फ्लॉपच्या चक्रात अडकलेल्या बॉलिवूडला 2022 मध्ये 'या' सिनेमांमुळे मिळाला दिलासा...

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
कोव्हिडमुळे संपूर्ण जगात टाळेबंदी झाली. या टाळेबंदीतून कोणतेही व्यवसाय सुटले नाहीत. असाच फटका भारतीय सिनेसृष्टीला ही बसला होता. अडचणींचा सामना करणाऱ्या सिनेसृष्टीने यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पण 2021 मध्ये आलेल्या या संकटाचं सावट अजून विरलेलं नाही.
काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली असली तरी बहुतांशी चित्रपट सपाटून आपटले आहेत. कोव्हिडच्या आधी बॉक्स ऑफिसवर जी कमाई व्हायची त्याची पुनरावृत्ती अजूनतरी शक्य झालेली नाही.
भारतात आलेल्या कोव्हिडच्या लाटेनंतर सामान्य जीवन पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागला. लोकांसाठी थिएटर सुरू झाले तेव्हा फिल्म इंडस्ट्रीला आशेचा किरण दिसला.
यावर्षी सिल्व्हर स्क्रीनवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यातल्या काहींनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली तर काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले.
फिल्म ट्रेड मॅगझिन असलेल्या 'कंप्लीट सिनेमा'ने बीबीसीशी बॉक्स ऑफिसचे आकडे शेअर केलेत.
बॉलिवूडने 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली ते जाणून घेऊया.
दृश्यम 2

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
2015 मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेला 'दृश्यम' रिलीज झाला होता. त्याचा दुसरा पार्ट यावर्षी म्हणजेच 2022 मधील नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित झाला. 'दृश्यम 2' हा देखील मल्याळम चित्रपटाच्या सिक्वेलचा रिमेक आहे.
'कम्प्लीट सिनेमा'ने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगण स्टारर या चित्रपटाने 220 कोटींचा गल्ला जमवलाय आणि हा चित्रपट अजूनही थिएटर मध्ये सुरू आहे.
'दृश्यम 2' मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू आणि श्रिया सरन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
रिमेक चित्रपट असूनही 'दृश्यम 2' प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरलाय.
2022 मध्ये अजय देवगणचे आणखीन 2 चित्रपट आले होते.
एक, अमिताभ बच्चनसोबत 'रनवे 34' आणि दुसरा सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'थँक गॉड'.
'रनवे 34'ला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवता आली नाही. या चित्रपटाने 28.1 कोटींची कमाई केली, तर दिवाळीत रिलीज झालेल्या 'थँक गॉड'ने 35 कोटींची कमाई केली. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यथातथाच कमाई करू शकले.
भूल भुलैया 2

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
2022 मधील मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अनीस बज्मीचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. हिंदी चित्रपटांना वैतागलेले प्रेक्षक सुद्धा हा चित्रपट पाहायला थिएटर मध्ये गेल्याचं दिसून आलं.
कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू स्टारर असलेला हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' सिरीजमधील दुसरा चित्रपट होता.
'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर 179 कोटींची कमाई केली. हा चित्रपट हिट झाल्यानंतर कार्तिकने त्याची फी वाढवल्याच्या बातम्या आहेत.
चित्रपट हिट झाल्याने निर्माता भूषण कुमार यांनी खुश होऊन कार्तिक आर्यनला चार कोटींची महागडी कार भेट दिल्याच्या ही बातम्या आल्या आहेत.
द काश्मीर फाइल्स

फोटो स्रोत, SPICE PR
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाने चांगली कमाई केली.
केवळ 15 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 251 कोटींची कमाई केली. यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरलाय.
चित्रपट बनवण्याच्या हेतूवर आजही वाद कायम आहे. गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आलेल्या इस्रायली फिल्ममेकर नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटल्यानंतरही बराच वादंग माजला होता.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'द काश्मीर फाइल्स'मुळे अक्षय कुमारच्या अॅक्शन कॉमेडी चित्रपट 'बच्चन पांडे'लाही फटका बसला होता.
या चित्रपटाने अवघ्या 45 कोटींची कमाई केली आणि फ्लॉप कॅटेगरी मध्ये जाऊन बसला.
गंगुबाई काठियावाडी

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
बॉक्स ऑफिसवर संकटाचं सावट गडद झालेलं असताना संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा गाठला. या चित्रपटात आलिया भट्ट लीड रोल मध्ये होती.
चित्रपटाने 115 कोटींची कमाई केली केली.
ब्रह्मास्त्र : पार्ट 1 - शिवा

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'ब्रह्मास्त्र ट्रायलॉजी' सिरीज मधील पहिला चित्रपट 'पार्ट 1 - शिवा' ची प्रचंड क्रेझ सुरू होती.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल लाईफमुळेही या सिनेमाची चर्चा सुरू होती.
यात या दोघांचं प्रेमप्रकरण, लग्न आणि पहिल्या मुलीच्या जन्मामुळे तर चर्चेने आणखीनच वेग धरला.
धर्मा प्रॉडक्शनचा 'ब्रह्मास्त्र: पार्ट 1 -शिवा' हा चित्रपटही वादात सापडला होता. शिवाय या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंडही सोशल मीडियावर चालवण्यात आला. तरीही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. 'कम्प्लीट सिनेमा'नुसार, 'ब्रह्मास्त्र: पार्ट 1 - शिवा'ने भारतात जवळपास 225 ते 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा आकडा मोठा आहे. धर्मा प्रॉडक्शननुसार, चित्रपटाचं बजेट 410 कोटी रुपयांचं होतं आणि चित्रपटाने एकूण 360 कोटींची कमाई केली.
रणबीर कपूरचा दुसरा मोठा चित्रपट 'शमशेरा' मोठ्या दिमाखात रिलीज तर झाला. मात्र या चित्रपटाने केवळ 41.3 कोटींची कमाई केली. यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला.
दक्षिण भारतीय चित्रपटांचा दबदबा
भलेही बॉलिवूडने प्रेक्षकांची निराशा केली असेल, पण साऊथ इंडियन चित्रपटांनी उत्तर भारतात तुफान कमाई केली आणि विशेष म्हणजे बातम्यांमध्ये यांच्या हेडलाईन्स खूप गाजल्या.
यामध्ये 'केजीएफ 2', 'RRR' आणि 'कांतारा' यांचा समावेश आहे.
केजीएफ 2

फोटो स्रोत, SPICE PR
2018 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट 'केजीएफ' नंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते.
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, दुसऱ्या पार्टमध्ये बॉलिवूडची स्टार कास्ट दिसली. यात रवीना टंडन आणि संजय दत्त लीड रोल मध्ये होते.
100 कोटी रुपये खर्चून बनवलेला हा आजवरचा सर्वात महागडा कन्नड चित्रपट होता. चित्रपटाने तशीच तगडी कमाई देखील केली असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 427 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
या चित्रपटाने ओवरसीज 1000 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जातंय. थोडक्यात केजीएफ 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.
आरआरआर

फोटो स्रोत, SPICE PR
बाहुबलीच्या यशानंतर एसएस राजामौली यांच्या पुढच्या पॅन इंडिया चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. कोव्हिडच्या लाटेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. शेवटी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपट रिलीज करण्यात आला. या तेलगू स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर महत्त्वाच्या भूमिकेत होते.
त्याचबरोबर बॉलिवूड स्टार आलिया भट्ट आणि अजय देवगण सुद्धा यात दिसले.
550 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या चित्रपटाने हिंदी भाषेतून 269 कोटी रुपयांची कमाई केली तर या चित्रपटाची ओवरसीज कमाई 1000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय. या चित्रपटाला बाहुबलीचे रेकॉर्ड मोडता आले नाहीत.
कांतारा

फोटो स्रोत, SPICE PR
वर्षाच्या शेवटी कन्नड भाषेतील 'कंतारा' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने हिंदी भाषेतून जवळपास 75 कोटींची कमाई केली.
तर तेलुगू भाषिक असलेला 'कार्तिकेय 2' देखील हिंदी भाषिक प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली.
तेच दुसरीकडे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित 'मेजर' या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली.
काही दक्षिण भारतीय चित्रपट म्हणावी तशी कामगिरी करू शकले नाहीत.
'बाहुबली' फेम प्रभासचा 'राधे श्याम' हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज झाला होता. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे कानाडोळा केला.
तब्बल 200 कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट हिंदी भाषेतून केवळ 17 कोटींची कमाई करू शकला.
दुसरीकडे तेलगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडाचा 'लायगर' हा चित्रपट सुद्धा पॅन इंडिया रिलीज झाला होता. मात्र या चित्रपटाला ही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.
100 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.
उत्तर भारतात प्रमोशन करून देखील या चित्रपटाला हिंदी भाषेतून केवळ 18 कोटी रुपयांची कमाई करता आली. दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले.
दुसरीकडे, कमल हसनचा 'विक्रम', रोना आणि मणिरत्नमचा 'पोन्नी सेलवन पार्ट 1' देखील रिलीज झाले पण तेही फ्लॉप ठरले.
कमी बजेट असलेले चित्रपट

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
काही चित्रपटात मोठी स्टारकास्ट असून देखील त्यांना 100 कोटींचा टप्पा ओलांडता आला नाही. पण तेच कमी बजेट असलेल्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली.
या चित्रपटांमध्ये वरुण धवन, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर यांच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाने 65 कोटींची कमाई केली आहे.
तसेच स्पेस सायंटिस्ट असलेल्या नंबी नारायण यांच्यावरील बायोपिक 'रॉकेटरी'ने हिंदी भाषेतून 23 -24 कोटींची कमाई केली. यात आर माधवन लीड रोल मध्ये होता. काही हॉलिवूड पटांनीही चांगली कामगिरी केली. यात 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर', 'टॉप गन मॅव्हरिक' आणि 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटांचा समावेश आहे.
यावर्षाच्या शेवटी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालाय. यात रणवीर सिंग असून कॉमेडी जॉनर असलेला हा चित्रपट चांगली कमाई करेल, असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र चित्रपटाला मिळालेला सुरुवातीचा रिस्पॉन्स यथातथाच राहिलाय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








