You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Success Tips: फक्त परिश्रम करुन हवं तेवढं यश का मिळवता येत नाही?
- Author, केट मॉर्गन
- Role, बीबीसी फ्युचर
इंग्लंडमधील लेखिका केट लिस्टर यांना काही दिवसांपूर्वी स्वतःचा एक प्रतिध्वनी उमटल्याची जाणीव झाली.
त्यामुळं त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली, 'आयुष्यात खूप मोठं होण्यासाठी खूप परिश्रम करण्याचा मार्ग निरर्थक आहे अशी जाणीव तुम्हाला झाली त्यावेळी तुम्ही किती वर्षांचे होता?'
असा सवाल त्यांनी या पोस्टमध्ये केला होता.
हे ट्वीट उपहासात्मक असलं तरी त्यांच्या भावना मात्र, सर्वांसमोर आल्या आणि जवळपास 4 लाख लोकांना ते ट्वीट आवडलं होतं किंवा त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती.
कठोर परिश्रम केल्यास तुम्ही हवं ते मिळवू शकता, असं आपल्याला लहानपणापासूनच सांगण्यात आलं आहे किंवा तसे सल्ले देण्यात आलेले आहेत.
मात्र तसं खरंच नसतं, असं मत प्रसिद्ध प्रशिक्षक आणि 'हार्ड वर्क इज नॉट इनफ : द सरप्राइजिंग ट्रूथ अबाऊट बीइंग अॅव्हेलेबल अॅट वर्क' या पुस्तकाचे लेखक जेफ शॅनन यांनी मांडलं.
त्यांच्या मते, परिश्रम ही चांगली सुरुवात आहे आणि तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या नोकरीमध्ये किंवा कामात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
पण तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तेवढंच पुरेसं नाही, "एका ठराविक क्षणाला तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर, या पातळीवर प्रत्येकजण कठोर परिश्रम घेत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. तुमची कौशल्यं आणि परिश्रम यामुळं केवळ तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढत असतात, पण तुम्हाला यशाची शिडी त्यामुळं मिळत नाही."
यंत्रणेमध्ये कठोर परिश्रमाचं मूल्य नसणं हे अन्याकारक आहे. पण अशा प्रकारचं परिश्रण करणाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं सत्य आहे.
विशेषतः जे यशाच्या शिखरावर जाण्यासाठी शिडीच्या शोधात असतात आणि त्यासाठी संघर्ष करत असतात त्यांच्यासाठी. त्यामुळं यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामापेक्षा काहीतरी अधिक करण्याची गरज असते.
आपलं करिअर एका ठराविक ठिकाणी अडकलेलं असताना, आपल्या सारख्याच किंवा काही वेळा तुलनेनं कमी क्षमता असणारे सहकारी यश मिळवत असल्याचं पाहून, अनेकदा लिस्टर यांच्यासारखी जाणीव होत असते.
अनेकदा ज्यांची कोणत्याही मार्गाने पुढं जाण्याची इच्छा असते, ते अशाप्रकारे पुढं जात असतात. तुम्ही मात्र त्यावेळी केवळ आपल्या कामामध्ये किंवा परिश्रम करण्यात व्यस्त असता.
जर तुम्ही करत असलेल्या कामाची पावती मिळत नसेल किंवा कुणाला त्याची किंमत नसेल तर अशा परिश्रमाला काही अर्थ नसल्याचं शॅनन म्हणतात.
तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचं रुपांतर पदोन्नती किंवा तुमच्या यशात व्हावं यासाठी तुम्हाला तुमचं काम आणि तुम्हाला स्वतःलाही लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल. विशेषतः कामाचं स्वरूप बदलत चाललेल्या या जगात ते गरजेचं आहे.
'टियारा इफेक्ट'चं जाळं
तसं असलं तरी परिश्रम हे अत्यंत गरजेचे आहेत, असं अमेरिकेतील सल्लागार संस्था निगोशिएटिंग वूमन, इंक च्या अध्यक्ष कॅरोल फ्रोलिंगर म्हणाल्या. मात्र ते कुणाच्या तरी लक्षात येईल याची वाट पाहत बसणं हे धोकादायक ठरू शकतं असं त्या म्हणाल्या.
या प्रवृत्तीला फ्रोलिंगर या "टियारा इफेक्ट" (हीच व्याख्या शेरील सँडबर्ग यांनी लीन इनमध्ये वापरली आहे) असं म्हणतात.
"लोक अत्यंत कठोर परिश्रम करतात आणि त्याद्वारे अत्यंत उत्तम, फायदेशीर असे परिणामही मिळतात. आपले परिश्रम योग्य लोकांच्या किंवा वरिष्ठांच्या लक्षात येईल आणि ते आपल्या डोक्यावर यशाचा मुकूट (टियारा) आणून ठेवतील, असं त्यांना वाटत असतं. पण शक्यतो तसं घडत नाही," असं त्या म्हणाल्या.
"जे लोक कायम चांगलं काम करत राहतात आणि त्याशिवाय काही करत नाही, त्यांच्याबाबत एक बाब नक्की घडते, ती म्हणजे ते कायम रडारखाली असतात. त्यामुळं जेव्हा पदोन्नती सारखी संधी समोर येते त्यावेळी कोणीही त्यांच्या नावाचा विचार करत नाही. अगदी सहजपणे त्यांचा विसर पडतो."
या सर्वाची सुरुवात लहानपणापासून अगदी प्राथमिक शाळेतच होते. शांत, मेहनती मुलं मोठी झाल्यावर यशस्वी बनतात असं याठिकाणी शिकवलं जातं.
अशा मुलांना शिक्षकांकडून त्यांच्या या गुणासाठी नेहमी शाबासकी मिळत असते. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉसनंही तसं करावं अशी आपली अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काम करत असलेल्या विश्वामध्ये जेव्हा शाळेत शिकलेला हा धडा चुकीचा असल्याची जाणीव होते, तेव्हा ते निराशाजनक ठरतं.
खरं म्हणजे कठोर परिश्रम एका ठराविक काळानंतर दुर्लक्षित केले जाऊ लागतात. त्याचं कारण म्हणजे अशाप्रकारे काम करणारे तुमच्या आजुबाजूला खूप असतात, असं निरीक्षण शॅनन यांनी नोंदवलं. तुम्ही इतर मार्गांनी तुमच्याकडं लक्ष वेधून घेतलं नाही, तर तुम्ही सहजपणे दुर्लक्षित होऊ शकता.
पुरुष आणि महिला दोघंही अशाप्रकारे त्यांच्या कामाकडं दुर्लक्ष करण्याच्या मुद्द्याबाबत संवेदनशील असतात. मात्र तसं असलं तरी महिलांवर याचा अधिक नकारात्मक परिणाम होतो, असं फ्रोलिंगर म्हणतात.
त्याचं कारण म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल बोलणाऱ्यांचा विचार करता महिलांच्या तुलनेत पुरुषांबाबत अधिक स्वीकार्यता असते. "महिलांनी त्यांच्या कामाबाबत बोलणं म्हणजे बढाई मारणं असं समजलं जाऊ शकतं आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागू शकतो" असं त्या म्हणाल्या.
मग यासंदर्भात काय करायला हवे? तर याचं उत्तर म्हणजे पुरुष असो वा महिला तुम्ही करत असलेल्या कामाकडे, परिश्रमाकडे वरिष्ठांचं लक्ष वेधलं जाईल यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी वार्षिक मूल्यांकन किंवा परफॉर्मन्स असेसमेंटची वाट पाहत बसू नका.
"अनेक कंपन्या आणि संस्थांमध्ये तुम्ही वर्षाच्या अखेरीपर्यंत तुमच्या कामाचं मूल्यांकन करण्यासाठी वाट पाहत असता, पण अशाप्रकारे वर्षभर थांबता कामा नये," असं फ्रोलिंगर यांनी म्हटलं.
त्याऐवजी तुम्ही करत असलेलं काम आणि त्यात मिळालेलं यश किंवा त्यामुळं कंपनीला होणारा फायदा याबाबत आपल्या वरिष्ठांना वेळोवेळी माहिती देत राहाणं गरजेचं आहे.
ती माहिती एखाद्या छोटयाशा इमेलद्वारेही देता येऊ शकते. त्यात 'माझ्या कामाला मिळालेलं यश आणि त्याचा टीमसाठी काय फायदा आहे, किंवा त्यामुळं कंपनीचा पैसा कसा वाचला,' अशी माहिती असू शकते.
मात्र रोजच कुणाला असं ऐकायलाही आवडत नसतं. तसंच टीमसारख्या शब्दांचा यामध्ये उल्लेख केल्यास, त्याचा फायदा होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.
तुम्ही हे सर्व कसं पोहोचवता किंवा सादर करता हेही महत्त्वाचं आहे. कदाचित नेहमी स्वतःचे गुणगाण करणं हे बॉसला विचित्र वाटू शकतं.
त्यामुळं आपल्या कामांची माहिती त्यांना अपडेटच्या माध्यमातून देणं, सल्ला घेताना आपण काय करतो आहोत हे दाखवणं या प्रकारे ते करता येईल असं फ्रोलिंगर यांनी म्हटलं आहे.
राजकारणाचे मूल्य
अनेक कार्यालयामध्ये आणि उद्योगांमध्ये केवळ तुमची क्षमता सिद्ध करणं हे यश मिळवण्यासाठी पुरेसं नसतं, तर तुम्ही वरिष्ठांना आवडायलाही हवे आणि स्मरणातही राहायला हवे.
"जर तुम्हाला लोकांवर तुमचा प्रभाव पाडायचा असेल तर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा," असं शॅनन यांनी म्हटलं आहे.
मुळात यशाची शिडी चढण्यासाठी तुम्ही केवळ एक चांगले कर्मचारी असून चालत नाही, तर काही प्रमाणात राजकारणीही असायला हवं.
फ्रोलिंगर यांच्या मते, तुमच्याकडे एक नेता म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. तुमच्याबरोबर काम करणारे सहकारी, तुमचे वरिष्ठ आणि तुमचे कनिष्ठ सहकारी अशा सर्वाचे तुम्ही आवडते असायला हवं. जेव्हा कामाचं मूल्यमापन केलं जातं, त्यावेळी त्याबाबतचा पूर्ण अभ्यास झालेला असायला हवा. कारण अनेकदा आपल्यासारखंच काम करणाऱ्यांना अधिक चांगलं रेटिंग मिळत असतं.
याबाबतचं एक अन्यायकारक पण कटू सत्य म्हणजे, तुम्ही आणि तुमचे सहकारी अगदी सारखंच काम करत असाल, पण ते जर मित्र बनवण्यात किंवा लोकांवर प्रभाव टाकण्यात, स्वतःची प्रतिमा तयार करण्यात अधिक वेळ घालवत असतील, तर ते अधिक चांगलं काम करतात असं दिसत असतं. वरिष्ठदेखील माणूस असतो आणि अशा लोकांकडे आकर्षित होणं हे अगदी स्वाभाविक आहे.
मात्र कामाच्या ठिकाणी अशाप्रकारे आपला ठसा उमटवणं हे अगदी शक्य आहे. ऑफिसमध्ये सर्वांवर तुमचा प्रभाव राहावा यासाठी काही अगदी छोट्या गोष्टी असतात.
आपल्या सहकाऱ्यांना कामाच्या शिवायदेखील महत्त्व देणं, त्यांच्याशी बोलणं याचा त्यात समावेश होतो. केवळ कामाशिवाय इतर गोष्टींतून सहकाऱ्यांबरोबर कसा वेळ घालवता येईल, याचा विचार करायला हवा.
तुमच्या आवडी, छंद सारखे आहेत का? त्याबद्दल चर्चा करणे. माहितीची देवाण घेवाण करणे अशा माध्यमातून तुम्ही सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकता, असं फ्रोलिंगर म्हणाले.
हे काहीसं वेगळं वाटत असलं तरी अशाप्रकारच्या चांगल्या वागण्यामुळं कुणी दुखावलं जात नाही आणि पुढं जाण्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकतं. पण केवळ आपलं कामच करत राहणाऱ्यांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा नव्यानं प्राधान्यक्रम ठरवून अशा प्रकारे इतर गोष्टींनाही वेळ देणं गरजेचं आहे. हा सर्व आपलं करिअर घडवण्याचा एक भाग असून प्रत्येक कर्मचाऱ्याची स्वतःबाबतची ती जबाबदारी असल्याचं फ्रोलिंगर म्हणतात.
''जर तुम्हीच तुमच्या करिअरची काळजी घेतली नाही, तर इतर कोणीही घेणार नाही," असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)