व्यक्तिमत्त्व विकास: दडपण न घेता स्वतःमध्ये हसत-खेळत सकारात्मक बदल कसे घडवायचे?

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, प्रतिनिधी, बीबीसी वर्कलाइफ

प्रत्येकाला आपली आयुष्यात प्रगती व्हावे असं वाटतं. नवीन गोष्टी शिकाव्यात, कामातील कामगिरी उंचावी, असं काहीतरी करावं की ज्यामुळे त्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण होईल. किंवा असं देखील वाटतं की आपली तब्येत छान व्हावी.

पण काही ना काही कारणाने हे सर्व करताना अनेक अडथळे आपल्यासमोर येतात. अनेकदा लोक असंही म्हणतात की खूप खस्ता खाल्ल्याशिवाय तुम्ही स्वतःची प्रगती साधूच शकणार नाहीत.

आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मेहनत घेणं ही सामान्य बाब आहे पण अनेकदा असं देखील निदर्शनास आलं आहे की, उद्दिष्टपूर्तीचं ओझं घेतल्यामुळे अनेकांवर विपरित परिणाम झाले आहेत.

आज तुम्हाला आम्ही असं सिक्रेट सांगणार आहोत, की ज्यामुळे सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःची प्रगती साधण्याच्या प्रक्रियेचा ताण येणार नाही , तुमच्यावर कुठलं दडपण न येता किंवा त्याचं ओझं न वाटता त्या प्रक्रियेचाच तुम्हाला आनंद कसा मिळेल हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

नवीन वर्षाच्या सुरुवात असो किंवा वाढदिवस असो किंवा असंच एखादं वार्षिक 'ऑकेजन.' अशा दिवशी आपण काही उद्दिष्टे ठरवतो काही संकल्प करतो.

हे संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील काही महिन्याचे नियोजन देखील आपण करतो.

जेव्हा हे सर्व आपण करतो तेव्हा त्याचं मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहेच पण त्याचबरोबर हे देखील महत्त्वाचं आहे, की तो संकल्प आपण का केला याचा विचार करणं.

म्हणजेच त्या संकल्पामागचे आपले कारण काय, त्यामागची प्रेरणा काय आणि आपल्या जीवनातील ध्येयाशी त्या संकल्पाचा असलेलं नातं या सर्वांचा विचार करणे आवश्क ठरतं.

समजा तुम्ही एखादं पुस्तकं किंवा कादंबरी पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. तेव्हा तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुम्ही हे पुस्तक केवळ आनंदासाठी, स्वांत सुखाय लिहित आहात का, तुम्ही जे पुस्तकाद्वारे विश्व उभं करत आहात, जी पात्रं त्या पुस्तकात आहेत ती कशी पुढे आकार घेतील या औत्सुक्यापोटी तुम्ही हे काम करत आहात का?

किंवा तुम्ही हे लिहित आहात कारण तुमचं साहित्यावर, लिखाणावर प्रेम आहे. साहित्यसृष्टीला काहीतरी नवीन देण्याचा ध्यास तुम्हाला आहे. या समाजाचे आपण काही सांस्कृतिक देणे लागतो यातून तुम्ही करत आहात का?

किंवा, तुम्ही फक्त हे दाखवण्यासाठी करत आहात की मी देखील कुणीतरी एक आहे. माझं पुस्तकही प्रकाशित होऊ शकतं, प्रसिद्धी मिळेल किंवा सर्वाधिक खपाचे पुस्तक लिहिणारा लेखक म्हणून मिळणारी ओळख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यापैकी तुम्ही नेमक्या कोणत्या वर्गवारीत येता हे तुमच्या लक्षात येणं अनिवार्य आहे.

सेल्फ डिटरमिनेशन थिअरी किंवा दृढ निश्चयाचे तत्त्व

सेल्फ डिटरमिनेशन थिअरी किंवा दृढ निश्चयाच्या तत्त्वानुसार हे प्रश्न काय दर्शवतात. तर तुमच्या प्रेरणेचा नेमका स्रोत काय आहे हे त्यातून आपल्याला कळतं.

त्याच बरोबर आपण आपले उद्दिष्ट गाठले किंवा नाही गाठले तर त्याचे चांगले किंवा वाईट काय परिणाम होतील याचा एक अंदाज आपल्याला येतो.

त्याचा आपल्या उद्दिष्टांवर आणि एकूणच जीवनमानावर काय परिणाम होईल याचा एक अंदाज आपल्याला येतो. एक अत्यंत महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे.

त्यानुसार असं म्हटलं आहे की जर आपण योग्य उद्दिष्टं आणि त्या उद्दिष्टांमागचे हेतू हे देखील योग्य असतील तर ते उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे ते उद्दिष्ट गाठल्याचे अभूतपूर्व समाधानही आपल्याला मिळू शकते.

उद्दिष्ट पूर्ण करणे हेच बक्षीस

अनेक वैज्ञानिक तत्त्वांप्रमाणे सेल्फ डिटरमिनेशन थिअरीला आकार घेण्यासाठी, मूर्त स्वरूप प्राप्त होण्यासाठी अनेक वर्षं लागली.

1970 साली एक संशोधन झाले होते त्यामध्ये या तत्त्वात बीजं आहेत. पण या सिद्धांतामध्ये संशोधकांचा रस 2000 सालानंतर वाढला. या संशोधनात प्रेरणा, कामगिरी आणि निरामय जीवन या संकल्पनांचा ऊहापोह करण्यात आला होता. या सिद्धांताचं मूळ आशावादी दृष्टिकोनात आहे. त्यात असं म्हटलं आहे की सर्व मानवांना शिकण्याची आणि आपली प्रगती करण्याची एक नैसर्गिक इच्छा असते.

सर्व जणांचं उद्दिष्ट हे आपली प्रगती साधणे असते या गृहीतकावर हा सिद्धांत उभा आहे, असं अंजा व्हॅन डेन ब्रोएक सांगतात. ते बेल्जियममधील विद्यापीठात अर्थशास्त्र आणि व्यवसाय या विषयाचे प्राध्यापक आहेत. प्रगती साधण्याबाबतचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये किंवा वाढत्या वयाच्या मुलांमध्ये ठळकपणे दिसतो.

आजूबाजूच्या जगाबद्दल असलेलं कुतूहल त्यांच्या कृतीतून दिसतं. प्रौढांना देखील काही विशिष्ट कृतींबद्दल, गोष्टींबद्दल आंतरिक कुतूहल असू शकतं, त्यामुळे आपलं उद्दिष्ट पूर्ण करणे हेच त्यांच्यासाठी एखाद्या बक्षीसासारखं असतं.

म्हणजे असा विचार करा की एखादी गोष्ट करण्यातच तुम्ही इतके गुंतून गेला होता की वेळ किती झाला याचं भानच तुम्हाला राहिलं नाही. अशी गोष्ट करणे म्हणजेच अंतःप्रेरणा.

पण असंही होतं की एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ तितक्या प्रमाणात अंतःप्रेरणा नसते. तेव्हा ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रेरित करावे लागते. या गोष्टीला बाह्य प्रेरणा म्हणतात. या बाह्य प्रेरणा कोणत्या आणि त्या आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी कशी आपली मदत करू शकतात.

तुमची ओळख काय आहे?

कदाचित तुम्ही ती गोष्ट तितक्या तन्मयतेने किंवा आनंदाने करू शकत नाही पण तुमच्या आयुष्यातील मोठं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकत असेल तर ते देखील समजून घ्या.

त्यातून निर्माण होणारी ओळख तुम्हाला मदत करू शकते. जसं की समजा तुम्ही एक शिक्षक आहात. शिक्षणाचे महत्त्व ओळखणे आणि तुमच्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य चांगले होईल हा विचार तुम्हाला प्रेरणादायी ठरू शकतो.

शिक्षणाचं महत्त्व सांगून तुम्ही मुलांकडून होमवर्क करून घेणे तुम्हाला आंतरिक समाधान देणारे ठरू शकते. समजा तुम्ही लेखक आहात तर तुम्ही ज्या पुस्तकावर काम करत आहात त्यामुळे साहित्य क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं जाणार आहे अशी भावना मनात असली की तुम्ही तुमचं हस्तलिखित वारंवार तपासण्याचे अवघड काम देखील लीलया करू शकाल.

कधी कधी लिखाण करणं हे अतिशय कष्टाचे काम ठरू शकते तेव्हा हा विचार तुम्हाला तुमचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल.

तुमची तुमच्या मनातील प्रतिमा काय आहे?

आपली आपल्या मनातील प्रतिमा जपण्यासाठी आपण आपल्या क्षमतेहून अधिक कार्य करू शकतो. जर त्या कृतीवर तुमचा स्वाभिमान अवंलबून असेल तर तुम्ही ते उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न कराल.

किंवा ते जर पूर्णत्वाला गेलं नाही तर तुमची तुमच्या मनात असलेली प्रतिमा धूसर होईल या भीतीने, या लाजेखातर तुम्ही तो संकल्प तडीस न्याल.

उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर मिळणारे फायदे

कधीकधी आपण एखादी गोष्ट पूर्णतः निकालानंतर जे फायदे मिळणार आहेत, जी बक्षीसं मिळणार आहेत त्यासाठी करतो. जसं की ते उद्दिष्ट गाठल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी आणि यश मिळणार असेल तर ती देखील प्रेरणा ठरू शकते.

काही संस्थांमध्ये तुमच्या कामगिरीनुसार तुम्हाला बोनस मिळतं किंवा पगारवाढ मिळते. त्यामुळे देखील आपण आपली कामगिरी उंचावू शकतो. ते काम आपल्याला कदाचित रटाळ वाटू शकते पण त्यातून आपल्याला जो आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे आपण ते काम करतो.

जर कुणामध्ये या गोष्टींची कमतरता दिसली तर असं समजून घ्या की ती व्यक्ती प्रेरित नाहीये. प्रेरणा नसलेली व्यक्ती अकार्यक्षम आणि निरुत्साही होत जाते.

याचं एक छोटंसं उदाहरण आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्याचीच प्रेरणा नाही तर तो विद्यार्थी क्लासला न जाण्याची संधीच शोधेल, अभ्यास न करण्याचा बहाणा शोधेल आणि अभ्यासासाठी लागणारे प्रयत्न त्या विद्यार्थ्याकडे नसतील.

पण जर समजा एखादा विद्यार्थी शिकण्याच्याच ध्येयाने प्रेरित आहे तर तो विद्यार्थी एखादा क्लास चुकला तरी कुणाकडून समजून घेईल, अडचणी आल्या तर आपल्या अभ्यासात खंड पडू देणार नाही.

ज्या मानसशास्त्रतज्ज्ञांनी सेल्फ डिटरमिनेशन थिअरीचा अभ्यास केला आहे त्यांनी एक प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीमुळे विविध परिस्थितींमध्ये प्रेरणा कशी मिळते आणि तिचं कार्य कसं घडतं याबद्दल आपल्याला माहिती मिळते.

दोन दशकांहून अधिक काळासाठी हे संशोधन करण्यात आलं आहे आणि त्यातून अगदी काही नेमके निष्कर्ष आणि सूत्रं हाती लागली आहेत. व्हॅन डेन ब्रोएक यांनी नुकताच 104 संशोधन निबंधांचा अभ्यास केला आहे. कार्यालयीन स्थिती किंवा तुमच्या कामाशी संबंधित प्रेरणा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यात त्यांच्या असं लक्षात आलं आहे की जे लोक अंतःप्रेरणेनी काम करतात त्यांच्यासाठी ते काम आपण करत आहोत हीच भावना आनंददायी असते. अशा लोकांमध्ये कामाचे समाधान जास्त असते.

ते उत्साही असतात, स्वतःहून कामाची जबाबदारी घेण्यात त्यांना रस असतो आणि असे लोक लवकर कंटाळत नाहीत तसेच कामामुळे पूर्णपणे त्यांच्या शक्तीचा व्यय होत नाही. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चांगल्या कामगिरीसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे असं सिद्ध झालं.

इतर प्रेरणांचे परिणाम हे संदिग्ध स्वरूपाचे आहेत. जसं की इंट्रोजेक्शन ( याचा अर्थ आहे - तुमचे काम आणि तुमच्या स्वाभिमानाची सांगड घालणे.) यामुळे तुमची कामगिरी उंचावू शकते.

पण यामुळे तणाव आणि सर्व ऊर्जा क्षीण होण्याची शक्यता अधिक आहे. व्यावसायिक यश मिळवण्यासाठी ही खूप मोठी किंमत मोजण्यासारखे आहे.

बाह्य प्रेरणा- जसं की प्रेमोशन आणि पगारवाढ यामुळे देखील नकारात्मक परिणाम दिसल्याचं सिद्ध झालं आहे.

कामगिरी आणि उत्साहाने सहभाग घेण्याच्या दृष्टीने बाह्य प्रेरणा मर्यादित स्वरूपाचं काम करते. त्याचे तुमच्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. काही पुरावे असे देखील आढळले आहेत की केवळ बाह्य प्रेरणांनी प्रेरित होऊन काम करणारे लोक हे अप्रमाणिक देखील असतात.

त्यांना हवं ते बक्षीस मिळवण्यासाठी ते त्यांच्या कामगिरीबाबत खोटं देखील बोलायला मागे पुढे पाहात नाहीत.

तुम्हाला नेमकं काय हवंय?

या अभ्यासातून आलेले निष्कर्ष एका विशिष्ट संदर्भासह घेणं आवश्यक आहेत असं इआन मॅक-रे यांना वाटतं. ते एक मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी यासंदर्भता अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

त्यांमध्ये प्रेरणा आणि कामगिरी या पुस्तकाचाही समावेश आहे. ते सांगतात की विविध प्रेरणांची वर्गवारी करणे हे उपयुक्त आहे. पण त्याच सोबत हे देखील लक्षात घेतले पाहिजे की त्या प्रेरणेचं महत्त्व हे संदर्भाच्या परिप्रेक्ष्यात पाहणे आवश्यक आहे.

असं समजा की एखादी व्यक्तीला आपले जीवनावश्यक खर्च पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि अशा वेळी त्या व्यक्तीला सांगितलं की चांगल्या कामाच्या मोबदल्यात तुला पगारवाढ मिळेल, तर निश्चितच ही गोष्ट त्या व्यक्तीची कामगिरी उंचावण्यासाठी मदतीची ठरेल.

पुढे ते म्हणतात की प्रत्येक क्षेत्रागणिक हे निष्कर्ष बदलू शकतात, तेव्हा ही काळजी देखील घेणं आवश्यक आहे.

मॅक-रे सांगतात की, एकदा का तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर अंतःप्रेरणाच महत्त्वाची ठरते. जर तुम्ही आर्थिक सुस्थितीत आहात तर केवळ पैशांसाठी तुम्ही एखादी नवी जबाबदारी घेण्यास किंवा एखादा प्रकल्प हाती घेण्याबद्दल दोनदा विचार कराल.

जर पैशांसोबतच तुम्हाला त्यातून समाधान मिळणार असेल, तुमच्या ज्ञानात भर पडणार असेल आणि त्यातून तुम्हाला उद्दिष्टपूर्ती आणि अर्थपूर्ण कार्य करत आहोत ही भावना उद्दपित होणार असेल तर तुम्ही ते जरूर कराल. तुमच्या प्रेरणांचे स्रोत अभ्यासल्यामुळे सध्याच्या नोकरीत देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःला ओळखणं, सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या कामाकडून काय अपेक्षा आहेत.

जसं की तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी तयार होणारे व्यावसायिक संबंध महत्त्वाचे आहेत की कामामुळे तुम्हाला शिकण्याची संधी मिळते, तुमची प्रगती होत आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्ही या गोष्टींबाबत विचार करा आणि तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या संधी मिळत आहेत हे समजून घ्या, असं मॅक-रे सुचवतात.

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर मॅक-रे सांगतात की मोठ्या पदावरील व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे सहकारी जेव्हा त्यांच्या प्रेरणांबद्दल बोलतात त्याकडे त्यांचे नीट लक्ष हवे.

आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ते मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा. याचा परिणाम अधिक चांगला होऊ शकतो असं मॅक-रे यांना वाटतं ते म्हणतात की तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आणण्यासाठी हा महत्त्वाचा बदल ठरू शकतो.

केवळ वर्षाच्या शेवटी बोनस मिळणार यापेक्षा हे अधिक चांगलं असतं. या मताशी व्हॅन डेन ब्रोएकदेखील सहमत आहेत. त्या म्हणतात की आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या आवडीचं काम करू देण्याचं स्वातंत्र्य देणं ही अंतःप्रेरणा आणि तुमच्या स्वतःच्या ओळखीच्या संदर्भातील प्रेरणा आहे.

याचा अर्थ असा नाही की त्या कर्मचाऱ्यांना वाटेल ते करण्याची मुभा देणं. पण याचा अर्थ असा आहे की ते जे काम करतील त्यामळे कमी हस्तक्षेपण करणं, त्यांच्यासमोर अधिक पर्याय ठेवणं हे आहे.

त्याबरोबरच त्यांना त्यांचं उद्दिष्ट नीट समजावून दिलं पाहिजे म्हणजे त्यांना हवं असलेलं काम टीमच्या उद्दिष्टांसाठी कसं सहाय्यभूत ठरेल याबाबत त्यांना स्पष्टता देणं महत्त्वाचं आहे.

कामातून मिळणारा आनंद

सेल्फ डिटरमिनेशन थिअरी फक्त कामाच्याच बाबत लागू होते असं नाही. तुमच्या आवडीच्या गोष्टी, शिक्षण आणि छंदांच्याही बाबतीत लागू होते.

समजा तुम्ही एखादी नवी भाषा शिकत आहात. नवी भाषा शिकल्यामुळे कुणावर प्रभाव पडेल, तुमची छाप पडेल यासाठी तुम्ही ते करत आहात की तुम्हाला त्या भाषेत, त्या भाषकसमूहाच्या संस्कृतीत रस आहे किंवा त्या भाषेत एखादी व्यक्ती बोलते त्या व्यक्तीशी बोलण्यात तुम्हाला अधिक रस आहे याचा शोध घ्या.

जर समजा तुम्ही कुणावर छाप पाडण्यासाठी जर शिकणाऱ्या गटात नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर तुम्ही ती भाषा अवगत करण्याची संधी अधिक आहे.

याचं कारण आहे की भाषा शिकण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागती ती घेण्यासाठी तुम्ही तयार असाल.

केवळ इतरांना वाटावं मला खूप साऱ्या भाषा येतात या कारणासाठी तुम्ही ती मेहनत घेणं टाळाल असं मानसशास्त्रज्ज्ञ सांगतात.

ही गोष्ट व्यायामाच्या बाबतीतही लागू शकते. ते कसं आपण पाहू. जर तुम्हाला केवळ कुणाला दाखवण्यासाठी तुमची शरीरस्वास्थ चांगलं करायचं असेल तर तुम्ही रोज रोज जिम मध्ये जाण्याचे कष्ट घेणार नाहीत.

तुम्ही स्वतःवर खूप सारा ताण टाकाल, त्यातून तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या पूर्ण क्षमतांचा वापर केला नाही तर मी अयशस्वी होईल.

यातून तुमची अंतःप्रेरणा स्पष्टपणे दिसत नाही. त्यापेक्षा तुम्ही हे का नाही करत स्वतःवर खूप सारा ताण ओढावून घेण्याऐवजी अशी एखादी गोष्ट करा ज्यामुळे तुम्हाला ती करण्याचा आनंद मिळेल. किंवा कमी ताण घेऊन ती गोष्ट कशी करता येईल याचा विचार करणं योग्य ठरेल. संशोधन असं सांगतं की जे लोक आनंद मिळवण्यासाठी व्यायाम करतात ते अधिक काळासाठी व्यायाम करतात. ज्या लोकांना व्यायामातून आनंद मिळत नाही ते लवकर कंटाळतात आणि ते व्यायाम करणं सोडून देतात.

हे लक्षात घ्या की व्यायाम करताना तुम्ही तुमच्या ऊर्जेचा खूप व्यय होत नाहीये पण तुम्ही व्यायाम करण्याची सवय अधिक काळासाठी ठेवणार आहात तर तुम्हाला त्यातून जास्त लाभ होऊ शकतो.

आयुष्य हे अल्पकालीन आहे. यात करता येतील अशा खूप गोष्टी आहेत पण मिळालेल्या वेळेत त्या पूर्ण करणे हे खूपच आव्हानात्मक आहे.

त्यामुळे डिरमिनेशन थिअरी आपल्याला हे सांगते की आपण आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचा पाठलाग करावा याबाबत सजग असावे.

जर आपल्या आयुष्यात आपण आपली उद्दिष्टं ही आपल्याला आनंददायी आणि अर्थपूर्ण वाटणारी ठेवली तर व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया ही आनंददायी होईल.

पण जर समजा आपण इतर कुणी लादलेली उद्दिष्टं निवडली, किंवा कुणाला प्रभावित करायचं आहे म्हणून जर उद्दिष्टं ठरवून ती पूर्ण करू लागतो तर हे काम अगदी जीवावर येणारे होऊन जाईल, आपली प्रगती साधताना आनंद मिळणे देखील महत्त्वाचे आहे त्याचा तणाव निर्माण होणे नाही हीच गोष्ट आपल्याला दृढनिश्चय सिद्धांत किंवा डिटरमिनेशन थिअरीतून शिकायला मिळते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)