एक छोटीशी युक्ती वाढवेल तुमची विचार करण्याची शक्ती

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, बीबीसी वर्कलाइफ

आपली विचार प्रक्रिया सुधारावी, आपण आणखी योग्य पद्धतीने निर्णय घ्यावेत, असं आपल्याला वाटत असतं पण विचार करू लागलो की असंख्य गोष्टी मनात येतात त्यामुळे विचार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट होत जाते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर तुम्ही हा लेख वाचा. अतिशय छोट्या ट्रिक्स वापरून तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकते आणि त्याचा तुम्हाला करिअर आणि जीवनात फायदा होऊ शकतो.

मी मानसशास्त्रविषयक क्षेत्रातला लेखक आहे. त्यामुळे, विचार प्रक्रिया कशी सुधारावी या विषयावर मला आतापर्यंत शेकडो अशा टिप्स माझ्या वाचनात आल्या आहेत ज्यांना ठोस वैज्ञानिक आधार आहे.

पण काहीच युक्त्या प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या इलेइजमसारख्या प्रभावी ठरल्या असतील.

इलेइजम म्हणजे काय, तर ही एक अशी पद्धत आहे ज्यात आपण स्वतःबद्दल बोलताना तृतीयपुरुषी सर्वनामात बोलायचं.

म्हणजे मी केलं असं म्हणण्याऐवजी तुमचं जे नाव आहे ते तुम्ही स्वतःच घ्यायचं, आणि त्याने किंवा तिने अमूक गोष्ट केली असं सांगायचं.

उदाहरणार्थ. तुमचं नाव मनिष आहे. आणि मित्राला तुम्हाला सांगायचंय की मी जेवत आहे तर त्याऐवजी मनिष जेवण करतोय असं सांगायचं.

या गोष्टीचा वापर बहुतांश वेळा राजकारण्यांकडून केला जातो. यामुळे ते त्यांच्या शब्दाला वस्तुनिष्ठता देण्याचा प्रयत्न करत असतात. गॅलिक युद्धाच्या संदर्भात ज्युलियस सिजरने लिहिताना जे लिहिलं ते इलेइजमचं उदाहरण म्हणून अनेक वेळा समजावून सांगण्यासाठी वापरलं होतं. ज्युलियस सिजर स्वतःच लिहितो की,

"लोकांवर झालेल्या अत्याचाराचा 'सिजर'ने बदला घेतला."

लोकांवर झालेल्या अत्याचाराचा 'मी' बदला घेतला, असं तो म्हणत नाही, तर सिजरने बदला घेतला असं तो सांगतो.

भाषाशास्त्रातील एका छोटाशा बदलामुळे वाचकावर एक वेगळा परिणाम होतो. वाचकासाठी हे वाक्य सिजरचं भाष्य ठरत नाही तर एक ऐतिहासिक वास्तव ठरतं.

या काळात जर कुणी असं बोललं तर आपल्याला ते बावळटपणाचं किंवा स्वतःचीच टिमकी वाजवण्यासारखं वाटेल. आणि त्यामुळे आपण काही प्रसिद्ध लोक जर असं बोलत असतील तर त्यांची थट्टा देखील करतो.

असं असलं तरी हे सांगावं वाटतं की इलेइजमचे म्हणजे 'मी' किंवा 'माझे' ऐवजी स्वतःच्याच नावाचा उल्लेख करण्याच्या पद्धतीचे विचार करण्याची प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत, असं अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून समोर आलं आहे.

जर समजा तुम्ही कठीण निर्णय घेत आहात, तर स्वतःबद्दल तृतीयपुरुषी सर्वनामात बोलल्याने किंवा तसा विचार केल्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांकडे निरपेक्षपणे पाहू शकतात.

नाहीतर तुमचे विचार हे भरकटत जाण्याचा धोका असतो. जर तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचा असेल किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर हवे तर इलेइजममुळे ती शक्यता वाढते.

चांगला निर्णय घेण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत?

इलेइजमचे फायदे समजून घ्यायचे असतील तर हे समजून घ्यायला हवं की वैज्ञानिक लोक 'शहाणपण' कसं मोजतात.

शहाणपणा म्हणजे काय यावर इगोर ग्रॉसमन यांनी कॅनडातील वॉटरलू विद्यापीठात शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला आहे.

त्यांनी आधी विविध तत्त्वज्ञांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी हे पाहिलं की कोणत्या गोष्टींमुळे व्यक्तीकडे शहाणपण येतं. या अनेक गोष्टींच्या समुहाला त्यांनी 'मेटाकॉग्निटिव्ह कंपोनंट्स' असं नाव दिलं.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला हुशार, शहाणी, बुद्धिवान म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये जे गुण असतील ते असणं त्याचबरोबर विनम्रता, इतरांच्या दृष्टिकोनाची दखल घेणं आणि वाटाघाटीसाठी तयार असणं हे अचूक निर्णय घेण्यासाठी किंवा उत्तम निर्णय घेण्यासाठी आवश्यक गुण आहेत असं त्यांच्या लक्षात आलं.

एका संशोधनावेळी ग्रॉसमन यांनी त्या संशोधनातील सहभागी लोकांसोबत एक प्रयोग केला.

त्यांनी त्यांना म्हटलं की तुमच्या मनात असलेलं द्वंद किंवा समस्या घ्या. असं समजा की तुम्ही वृत्तपत्रातले स्तंभलेखक किंवा स्तंभलेखिका आहात, जे लोकांच्या प्रश्नाला उत्तरं देतात. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना मोठ्याने स्वतःशीच बोला.

ग्रॉसमन यांच्या असं लक्षात आलं की त्यांची ही चाचणी अनेक बुद्ध्यांक चाचण्यापेक्षा काही गोष्टीत उजवी आहे. ते म्हणजे आयुष्याबद्दल समाधानी असण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि सामाजिक नातेसंबंधांबाबत ग्रॉसमन यांची चाचणी बुद्ध्यांक चाचण्यांपेक्षा सरस ठरली.

म्हणजेच तर्कशुद्ध विचारांबाबत काहीतरी नवीन गोष्ट या संशोधनात सापडल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सोलोमॉन्स पॅराडॉक्स म्हणजे काय?

ग्रॉसमन यांच्या नंतरच्या संशोधनात ही गोष्ट समोर आली की शहाणपण हे संदर्भावर अवलंबून असतं.

त्या-त्या संदर्भानुसार लोक तर्कशुद्ध पद्धतीने विचार करतात आणि त्यावरून त्यांच्यातील शहाणपण दिसत असतं. त्यांनी प्रयोग केला की त्यांच्यात प्रयोगात सहभागी असलेल्या लोकांना जास्तीत जास्त तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याबाबत त्यांनी गुण दिले.

त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा एखादा प्रश्न त्यांच्यासमोर आहे तो इतर कुणाचा आहे असं म्हणून दिला तर त्यावर ते अधिक चांगल्या रितीने विचार करू शकत होते. स्वतःच्या प्रश्नांवर किंवा स्वतःच्या मनातील द्वंदाचे उत्तर दिल्यास ते निरपेक्ष नव्हते. त्यामुळे त्या चाचण्यांमध्ये त्यांना कमी गुण मिळाले.

ग्रॉसमन यांनी या प्रकाराला सोलोमॉन्स पॅराडॉक्स हे नाव दिले. प्राचीन काळात सोलोमॉन नावाचा एक राजा होता. तो इतरांना अतिशय चांगला सल्ला देत असे. पण स्वतःच्या आयुष्यात मात्र तो वेंधळेपणाने निर्णय घेत होता, त्यामुळे त्याच्या राज्यात अराजक माजले आणि ते लयास पावले. थोडक्यात सोलोमॉन्स पॅरॉडॉक्स म्हणजे इतरा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण.

जेव्हा आपण आपल्यासंबंधीतील समस्याचा विचार करतो तेव्हा, आपली भावनिक गुंतणूक अधिक असते. त्यामुळे आपल्या डोक्यात विचारांचे ढग दाटून येतात आणि आपण आपली समस्या काय आहे याचा वस्तुनिष्ठ विचार करू शकत नाहीत.

याचं एक उदाहरण आपण पाहू. समजा मला जर माझ्या सहकाऱ्याने निगेटिव्ह फीडबॅक दिला तर मी त्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची शक्यता अधिक आहे. मी लगेच सांगायचा प्रयत्न करेन की मीच कसा बरोबर आहे. त्यामुळे सहकाऱ्याला नेमकं काय सांगायचं आहे त्याकडे लक्षच जाणार नाही. कदाचित जर मी ही गोष्ट ऐकून घेतली तर भविष्यात चुका कमी होऊ शकतात.

शहाणं कसं होता येईल?

इलेइजममुळे सोलोमॉन्स पॅराडॉक्स संपू शकतो का? जर आपण तृतीयपुरुषी सर्वनामात विचार केला तर त्या घटनांबाबत किंवा त्या प्रश्नाचं स्वरूप बदलू शकतं. अंतर्मनाच्या स्तरावर याचा बदल जाणवू शकतो. त्या प्रश्नाबाबत निसंगता येऊन आपण मोठा विचार करू लागतो. असं नाही केलं तर स्वतःच्याच विचारांमध्ये गुरफुटून राहण्याचा धोका अधिक आहे.

आणि अगदी हीच गोष्ट ग्रॉसमन यांनी शोधून काढली आहे. त्यांनी मिशिगन विद्यापीठात इथन क्रॉस यांच्यासोबत एक संशोधन केले. त्यात त्यांनी असं दाखवून दिलं की इलेइजमचा वापर विचार करण्यासाठी किंवा स्वतःच्या प्रश्नांबाबत बोलण्यास केला तर आपण ते अधिक विनम्रतेनी मांडतो. इतरांच्या दृष्टिकोनाबाबत असलेला आदर, तडजोड करण्याची तयारी असेल तर आणि एकूणच चांगला, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

नवीन शोधानुसार असं समजलं आहे की इलेइजमच्या सातत्यपूर्ण वापरामुळे आपल्या विचार प्रक्रियेला अनेक फायदे होऊ शकतात.

अॅबगेल श्लोएर, अॅना डॉर्फमन आणि त्यांचे काही इतर सहकारी यांना सोबत घेत ग्रॉसमन यांनी एक प्रयोग केला. ज्यात त्यांनी सहभागी लोकांना सांगितले की एका महिन्यासाठी तुम्ही तुम्हाला काय वाटतं याचे अनुभव डायरीत लिहा.

सहभागी लोकांपैकी अर्ध्या जणांना त्यांनी सांगितलं की तृतीयपुरुषी सर्वनामात स्वतःबद्दल लिहा. म्हणजे इलेइजमचा वापर करून. आणि निम्म्या जणांना सांगितलं नेहमी सारखं लिहा.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच संशोधकांना या गोष्टी सापडल्या. ज्या सहभागी लोकांनी इलेइजमचा वापर केला त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता महिन्याभरात वाढली होती.

आपल्या प्रश्नांना संदर्भाची जोड देऊन, ते वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करून आपण इलेइजमचा वापर करायला हवा. त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे ताणतणाव आहेत त्यांना आपण अधिक संतुलित प्रक्रिया देऊ शकतो.

ज्यांनी इलेइजमचा वापर करून डायरी लिहिली त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ही लोकांनी सकारात्मक भावना जपल्याचे सांगतिले. दुःखाच्या, निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी त्यांनी ही आपल्या उत्कर्षाची संधी आहे असं समजून त्याकडे पाहिलं.

या संशोधनाच्या आधारे मी हे सांगतो की छोटा असो किंवा मोठा निर्णय असो मी इलेइजमचा वापर करतो. मग मला कामात काही अडचणी येऊ द्या अथवा मित्रांशी कुरबुरी होऊ द्या अथवा कुटुंबात काही तणावाची स्थिती येऊ द्या मी इलेइजमचा वापर करतो. काही क्षणानंतर मला असं जाणवतं की स्वतःच्यात समस्यांकडे तिऱ्हाईतपणे पाहिल्यानंतर वैचारिक स्पष्टता अधिक येते, नकारात्मक विचारांचे ढग दूर होऊ लागतात आणि मी चांगला निर्णय घेऊ शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)