कांतारा : रश्मिका मंदाना-ऋषभ शेट्टी यांच्यातील वाद नेमका काय आहे?

रश्मिका मंदाना आणि ऋषभ शेट्टी

फोटो स्रोत, getty/twitter

कधी काळी 'नॅशनल क्रश' म्हणून संबोधली जाणारी रश्मिका मंदाना सध्या मात्र सोशल मीडिया ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

कांतारा चित्रपट अद्याप पाहिला नाही, असं रश्मिकाने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवाय, कांताराचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याच्यासोबत तिच्या गूढ वादामुळेच तिला ट्रोल करण्यात येत असल्याचं दिसून येतं.

एरवी, सोशल मीडियावर रश्मिका मंदाना हिच्या अभिनयाचं किंवा सौंदर्याचं कौतुक होत असतं. रश्मिकाचे फोटो डिपी-स्टेटसला लावणं, रश्मिकाच्या चित्रपटांमधील व्हीडिओंना वेगवेगळी गाणी-डायलॉग्ज लावून रिल्स बनवणं, आदी गोष्टी तिचा चाहता वर्ग करत असतो.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून एका मुलाखतीत रश्मिकाने ऋषभ शेट्टी संदर्भात केलेली टिप्पणी व्हायरल होताना दिसत आहे.

रश्मिका आणि ऋषभ शेट्टी यांच्यातील वाद नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊ ...

‘कांतारा चित्रपट पाहिला नाही’

कांतारा हा मूळ कन्नड चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. कन्नड व्हर्जनला मिळालेल्या भरघोस यशानंतर त्याचे हिंदी, तेलुगू, तमीळ आणि मल्याळम डब व्हर्जन 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाले. सर्वच भाषांमध्ये कांतारा चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने एकूण 400 कोटींपेक्षाही जास्त कमाई केल्याची नोंद आहे.

दरम्यान, कांतारा चित्रपटाचं कौडकौतुक सुरू असतानाच दिवाळीदरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला चित्रपटाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.

यावेळी कांतारा आपण अद्याप पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया रश्मिकाने दिली होती. तीच हिच प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या नाराजीचं कारण ठरली.

कांतारा न पाहिल्यावरून तेव्हापासूनच रश्मिकाला ट्रोल करण्यात येऊ लागलं. तसंच यानंतर काही दिवसांनी रश्मिकाने एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यानेही नेटकऱ्यांच्या नाराजीला फोडणी दिली.

या व्हीडिओत आपल्या चित्रपट विश्वातील एन्ट्रीबाबत बोलताना रश्मिकाने “प्रोडक्शन हाऊस” असं अवतरण चिन्हांमध्ये हातांनी संबोधलं. रश्मिकाची ही कृतीसुद्धा ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

किरीक पार्टी

फोटो स्रोत, paramvah studios production

रश्मिका मंदाना-ऋषभ शेट्टी यांचं कनेक्शन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खरं तर, अभिनेत्री रश्मिका मंदानाने चित्रपट रसिकांचं लक्ष वेधलं ते ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या तेलुगू चित्रपटांमधून. मात्र तिचं चित्रपट सृष्टीतील पदार्पण हे ‘किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून 2016 साली झालं होतं.

वर रश्मिका ज्या “प्रोडक्शन हाऊस”बद्दल हातांनी खुणावत बोलत होती. तोच हा चित्रपट होय. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी होता.

किरीक पार्टी चित्रपटाची निर्मिती रक्षित शेट्टी आणि जी. एस. गुप्ता यांनी केली. तसंच रक्षित शेट्टी हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही होता. शिवाय हा चित्रपट त्यानेच लिहिलेला होता. रक्षितची हिरोईन म्हणून रश्मिकाची या चित्रपटात वर्णी लागली होती.

या चित्रपटाला चांगलं यश मिळाल. किरीक पार्टी हा चित्रपट त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही होता.

दरम्यान, अभिनेता रक्षित आणि रश्मिका यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांनी साखरपुडाही केला होता. मात्र काही कारणांमुळे दोघांचा साखरपुडा मोडला होता.

पुढे, रश्मिकाला अनेक चांगल्या चित्रपटांची ऑफर मिळाली. तिला हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली आहे.

ऋषभ शेट्टी म्हणाला ‘इस टाईप की अॅक्ट्रेस’

वरील सर्व घटनाक्रम पाहिल्यास ज्या दिग्दर्शकासोबत रश्मिकाच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याच्याविषयी बोलणं टाळणं, त्याचे चित्रपट न पाहणं, या कारणांमुळेच रश्मिकावर टीका करण्यात येत आहे.

कितीही यश मिळालं तरी माणसाने आपलं मूळ विसरता कामा नये, असा सल्ला रश्मिकाला ट्रोलर्सकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, रश्मिकाने केलेल्या वक्तव्यानंतर ऋषभ शेट्टीचं तिच्याविषयी थेट वक्तव्य केलं नव्हतं. मात्र नुकतेच त्याने रश्मिकासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे. हेच ऋषभचं रश्मिकाला उत्तर असल्याचं म्हटलं जात आहे.

Gulte.com या वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभला समंथा, साई पल्लवी, किर्ती सुरेश किंवा रश्मिका मंदाना यांच्यापैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला.

उत्तरादाखल ऋषभ म्हणाला, “मी आपली स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतरच कलाकारांची निवड करतो. पण मला नवोदित कलाकारांसोबतच काम करायला जास्त आवडतं. कारण त्यांच्यासोबत काम करण्यास कोणतेही अडथळे नसतात.

यानंतर ऋषभने हातांनी अवतरण चिन्हांची खूण करत म्हटलं, “इस टाईप की अॅक्ट्रेस मुझे पसंद नहीं.”

तो पुढे म्हणाला, “मात्र, मला साई पल्लवी आणि समंथा यांचं काम खूप आवडतं.”

ऋषभच्या याच उत्तराचा गर्भित अर्थ त्याच्या रश्मिकासोबतच्या वादाशी जोडण्यात येत असून त्याने रश्मिकाला कसं सडेतोड उत्तर दिलं, असं म्हणत हे दोन्ही व्हीडिओ व्हायरल केले जात आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)