क्वाएट क्विटिंग : नोकरीत वैतागला असाल तर हे वाचा

    • Author, पेरिशा कुधैल, बीबीसी न्यूज
    • Role, जान्हवी मुळे, बीबीसी मराठी

कल्पना करा की तुम्ही अशा ठिकाणी नोकरी करता आहात, जिथे तुम्ही रोज फक्त तुमच्या ठरलेल्या कामाएवढंच काम केलं तरी पुरेसं मानलं जातं? त्यापलीकडे ओव्हरटाईम करण्याची किंवा वरिष्ठांना खूश करण्यासाठी जास्तीचं काम करण्याची गरज नाही?

हा कल्पनाविलास आहे, असं तुमच्यापैकी बहुतेकांना वाटेल. पण कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत असे बदल झालेले दिसत आहेत.

बॉस काय म्हणेल किंवा प्रमोशनचं काय होईल याचा विचार न करता काहीजण जेवढ्यास तेवढं काम करण्याचं खुलेपणानं समर्थन करू लागले आहेत.

अशा वागण्यासाठी सोशल मीडियावर क्वाएट क्विटिंग (Quiet Quitting) काम कमी करणं असा नवा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. भारतातही तो चर्चेत आला आहे.

पण क्वाएट क्विटिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात?

'क्वाएट क्विटिंग' म्हणजे काय?

क्वाएट क्विटिंगचा शब्दशः अर्थ न सांगता काम सोडून देणं असा होतो. पण नोकरी सोडण्याशी याचा काहीही संबंध नाही, तर अपेक्षेपेक्षा जास्त काम करणं सोडून देणं असा अर्थ इथे अभिप्रेत आहे.

म्हणजे तुम्ही कामावर तर रोज जाल, पण ज्या पदावर आहात, त्या पदाच्या किंवा नोकरीवर घेताना तुम्हाला आखून दिलेल्या कामाच्या पलीकडे कोणतंही काम करणार नाहीत.

कुठली नवी जबाबदारी न उचलणं, जास्तीचं काम न करणं, कामाची ठराविक वेळ संपल्यावर कामासंबंधी ईमेल किंवा मेसेजेस न तपासणं अशा गोष्टींचा यात समावेश केला जातो.

क्वाएट क्विटिंग हा शब्द एका अमेरिकन टिकटॉक इन्फ्लुएन्सरनं पहिल्यांदा वापरला आणि तेव्हापासून तो लोकप्रिय झाला. या टिकटॉक इन्फ्लुएन्सरचं नाव झाएद खान असं असून तो विशीतला इंजिनियर असल्याचं अमेरिकन माध्यमांतले रिपोर्ट्स सांगतात.

झाएदचा एक व्हीडिओ ऑगस्ट 2020 मध्ये व्हायरल झाला होता ज्यात क्वाएट क्विटिंगची संकल्पना मांडताना झाएद सांगतो की, "तुमचं काम हेच तुमचं आयुष्य नाही."

काहींच्या मते, "झाएदनं हा मुद्दा मांडण्याआधीही लोक हे करत आले आहेत. कामावर नाराज असलेले लोक हळूहळू कामातून लक्ष कमी करतात. पण पगार न चुकता घेतात, असं याआधीही घडत आलं आहे आणि त्यासाठी 'कोस्टिंग' सारखे वेगवेगळे शब्दही वेळोवेळी प्रचलित झाले होते.

चीनमध्ये एप्रिल 2021 मध्ये एक ऑनलाईन चळवळ सुरू झाली होती, ज्यात लोकांनी कामाच्या लांबलेल्या वेळांचा विरोध केला होता. चीनमध्ये तेव्हा #tangping हा हॅशटॅग व्हायरल झाला होता, ज्यावर नंतर बंदी घालण्यात आली. या हॅशटॅगचा अर्थ काहीसा 'आडवे पडून राहा' असा होतो.

'क्वाएट क्विटिंग'मागची कारणं काय आहेत?

कोव्हिडची जागतिक साथ आणि लॉकडाऊनमुळे कामाच्या स्वरूपात एकूणच मोठे बदल झाले आहेत. कामाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही बदलतो आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना आपण घरूनही काम करू शकतो किंवा काहीवेळा सवडीनं काम करू शकतो, याची जाणीव झाली आहे.

पण ज्यांना अशा कामात सवलती मिळत नाहीत किंवा ज्यांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही असं वाटतं, अशा कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जास्त तास काम केल्यावर साधं कौतुकही होत नाही, याचा त्यातल्या अनेकांना कंटाळा आला आहे.

अनेकांना कामापलीकडे तणावरहीत, आरामाचं, आरोग्यदायी आयुष्य जगायचं आहे. त्यांच्यासाठी काम महत्त्वाचं आहे, पण त्यांच्या आयुष्यात कामाइतकंच कुटुंब, मित्रमंडळी, छंद, स्वतःसाठीचा वेळ काढणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे.

सध्या विशीत असलेले अनेक तरुण-तरुणी म्हणजे 'जेन झी' नावानं ओळखल्या जाणाऱ्या पिढीचे लोक याविषयी सजग असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

या पिढीला 'बर्नआऊट' म्हणजे कामाच्या ओझ्याखाली दडपून जाणं पसंत नाही. काम आणि खासगी आयुष्यातला समतोल साधण्यावर त्यांचा भर आहे.

त्यातूनच क्वाएट क्विटिंगसारखी कल्पना लोकप्रिय का झाली, हे दिसून येतं. या चळवळीच्या केंद्रस्थानी असलेलं तत्त्व आहे - जेवढा पगार, तेवढं काम (acting your age)

मानसिक आरोग्य आणि पगार हे प्रमुख घटक

"इथे प्रश्न फक्त पैशाचा नाही, तर मानसिक स्वास्थ्याचाही आहे," मुंबईत एका फायनान्स कंपनीत मार्केटिंग विभागात काम करणारी अनिता तिचा अनुभव सांगते. (नाव बदललं आहे.) "आपण कुणासाठी, कशासाठी काम करतो आहोत, त्यातून पगारापलीकडे समाधान मिळतं का, हेही महत्त्वाचं आहे."

ती पुढे म्हणते, "रोज 10-12 तास काम, त्यानंतर प्रवास करून उशीरा घरी जायचं, घरीही काम करायचं असा माझा दिनक्रम होता. घरात मदतनीस आहेत आणि नवराही मदत करतो. पण हे सगळं मॅनेज करणं थकवणारं आणि मानसिकदृष्ट्या खूप तणावाचं होतं. यावर्षी मार्चमध्ये अशी अवस्था होती, की एक दिवस मी कोलमडून पडले. तेव्हापासून कामाइतकंच स्वतःकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे, याची जाणीव झाली."

"मी सुट्टी मागितली पण फार दिवस सुट्टी देणं शक्य नसल्याचं माझ्या मॅनेजरनं स्पष्ट केलं. दुसरीकडे कुठे नोकरी शोधली, तरी याच सगळ्याला सामोरं जावं लागलं असतं. मग विचार केला, नोकरी सोडणं शक्य नाही, पण कामाच्या तासांवर आपण मर्यादा आणू शकतो."

तेव्हापासून अनितानं आठ तासांच्या वर ऑफिसमध्ये थांबायचं नाही आणि घरी पोहोचल्यावर कामाशी निगडीत ईमेल्स पाहायचे नाहीत असं ठरवलं.

"कोव्हिडआधी मला प्रमोशन मिळणार होतं, म्हणून मी अधिकच्या जबाबदाऱ्या घेऊ लागले. पण माझ्या प्रमोशन किंवा पगारवाढीविषयी अजून काहीच निर्णय झालेला नाही. मग मी जास्तीचं काम का करावं?" असा प्रश्न ती विचारते.

अखेर मॅनेजरला तिची बाजू पटली. सध्या पगार वाढवणं शक्य नसलं, तरी कामाचा भार थोडा हलका करण्याचा, अतिरिक्त तास कामाची सक्ती न करण्याचा आणि घरून कामासाठी परवानगी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

"आमच्या कंपनीत मानसिक आरोग्याविषयी जागरुकता असल्यानं त्यांनी माझी बाजू समजून घेतली."

पण अनिताला मिळाला तसा पाठिंबा सगळ्यांनाच मिळतो असं नाही. त्यामुळे अनेकजण शेवटी नोकरी सोडतानाही दिसत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, अनेकदा कर्मचाऱ्यांकडे दुसरी कौशल्यं नसतात आणि नोकरी सोडली तर लगेच दुसरी मिळेल याची खात्री नसते. तसंच नोकरीतून मिळणाऱ्या इन्शुरन्स, पेंशन अशा गोष्टींची सुरक्षितता त्यांना हवी असते. त्यामुळे नोकरी सोडण्याचा पर्याय त्यांना परवडणारा नसतो.

"मानसिक आरोग्याविषयी सजगता वाढू लागली असल्यानं आता लोक काम आणि वैयक्तिक आयुष्यातील सीमेविषयी जागरूक झाले आहेत. 24 तास कामाचा विचार करण्याऐवजी ते आपला जास्तीत जास्त वेळ इतर अर्थपूर्ण गोष्टींमध्ये घालवू इच्छितात, ज्यातून मानसिक समाधान मिळेल." असं निरीक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे सहप्राध्यापक अँथनी कोल्ट्झ मांडतात.

भारतात क्वाएट क्विटिंगचं प्रमाण किती आहे?

नेमके किती लोक 'जेवढ्यास तेवढं' काम करतायत, याविषयी निश्चित सांगता येणार नाही. पण किती लोकांना असं करावंसं वाटतं, याचा अंदाज काढता येऊ शकतो.

लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्सनं 2020 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांपैकी दर पाचपैकी दोनजण ताण-तणाव आणि चिंतेनं ग्रासलेले आहेत.

डेलॉईट या संस्थेच्या सर्व्हेनुसार भारतात 80 टक्के कामगारांनी गेल्या वर्षभरात मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या जाणवल्याचं मान्य केलं आहे, ज्याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवरही होतो.

गॅलप या विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार कामगारांच्या कल्याणाच्या बाबतीत (वेलबिईंग) भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाची आणि युरोपचीही रँकिंगमध्ये घसरण झाली आहे.

गॅलपचच्या वर्कप्लेस मॅनेजमेंट अँड वेलबिईंग विभागाचे एक मुख्य वैज्ञानिक जिम हार्टर सांगतात, "एरवी तरुण कामगार कामामध्ये जास्त रस घेताना दिसतात, पण आता त्यात घट होते आहे."

कोव्हिड-19 नंतर आता कामातून समाधान मिळतंय का याविषयी युवा कामगार जास्त जागरूक झाल्याचं दिसत आहे, असंही ते सांगतात.

महागाईमुळे प्रत्यक्ष हातात उरणारे पैसे कमी होत चालले आहेत, याकडेही जिम हार्टर लक्ष वेधतात. त्यामुळे एकदम काम सोडण्याऐवजी आता अतिरीक्त काम, विनापगारी ओव्हरटाईम विरोधातलं बंड म्हणून क्वाएट क्विटिंग ही कल्पना पुढे आली आहे, असं ते सांगतात.

पण ज्यांना सर्वांत जास्त बर्नआऊट जाणवतो अशा लोकांना क्वाएट क्विटिंगही परवडणारं नाही. कारण नोकरी जाईल, हा धोका ते पत्करू शकत नाहीत.

गॅलपनं अमेरिकेत 2021 साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तिथे नोकरीत 'बर्न आऊट' जाणवणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक आहे.

क्वाएट क्विटिंगनं खरंच फायदा होतो?

क्वाएट क्विटिंग आणि कामाच्या तासांवर नियंत्रण आणण्याच्या मागणीविषयी चर्चा होत असतानाच, सर्वांनाच ते पटलं आहे असंही नाही. हा एक वादाचा विषय आहे.

कामाच्या ठिकामी वर्तणुकीविषयीच्या तज्ज्ञ पॅटी एहसाई यांना वाटतं, की तुम्ही 'जेवढ्यास तेवढं' अशी मानसिकता ठेवली तर करियरमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. त्यांनी आपलं मत मांडण्यासाठी टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हीडियोचीही चर्चा होते आहे.

बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "क्वाएट क्विटिंगमध्ये तुम्ही जेवढं गरजेचं आहे तेवढंच काम करता आणि तेवढ्यावरच समाधानी राहता. पण जे त्यापलीकडे जाऊन काम करतात त्यांना करियरमध्ये पुढे जाण्याची संधी आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता जास्त असते."

करियर कोच आणि एका पॉडकास्टच्या सूत्रसंचालक जोआन मॅलोन सांगतात, "मी कुणालाही कधीही क्वाएट क्विटिंग करण्याचा सल्ला कधीच देणार नाही. पण माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आलेल्या लोकांना मी ते असा विचार का करत आहेत, यामागचं कारण मात्र जरूर विचारते."

त्या पुढे म्हणतात, "प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी क्वाएट क्विटिंग करत असतो. पण असं करणं म्हणजे आता आयुष्यात दुसरं काहीतरी करण्याची वेळ आली आहे, नवं काहीतरी करून पाहण्याची, स्वतःचा नव्यानं शोध घेण्याची गरज आहे, असा अर्थही होऊ शकतो."

नोकरी पुरवणाऱ्या कंपन्यांचं काय मत आहे?

क्वाएट क्विटिंगविषयी चर्चा सुरू झाल्यावर, वेगवेगळी मतं समोर येत आहेत. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करणं, त्यांना कामासाठी प्रेरणा देणं ही कंपनीची जबाबदारी आहे असं काहींना वाटतं. तर काहींच्या मते कामगारांना यातून कामं टाळण्यासाठी नवं निमित्त मिळालं आहे.

नुकतंच भारतातल्या एका सीईओंनी यासंदर्भात दिलेल्या सल्ल्यावर बरीच टीका झाली होती.

बाँबे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक आणि सीईओ शांतनू देशपांडे यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहिली होती. त्यांच्या मते 'नोकरीत नवे असलेल्या व्यक्तींनी करीयरच्या सुरुवातीच्या चार पाच वर्षांमध्य रोज 18 तास काम करायला हवं.'

कामावरून "रोना-धोना" बंद करा असंही शांतनू यांनी म्हटलं होतं, ज्यावर बरीच टीका झाली. अनेकांना ते एक प्रकारे शोषण करणाऱ्या व्यवस्थेचं समर्थन असल्याचं वाटलं आणि अतिरिक्त काम करणाऱ्यांना शांतनू ज्यादा पगार देणार आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला.

त्यानंतर, टीका करणाऱ्या लोकांनी माझ्या कंपनीत येऊन लोकांशी बोलावं, असं शांतनू यांनी स्पष्ट केलं.

बेंगलुरूमध्ये एका आयटी क्षेत्रातील कंपनीत ह्युमन रिसोर्स विभागात काम करणाऱ्या कविता यांना वाटतं की क्वाएट क्विटिंगविषयीच्या चर्चेची मॅनेजर्स आणि बॉसेसनीही दखल घ्यायला हवी.

"अशा कर्मचाऱ्यांना अनुकंपा दाखवण्याची गरज असते. एखादा कर्मचारी क्वाएट क्विटिंग का करत आहे, यामागचं कारण शोधून काढायला हवं आणि त्याच्या मुळाशी काही समस्या असेल तर ती आधी सोडवायचा प्रयत्न करायला हवा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)