इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींच्या लग्नाची गोष्ट, नेहरु कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कसं पार पडलं लग्न?

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाचा फोटो
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

फिरोज गांधी हे आपल्या मुलीसाठी म्हणजेच इंदिरा गांधींसाठी जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती नाहीत, असं जवाहरलाल नेहरु यांचं मत होतं.

फिरोज ना हिंदू होते ना काश्मीरी. मात्र, हा मुद्दा नेहरुंसाठी फार महत्त्वाचा नव्हता. कारण, त्यांच्या स्वत:च्या बहिणी म्हणजेच विजयालक्ष्मी आणि कृष्णा यांचेही पती काश्मीरी नव्हते.

नेहरुंनी आपल्या बहिणींच्या लग्नाला बिलकूल विरोध केलेला नव्हता. मात्र, या दोन्हीही बहिणींचे पती ऑक्सफर्डमधून शिक्षण घेऊन आलेले होते तसेच त्यांचं घराणं उच्चभ्रू आणि समृद्ध असं होतं. विजयालक्ष्मी पंडित यांचे पती रणजीत पंडित हे बॅरिस्टर होते आणि संस्कृतचे उत्तम अभ्यासक होते.

दुसऱ्या बाजूला, फिरोज गांधी हे फारच सर्वसामान्य अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले होते. त्यांच्याकडे ना विद्यापीठाची पदवी होती, ना नोकरी होती, ना नियमित उत्पन्नाचं एखादं साधन होतं.

कॅथरीन फ्रँक यांनी 'इंदिरा: द लाईफ ऑफ इंदिरा नेहरु-गांधी' या इंदिरा गांधींवरील चरित्रात लिहिलंय की, "फिरोज हे जोरजोरात तसेच तोंडावर स्पष्टपणे बोलणारे व्यक्ती होते. तर नेहरु याहून अगदी उलट म्हणजेच खूपच सभ्य, सुसंस्कृत आणि मोजून-मापून बोलणारे व्यक्ती होते."

कॅथरीन यांनी पुढे लिहिलंय की, "इतर वडिलांप्रमाणेच नेहरुंनाही आपल्या मुलीला गमवायचं नव्हतं. इंदिरा गांधींच्या बिघडलेल्या तब्येतीचा मुद्दाही होताच. त्यांच्या पत्नी कमला नेहरु यांनीदेखील मृत्यूशय्येवर असताना इंदिरा आणि फिरोज यांच्या लग्नाबाबत असलेली तीव्र साशंकता व्यक्त केली होती. कमला यांच्या मते फिरोज स्थिर आणि विश्वासार्ह व्यक्ती नव्हते. "

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नेहरुंच्या बहिणींचाही होता आक्षेप

जेव्हा इंदिरा गांधींनी फिरोज यांच्यासमवेत लग्न करण्याची इच्छा आपल्या आत्याकडे म्हणजेच कृष्णा यांच्याकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी इंदिरा यांना थोडी प्रतीक्षा करण्याचा तसेच आणखी काही मुलांना भेटण्याचाही सल्ला दिला.

कृष्णा हठीसिंग आपल्या 'वुई नेहरुज्' या पुस्तकात लिहितात की, "यावर इंदिरानं ताडकन विचारलं की, असं का? तुम्ही तर अवघ्या दहा दिवसांतच राजा भाई यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी तर फिरोजला कित्येक वर्षांपासून ओळखते. मी आणखी प्रतीक्षा का करावी आणि इतर मुलांना का भेटावं?"

जेव्हा इंदिरा यांनी त्यांच्या दुसऱ्या आत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांचंही मत या लग्नाबाबत अनुकूल नव्हतं.

जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला अनुकूल नव्हते.

फोटो स्रोत, Keystone/Hulton Archive/Getty Images)

फोटो कॅप्शन, जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला अनुकूल नव्हते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींच्या चरित्रात लिहिलंय की, "नान यांनी (विजयालक्ष्मी) कठोर शब्दात स्पष्टपणे त्यांना सल्ला दिला की, तू फिरोजसोबत प्रेमसंबंध ठेव मात्र लग्न करण्याचा विचार अजिबात करु नकोस. इंदिरा यांना या सल्ल्याचं प्रचंड वाईट वाटलं. त्यांना हा आपला आणि फिरोज यांचा अपमान वाटला."

एकीकडे नेहरु कुटुंबामध्ये इंदिरा यांच्या लग्नाबाबतच्या या सगळ्या चर्चा सुरु होत्या. त्याच दरम्यान, अलाहाबादमधील 'द लीडर' या वृत्तपत्राने आपल्या पहिल्याच पानावर "मिस इंदिरा नेहरुज् एंगजमेंट" अशी हेडलाईन छापली. जेव्हा 'द लीडर' वृत्तपत्राने ही बातमी ब्रेक केली तेव्हा नेहरु कोलकात्यात (तेव्हाचं कलकत्ता) होते. परत आल्यानंतर त्यांनी एक वक्तव्य जाहीर केलं. हे वक्तव्य 'बॉम्बे क्रॉनिकल' आणि इतर काही वृत्तपत्रांनी छापलं.

नेहरु यांनी या वक्तव्यात म्हटलं होतं की, "इंदिरा आणि फिरोज यांच्या लग्नाबाबत छापून आलेल्या बातम्यांना मी दुजोरा देतो. लग्नाबाबत आई-वडिल फक्त सल्ला देऊ शकतात मात्र, अंतिम निर्णय हा त्या मुला-मुलीलाच घ्यायचा असतो, असं माझं मत आहे. जेव्हा मला इंदिरा आणि फिरोज यांच्या या निर्णयाबाबत माहिती झालं तेव्हा मी त्यांचा हा निर्णय मनापासून स्वीकारला. महात्मा गांधींनीही त्या दोघांना आशीर्वाद दिला आहे. फिरोज गांधी एक असे पारसी तरुण आहेत, ज्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबाशी सख्य राहिलेलं आहे."

रामनवमी दिवशी झालं लग्न

महात्मा गांधींनी आपल्या 'हरिजन' या वृत्तपत्रामध्ये लेख लिहून या विवाहाला आपलं समर्थन दिलं होतं. मात्र, गांधींनी पाठिंबा दिलेला असतानाही या लग्नाबाबत काही लोकांचा राग कमी झाला नाही.

या लग्नामुळे भारतातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला गालबोट लागत असल्याचं काहींना वाटत होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा आई-वडिलांनी ठरवलेला विवाह नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघेही आपापल्या धर्माच्या सीमा ओलांडून हे लग्न करत होते.

अलाहाबादमधील आनंद भवनामध्ये या लग्नाच्या निषेधार्थ अनेकांनी तार केलेली होती. काहींनी अभिनंदनाचीही तार केली होती. तत्कालीन माध्यमांमध्येही या लग्नावर बरीच उलटसुलट चर्चा झाली.

महात्मा गांधींनी इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला पाठिंबा दिला होता.

फोटो स्रोत, Universal History Archive/ Universal Images Group via Getty Images)

फोटो कॅप्शन, महात्मा गांधींनी इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाला पाठिंबा दिला होता.

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर इंदिरा गांधी यांनी अर्नोल्ड मिकालिस यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की, "संपूर्ण भारत आमच्या लग्नाविरोधात होता, असंच काहीसं वाटत होतं."

पंडितांच्या सल्लामसलतीनंतर या लग्नासाठी 26 मार्च हा दिवस निवडण्यात आला. हा दिवस शुभ मानला जात होता, कारण त्या दिवशी रामनवमी होती.

कृष्णा हठीसिंग लिहितात की, "बरोबर नऊ वाजता वधू आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने आपल्या वडिलांनी तुरुंगात स्वहस्ते कातलेल्या सूतापासून विणलेली साडी परिधान केलेली होती. या साडीच्या किनारी सिल्व्हर कलरची एम्ब्रॉयडरी केली होती. इंदिराने ताज्या फुलांचा हार आणि काचेच्या बांगड्या घातल्या होत्या. इंदिरा एवढी सुंदर याआधी कधीच दिसली नव्हती. तिचा चेहरा ग्रीक नाण्यावरील एखाद्या सुंदर आकृतीसारखा दिसत होता."

फिरोज यांनी खादीचा परंपरागत शुभ्र असा शेरवानी आणि चुडीदार पायजमा परिधान केलेला होता.

हिंदू परंपरेनुसार लग्न

हा समारंभ आनंद भवनच्या बाहेरील बागेत एका मंडपात आयोजित करण्यात आला होता. इंदिरा आणि फिरोज हे दोघेही एका व्यासपीठावर बसले होते, त्यांच्यासमोर हवन पेटवण्यात आला होता. नेहरूंच्या शेजारी त्यांच्या दिवंगत पत्नी कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ एक रिकामी जागा ठेवण्यात आली होती.

आमंत्रित करण्यात आलेले लोक व्हरांड्यात खुर्च्या आणि गालिच्यांवर बसले होते. आनंद भवनाबाहेर हजारो अनिमंत्रित लोकांचा जमाव हे दृश्य पाहत होता.

या जमावामध्ये अमेरिकन फॅशन मॅगझीनचे फोटोग्राफर नॉरवन हेन देखील सामील होते. ते त्या काळातील स्थानिक इविंग क्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत होते. ते आपल्या 8 एमएम या मूव्ही कॅमेरामधून हे दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करत होते.

फिरोज गांधी यांच्याशी लग्न करण्याबाबत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, हा विवाह कायदेशीर की बेकायदेशीर याने मला काही फरक पडत नाही.

फोटो स्रोत, Keystone/Hulton Archive/Getty Images

फोटो कॅप्शन, फिरोज गांधी यांच्याशी लग्न करण्याबाबत इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, हा विवाह कायदेशीर की बेकायदेशीर याने मला काही फरक पडत नाही.

कॅथरीन फ्रँक लिहितात की, "इंदिरा आणि फिरोज यांचा हा विवाह ना परंपरागत होता, ना तो कायदेशीर होता. त्या काळी असलेल्या ब्रिटीश कायद्यानुसार, दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी जर आपल्या धर्माचा त्याग केला तरच ते विवाहबद्ध होऊ शकायचे. सात वर्षांपूर्वी इंदिराजींचे चुलत भाऊ बी. के. नेहरू यांनी फोरी या हंगेरियन ज्यू मुलीशी अशाच पद्धतीने लग्न केलं होतं."

बी. के. नेहरु यांच्या विवाहावेळी देखील महात्मा गांधी यांचा सल्ला घेण्यात आला होता. त्यांच्या सल्ल्यानंतरच दोघांचा विवाह हिंदू पद्धतीने करण्यात आला होता. मात्र, त्या लग्नाला ना हिंदू कायद्यानुसार मान्यता मिळाली, ना ब्रिटीश कायद्यानुसार!

लग्नाच्या कित्येक वर्षांनंतर जेव्हा इंदिरा गांधी यांच्या आणखी एक चरित्रकार असलेल्या उमा वासुदेव यांनी याबाबत त्यांना प्रश्न केला तेव्हा इंदिरा गांधींनी उत्तर दिलं होतं की, "हे लग्न कायदेशीर होतं की बेकायदेशीर, या गोष्टीनं मला काडीचाही फरक पडत नाही."

फिरोज यांनी घातला पवित्र पारसी धागा

हा संपूर्ण विवाहसोहळा दोन तास चालला. या दरम्यान पंडित सतत चांदीच्या चमच्यातून हवनमध्ये देशी तूप घालत होते. सर्वांत आधी, इंदिरा गांधी व्हरांड्यात जवाहरलाल नेहरूंच्या शेजारी बसल्या. मग त्या दुसऱ्या बाजूला जाऊन फिरोज गांधींच्या शेजारी बसल्या.

फिरोज यांनी इंदिरा गांधी यांना काही कपडे भेट म्हणून दिले. इंदिरा गांधींनी स्वतःच्या हाताने फिरोज यांना काहीतरी खाऊ घातलं.

इंदिरा गांधी यांच्या भाची नयनतारा सहगल यांनी आपल्या 'प्रीजन अँड चॉकलेट केक' पुस्तकात लिहिलंय की, "यानंतर त्या दोघांच्या मनगटावर फुले बांधण्यात आली. पंडिताने तूप टाकून हवनमधील ज्वाला आणखी प्रदीप्त केली. त्यानंतर, इंदिरा आणि फिरोज यांनी उभं राहून आगीच्या भोवतीने सात फेऱ्या मारुन सप्तपदी पूर्ण केली. त्यानंतर, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्यावर फुलाच्या पाकळ्यांनी वर्षाव केला."

फिरोज गांधींनी इंदिरा गांधींना काही कपडे भेट दिले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फिरोज गांधींनी इंदिरा गांधींना काही कपडे भेट दिले

बर्टिल फॉक 'फिरोज द फॉरगॉटन गांधी' या फिरोज गांधीवरील चरित्रात लिहितात की, "जेव्हा फिरोज आपल्या लग्नाचे कपडे परिधान करत होते, तेव्हा रत्तीमाई गांधी यांनी त्यांना खास पद्धतीनं म्हटलं की, त्यांनी आपल्या शेरवानीच्या खाली पारसी पवित्र धागा परिधान करावा. त्या दिवशी फिरोज हे इंदिरा यांच्यापेक्षाही अधिक उजळ दिसत होते."

या समारंभामध्ये पारसी समुदायाचेही अनेक लोक सामील झाले होते. आनंद भवनाबाहेर निदर्शने करून या लग्नाला विरोध करू इच्छिणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. पण जवाहरलाल नेहरूंनी रत्तीमाई गांधींना अशी विनंती केली होती, की असं न करण्यासाठी त्यांनी या लोकांना मनवावं.

या लग्नसोहळ्यात सामील होणाऱ्यांमध्ये 'नॅशनल हेराल्ड' वृत्तपत्राचे संपादक रामारावदेखील सामील होते. ते आपल्या हातामध्ये पेन्सील आणि नोटबूक घेऊनच या लग्नात उपस्थित होते जेणेकरुन ते या लग्नाचं रिपोर्टींग देखील करु शकतील.

मोठमोठे काँग्रेस नेतेही होते उपस्थित

त्या सायंकाळी आनंद भवनमधील गार्डनमध्ये देण्यात आलेल्या मेजवानीमध्ये रोटी आणि हिरव्या पालेभाज्या असलेलं साधं जेवण देण्यात आलं होतं. या विवाह सोहळ्यात उपस्थित असणाऱ्यांमध्ये सरोजिनी नायडू, त्यांच्या कन्या पद्मजा नायडू आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक मेरी क्यूरी यांच्या कन्या ईव्ह क्यूरी यांचा समावेश होता.

पुपुल जयकर लिहितात की, "सामान्यत: भारतीय विवाहांमध्ये आपल्या घरातून निघताना मुली रडू लागतात. मात्र, इंदिरा गांधी बिलकूल रडत नव्हत्या. जवाहरलाल नेहरु यांच्या डोळे मात्र पाणावलेले होते. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते. महात्मा गांधी देखील या लग्नाला उपस्थित राहू शकलेले नव्हते; कारण ते 26 मार्च रोजी ब्रिटनहून आलेल्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झालेले होते. लग्नादिवशी क्रिप्स तिथे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, नंतर ते या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास अलाहाबादला गेले होते."

इंदिरा गांधींच्या लग्नाला महात्मा गांधी उपस्थित राहू शकले नव्हते.

फोटो स्रोत, Photo by Central Press/Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधींच्या लग्नाला महात्मा गांधी उपस्थित राहू शकले नव्हते.

काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. कारण, त्यांची ट्रेन उशीरा पोहोचली होती. मात्र, ते सायंकाळी देण्यात आलेल्या मेजवानीमध्ये सामील झाले.

इंदिरा गांधींच्या लग्नाच्या दिवशीदेखील राजकीय घडामोडी थांबवण्यात आलेल्या नव्हत्या. मेजवानीच्या अगदी आधीच आनंद भवनच्या ड्रॉइंग रुममध्ये क्रिप्स मिशनवर आपली भूमिका निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती.

दोन दिवसांनंतर जवाहरलाल नेहरु यांच्यासहित काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते म्हणजेच डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी, भुलाभाई देसाई आणि सय्यम महमूद हे अलाहाबादहून दिल्लीसाठी रवाना झाले होते.

काश्मीरमध्ये हनीमून

लग्नानंतर लगेचच इंदिरा आणि फिरोज हे दोघेही 5 फोर्ट रोडमध्ये भाड्याच्या एका घरात रहायला गेले. त्यावेळी फिरोज गांधी यांच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. मात्र, ते वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून काही पैसे नक्कीच कमवायचे.

ते विमा पॉलिसींचीही विक्री करायचे. यातून त्यांना थोडे अतिरिक्त पैसे प्राप्त व्हायचे. विवाहाच्या दोन दिवसांनंतर फिरोज यांच्या आई रत्तीमाई गांधी यांनी जॉर्ज टाऊनमधील आपल्या घरामध्ये एका हाय-टी समारंभाचं आयोजन केलं होतं. या समारंभामध्ये अलाहाबादमधील उच्चभ्रू लोक सहभागी झाले होते.

इंदिरा यांचा फिरोज गांधी यांच्याशी 26 मार्च 1942 ला अलाहाबादमध्ये विवाह झाला.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, इंदिरा यांचा फिरोज गांधी यांच्याशी 26 मार्च 1942 ला अलाहाबादमध्ये विवाह झाला.

दोन महिन्यांनंतर इंदिरा आणि फिरोज आपल्या हनीमूनसाठी काश्मीरला रवाना झाले.

तिथून इंदिरा गांधींनी नेहरुंना तार पाठवली.

"आम्ही तुम्हाला इथली थंड हवा पाठवू शकलो असतो, तर बरं झालं असतं...."

यावर नेहरुंची प्रत्युत्तर देणारी तार तातडीनं आली,

"मात्र, तुझ्याकडे तिकडं आंबे नाहीयेत!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)