अजित : स्वत:चे स्टंट स्वत: करणारा 'लायन' अभिनेता

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
70 च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीतील खलनायकाची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकण्याचं श्रेय अजित यांना दिलं जातं. अतिशय शिष्ट, उच्च शिक्षित, सुटबुटात राहणारे आणि पांढरेचं बूट घालणारे अजित क्लार्क गेबल्स स्टाईलच्या मिशा ठेवायचे.
हिंदी चित्रपटांतले खलनायक मोठ्या आवाजात बोलतात असं अजित यांचं मत होतं. पण अजित यांनी खलनायकाच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये थोडा सॉफ्ट टच दिला. कठोरातला कठोर निर्णय घेतानाही आवाज वाढवला नाही.
अजित यांच्या जीवनावर आधारित 'अजित द लायन' हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाचे लेखक इक्बाल रिझवी सांगतात, "एक काळ असा होता जेव्हा डाकू किंवा त्याही आधी जमीनदार, गावचे महाजन खलनायक असायचे. पण 70 च्या दशकात अजित खलनायक बनले. तेव्हा भारतीय समाजात बदल घडत होता. इंग्रजी चित्रपटांचा प्रभावही दिसू लागला. त्यानंतर लोकांनी असा एक खलनायक पाहिला जो अतिशय सभ्य आहे. त्याचे केस मोठे आहेत, त्याच्या हातात बंदूक आहे किंवा शब्दाशब्दाला तो गोळी झाडतोय असं काहीचं तो करत नव्हता. अजित यांनी साकारलेला खलनायक सूट घालायचा, जुगार चालवणार्या हॉटेलचा परवानाधारक मालक असायचा. हा खलनायक खूप निवांत बोलायचा. पण मग त्यांना हा माणूस सैतानी प्रवृत्तीचा असेल यावर विश्वास बसायचा नाही."
शाळेची पुस्तकं विकली आणि मुंबईची वाट धरली
अजित यांचे वडील शाहजहानपूरचे होते. पण त्यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. त्यांचे वडील निजामाच्या सैन्यात काम करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी घरंदाज कुटुंबातील मुलांना चित्रपट पाहण्याची परवानगी नव्हती.
इक्बाल रिझवी सांगतात, "अजित यांच्या मामाकडे हैदराबादमधील दोन सिनेमा हॉलच्या कॅन्टीनचे कंत्राट होते. त्यामुळे अजितच्या चित्रपट पाहण्यावर कोणतेही बंधन नव्हते. तिथूनच त्यांच्यामध्ये सिनेमाची आवड निर्माण झाली. वयाच्या 12 व्या वर्षी, अजितने आपल्या करिअरची सुरुवात केली. फुटबॉल खेळायला सुरुवात केली आणि लवकरच ते एक चांगला फुटबॉल खेळाडू बनले. त्यांना अभ्यासात रस नव्हता."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
"त्यातच अजितची परीक्षा झाली आणि त्यांना अंदाज आला की ते काही परीक्षा पास होणार नाहीये. ते त्यांच्या वडिलांना खूपचं घाबरायचे. कारण ते प्रचंड धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे होते. अशातच पास नाही झालो तर मार बसेल आणि आर्मीत भरती व्हावं लागेल ही भीती अजितच्या मनात होती. म्हणून आपण एक्टिंग मध्ये आपलं नशीब आजमावून बघावं असं त्यांना वाटलं. त्यामुळेचं त्यांनी वडिलांशी खोटं बोलून परीक्षा पास झाल्याचं सांगितलं. आणि वडिलांकडून शाळेची फी घेतली आणि आपली होती नव्हती तेवढी पुस्तक विकून 113 रुपये जमा करून ट्रेनने थेट मुंबई गाठली."
मुंबईतले संघर्षाचे दिवस
त्यानंतर किथ डिकोस्टा यांना दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये अजित सांगतात, "जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या मनात आशा होती की केदार शर्मा, मेहबूब खान, व्ही शांताराम यांच्यासारखे मोठमोठे दिग्दर्शक सीएसटी रेल्वे स्टेशनवर माझ्या स्वागतासाठी हजर असतील. पण माझ्या मनात काही मूर्खपणाच्या कल्पना होत्या, जसं की, चित्रपटात काम करण्याचा विचार करणारा मीचं कदाचित एकमेव व्यक्ती आहे असं मला वाटायचं."
साहजिकच अजितच्या आशा फोल ठरल्या. चित्रपट स्टुडिओ आणि मोठ्या चित्रपट निर्मात्यांच्या घरी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या अफगाण पठाणांशी त्यांनी जवळीक वाढवाली, जेणेकरून कोणा एखाद्या फिल्मी जगतातल्या व्यक्तीशी ओळख होईल. आणि यासाठी त्यांनी पठाणांची पश्तो भाषा वापरायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
त्यांनी मुंबईत एक जागा पाच रुपये महिना भाड्यावर घेतली. रुबी या उर्दू मासिकाच्या नोव्हेंबर 1975 च्या अंकात 'याद ए अय्याम, इशरत ए फानी' या शीर्षकाच्या लेखात अजित कबूल करतात की, "ही जागा इतकी लहान होती की माझ्यासारखा सहा फूट उंचीचा बलदंड माणूस खाली वाकुनचं आत जाऊ शकायचा. एका मित्राने तिथल्याचं घरांचं भाडं वसूल करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तो म्हणाला की तू उंच आणि धिप्पाड आहेस त्यामुळे तुला या कामात कोणतीही अडचण येणार नाही. पण मला काही हे काम आवडलं नव्हतं. त्या दिवसांत माझी भेट मजहर खानशी झाली. त्यांनी मला त्यांच्या 'बडी बात' चित्रपटात शाळेतील शिक्षकाची भूमिका दिली. मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सुमारे तीन वर्षे सहा चित्रपटांमध्ये काम केलं. या काळात माझे नाव हमीद अली खान होतं."
आणि हमीद अली खान जाऊन अजितचा प्रवास सुरु झाला..
यादरम्यान हमीद अली खान हे निर्माता दिग्दर्शक असलेल्या के. अमरनाथ यांच्या संपर्कात आले. अमरनाथ यांनी हमीदशी एक हजार रुपये महिन्याचा करार केला. आणि याचं अमरनाथांनी हमीदचं नामकरण अजित असं केलं.
इक्बाल रिझवी सांगतात, "अमरनाथजींच्या मते हमीद अली खान हे नाव खूप मोठं होतं. सिनेमात यायचं तर नाव असं पाहिजे की जे लोकांच्या तोंडात बसेल. नाव लहान आकर्षक पाहिजे जेणेकरून लोकांना हे उच्चारताना ते सोपं वाटेल. अमरनाथ यांनी दोन-तीन नावं सुचवली होती. पण त्यांना अजित हे नाव आवडलं. अजित हे नाव जसं पुढं आलं तसे त्यांना चित्रपट मिळू लागले."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
अजित यांचा हिरो म्हणून पहिला चित्रपट होता बेकसूर. या चित्रपटात मधुबाला त्यांची नायिका होती. यानंतर त्यांनी नास्तिक, बडा भाई, बारादरी, ढोलक या चित्रपटातही काम केलं. पण मुघल-ए-आझम या चित्रपटातील दुर्जन सिंहच्या भूमिकेने अजित यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
राजेंद्र कुमार यांनी त्यांना व्हिलन म्हणून काम करण्यासाठी तयार केलं.
नकारात्मक भूमिका करताना अजित यांच कौतुक झालेली पहिली फिल्म म्हणजे सूरज. हाच सिनेमा पाहून प्रभावित झालेल्या लेख टंडन यांनी त्यांना प्रिन्स या सिनेमासाठी साइन केलं.
इक्बाल रिझवी सांगतात, "अजित आणि राजेंद्र कुमार यांच्यात चांगली मैत्री होती याचं कारण म्हणजे दोघांनाही शायरी मध्ये खूप रस होता. त्यावेळी अजितला नायक म्हणून चित्रपट मिळणं बंद झालं होतं. राजेंद्र कुमारने त्यांना सूरज या चित्रपटात खलनायक म्हणून काम करायला लावलं. सुरुवातीला अजित या रोलसाठी थोडेसे संकोचले. पण राजेंद्र कुमारने सांगितलं की खलनायकाचं वय जास्त असतं. आणि एका विशिष्ट वयानंतर हिरोचं काम मिळणं बंद होतं. साहजिकच राजेंद्र कुमार अजितचे मित्र होते. अजितला वाटलं की स्वतःच्या फायद्यासाठी राजेंद्र कोणताही चुकीचा सल्ला देणार नाही. आणि दिलेला सल्ला मानून अजितने सूरज चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली."
अजित यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सूरज या चित्रपटामुळेचं त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्जन्म झाला.
तेजा आणि शाकालच्या भूमिकेने अजितला बॉलीवूडच्या शीर्ष खलनायकांच्या श्रेणीत नेऊन बसवलं.
तीन दशकांच्या काळात वेगवेगळ्या भूमिका वठवल्यानंतर 1973 मध्ये त्यांनी दोन अशा भूमिका केल्या ज्याने संपूर्ण भारतात अजित यांना मोठी ओळख मिळवून दिली. सलीम-जावेद या जोडगळीने लिहिलेल्या या दोन्ही भूमिका स्मगलरच्या होत्या. जंजीरमधील तेजाच्या भूमिकेने आणि यादों की बारातमधील शाकालच्या भूमिकेने अजितला बॉलीवूडच्या शीर्ष खलनायकांच्या श्रेणीत नेऊन बसवलं.

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
जंजीर चित्रपटाचे बजेट फारसं मोठं नव्हतं. या चित्रपटातील तेजाच्या भूमिकेसाठी अजितने स्वतःचे कपडे घातले होते. क्वचितचं कोणाचं तरी कौतुक करणाऱ्या दिलीप कुमार यांनी तेजाची भूमिका पाहून अजितचं कौतुक केलं होतं. अजितने ज्या पद्धतीने तेजाची भूमिका साकारली त्यात एक प्रकारचा हॉलिवूड टच होता.
इक्बाल रिझवी सांगतात, "अजित हॉलिवूडचे सिनेमे खूप आवडीने पाहायचे. त्यांनी हॉलिवूड कलाकारांचे स्टायलिश फॅशनेबल कपडे, सिगार आणि पाईप ओढणे, लांबच लांब गाड्या चालवणे आणि कूल हावभाव शिकून घेतले. यामुळे ते सिनेप्रेमींचा लाडके झाले."
धर्मा तेजावर आधारित तेजाचं चरित्र
'प्युअर इव्हिल द बॅड मॅन ऑफ बॉलीवूड' या खलनायकांवरील पुस्तकात बालाजी विठ्ठल लिहितात, "खरंतर तेजा आणि शाकाल नावाची माणसं या जगात होती. 1960 मध्ये जयंत धर्मा तेजाने जयंती शिपिंग कंपनीची स्थापना केली होती. यासाठी 2 कोटी 20 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. नंतर कळलं की तो कर्जाचे पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर करून देश सोडून पळून गेला. सलीम-जावेदने या तेजाकडून प्रेरणा घेऊन जंजीर चित्रपटात अजितची भूमिका लिहिली होती."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
याउलट, जीपी शाकाला हे एक आदरणीय व्यक्ती होते. ते नासिर हुसेन यांच्या चित्रपटांत पब्लिसिटी इंचार्ज होते. या सज्जन माणसाचं नाव सलीम-जावेद यांनी यादों की बारात या चित्रपटातल्या व्हिलनला दिलं. जो आपल्या दोन्ही मुलांना वेगळं करतो. आणि कोणी याचा विचार स्वप्नात सुद्धा केला नसेल. हा माणूस देशभरातून मौल्यवान मूर्ती आणि रत्न चोरतो आणि रॉबर्टसारख्या लोकांना परदेशात विकतो.
आपली प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेणारी पात्र
शाकाल आणि तेजाच्या भूमिकांची खास गोष्ट म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा. त्यांच्याकडे नेहमीच प्लॅन बी असायचा. आणि त्यामुळे त्यांना कधी अडचण यायची नाही.
चित्रपट इतिहासकार कौशिक भौमिक म्हणतात, "या चित्रपटांमधील अजितची व्यक्तिरेखा नेहमीचं हत्येची जबाबदारी त्याच्या गुंडांवर सोपवतो. आणि हा स्वत: मात्र परस्त्री संग करतो. यादों की बारात या चित्रपटात त्याने घातलेला पांढरा, काळा, तपकिरी फुल स्लीव्ह शर्ट हे गोरख धंदे करून सुद्धा आपली इमेज क्लिन ठेवण्याचं प्रतीक होती."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
बालाजी विठ्ठल त्यांच्या पुस्तकात लिहितात, "तेजा आणि शाकाल या पात्रांनी अजितला एका ग्लॅमरस स्मगलरच्या इमेजमध्ये प्रस्थापित केलं. या दोन्ही भूमिकांमध्ये बरीच साम्य होती. आणि विशेष म्हणजे अजितला डोळ्यांसमोर ठेवूनच लेखकाने या भूमिका लिहिल्या होत्या. प्रेमनाथ, अन्वर हुसेन आणि प्राण यांसारखे खलनायक असताना सुद्धा त्यांनी अजितची निवड का केली हे काही स्पष्ट नाही. सुरुवातीला अजित तेजाच्या भूमिकेबद्दल फारसा उत्साही नव्हता पण सलीम खानने त्याला ही भूमिका करण्यासाठी खूप मेहनतीने तयार केलं."
दिवार चित्रपटातील खलनायकाची भूमिका नाकारली
सलीम-जावेद यांनी जेव्हा दीवार हा चित्रपट लिहिला तेव्हा त्यांना अजितला मुख्य खलनायकाच्या भूमिकेत घ्यायचं होतं. यावर इक्बाल रिझवी सांगतात, "चित्रपटात एक सीन होता. या सीनमध्ये खलनायक बेडरूममध्ये असतो. त्याला फक्त अंडरवेअर घालून हिरोशी भांडण करायचं असतं. त्यानंतर हिरो त्याला खिडकीबाहेरच्या स्विमिंग पूलमध्ये टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अंडरवेअर घालायला अजितने आक्षेप घेतला. आणि दिग्दर्शक यश चोप्रा 'दीवार'मधून हा सीन काढून टाकायला तयार नव्हते. त्यामुळे अजितने ही भूमिका करायला नकार दिला. नंतर ही भूमिका मदन पुरी यांनी साकारली."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
त्याच वर्षी आलेल्या कालीचरण या चित्रपटातील 'सारा शहर मुझे शेर के नाम जाता है' या त्यांच्या डायलॉगला शोलेच्या 'कितने आदमी थे' या डायलॉगच्या तोडीस तोड प्रसिद्धी मिळाली. स्टंट कितीही धोकादायक असले तरी अजित त्यांच्या सर्व चित्रपटांसाठी स्टंट स्वतःच करायचे. स्टंटसाठी त्यांनी कधीही डुप्लिकेट वापरले नाहीत.
अटलबिहारी वाजपेयी सुद्धा अजितचे जबरदस्त फॅन होते
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे अजित यांचे खूप मोठे चाहते होते. प्रसिद्ध चित्रपट पत्रकार राम कृष्ण त्यांच्या 'फिल्म जगत में अर्धशती का रोमांच' या पुस्तकात लिहितात, "त्यावेळी मी लखनौमध्ये असताना एके दिवशी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर पांचजन्यचे संपादक गिरीशचंद्र मिश्रा आणि त्यांच्यासोबत अटलबिहारी वाजपेयी. खरं तर त्या दोघांमध्ये दहा रुपयांची पैज लागली होती आणि त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी ते माझ्या दारापर्यंत आले होते.
अटलबिहारींचं म्हणणं होतं की, अजित शाहाजहानपूरचे आहेत. तर मिश्रा यांचा पूर्ण विश्वास होता की, अजित हा हैदराबादचा आहे. त्यांनी मला विचारलं तेव्हा मी म्हणालो, तुम्ही दोघेही बरोबर आहात. अजितचं वडिलोपार्जित घर शाहजहानपूरला आहे . पण त्याचा जन्म आणि वाढ हैदराबादमध्ये झाली."

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
80 च्या दशकात अजित मनालीमध्ये कर्मयोगी चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यावेळची गोष्ट सांगताना इक्बाल रिझवी म्हणतात, "शूटिंगसाठी आलेल्या अजितला एके दिवशी अटलबिहारी वाजपेयींनी निरोप पाठवला की, त्यांना त्यांच्यासोबत चहा घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अजित वाजपेयींना त्यांच्या घरी भेटायला गेले. वाजपेयींनी अजितचं स्वागत केलं. त्यांनी सांगितलं की, जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी लालकृष्ण अडवाणींसोबत अजितचे चित्रपट पाहिले. वाजपेयी अजितच्या आवाजाचे आणि डायलॉगचे चाहते होते. पाहुणचार आटोपून अजित जेव्हा जायला लागले तेव्हा वाजपेयी त्यांना दारात सोडायला आले. अजित नशीबवान होते कारण त्याचा दोन पंतप्रधान संबंध आला. एक म्हणजे नरसिंह राव. अजित ज्या कॉलेजमध्ये शिकायला होते तिथेच त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी सिनियर होते पी. व्ही नरसिंह राव. ते आणि अजित एकाच वसतिगृहात राहायचे."
बड्या दिग्दर्शकांनी दुर्लक्ष केलं
व्ही शांताराम, राज कपूर, मेहबूब खान, गुरु दत्त आणि बिमल रॉय यांसारख्या समकालीन दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली नाही हे अजितचे दुर्दैव. आतापर्यंतच्या महान दिग्दर्शकांपैकी फक्त के. आसिफ यांच्यासोबत त्यांनी काम केलं. 70 च्या दशकातील मनमोहन देसाई, मनोज कुमार आणि फिरोज खान यांनीही त्यांना काम दिलं नव्हतं.

फोटो स्रोत, SHAHID ALI KHAN
सुभाष घई यांचा कालीचरण हा पहिला चित्रपट होता ज्यात अजितने काम केलं होतं. तो चित्रपट खूप हिट ठरला. मात्र चित्रपट हिट होऊनही त्यांनी अजित यांना त्यांच्या पुढील कोणत्याही चित्रपटात रिपीट केलं नाही. त्याचप्रमाणे प्रकाश मेहरा यांचा दिग्दर्शक म्हणून जंजीर हा पहिला चित्रपटही खूप यशस्वी ठरला. पण त्यांनी अजितसोबत पुन्हा काम केलं नाही. बी आर चोप्रा यांनी सुद्धा अजितसोबत 'नया दौर' हा एकच चित्रपट केला. त्याचप्रमाणे यश चोप्रानेही त्यांना फक्त आदमी और इंसान या एकाच चित्रपटासाठी साइन केलं होतं. मात्र देवानंद आणि चेतन आनंद यांनी अजित यांच्या प्रतिभेला ओळखलं आणि त्यांना त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम करायला लावलं.
मात्र खाजगी जीवनात मृदुभाषी आणि नम्र अशी प्रतिमा होती
अजित यांची आठवण काढताना त्यांचा मुलगा शाहिद अली खान सांगतात की, "अजित हे वैयक्तिक आयुष्यात खूप मृदुभाषी आणि नम्र व्यक्ती होते. तसं तर ते कधी रागवायचे नाहीत मात्र तरी कधी कधी त्यांना राग यायचा. ते माझं पूर्ण नाव घेऊन मला हाक मारायचे. म्हणायचे, 'शाहिद अली खान इकडे या.' ते त्यांच्या ड्रायव्हर आणि नोकरांना सुद्धा जी किंवा साहेब म्हणायचे. आम्ही आमच्या शाळेच्या बसने जायचो. तर आमच्या वडिलांकडे दोन गाड्या आणि ड्रायव्हर असायचा. त्यांनी आम्हाला कधीच गाडीतून सोडले नाही. तसं तर मीच त्यांना बाहेर घेऊन जायचो, मात्र मी कधी घरी नसलो तर ते स्वत: ऑटो घेऊन जायचे. त्यांना कधीच वाटलं नाही की ते एक सेलिब्रिटी आहेत."
त्यांना शेरो शायरीची खूप आवड होती. शाहिद सांगतात की, आमच्याकडे कधी फिल्मी पार्ट्या झाल्याचं नाहीत. त्यांना आंबे खूप आवडायचे. ते आंब्याच्या मोसम आला की ते खुश व्हायचे.
अत्यंत तत्वनिष्ठ व्यक्ती
अजित हे अतिशय तत्त्वनिष्ठ व्यक्ती होते. इक्बाल रिझवी सांगतात, "थिल्लर बडबडणं तर दूर त्यांनी चित्रपटांमध्ये सुद्धा अशा प्रकारची भूमिका स्वीकारली नाही. रेप सीन हे त्याच्या सन्मानाच्या विरोधात असल्याचे सांगून ते नेहमी टाळायचे. त्यांना कवितांची खूप आवड होती. तो अनेकदा भेंडीबाजारला त्यांची गाडी पाठवून आणि कवींना त्याच्या घरी बोलवायचे. बेगम पारा यांनी अजितबद्दल एक अतिशय भारी गोष्ट सांगितली होती की, जर एखादी स्त्री पुरुषाबद्दल काही सांगत असेल तर त्यातून त्या पुरुषाचं खरं व्यक्तिमत्व समोर येतं. त्यांनी मला सांगितलं की अजित हा असा पुरुष आहे ज्याच्या सहवासातील स्त्रियांना त्याच्यापासून कधीही धोका वाटतं नाही."
अजित यांच्या जोक्सची लोकप्रियता
गेल्या काही वर्षांत अजित यांच्या 'मोना डार्लिंग' आणि 'रॉबर्ट' सारख्या वन-लाइनरने मागील बऱ्याच पिढ्यांचं मनोरंजन केलंय. माझ्या चाहत्यांना मी मारलेल्या डायलॉग्सचं वेड लागलयं, असं खुद्द अजित सांगायचे. जेव्हा असे डायलॉग मिळणं बंद झालं तेव्हा मी माझ्याच मनात काही डायलॉग्स तयार केले.
एका चित्रपटातल्या सीनमध्ये अजित, वाईटरित्या मारहाण झालेल्या आणि साखळदंडाने बांधलेल्या हिरोला लिक्विड ऑक्सिजनमध्ये बुडवण्याचा आदेश देतात. "लिक्विड इसे जिंदा नहीं रहने देगी और ऑक्सीजन इसे मरने नहीं देगी." हा तो डायलॉग होता.
1982 मध्ये जावेद जाफरी यांनी अजित यांच्या 'बास, पास द सास' या डायलॉगच्या धर्तीवर मॅगी सॉसची टॅग लाइन लिहिली होती. पार्ले जी बिस्किटचे प्रमोशनही अजित यांच्या खास अंदाजात झालं होतं. 'माल लाये हो' ही त्यांची पंच लाईन होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








