जेव्हा चार्ली चॅप्लिनची शवपेटी चोरून त्याच्या बायकोला ब्लॅकमेल केलं होतं

जेव्हा चार्ली चॅप्लिनची शवपेटी चोरून त्याच्या बायकोला ब्लॅकमेल केलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, देहलिया वेंचुरा
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड

चार्ली कुणाला माहिती नाही असं होणं शक्य नाही आणि आवडत नाही, असं तर अजिबातच शक्य नाही.

एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ख्यातनाम पावलेला असा हा चार्ली, जीवनातील खडतर आव्हानं आणि शोकांतिका पडद्यावर अशा रीतीने सादर करायचा की प्रेक्षक हसता हसता कधी रडतील सांगता यायचं नाही.

मूकपटांचा अनभिषिक्त बादशहा ठरलेला25 डिसेंबर 1977 रोजी चार्लीचा मृत्यू झाला. चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने त्याच्या मृत्यूनंतर त्याचं थडगं उकरून कुणीतरी त्याचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरून नेल्याचं आढळून आलं. पण बरेच लोक यामागची गोष्टच विसरून गेलेत.

चार्ली हा विनोदांचा अनभिषिक्त सम्राट होता.

16 एप्रिल 1889 रोजी चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिनचा जन्म झाला.

अत्यंत गरिबी आणि उपासमारी अशा प्रतिकूल परिस्थिती चार्ली वाढला. या निराशाजनक आणि नियतीशी असणाऱ्या दु:खद संघर्षांचं रूपांतर त्याने विनोदात केलं.

फक्त विनोदवीरच नाही तर एक लेखक, संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणूनही त्याने नाव कमावलं. त्याने त्याचा प्रत्येक चित्रपट सर्वांगाने अप्रतिम बनवण्याचा प्रयत्न केला.

विचित्र वाटणारे कपडे, छोटी बटलर टोपी आणि मोठाले बूट, आखूड काळ्या मिशा, ढगळी विजार, तंग कोट आणि फेंगडी चाल असलेल्या वेंधळ्या चार्लीचं पात्र लोकांना तेव्हाही आणि आताही भावतं.

मूकपट बऱ्याचदा कंटाळवाणे वाटतात, पण चार्लीने त्याच्या मुकपटात करुणा, प्रेम, राग, संशय, अशा अनेक भावना ओतून त्याला काहीतरी सांगायचं आहे हे दाखवून दिलं.

1940 मध्ये चार्लीचा पहिला बोलपट "द ग्रेट डिक्टेटर" रिलीज झाला. हा चित्रपट जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरवर आधारलेला होता.

या चित्रपटात शेवटी चार्लीने लोकशाहीवर जे भाषण दिलं होतं ते आजही कालबाह्य वाटत नाही.

चार्ली चॅप्लिन

फोटो स्रोत, Getty Images

पण चार्लीचा हा चित्रपट तेव्हा हिटलरच्या नेतृत्वाखालील जर्मनीत, बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्वाखालील इटली आणि फ्रान्सिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली स्पेनमध्ये प्रदर्शित झालाच नाही.

कारण चार्लीने हिटरलचं जे विडंबन केलं होतं ते नाझी हुकूमशहाला सहन झालं नव्हतं.

साहजिकच या तिन्ही हुकूमशाहांनी या चित्रपटावर त्यांच्या त्यांच्या देशात बंदी घातली. अर्थात चार्लीला जे इप्सित साध्य करायचं होतं ते झालं होतं.

अमेरिकेतून हकालपट्टी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्या पद्धतीने चार्ली प्रसिध्दीच्या शिखरावर होता अगदी त्याचपद्धतीने त्याच्या भोवती वादाचं मोहोळही साचलं होतं.

अशातला एक वाद म्हणजे नाझी हुकूमशाहा अर्थात हिटलरचं केलेलं विडंबन. हिटलरच्या क्रौर्याची खरी कहाणी जगाला समजावी म्हणून चार्लीने त्याच्यावर विनोदी चित्रपट बनवला.

चार्ली एकेठिकाणी म्हणाला होता की, हिटलरला हसवणं गरजेचं होतं म्हणूनच त्याने कॉमेडी करण्याचा निर्धार केला होता.

कधीकधी चार्लीच्या खाजगी आयुष्याबद्दलचं गॉसिप वृत्तपत्रातून छापून यायचं. तसा त्यामुळे वादंग निर्माण झाला नाही, मात्र त्याच्या राजकीय विचारसरणी मुळे अडचण निर्माण झाली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चार्लीने रशियाच्या बाजूने विधानं केली होती. तो असं म्हटला होता की, हिटलरला धडा शिकवण्यासाठी रशिया आणि पाश्चात्य देशांनी एकत्र यावं. त्याच्या या विधानामुळे बरेच पुराणमतवादी खवळले.

पुढं अमेरिका आणि रशिया शीतयुद्ध अगदी भरात आलं असताना साम्यवादाबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या चार्लीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचा संशय बळावला.

शेवटी ब्रिटिश नागरिक असलेल्या चॅप्लिनला 1952 साली अमेरिकेत परत यायला बंदी घातली गेली. यानंतर पुढची 20 वर्षं चार्ली अमेरिकेत परतला नाही. पण नंतर अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने चार्लील ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी बोलावलं. चार्लीही झाला गेला अपमान विसरून अमेरिकेला गेला.

1952 मध्ये अमेरिकेतून इंग्लंडला जाण्यासाठी जहाजावर बसलेल्या चार्लीला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने तंबी दिली. राजकीय आरोप आणि नैतिक पतन केल्याप्रकरणी चार्लीने उत्तरं दिली तर त्याला अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली जाईल असं त्या विभागाने म्हटलं.

अमेरिकन अधिकार्‍यांच्या छळाला कंटाळून चार्लीने स्वित्झर्लंड गाठलं.

चार्ली वयाच्या 88 व्या वर्षी म्हणजे 1977 साली नाताळच्या दिवशी सकाळी झोपेत असताना वारला.

तो वारला त्यावेळी त्याची चौथी पत्नी उना आणि 11 मुलांपैकी चार मुलं तिथं हजर होती.

चार्ली चॅप्लिन

फोटो स्रोत, Getty Images

चार्लीची चित्रपट कारकीर्द 1914 मध्ये सुरू झाली आणि 1967 मध्ये संपली. त्याने आपल्या हयातीत एकूण 81 चित्रपट केले.

चार्लीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील तलावाच्या उतारावर त्याचा दफनविधी करण्यात आला.

चार्ली गेला पण त्याची गोष्ट इथंच संपली नाही.

मार्च 1978 मध्ये, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन महिन्यांनी त्याचं थडगं उकरून कुणीतरी त्याचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरून नेली.

आणि चार्लीच्या शवपेटीच्या बदल्यात 4 लाख पाउंड इतकी रक्कम मागितली. आजच्या तारखेला 23.5 लाख यूएस डॉलर इतकी ती रक्कम होती.

पण उनानं म्हणजेच त्याच्या पत्नीने चोरट्यांची ही मागणी फेटाळली. त्यावर पैसे न दिल्यास तिच्या दोन मुलांना इजा करू असा दम चोरट्यांनी भरला.

चार्लीच्या मृत्यूनंतर, त्याच्या पत्नीला 1.2 दशलक्ष पौंड इतकी संपत्ती मिळाली होती.

चोरट्यांच्या ताब्यात असलेल्या या शवपेटीबाबत चार्लीच्या कुटुंबीयांनी चकार शब्द काढला नव्हता. मात्र त्याची शवपेटी गायब झाल्याच्या तितक्याच अफवा पसरल्या.

एका हॉलिवूड मासिकाने यावर एक सनसनाटी स्टोरी लिहिली. त्यांनी आपल्या स्टोरीत असा दावा केला होता की, चार्ली ज्यू होता म्हणून त्याचा मृतदेह बाहेर काढून ज्यूंच्या स्मशानभूमीत पुरण्यात आला.

तर दुसरीकडे, स्विस पोलिसांनी 200 टेलिफोन टॅप केले. चार्लीच्या घरी असलेला फोनसुद्धा टॅप करण्यात आला.

तब्बल पाच आठवड्यांनंतर चोर सापडले आणि त्यांना अटक झाली.

चार्ली चॅप्लिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चार्ली चॅप्लिन आणि उना यांचं लग्न 1943 साली झालं. तेव्हा उना फक्त 18 वर्षांची होती तर चार्लीचं वय 54 होतं.

या चोरट्यांनी जिनेव्हा तलावापासून जवळ असलेल्या एका मक्याच्या शेतात शवपेटी पुरली होती, पोलिसांना ती सापडली.

चार्लीचा मृतदेह चोरणाऱ्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चॅप्लिनच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर 11 डिसेंबर 1978 रोजी या चोरट्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

यात 24 वर्षांचा पोलंडचा रोमन वार्डास आणि दुसरा बल्गेरियाचा रहिवाशी असलेला 38 वर्षीय गँचो गानेव असे दोघंजण होते.

रोमन साधा मेकॅनिक होता. त्याने आपला गुन्हा कबूल करताना सांगितलं की, त्याच्या हाताला काहीच काम नव्हतं. थोडेफार पैसे मिळतील या लालसेनं त्याने हे कृत्य करायचं ठरवलं. यासाठी त्याने आपल्या 38 वर्षीय बल्गेरियन मित्र गँचो गानेव मित्राची मदत मागितली.

अशाच पद्धतीने इटलीत पैसे मिळवल्याची बातमी त्याने एका वर्तमानपत्रात वाचली होती. आपण ही आपल्या दुःखातून बाहेर पडावं यासाठी हा मार्ग निवडल्याचं रोमनने सांगितलं.

रोमन वार्डासचा मित्र गँचो गानेव कोर्टात म्हणाला की, "मला माझ्या मित्राला मदत करण्यात कोणतीही अडचण नव्हती. त्याला मदत केल्यानंतर मी या प्रकरणातून बाहेर पडणार होतो."

शेवटी चोरट्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने रोमनला चार वर्षं तर गानेवला 18 महिन्यांची शिक्षा दिली.

त्यानंतर चार्लीच्या मृतदेहाचं अंत्यसंस्कार आधी ज्या ठिकाणी झालं होतं, तिथे त्याची शवपेटी पुरण्यात आली. आणि पुन्हा त्याची शवपेटी चोरीला जाऊ नये म्हणून तिथं काँक्रीटचं बांधकाम करण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)