ड्रग्जच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या अफगाणिस्तानवर व्यसन मुक्ती मोहीम राबवण्याची वेळ का आली?

- Author, याल्दा हकीम
- Role, बीबीसी न्यूज
या वृत्तातील काही वाक्य तुम्हाला विचलित करू शकतात.
"कुठेतरी ड्रग्ज मिळतील या आशेने मी एका पुलाखाली उभा होतो. इतक्यात मागून येऊन कोणीतरी माझा हात पकडल्याचं मला जाणवलं. ते तालिबानी होते, आम्हाला तिथून कुठेतरी दूर न्यायच्या उद्देशाने ते तिथे आले होते."
ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मोहम्मद उमर पश्चिम काबूलमधील पुल-ए-सुख्ता पुलाखाली उभा होता. अचानक त्याच्यासमोर तालिबानी सैनिक आले होते.
2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आलं. पण त्याआधी या परिसरात ड्रग्स घेणाऱ्या लोकांची ये जा असायची, त्यामुळे हा परिसर कुप्रसिद्ध होता.
अलीकडच्या काळात तालिबानी सैनिक पूल, उद्याने आणि डोंगरमाथ्यावरुन लोकांची धरपकड करीत आहेत.
पूर्वीचा अमेरिकेचा लष्करी तळ आता रिकामा आहे. या ठिकाणी अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यसनाधीनांसाठी तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याच ठिकाणी या व्यसनी लोकांना नेलं जात आहे.
अफगाणिस्तानमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. ड्रग्जच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ही 'ड्रग्जच्या जगाची राजधानी' म्हणता येईल.
ब्यूरो ऑफ इंटरनॅशनल नार्कोटिक्स अँड लॉ एन्फोर्समेंटच्या मते देशाच्या चार कोटी लोकसंख्येपैकी किमान 35 लाख लोक ड्रग्जच्या आहारी गेलेत.
कचऱ्याचा ढीग आणि व्यसनी लोकांचा अड्डा
जर तुम्ही पुल-ए-सुख्ताकडे गेलात तर या भागात तुम्हाला गलिच्छ आणि कचऱ्याचं साम्राज्य दिसेल. सोबतच या कचऱ्याच्या ढीगात शेकडो पुरुषही दिसतील.
या परिसरात सिरिंज, मलमूत्र या व्यतिरिक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले मृतदेह सापडतील. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे या लोकांचा मृत्यू झालेला असतो.
हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइन लोकांचे आवडते ड्रग्ज आहेत.
एखाद्या नव्या व्यक्तीला पुलाखाली पसरलेली दुर्गंधी असह्य होते. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भटकी कुत्री फिरत असतात. कचऱ्यात पडलेल्या मृतदेहांमध्ये ते आपलं अन्न शोधत फिरत असतात. पुलावर ट्रॅफिक दिसतं. इथल्या गल्लीबोळात फेरीवाले त्यांचा माल विकताना दिसतात.
उमर सांगतो, "मी माझ्या मित्रांना भेटायला आणि त्यांच्याकडून काही ड्रग्ज घेण्यासाठी तिथे जायचो. मला मरणाची भीती नव्हती, तसंही मरण देवाच्या हातातच असतं."

पूर्वीचं सरकार अंमली पदार्थांचं व्यसन करणाऱ्या लोकांना पकडून वेगवेगळ्या सेंटर्स मध्ये पाठवायचं. ड्रग्जच्या विळख्यात आलेले लोक कधीकाळी या परिसराला आपलं घर मानायचे पण आता ते या सगळ्या गोष्टी विसरलेत.
पण 2021 मध्ये जेव्हा तालिबान सरकार सत्तेवर आलं त्यावेळी या परिसरातून लोकांना हाकलण्यासाठी त्यांनी आक्रमक मोहीम राबवायला सुरुवात केली.
उमर सांगतो, "तालिबानी सैनिक आम्हाला पाईपचे फटके मारायचे. याच मारहाणीत माझ्या हाताचं एक बोट तुटलं. मी या परिसरातून बाहेर पडण्यास तयार नव्हतो, म्हणून मला मारहाण झाली. मी विरोध केला तरीही त्यांनी मला इथून बाहेर पडण्यास भाग पाडलं."
त्यांनी उमरसोबत इतर लोकांनाही बसमध्ये कोंबलं.
यानंतर तालिबानी सरकारने एक व्हीडिओ फुटेज प्रसिद्ध केलं होतं. यात तालिबानी सैनिक ड्रग्जच्या अतिसेवनाने मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह उचलत असल्याचं दिसत होतं. ज्या लोकांचा श्वास सुरू होता मात्र ते बेशुद्धावस्थेत होते, त्यांना स्ट्रेचरवरून नेलं जात होतं.
पुनर्वसन केंद्रात जागा कमी, पण रुग्ण जास्त
उमरला ज्या पुनर्वसन केंद्रात नेण्यात आलं होतं ते केंद्र 1000 बेडचं होतं. तिथे जवळपास 3000 रुग्णांवर उपचार सुरू होते. या ठिकाणचं वातावरण अतिशय घाण आहे. लोकांना या केंद्रात 45 दिवसांसाठी ठेवलं जातं. त्या काळात सेशन घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. यानंतर त्यांना सोडलं जातं.
पण या सेशन नंतरही ज्यांचंं व्यसन सुटेल याची काही खात्री देता येत नाही. ते पुन्हा ड्रग्जच्या विळख्यात सापडू शकतात.
या सगळ्या व्यसनाधीन लोकांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. सोबतच काही महिला आणि लहान मुलांना देखील या केंद्रात उपचारांसाठी आणलं जातं.
ड्रग्ज घेणाऱ्या इतर लोकांप्रमाणे एका खोलीत बंद असलेला उमर खूपच अशक्त दिसतोय. इथे त्याला अंगावर चढवायला जे कपडे दिलेत त्यात तो आणखीनच कृश दिसतोय.
खोलीतील कोपऱ्यात ठेवलेल्या बेडवर बसून उमर त्याची गोष्ट सांगत होता.

तो सांगतो, "कधी मी दुबईत असायचो, तर कधी तुर्कस्तानमध्ये तर कधी इराणमध्ये. कॅम एअरसाठी फ्लाइट अटेंडंट म्हणून जगभर प्रवास केलाय. आमच्यासोबत कधी कधी राष्ट्रपतींसारखे व्हीआयपी पाहुणे देखील असायचे."
पण तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर त्याची नोकरी गेली. आर्थिक समस्या आणि अनिश्चित भविष्य यामुळे तो ड्रग्जच्या विळख्यात अडकला.
देशातील अफू नष्ट व्हावा यासाठी तालिबानने 1990 च्या दशकात अफूच्या लागवडीवर बंदी घातली होती.
पण तालिबानच्या 20 वर्षांच्या बंडखोरीदरम्यान अंमली पदार्थांचा व्यापार हाच त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता.
मात्र आता तालिबानचं म्हणणं आहे की, त्यांनी अफूच्या व्यापारावर बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अफूच्या लागवडीत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अडचणी वाढल्या
दरम्यान, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. अफगाणिस्तानला जी आंतरराष्ट्रीय मदत मिळत होती ती देखील कमी झाली आहे. सुरक्षा, वातावरणातील बदल आणि अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीमुळे अफगाणी लोक बेजार झाले आहेत.
पुनर्वसन केंद्रात आल्यापासून उमरने ठरवलंय की, तो या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडेल.
तो म्हणतो, मला लग्न करायचं आहे. मला माझ्या कुटुंबासोबत साधं आयुष्य जगायचं आहे. इथले डॉक्टर खूप चांगले आहेत. मी व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
या पुनर्वसन केंद्रात जागेच्या कमतरतेमुळे डॉक्टरांना काम करणं अवघड झालं आहे. तालिबानी सैनिक रोज नव्या लोकांना घेऊन येत आहेत.

एक डॉक्टर मला म्हणाले की, "आम्हाला मदतीची नितांत गरज आहे. मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था इथून निघून गेल्या, त्यांनी मदत करणं थांबवलंय. पण आमच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत.
ते पुढे म्हणाले की, "इथे उपचारांसाठी आलेल्या लोकांमध्ये बरेचसे लोक स्मार्ट, प्रोफेशनल, शिक्षित आहेत. पूर्वी त्यांचं जीवन सुखकर होतं, पण आता बेरोजगारी आणि गरिबीमुळे परिस्थिती आणखीन बिघडली आहे. आता त्यांना त्यातून सुटका हवी आहे."
रुग्णांची वाढती गर्दी आणि संसाधनांची कमतरता असूनही रुग्णांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढायचा डॉक्टरांचा निर्धार दिसतो. या रुग्णांना शक्य ती मदत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पण इथून निघून गेल्यावर ते ड्रग्जपासून लांब राहतील का? याची काही शाश्वती देता येत नाही. पण आपण प्रयत्न करत राहायला हवं. त्यांच्या भविष्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. पण सध्या तरी त्यांच्याकडे बघून अशी कोणतीही आशा दिसत नसल्याचं डॉक्टर सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








