ताणतणावाचा शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? तो कसा हाताळावा?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आर्मेन नरसेसिया
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
बहुतांश प्रौढ लोकांना ताणतणावाला सामोरं जावं लागतं. त्यांना डोकेदुखीसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
थोडासा तणाव आपल्यासाठी जरी फायदेशीर असला तरी दीर्घकाळ जर आपण ताणतणावात राहिलो, तर त्यामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो.
वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की खूप जास्त तणावामुळे मानसिक आणि शारीरिक, दोन्ही प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
परिणामी मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकतं. त्याचबरोबर तुमचं आयुष्य कठीण आणि त्रासदायक होऊ शकतं.
अर्थात, ताणतणावावर नियंत्रण मिळवणं आणि त्याचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करणं शक्य आहे.
ताणतणाव म्हणजे काय? आपल्याला ताणतणाव का जाणवतो?
ताणतणाव ही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज होण्याची शरीराची एक पद्धत आहे.


ताणतणाव जाणवल्यावर काय होतं?
ज्यावेळेस तुम्हाला ताणतणाव जाणवतो, त्यावेळेस तुमच्या शरीरातून अशा प्रकारचे हार्मोन स्रवतात, जे तुम्हाला येणाऱ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज करतात.
थोड्या कालावधीसाठी हा तणाव तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. कारण यामुळे तुमचं लक्ष केंद्रीत होतं आणि तुमची काम करण्याची पद्धत अधिक चांगली होते.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार, प्रदीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे तुमच्या शरीरात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, चिंता, ह्रदयविकार आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणं इत्यादी.
काम, पैसे आणि खासगी नातेसंबंध या गोष्टींमुळे अनेकदा तणाव निर्माण होतो. शिवाय त्याकडे दुर्लक्षदेखील केलं जाऊ शकत नाही. मात्र याबाबतीत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ताणतणाव किती काळापर्यंत राहतो.
अॅक्युट स्ट्रेस म्हणजे तीव्र स्वरुपाच्या तणावाचा कालावधी कमी असतो आणि त्याचा फायदादेखील होऊ शकतो. मात्र क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे दीर्घकाळ तशाच राहणाऱ्या तणावाचा शरीरावर वाईट किंवा प्रतिकूल परिणाम होतो.
अॅक्युट आणि क्रॉनिक स्ट्रेस
सायकोथेरेपिस्ट असलेल्या आणि ब्रिटिश असोसिएशन ऑफ काउन्सलिंग अँड सायकोथेरेपी (बीएसीपी) च्या मेंबर असलेल्या रिचेल वोरा म्हणतात, "एखाद्या स्थितीला तात्काळ स्वरुपात दिलेलं उत्तर म्हणजे अॅक्युट स्ट्रेस असतो. काहीवेळा या प्रकारच्या तणाव फायदेशीरदेखील ठरू शकतो."
"अॅड्रेनेलिन आणि कॉर्टिसोल स्रवून त्यामुळे लढण्याची किंवा पळण्याची प्रतिक्रिया सक्रिय होते. त्यामुळे आपला फोकस वाढतो आणि काही काळासाठी आपली पचनशक्ती देखील चांगली होते."
जर अॅक्युट स्ट्रेसचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात आलं तर त्यामुळे कोणताही अपाय होत नाही. या प्रकारच्या तणावामुळे तात्कालिक स्वरूपाच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत होते.
मात्र क्रॉनिक स्ट्रेसचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
वोरा म्हणतात की क्रॉनिक स्ट्रेसचा आपल्या हार्मोनवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा, पचनशक्ती कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोमदेखील होऊ शकतो.
क्रॉनिक स्ट्रेसचा संबंध चिंता (अँक्झायटी) आणि नैराश्य (डिप्रेशन) यांच्यादेखील असतो. या प्रकारच्या तणावाचा आपल्या झोपेवर विपरित परिणाम होतो. तसंच आपलं शारीरिक वय वाढण्यास गती मिळते.
वोरा यांच्या मते, एखादी समस्या किती काळापासून आहे, त्यानुसार क्रॉनिक स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे आपल्या शरीराचं मोठं नुकसान होतं.
ताणतणावाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
युके नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक प्रतिक्रियांची सुरुवात होते. यामध्ये स्ट्रेस हार्मोन, कॉर्टिसोल आणि अॅड्रेनॅलिन स्त्रवण्याचा समावेश आहे.
यामुळे आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब वाढतो. ऑक्सिजनयुक्त रक्त अधिक वेगानं आपल्या मांसपेशीपर्यंत पोहोचतं.
रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे तात्काळ ऊर्जा मिळते.
मात्र यामुळे पचनसंस्था आणि रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. कारण ऊर्जा मिळाल्यामुळे शरीर तात्कालिक स्वरूपाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतं.
प्रदीर्घ काळ तणाव राहणं अपायकारक असतं. क्रॉनिक स्ट्रेसमुळे वजन वाढतं. विशेषकरून पोटाचा घेर वाढतो.
स्ट्रेस हार्मोनचा परिणाम स्मरणशक्तीवर देखील होतो. एकाग्रता करण्यासदेखील अडचण येते.
यामुळे झोप विस्कळीत होते आणि परिणामी शरीराच्या स्वत:च दुरुस्त होण्याच्या, ताजंतवानं होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
एनएचएसनं इशारा दिला आहे की प्रदीर्घ काळ तणाव राहिल्यामुळे हृदयविकार, पचनसंस्थेशी निगडीत समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ताणतणाव फायदेशीर असतो का?
गोलनाज तबिब्निया कॅलिफोर्निया विद्यापीठात सहाय्यक संशोधक प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात, "कणखरपणा ही अशी गोष्ट नाही की जी तुमच्याकडे आहे किंवा नाही. हे एक कौशल्य आहे. ते दीर्घकालावधीत विकसित होतं."
"आव्हानांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांना तोंड दिल्यामुळे कणखरपणा विकसित होतो."
डॉक्टर तबिब्निया यांना वाटतं की जेव्हा लोक तणावाकडे धोक्याऐवजी मदत म्हणून पाहतात, तेव्हा त्यांच्या शारीरिक तणावाची प्रतिक्रिया कमी होते.

फोटो स्रोत, Getty Images
दृष्टीकोनात थोडासा बदल केल्यास त्यामुळे फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे चिंता कमी होऊ शकते.
त्या म्हणाल्या, "तणावाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सातत्यानं त्याला तोंड दिल्यामुळे भविष्यात येणाऱ्या तणावाला तोंड देण्यास मेंदूला मदत होते. हे जिममध्ये जाण्यासारखं आहे. जिममध्ये व्यायाम करताना जास्त वजन उचलणं कठीण तर असतं, मात्र त्यामुळे आपलं शरीर आणखी मजबूत होतं."
ताणतणाव आणि चिंतेमध्ये काय फरक असतो?
अकॅडमिक संशोधनानुसार वर्तणुकीत बदल करण्याचा सराव केल्यास त्यामुळे ताणतणावामुळे होणारं शरीराचं नुकसान कमी होण्यास फायदा होऊ शकतो.
शारीरिक व्यायामामुळे देखील स्ट्रेस हार्मोन कमी होतात आणि मूड चांगला राहतो. ध्यान केल्यामुळे मेंदू शांत होण्यास मदत होते. तसंच संशोधनातून समोर आलं आहे की भावनिक बळ किंवा ताकद देण्यास सामाजिक आधार किंवा सहाय्य महत्त्वाची भूमिका बजावतं.
डॉक्टर तबिब्निया, दयाळूपणा तसंच व्यायाम करणं, बाहेर वेळ घालवणं, लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवणं यासारख्या वैज्ञानिक बाबींवरदेखील भर देतात.

फोटो स्रोत, Getty Images
युकी लंडनमध्ये माइंडफुलनेस प्रशिक्षक आहेत आणि सेवेन ब्रीथच्या संस्थापिका आहेत. व्यापक दृष्टीकोन बाळगण्यावर त्या भर देतात.
त्या म्हणतात, "ताणतणावाचं व्यवस्थापन फक्त रिलॅक्स होणं किंवा आराम करण्यापुरतं नसतं. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी योग्य जीवनशैली अंवलंबण्याशी त्याचा संबंध आहे. जेव्हा तुम्ही स्वत:च्या आरोग्याला महत्त्व देता तेव्हा ताणतणाव हाताळणं सोपं होतं."
माइंडफुलनेस म्हणजे सजग असणं, झोप, चालणं-फिरणं आणि पोषक आहार या गोष्टींना त्या ताणतणावाच्या व्यवस्थापनात महत्त्वाचं मानतात.
त्या म्हणतात, "तुमचं पोट किंवा पचनसंस्था मायक्रोबायोम स्ट्रेसचं व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. चांगला पोषक आहार तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो."
युकी यांच्या मते, ताणतणावाचं व्यवस्थापन ही चटकन साध्य करता येण्यासारखी गोष्ट नाही. याचा समावेश तुमच्या दैनंदिन आयुष्याशी आहे. रोज याची सवय लावली पाहिजे. जेणेकरून तुम्ही अधिक कणखर व्हाल.
ताणतणावाचं रुपांतर शक्तीमध्ये कसं करावं?
आमचे तज्ज्ञ म्हणतात की ताणतणाव आयुष्याचा एक भाग आहे. मात्र त्यातून जी वेदना मिळते ती आवश्यक नाही.
अभ्यासातून समोर आलं आहे की ताणतणाव असतोच असं जे लोक मानतात, ते त्याला अधिक चांगल्याप्रकारे तोंड देतात. त्यांना कमी थकवा जाणवतो आणि भावनिकदृष्ट्या देखील त्यांचं आरोग्य चांगलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या संशोधनानुसार ताणतणावाकडे धोक्याऐवजी आव्हान म्हणून पाहिल्यास त्याचा शरीरावर होणाऱ्या परिणामात महत्त्वाचा बदल होऊ शकतो.
डॉक्टर तबिब्निया म्हणतात, "जेव्हा लोक ताणतणावाकडे धोक्याऐवजी मदत म्हणून पाहतात, तेव्हा त्यांचा मानसिक तणाव कमी होतो."
"ताणतणावाबद्दलचा दृष्टीकोन बदलून एखादी व्यक्ती आव्हानांचं रूपांतर वैयक्तिक प्रगतीसाठीच्या संधीमध्ये करू शकते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











