ड्रग्ज माफिया अल् चॅपोच्या साम्राज्याची 'ही' राणी आता काय करते?

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGES
- Author, तारा मॅकॅल्वी
- Role, बीबीसी न्यूज
एमा कॉरोनेल अॅसपुरो न्यूयॉर्कमध्ये अत्यंत आरामदायी जीवन जगत होती. ड्रग्ज माफिया वाकीन गुसमॅन लोएरा उर्फ अल् चॅपोबरोबर केलेल्या लग्नाचा तो फायदा होता, असं म्हणता येईल. त्यानंतर तिला अटक झाली आणि तिला व्हर्जिनिया येथील एका तुरुंगात टाकण्यात आलं. पण ड्रग्ज साम्राज्याच्या या राणीचं पुढे काय झालं?
व्हर्जिनियाच्या अॅलेक्झेंड्रिया शहरात असणाऱ्या विल्यम ट्रुसडेल अॅडल्ट डिटेन्शन सेंटर या तुरुंगांच्या खिडक्या उभ्या आयाताकार एका विटेच्या आकाराच्या आहेत. याच तुरुंगातल्या एका लहानशा कोठडीत एमाला एकटीला ठेवण्यात आलंय.
या कोठडीमध्ये वेळ घालवण्यासाठी एमा 'रोमँटिक' कादंबऱ्या वाचत असल्याचं त्यांच्या वकील मॅरिएल कोलोन मीरो सांगतात.
एमा यांचं या तुरुंगातील जीवन आणि अवस्था ही त्यांच्या आधीच्या आयुष्याच्या अगदी विरुद्ध आहे.
काही महिन्यांपूर्वी तिनं 'अल् चॅपो गुजमन' हा कपड्यांचा ब्रँड सुरू करण्याचा विचार केला होता. (खरं तर मेक्सिकोमध्ये या जोडप्याला स्टाइल आयकॉन समजलं जातं. त्यांच्या मुलीनंही पित्याच्या नावाचा वापर करत फॅशन इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली आहे.)
2019 मध्ये जेव्हा एमाचे पती गुजमॅन यांच्यावर न्यूयॉर्कच्या कोर्टात खटला सुरू होता, त्यावेळी माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तिनं रत्नं आणि महागडं घड्याळ परिधान केलं होतं.
त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला 31 वर्षीय कोरोनेलला व्हर्जिनियाच्या डलास आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अटक करण्यात आली. तिच्यावर कुप्रसिद्ध सिनालोआ कार्टेल (ड्रग्ज व्यवसाय) चालवण्यात पतीची मदत केल्याचे आरोप ठेवण्यात आले. 64 वर्षीय गुजमॅन सध्या कोलोराडो सुपरमॅक्सच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
कोरोनेलनं कोकेन वितरणासाठीचा कट रचला आणि 2015 मध्ये मेक्सिकोच्या तुरुंगातून पतीला पळून जाण्यासाठी कारस्थान रचण्यात मदत केल्याचं FBIच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANADOLU AGENCY VIA GETTY IMAGES
एमाचं संपूर्ण जीवन एक दगाबाज पती, पतीची दुसरी प्रेयसी आणि एका गुन्हेगारी संघटनेच्या अवती-भोवती फिरणारं आहे. मात्र, एमाच्या जीवनातून ड्रग्ज कार्टेल्स (ड्रग्ज तस्करी करणारी गँग) च्या गूढ जगाबाबत आणि त्यातील महिलांबाबत बरीच माहिती मिळते.
तिच्या खटल्याच्या सुनावणीची तारीख अद्याप ठरलेली नाही. जर तिच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
एमा दोषी आहे की निर्दोष हा मुद्दा वेगळा. पण तिनं या विश्वात स्वतःसाठी एक खास जागा तयार केल्याचं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. तिची स्वतःची एक ओळख होती, तिचा उद्योग होता, एकूण व्यवसायावर तिचं लक्ष असायचं. तिचा नवरा जरी ड्रग्सचा धंदा चालवत असला तरी त्याच्यापर्यंत कोण पोहोचू शकतं, हे तिच्या हातात होतं.
सॅन डिएगोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधील स्कॉलर सेसीलिया फारफन मेंडेझ म्हणतात, "पारंपरिकदृष्ट्या ड्रग तस्करांच्या पत्नींकडे 'अत्यंत कामुक' महिला असा दृष्टीनंच पाहिलं जातं. ज्यांना काहीही काम नसतं. पण कोरोनेल वेगळी होती. महिलाही त्यांच्या हातात अधिकार ठेवू शकतात हे तिनं सिद्ध केलं होतं."
पण ड्रग्ज कार्टेलमध्ये सत्ता मिळवण्याचेही अनेक धोके असतात.
अमेरिकेच्या ड्रग्ज एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये स्पेशल एजंट म्हणून काम केलेले डेरिक माल्टझ गतात, "तुम्ही जर या व्यवसायामध्ये असाल तर तुम्ही एक तर पकडले तरी जाता, किंवा मारले तरी जाता."
स्वतःची फॅशन कंपनी उघडण्याच्या योजनेसह एमा स्वतःला अत्यंत धाडसी असल्याचं भासवत पुढं जात होती, पण तिच्याभोवती चौकशीचा फास आवळत होता. माल्टझ म्हणतात, "तिचा जीवनाचा पाया हलला होता, किल्ला ढासळत होता."
अपहरण आणि हत्या
पतीच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कोरोनेल ब्रुकलिनच्या फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आइसबर्ग लेट्यूस खात बसली होती. त्यावेळी कॅफेटेरियामध्ये मित्रांबरोबर बसलेली एमा हसत, जोक करत बसली होती.
तिच्या वकील मीरो म्हणतात, "तिचं व्यक्तीमत्त्वं वेगळं आहे. ज्या एमाला मी ओळखते ती उत्साहाने भारलेली कायम हसतमुख असते."

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGES
एमाकडे अमेरिका आणि मॅक्सिको दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. 17 वर्षांची असताना ती गुजमॅनला भेटली होती. नंतर लवकरच त्यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलं आहेत. मारिया वाकीना आणि एमली. पतीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एमा जवळपास रोज कोर्टात बसलेली असायची.
मेक्सिकोमध्ये ड्रग्ज कार्टेल्सवर अभ्यास करणाऱ्या पॅरीसच्या सुरक्षा विश्लेषक रोमेन ली कूर ग्रँडमायसन कोरोनेलला 'एक सिनालोआ अप्सरा' असं म्हणतात.
लाल लिपस्टिक, हिऱ्यांचे दागिने आणि पायाला घट्ट असलेली जीन्स परिधान करणारी कोरोनेल 'ब्युकोना' म्हणून शोभेल अशी दिसायची. मेक्सिकोमध्ये ब्युकोना हा शब्द ड्रग्जचा धंदा करणाऱ्याच्या प्रेमिकेसाठी वापरतात.
जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या गुआडालुपे कोरे कबेरा यांनी मेक्सिकोच्या सिनालोआमध्ये अभ्यास केला. याच ठिकाणाहून अल चॅपोचा धंदा चालत होता.
ब्युकोना शब्दाची व्याख्या करताना त्या सांगतात की, "ती फार महागडे कपडे परिधान करते. लुई व्हिताँच्या पर्स वापरते. त्यांचं सर्वकाही भडक असतं आणि कोरोनेल या संपूर्ण वर्णनाप्रमाणेच राहायची. तिनं प्लास्टिक सर्जरीही केली होती. कारण दिखावाच महत्त्वाचा असतो."
कोरे कबेरा यांच्या मते, तिची सर्वाधिक आकर्षित करणारी बाब म्हणजे, तिच्या शरिराचा मागचा भाग, तो अत्यंत 'सुडौल' असल्याचं कोरे सांगतात.

फोटो स्रोत, ALEXANDRIA SHERIFF'S OFFICE VIA GETTY IMAGES
तिचं हे आकर्षक राहणीमान अल् चॅपोच्या कार्टेलच्या सत्यापेक्षा मात्र पूर्णपणे विरोधाभासी होतं.
गुजमॅननं अवैध ड्रग्ज बाजारावर कब्जा करण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्याचा परिणाम म्हणजे त्याचं कुटुंब अधिकाधिक श्रीमंत होत गेलं. 2006 पासून आतापर्यंत मेक्सिकोमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. याच वर्षानंतर सरकरानं कार्टेल्सच्या विरोधात मोहीम सुरू केली होती.
ड्रग्जमुळं झालेल्या हिंसाचाराच्या पीडितांमध्ये गुसमॅनच्या शत्रूंबरोबरच त्यांचे काही जवळचेही सहभागी होते. त्याच्या एका प्रेयसीचा मृतदेह एका कारच्या डिक्कीत सापडला होता. ही हत्या त्याच्या विरोधक गटाकडून करण्यात आली होती.
प्रामाणिकपणाची किंमत
दीर्घकाळापर्यंत गुजमॅनची प्रेमिका राहिलेली लुसेरो गुआदालूपे सांचेज लोपेज हिनं न्यायालयात गुसमॅनच्या विरोधात साक्ष दिली. तिला जून 2017 मध्ये ड्रग्जशी संबंधित आरोपांमध्ये अमेरिका-मेक्सिको सीमेवर अटक करण्यात आली होती.
लुसेरोनं आरोपांची कबुली दिल्यानंतर तिला 10 वर्षांची शिक्षा होईल असं तिला सांगण्यात आलं. दोन मुलांची आई असलेल्या सांचेजनं ते मान्य करत तपासात पोलिसांना मदत केली.
कैद्यांचा निळा गणवेश परिधान केलेल्या सांचेजने न्यायालयात तिचे प्रेम संबंध आणि कार्टेल लीडरम्हणून कामाची माहिती दिली. ती प्रचंड घाबरलेली होती. वारंवार तिच्या डोळ्यांची उघडझाप होत होती. तिच्या काही अंतरावर बसलेला गुसमॅन अत्यंत घाबरलेला होता, तो वारंवारं घड्याळीकडं पाहत होता.
कोरोनेल दुसऱ्या रांगेत बसली होती. लांब केसांमधून तिची बोटं फिरत होती. त्यादिवशी तिनं अगदी तसंच वेल्वेटचं जॅकेट परिधान केलं होते, जसं तिच्या पतीनं परिधान केलेलं होतं.
गुसमॅनचे वकील विल्यम परपुरा म्हणाले की, एकसारखं जॅकेट त्यांच्या मजबूत नात्यांच दर्शक होतं. सांचेज साक्ष देणार होती, त्यादिवशी पतीच्या जॅकेटला मॅचिंग करत एमाला तिला संदेश द्यायचा होता.
परपुरा यांच्या मते, यातून तिला सांगायचं होतं की, "तू खड्ड्यात जा, गुसमॅन फक्त माझा आहे."

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGE
न्यायालयात साक्ष दिल्यानंतर सांचेजला परत तुरुंगात पाठवण्यात आलं. तर कोरोनेल न्यूयॉर्कमध्ये एका डिनरसाठी रवाना झाली.
पण लवकरच या दोन्ही महिलांची परिस्थिती बदलली. सांचेजला सोडण्यात आलं आणि आता ती मुक्त आहे. तर कोरोनेल तुरुंगात असून तिला जामीन मिळवण्यात अडचणी येत आहेत.
खटल्यादरम्यान तिनं ज्या पद्धतीनं तिच्या लाईफस्टाईलचा दिखावा केला, तो कुणालाही आवडला नाही. ज्या पद्धतीनं तिनं पतीबद्दल प्रामाणिकपणा दाखवली तीही, अनेकांना आवडली नाही.
सुरक्षा विश्लेषक ग्रँडमेसन यांच्या मते, 'तिला सगळे मूर्खात काढत आहेत.'
पण सांचेजनं तसा विचार केला नाही.
सांचेजच्या वकील हेदर शेनर यांनी तिला कोरोनेल तुरुंगात गेल्याबद्दल सांगितलं तर तिनं आनंद व्यक्त केला नाही.
तिच्या वकिलांच्या मते, आनंद व्यक्त करण्याऐवजी सांजेचला दुःख झालं कारण तिला वाटलं की, 'एक आई आणि तिच्या मुलांमध्ये यामुळं दुरावा आला आहे.'
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









