, पण त्याबरोबरीने ब्रिटिश सैन्याने अनेक जादूगार, हातचलाखी करणारे, खोटा भास निर्माण करणारे इल्युजनिस्टही भरती केले होते.

हो, हे जादूगार अगदी सैन्याचा भाग होते, आणि ते सैनिकांची करमणूक करण्यासाठी नाही तर हातचलाखी करून शत्रु सैन्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. अशाच एका जादूगाराची कथा, ज्याने नाझी सैन्याला चकवण्यासाठी म्हणे सुएझ कालवा गायब केला होता तर एकदा अलेंक्झांड्रिया हे बंदरच नाहीसं केलं होतं.

नक्की खरं काय होतं?

या जादूगाराचं नाव होतं जॅस्पर मास्केलीन. आज तो ब्रिटनच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याच्यावर पुस्तक लिहिली गेली आहेत. एक चित्रपटही येतोय अशी चर्चा गेली काही वर्षं होतेय. आधी या चित्रपटात मास्केलीनचा रोल टॉम क्रूझ करणार होता तर आता मध्यंतरी बेनेडिक्ट कंबरबॅचचं नाव चर्चेत आलं होतं.

मास्केलीन एका दंतकथेपेक्षा कमी नाही.

स्कॉट पॅनरोझ जादू या कलेचे इतिहासकार आहेत. ते म्हणतात, "मास्केलीन हे नाव व्हिक्टोरियन काळापासून प्रसिद्ध आहे. जॉन नेव्हिल मास्केलीन जॅस्परचे आजोबा होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ते फारच प्रसिद्ध होते. त्यांचं टोपण नाव होतं 'द गव्हर्नर'. ते स्वतः जुगाडू संशोधक होते. ते जादूच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून काढायचे."

जॅस्परचे आजोबा - जॉन मास्केलीन
फोटो कॅप्शन, जॅस्परचे आजोबा - जॉन मास्केलीन

जॅस्परचे वडिलही जादूगर होते, पण त्यांचा ओढा विज्ञानाकडे जास्त होता. याच कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे जादूगर होते जॅस्पर.

पण जॅस्पर आपल्या आजोबांएवढी, किंवा वडिलांएवढी प्रसिद्धी आणि पैसा मिळवू शकले नव्हते. दुसरं महायुद्ध सुरू होत होतं. जॅस्परला आपल्या वाडवडिलांची संपत्ती विकावी लागली होती. ज्या थिएटरमध्ये त्यांचे खेळ चालायचे, ते थिएटरही मास्केलीन कुटुंबाच्या मालकीचं होतं पण ते थिएटरही विकावं लागलं होतं.

पण जेव्हा दुसरं महायुद्धात ब्रिटन उतरलं तेव्हा जॅस्परला यात स्वतःची ओळख निर्माण करण्याची नवी संधी सापडली. ऑक्टोबर 1940 मध्ये मास्केलीन सैन्याच्या एका खास टीमचा भाग बनले. कॅमाफ्लोज, ज्याला सोप्या मराठीत सांगायचं तर आपली, आपल्या तुकडीची ओळख लपावायची, किंवा ते जिथे असतील तिथे असा देखावा उभा करायचा की सैन्य इथे आहे हे कोणाला कळलं नाही पाहिजे.

पीटर फोर्ब्स यांनी या काळातल्या अशा टीम्सचा अभ्यास केला आहे. सरड्यासारखं स्वतःला आसपासच्या वातावरणात अदृश्य करून टाकणं ही कला आहे आणि याचा निसर्गात, जगात कोण कोण वापर करत या विषयावरचं एक पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे.

मास्केलीन ज्या सैन्याच्या खास विभागाचे सदस्य होते त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, "यातले बहुतेक सगळे मेंबर्स होतकरू कलाकार होते. युद्धकाळात यांच्या हाताला काही कामधंदा नव्हता, याच्यातलाच एक होता मास्केलीन. साधारण दोन महिन्यांसाठी या लोकांना इजिप्तमध्ये पाठवण्यात आलं."

मास्केलीनचं काम होतं, वेगवेगळे प्रयोग करणं. म्हणजे काय तर हालचलाखी, नजरभ्रमाचे असे खेळ करणं ज्याने शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकता येईल.

असं म्हणतात की इजिप्तमध्ये असतानाच हिटलरच्या नाझी सैन्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्याने काही मोठे, कल्पक दृष्टीभ्रमाचे प्रकल्प केले. हो, प्रकल्पच म्हणावं लागेल त्यांना कारण खेळ म्हणण्याइतके ते लहान नव्हते.

त्याने केलेल्या खेळाचे उल्लेख 'मॅजिक्स टॉप सिक्रेट' या पुस्तकात आहेत. आणि या पुस्तकावरूनच अनेकांनी मास्केलीनला इतिहासातल्या सर्वोत्तम जादूगारांपैकी एक असं नाव दिलेलं आहे. पण या पुस्तकाच्या खरेपणावरही शंका उपस्थित होतात. ते नंतर पाहू, आधी जाणून घेऊ या पुस्तकात काय होतं ते.

जादूचे खेळ
फोटो कॅप्शन, जादूचे खेळ

'मॅजिक्स टॉप सिक्रेट्स' हे पुस्तक जॅस्पर मास्केलीननेच लिहिलं असं काही जणांचं मत आहे. स्कॉट पॅनरोझ म्हणतात, "हे पुस्तक निनावी लिहिलं गेलं होतं. दुसऱ्या महायुद्धातल्या चमत्कारिक घटनांचा यात उल्लेख होता. यातली चटकन डोळ्यात भरणारी गोष्ट म्हणजे यात दावा केला होता की जादूच्या फिरत्या आरशांनी सुएझ कालवाच गायब केला होता. म्हणजे कालवा तिथेच होता, पण तो अदृश्य झाला होता."

हे जादूचे आरसे म्हणजे एका मोठ्या यंत्राला पाती म्हणून आरसे जोडलेले असायचे आणि ते वेगाने गोल फिरायचे. सुएझ कालव्याच्या 200 किलोमीटरच्या पट्ट्यात अशी 20 यंत्र बसवली गेली होती आणि त्यामुळे सुएझ कालवा अदृश्य झाला होता असा दावा या पुस्तकात आहे.

स्कॉट पॅनरोझ पुढे म्हणतात, "पण त्यावेळेच्या परिस्थितीचा अभ्यास करून जे सत्य पुढे आलं ते असं होतं की प्रत्यक्षात अशा प्रकारचं एकच यंत्र प्रायोगिक तत्वावर बनवलं होतं आणि ते कधी वापरलं ही गेलं नव्हतं."

मास्केलीनच्या नावावर आणखी एक दिव्य स्टोरी खपवली जाते ती म्हणजे - मास्केलीनने दृष्टीभ्रमाचा एवढा जबर प्रयोग केला की अलेक्झांड्रियाचं अख्खं बंदर लपवलं आणि तिथून काही किलोमीटर अंतरावर त्याची प्रतिमा उभी केली. म्हणजे जर नाझी सैन्याने विमान हल्ला केला तर ते त्या प्रतिमेवर करतील जिथे प्रत्यक्षात फक्त समुद्र आहे आणि मुख्य बंदर सुरक्षित राहील.

प्रतिमा उभी करताना त्याने जुनी जहाजं, मोठे मोठे फ्लड लाईट्स आणि बंदरातल्या जहाजबांधणीच्या यंत्राचा आवाजाची नक्कल करण्यासाठी लहान लहान स्फोट केले असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

पण ही घटना प्रत्यक्षात घडली याचाही ठोस पुरावा इतिहासाच्या पानांमध्ये सापडत नाही.

पीटर फोर्ब्स
फोटो कॅप्शन, पीटर फोर्ब्स

मग मास्केलीनने नक्की युद्धात केलं तरी काय?

पीटर फोर्ब्स म्हणतात, "त्याने ब्रिगेडियर डडली क्लार्क बरोबर काम केलं. क्लार्क हातचलाखी, वेशांतर, दृष्टीभ्रम, समोरच्याला कह्यात घेणं, वेड्यात काढणं यात पारंगत होते आणि म्हणूनच कदाचित ते ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा MI-5 चे प्रमुखही होते. त्यांनी आणखी एका युनिटची स्थापना केली. या युनिटचं नाव होतं MI-9."

फोर्ब्स पुढे सांगतात, "या युनिटला जादूचे खेळ करणाऱ्या जादूगारांची गरज होती कारण हे लोक युद्धकैद्यांना सोडवण्याच्या मोहिमेचा भाग होते. हे जादूगार नकाशे, सुरे, लहानमोठी शस्त्र, गरजेच्या वस्तू या देशातून त्या देशात स्मगल करायचे. हे स्मगलिंग करताना त्यांना आपल्या जादूच्या खेळांच्या सामानाचा, पेट्यांचा मोठा उपयोग व्हायचा. मास्केलीनचाही या कामासाठी उपयोग केला गेला."

वेगवेगळी यंत्र तयार करण्यात मास्केलीनचा हातखंडा होता हे खरंय पण युद्धातली परिस्थिती वेगळी असते. तिथे यंत्र बनवून चालत नाही, तर जीवनमरणाच्या लढाईत निर्णयही घ्यावे लागतात. त्यामुळे मास्केलीनने तिथे जगावेगळी यंत्र बनवली असतील याची शक्यता तज्ज्ञांना कमी वाटते.

फोर्ब्स म्हणतात, "मला ठोस असा पुरावा फक्त एकच सापडला. सनशिल्डच्या लढाईत रणगाड्यांना ट्रकच्या रूपात पुढे नेण्याची कल्पना जनरल व्हेवर यांनी मांडली होती आणि ती मास्केलीनने पूर्णत्वास नेली असावी."

स्कॉट पॅनरोझ यांचंही स्पष्ट मत आहे की इजिप्तमधल्या ज्या प्रयोगांची जाहिरात मास्कलीनने केली तो पब्लिसिटी स्टंट होता. मास्केलीन नावाला एक वलय होतं. त्याचे आजोबा, वडील प्रसिद्ध जादूगार होते त्यामुळे त्यांच्याही पुढे जाऊन जॅस्पर मास्केलीनने युद्धात जादू वापरली यावर लोकांचा पटकन विश्वास बसला."

प्रत्यक्षात मास्केलीनने कॅमाफ्लॉज युनिटमध्ये वर्षभरच काम केलं आणि मग त्याची बदली सैन्याच्या वेल्फेअर विभागात झाली. म्हणजे आता मास्कलीनचं मुख्य काम जादूचे खेळ करून सैनिकांचं मनोरंजन करणं हे होतं. हे काम त्याने तीन वर्षं केलं.

स्कॉट पॅनरोज
फोटो कॅप्शन, स्कॉट पॅनरोज

युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी मास्केलीनच्या प्रसिद्धीलाही ओहोटी लागली. नंतर तो दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाला आणि लोकांना कार ड्रायव्हिंग शिकवण्याचं काम करू लागला.

पण मग त्यांच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी, 1983 साली एक पुस्तक आलं - वॉर मॅजिशियन. हे पुस्तक ब्रिटनचे प्रसिद्ध लेखक, पटकथाकार डेव्हीड फिशर यांनी लिहिलं होतं.

या पुस्तकात मास्केलीनच्या करामती वाढवून चढवून सांगितल्या होत्या असं पॅनरोज आणि फोर्ब्स दोघांना वाटतं.

पण या पुस्तकामुळे मास्केलीन पुन्हा चर्चेत आला आणि आजवर ब्रिटनच्या इतिहासातली दंतकथा बनून राहिला आहे. बरं त्याची गोष्ट इतकी भारी आहे की त्यावर पिक्चर निघण्याच्या अनेकदा चर्चा होतात. आधी टॉम क्रूझचं नाव पुढे आलं मग बेनेडिक्ट कंबरबॅचचं.

पण इतकं नक्की की जादूगाराचं काम असतं प्रेक्षकांना सत्य न कळू देता त्यांची दिशाभूल करून भव्य प्रयोग दाखवणं आणि मास्केलीनची पूर्ण कथाच दिशाभूल करणारी आहे. ही शेवटची जादू त्याने कमाल केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)