'अर्थ' सिनेमानंतर स्मिता पाटील की शबाना आझमी या चर्चा का रंगू लागल्या?

फोटो स्रोत, ANU ARTS
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, बीबीसी इंडिया
महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ’ हा चित्रपट 3 डिसेंबर 1982 रोजी प्रदर्शित झाला होता.
एक लग्न, दोन नाती आणि दोन स्त्रिया - पूजा लहानपणापासून अनाथ आहे आणि लग्नानंतर तिचा पती इंदर हाच तिचे आयुष्य आहे.
दुसरी आहे कविता. ती सुपरस्टार आहे, पण आतल्या आत ती स्वतःला एकदम असुरक्षित व पोकळ समजते. तिच्या आयुष्यात प्रेम आहे, पण त्या प्रेमाकडे जग एक व्यभिचार म्हणून पाहते.
या दोघींना तोडणारा आणि जोडणारा समान दुवा आहे इंदर (कुलभूषण खरबंदा).
आपल्या ‘विश्वासघाता’चे समर्थन करताना तो म्हणतो, “मैंने तुमसे प्यार करना नहीं छोड़ा पूजा. फ़र्क़ इतना पड़ गया है कि मैं कविता (स्मिता पाटिल) से भी प्यार करता हूँ.”
‘अर्थ’ हा नात्यांच्या या भोवऱ्यामध्ये आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या दोन स्त्रियांची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे. 40 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1982 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
महेश भट्ट यांच्या खऱ्या आयुष्यातील घटनांवर बेतलेला आहे हा चित्रपट.
'अर्थ'- एक लँडमार्क चित्रपट

फोटो स्रोत, ANU ARTS
महेश भट्टचा हा चित्रपट एक लँडमार्क चित्रपट समजला जातो. विशेषतः ज्या क्षेत्रात बहुतेक कथा या पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या जातात, तिथे हा चित्रपट वेगळा ठरतो.
ज्या संवेदनशीलतेने, नाजूकपणे, चपखलपणे आणि धाडसाने स्त्रीच्या भावना व तिच्या प्रवासातील पापुद्रे उलगडून दाखवले आहेत, ते 80 च्या दशकात एक धाडसच होते. कारण दुसरीकडे त्याच वेळी ‘डिस्को डान्सर’ आणि ‘मर्द’सारखे चित्रपट तयार होत होते.
महेश भट्ट यांच्या आयुष्यातील खऱ्या घटनांवर आधारित ‘अर्थ’ हा चित्रपट होता यात काहीच गुपित नव्हते. या घटनांना काल्पनिक घटनांशी जोडून हा चित्रपट तयार करण्यात आला होता.
महेश भट्ट यांचं लॉरेन ब्राइट यांच्याशी लग्न झाल्यानंतरही त्यांचे परवीन बाबीसोबत प्रेमसंबंध होते. परवीन बाबीला नंतर स्क्रित्झोफ्रिनिया झाला आणि मग ते नाते संपुष्टात आले.
स्त्रियांची सामाजिक जडणघडण
चित्रपटातील व्यक्तिरेखेचे बारीक बारीक पदर शबाना आझमी यांनी उलगडून दाखवले आहेत. ही व्यक्तिरेखा अनेक स्त्रियांप्रमाणेच भावनिक, मानसिक व आर्थिक गरजांसाठी पूर्णपणे आपल्या पतीवर अवलंबून आहे.
आपल्या पतीचे नाते दुसऱ्या स्त्रीसोबत आहे, असे तिला समजते तेव्हा ती त्याला वाईट-साईट बोलत नाही. उलट त्याच्यासमोर ती याचना करते आणि म्हणते, "मुझसे क्या ग़लती हो गई इंदर. जो कमी थी कोशिश करूँगी वो न रहे. लेकिन एक मौका और दे दो."
पूजा मल्होत्राची (शबाना) सामाजिक जडणघडणच अशा प्रकारे झाली आहे की, तिच्यातच काहीतरी उणीव आहे, हाच तिच्या जीवनाचा अर्थ आहे.
पण या नात्यातून ती कशा प्रकारे बाहेर पडते आणि हळूहळू आयुष्याचा अर्थ समजू लागते, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ती अनेक टप्प्यातून जाते आणि हेच टप्पे 'अर्थ' या चित्रपटाचे सौंदर्य आहेत. हा बदल एका रात्रीत घडत नाही. 'अर्थ' ही खरे तर या बदलाची किंवा परिवर्तनाची गोष्ट आहे.
स्मिता पाटील यांचा संवेदनशील अभिनय

फोटो स्रोत, SUPRIYA SOGLE
शबाना आझमीच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात ती आसवे गाळते, आपला आत्मसन्मान ती एका बाजूला ठेवून कवितासमोर (स्मिता पाटील) याचना करते.
रागाच्या भरात आणि नैराश्यातून मद्याच्या अमलाखाली पार्टीमध्ये कवितासोबत (स्मिता) जसे वागते आणि जे शब्द वापरते, त्यावर नंतर तिचाच विश्वास बसत नाही.
स्मिता आणि शबानामधील संघर्षाचे हे दृश्य या चित्रपटातील काही उत्तम दृश्यांपैकी एक आहे. मद्यधुंद शबानाच्या साडीचा पदर या दृश्यात खाली पडतो. पण तेव्हा तिला कसलीच जाणीव नसते.
महेश भट्ट सांगतात की हे चुकून झाले होते. पण ते दृश्य अश्लील वाटत नाही. उलट त्या क्षणाची भावनिक तीव्रता दर्शवते, ज्यात एक सुपरस्टार (स्मिता पाटील) काहीशी भेदरलेल्या अवस्थेत गप्पपणे उभी आहे आणि आजपर्यंत ज्या स्त्रीचा आवाज घराच्या बाहेरही आलेला नाही, ती भान हरपून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
परवीन बाबी आणि महेश भट्ट यांचे नाते

फोटो स्रोत, ANU ARTS
'अर्थ' हा तसे पाहिले तर पूजाची गोष्ट आहे. पण यातील कविता या दुसऱ्या स्त्रीची म्हणजेच स्मिताची गोष्ट तिच्या नजरेतून दाखविण्यात आली आहे.
विशेषतः तिच्या मनातील असुरक्षिततेची भावना आणि तिच्या नाजूक भावनिक परिस्थितीचे पदर उलगडून दाखवते.
हा भाग परवीन बाबी आणि महेश भट्ट यांच्या नात्यातून घेण्यात आला आहे. या वेळी स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचे प्रेम प्रकरण सुरू होते आणि राज बब्बर आधीपासूनच विवाहित होते.
फिल्मफेअर या नियतकालिकाला 2018 मध्ये दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले होते, “चित्रपटात दुसऱ्या स्त्रीची भूमिका करण्याचा स्मितावर परिणाम होत होता का, असे मला कुणी विचारले तर मी सांगेन की, ती मला म्हणत असे, रात्री मला हे दुहेरी आयुष्य जगावे लागतेच, पण आता दिवसासुद्धा याचेच चित्रीकरण करावे लागत आहे.
दिलासा कुठेही नाही. मला वेडही लागू शकेल. तू आपल्या भूतकाळाशी लढत आहेस आणि मी माझ्या प्रश्नांशी.”
'मैं अपना घर बसाना चाहती थी, तुम्हारा घर उजाड़ना नहीं'

फोटो स्रोत, TWITTER@NFAIOFFICIAL
'अर्थ'मध्ये एक दृश्य आहे. त्यात स्मिता पाटीलने पुरुषाच्या आयुष्यातील दुसऱ्या स्त्रीच्या मनातील भीती, असुरक्षिततेची भावना आणि ढासळती मानसिक स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर साकारली आहे.
मानसोपचारतज्ज्ञाच्या सल्ल्याने शबाना स्मिताच्या घरी तिला भेटायला येते, जेणेकरून स्मिता तिच्या काल्पनिक भीतीला सामोरी जाऊ शकेल.
दोघींमधील संवाद खूपच मार्मिक आहे. अपराधीपणाच्या भावनेतून स्मिता शबानाला म्हणे, “मैं इंदर को चाहती हूँ, तुम्हारे पति को नहीं. मैं अपना घर बसाना चाहती थी, तुम्हारा घर उजाड़ना नहीं.”
त्यावर तिला दिलासा देत शबाना उत्तरते, “मेरा घर था ही नहीं, तुमने कुछ नहीं उजाड़ा…"
स्मिताच्या मनातील अपराधीपणाची भावना तिला खात आहे, तर दुसरीकडे शबाना आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे ती स्मिताच्या रुपातील सत्य आणि जीवनाला हिमतीने आणि मद्याच्या आहारी न जाता व शिवीगाळ न करता अत्यंत संयतपणे सामोरे जाऊ शकते.
खरे तर आपल्या पायावर उभी राहण्यास ती अजूनही पूर्णपणे तयार झालेली नाही
म्हणूनच ती या आधी इंदरला (कुलभूषण) पत्र लिहिते, “घराची चावी आणि कॅश पाठवत आहे. तुझ्या कविताच्या आयुष्यातून निघून जात आहे. तुझ्या आयुष्यातून नाही. तुझ्यापासून वेगळे राहून आयुष्य जगता येणे मला जमत नाही. जेव्हा तुला माझी गरज पडेल, तेव्हा मी असेन.”
म्हणजे विनवणीचा टप्पा तिने पार केला आहे आणि ती आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे तिला आपला स्वाभिमान गमावणे मान्य नाही.

फोटो स्रोत, ANU ARTS
'अर्थ'मध्ये ही वाट तर शबानाला स्वतःलाच निश्चित करायची आहे. पण या परिवर्तनासाठी राजकिरण उत्प्रेरकाचे काम करतो. तो स्वतः गझल गायक आहे. स्वतः बेरोजगार आहे. पण शबानाचा मित्र आहे आणि तिला तो बळ देतो.
पार्टीतील पहिल्याच भेटीत जणू राज पूजाला समजून घेऊ लागतो. जेव्हा पार्टीत तो उदास पण हसतमुख पूजाला पाहतो तेव्हा म्हणतो की, “अगर आप थक गई हों तो मुस्कुराना बंद कर दीजिए.”
चित्रपटाची गोष्ट आणि अभियन या व्यतिरिक्त यातील गाणी आणि संगीत हीसुद्धा एक जमेची बाजू होती. चित्रपटातील बहुतेक गाणी कैफी आझमी यांनी लिहिली होती.
जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या गझल म्हणजे या चित्रपटाचा आत्मा आहेत.
प्रेमालाच आयुष्यातील अंतिम सत्य समजणाऱ्या शपथांच्या जगात जगजीत विचारतात, "कहते हैं प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता, है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यूँ है?..."
प्रेमाच्या शाश्वततेवरच ही पंक्ती प्रश्नचिन्ह उभे करते. आणि आयुष्यातील एकटेपणाला ते साद घालतात, “कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यूँ है? वो जो अपना था वो ही और किसी का क्यूँ है?”
'कोई ये कैसे बताए कि वो तन्हा क्यों है'- ही गझल आयुष्याच्या एकटेपणाचाच एक संदेश आहे.
स्मिता आणि शबानाची जुगलबंदी
'अर्थ' चित्रपटानंतर एक वाद कायम होत असे, चित्रपटात उत्तम काम स्मिताने केले आहे की शबानाने?
चित्रपटात अजून एक परिणामकारक दृश्य आहे. या दृश्यात स्मिता पाटील कुलभूषण खरबंदाला म्हणते, "जो शादी सात साल में उसे (शबाना) कोई सिक्योरिटी नहीं दे सकी वो मुझे क्या देगी."
आपल्या मनात असलेली काल्पनिक भीती, मानसिक आजार आणि अपराधीपणाची भावना असलेल्या स्मिताच्या या दृश्याबद्दल महेश भट्ट म्हणाले होते की, “चित्रपटातील स्मिताचे काम म्हणजे जखमेतून झालेल्या स्फोटाचे होते. ती जखम अजूनही ताजी होती.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
चित्रपट समीक्षक अजय राय म्हणतात, “शबाना आझमी आणि स्मिता या दोघींनीही आपापली भूमिका चोख बजावली. स्मिता पाटीलने एका महत्त्वाकांक्षी नायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती, जी चंचल आहे, शीघ्रकोपी आहे. दुसरीकडे शबाना अत्यंत धीरगंभीर आहे.
दोघींची व्यक्तिरेखा एकदम वेगळी होती. पण दोघींनी उत्तम अभिनय केला होता. मला वाटते की, 'अर्थ' हा एक अर्थपूर्ण चित्रपटच असेल. कारण आजही भारतीय समाजात स्त्रियांच्या अनेक समस्या आहेत आणि अशा प्रकारच्या विषयांवरील अर्थपूर्ण चित्रपट क्वचितच तयार होतात.”
जेव्हा सुषमा स्वराज यांनी केली होती शबानाची प्रशंसा
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा जुना व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. त्यात त्यांना विचारण्यात आले की, त्यांची आवडती नायिका कोण आहे.
तेव्हा त्या उत्तरल्या होत्या, “शबाना आझमी. विशेषतः 'अर्थ' चित्रपटात. शबाना आणि स्मिता पाटील या दोघींच्या भूमिका कठीण होत्या. त्यांच्यापैकी अधिक उजवी कोण आहे, हे तुम्ही शेवटपर्यंत ठरवू शकत नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
'अर्थ'च्या आधीही मानवी नात्यांवर चित्रपट तयार झाले आहेत. बहुधा चित्रपटांचा शेवट सुखांत असतो. पण 'अर्थ' अशा एकमेव चित्रपट आहे, ज्यात कुलभूषण शबानाची माफी मागतो पण तसे होत नाही. ही कमाल होती.”
'तुम्हारी ज़िंदगी का कोई अर्थ है या नहीं...'

फोटो स्रोत, TWITTER@NFAIOFFICIAL
'अर्थ'चा शेवट अनेक दृष्टिकोनातून परिवर्तनवादी मानला जातो. पती-पत्नीच्या नात्यातील शेवट असो व राजकिरणशी मैत्रीचा परिणाम असो.
पतीला सोडल्यानंतर 'अर्थ'मध्ये शबानाकडे राजकिरणची मैत्रीच आहे, जी सहानुभूती आणि प्रेमाच्या मध्ये कुठेतरी आपली जागा शोधत आहे.
जेव्हा घटस्फोटानंतर शबाना पूजा मल्होत्राची फक्त पूजा होते. तेव्हा राज त्यांना काही गोष्टी समजावतो, “काही खास फरक पडलेला नाही. फक्त मल्होत्रा नसणार आहे. पूजा आता पूर्ण झाली आहे. खऱ्या पूजाचा आजच जन्म झाला आहे.
आयुष्याने जेव्हा शबानाला फटकारले तेव्हा ती सगळी नाती तोडून टाकते. अशा परिस्थितीत राज तिला हिंमत दाखवून विचारतो, “तुम्हारी ज़िंदगी का कोई अर्थ है या नहीं ये फ़ैसला मेरे लिए न सही कम से कम अपने लिए तो करना ही होगा.”
म्हणजे प्रत्येक क्षणी शबाना पुढे जात आहे. या वाटेवर तिला आपल्या आयुष्याचा 'अर्थ' शोधायचा आहे.
घरगुती हिंसेवरही 'अर्थ' भाष्य करतो

फोटो स्रोत, ANU ARTS
'अर्थ' ही केवळ पूजा आणि कविताचीच गोष्ट नाही. स्टेटस व जातीचे बंध तोडून आपापल्या पातळीवर लढा देणाऱ्या त्या सर्व स्त्रियांची ही गोष्ट आहे.
चित्रपटात अजून एक छोटी पण महत्त्वाची व्यक्तिरेखा रोहिणी हट्टंगडी यांनी साकारली आहे. ही व्यक्तिरेखा शबानाकडे घरकाम करते. तिच्या पतीचेही दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध आहेत. दारू पिऊन तो तिला मारतो. पण ती मोलकरीण आपल्या लहान मुलीला शिकवू इच्छिते. वेळ आल्यावर शबाना तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते.
नवऱ्याला सोडल्यावर शबानाला निराधार असल्यासारखे वाटते तेव्हा तिच बाई तिच्यासोबत असते आणि म्हणते, “मैं रहूँगी न इसके साथ.”
एके दिवशी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जेव्हा ती मोलकरणी तिच्या नवऱ्याची हत्या करते, तेव्हा तिच्या मुलीला शबाना आपल्याजवळ ठेवून घेते.
'तो क्या तुम मुझे वापस ले लेते?'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
या चित्रपटाच्या शेवटाचे दोन भाग होऊ शकतात. एक अत्यंत महत्त्वाचे दृश्य आहे.
यात कुलभूषण खरबंदा परत येऊन शबानाला म्हणतात, “कविताकडे मी कधीच जाणार नाही हे सत्य आहे. मला तुझ्यासोबत नव्याने सुरुवात करायची आहे.”
त्यावर शबाना विचारते, "एक सच और बता दो. जो कुछ तुमने मेरे साथ किया अगर वही मैं तुम्हारे साथ करती और इसी तरह लौट कर आती तो क्या तुम मुझे वापस ले लेते ? गुड बाय इंदर."
नायिकेने अशा तऱ्हेचा पलटवार करताना हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांनी फारच कमी वेळा पाहिले होते. म्हणजे आता पूजा मल्होत्राचा पूजा होण्याचा प्रवास आता जवळपास पूर्ण होत आला होता.
पण आयुष्याच्या दुसऱ्या टोकावर एक सोबती (राजकिरण) होता. पूजाने स्वतःची सोबत जेव्हा सोडली होती, तेव्हा तो तिच्या सोबत होता.
'तुम अपने आप में पूरी हो..'
चित्रपटाच्या शेवटाकडील अजून एक महत्त्वाचे दृश्य होते.
त्यात शबाना राजकिरणला म्हणते, “एक दिन तुम्ही ने कहा था कि पूजा तुम अपने आप में पूरी हो. अपने नाम को हर नाम से अलग करके मैं आज पूजा बनकर ही जीना चाहती हूँ. तुमने हमेशा मुझे सहारा दिया लेकिन आज तुम्हारा सहारा मुझे कमज़ोर बना देगा.”
राज म्हणतो, “जा पूजा. तुझ्या आतमध्ये जी हिंमत आली आहे, तोच आयुष्याचा खरा अर्थ आहे. आता तुला कोणत्याही मल्होत्रा किंवा राजची गरज पडणार नाही. तू मागे पाहू नकोस.”
त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर आपल्या मोलकरणीच्या दत्तक घेतलेल्या मुलीला घेऊन जाणारी शबाना हे चित्रपटातील अजून एक सुंदर दृश्य आहे.
चित्रपट समीक्षक अजय राय म्हणतात, “या चित्रपटाचा क्लायमॅकस हे 'अर्थ'चे वैशिष्ट्य होते. तो क्लासिक क्लायमॅक्स होता. वास्तववादी होता आणि स्त्रियांचे स्वातंत्र आणि स्वाभिमानाच्या बाजूने होता. या चित्रपटाच्या शेवटी शबाना आपल्या नवऱ्याकडे परत जाण्यास नकार देते. तिला आता नवऱ्याची गरज नाही.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होता. मी पाटणा येथील अशोक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेलो होतो. पण चित्रपट हाऊसफुल असल्याने मला दोन दिवस तिकीट मिळाले नव्हते. एक असा चित्रपट, ज्याला तुम्ही थोडा फार समांतर सिनेमा किंवा प्रायोगिक सिनेमा म्हणू शकता, तो हाऊसफुल झाला होता. ही मोठी बाब होती. ही एका स्त्रीच्या पूर्णत्वाची गोष्ट होती.”
स्मिता पाटीलचा मृत्यू
'अर्थ'मध्ये कुणीही नायक नाही आणि खलनायकही नाही.
कदाचित कुलभूषण खरबंदासुद्धा नाहीत. तो आपल्या आयुष्यात निश्चित भूमिकाच घेऊ शकत नाही. स्मिताही नाही. कारण ती आपल्या आनंदाच्या शोधात आहे.
खरे तर, 'अर्थ'मध्ये प्रत्येक जण आपापल्या वाट्याचा आनंद शोधत आहे. पण या सगळ्यांव्यतिरिक्त अशी एक स्त्री आहे, जी आनंदासोबतच आयुष्याचा अर्थ शोधत आहे.
या चित्रपटासाठी शबाना आझमी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. महेश भट्टना वेगळी ओळख मिळाली. स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याशी विवाह केला. राज बब्बर यांचे आधीच एक लग्न झाले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
'अर्थ' चित्रपटाच्या चार वर्षांनंतर 31 वर्षीय स्मिता पाटील यांनी मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
आणि या चित्रपटाच्या काही वर्षांनंतर राजकिरणसुद्धा नाहीसे झाले. शेवटी ऋषी कपूर आणि दीप्ती नवल यांनी त्यांना अमेरिकेत शोधण्याचा खूप प्रयत्न केला. ऋषी कपूर म्हणाले होते की, राजकिरण अमेरिकेतील एका मनोरुग्णालयात आहेत. पण ऋषी कपूर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते.
दरम्यान, ऋषी कपूर यांचा मृत्यू झाला आणि राजकिरण यांचा शोध अपूर्णच राहिला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








