ड्रग्जच्या तस्करीसाठी गोदामातच तयार केली पाणबुडी

फोटो स्रोत, SPANISH POLICE
चोरीसाठी कोण काय करेल आणि कोणती क्लृप्ती लढवेल, सांगता येत नाही. असाच प्रकार पहायला मिळाला स्पेनमध्ये.
स्पेनमध्ये ड्रग्ज तस्करीसाठी एकाने चक्क कारखान्याच्या गोडाऊनमध्येच पाणबुडी तयार केली. एक-दोन किलो नाही तर तब्बल 2 टन ड्रग्ज वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी अखेर पोलिसांनी जप्त केली आणि चोरही गजाआड गेला.
ही पाणबुडी 9 मीटर लांब आहे. स्पेनच्या दक्षिणेकडच्या मालागा शहरात एका वेअरहाऊसमध्ये ही पाणबुडी सापडली.
एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला उद्ध्वस्त करण्यासाठी युरोपीय महासंघाची क्राईम एजंसी असणाऱ्या युरोपोल आणि इतर पाच देशांच्या पोलिसांनी मिळून ही मोहीम राबवली होती.
या मोहिमेअंतर्गत संपूर्ण स्पेनमध्ये छापे टाकण्यात आले. यात 52 जणांना ताब्यात घेण्यात आलं तर मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि हशीश जप्त करण्यात आलं. अंमली पदार्थांची एक प्रयोगशाळाही बंद करण्यात आली आहे.
फायबर ग्लास आणि प्लायवुडपासून बनवलेल्या या पाणबुडीतून मोठ्या ड्रगसाठ्याची तस्करी करण्याची योजना होती. मात्र, पोलिसांनी ती आधीच उधळून लावली, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मात्र, स्पेनमध्ये तस्करीसाठी पाणबुडीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी दोनच वर्षांपूर्वी 2019 सालीसुद्धा स्पेनच्या वायव्येकडच्या भागात दोन हजार टन कोकेन भरलेली एक पाणबुडी रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी जप्त केली होती. त्यावेळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
ती पाणबुडी कोलंबियाची असावी, असा त्यावेळी संशय व्यक्त करण्यात आला होता. तिथूनच हा कोकेनचा साठा स्पेनमध्ये आणण्यात आला आहे का, या दिशेने पोलिसांनी तपासही केला होता.
तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणबुडीला 'नार्के-सब्ज' (नार्को-सबमरीन) असं म्हणतात. लॅटिन अमेरिकेहून अमेरिकेत ड्रग्जच्या तस्करीसाठीदेखील अशा नार्को-सब्जचा वापर होतो.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








