'एकटेपणा दिवसातून 15 सिगारेट पिण्याइतका धोकादायक'; तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आंद्रे बिर्नेथ
एकटेपणा आणि एकटं राहणं, हे अनेकांच्या जीवनाचा भाग असू शकतो. मात्र, मानसिक आरोग्याच्या दृष्टिने याचे दूरगामी परिणामही होऊ शकतात.
एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे. एकटेपणा दिवसातून 15 सिगारेट पिण्याइतका धोकादायक असल्याचं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
तुम्ही नेहमी आपल्या स्मार्टफोनशी जोडलेले असता, जिथं तुमच्यावर दिवसाला शेकडो मेसेजेसचा भडिमार होतो. परंतु, यामुळं तुम्हाला नेहमीच चांगलं वाटत नाही.
खरं तर, या सततच्या संपर्कामुळं तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळं अनेक जण थोड्याशा शांततेसाठीही आसुसलेले असतात. मग अशा सर्व गोष्टींमध्ये एखाद्या प्रकारचं संतुलन शोधणं शक्य आहे का?
बीबीसीनं यावर आरोग्य तज्ज्ञांचं मत विचारलं.


एकटं राहणं आणि एकटेपणा यात फरक आहे का?
तसं ही जुनी समस्या असली तरी कोविड साथीरोगाच्या काळात दीर्घ काळापर्यंत चाललेला लॉकडाऊन आणि सामाजिक अंतरामुळे लाखो लोकांसाठी एकटेपणा हे आव्हान बनले.
यामुळं अनेकांना एकटेपणा जाणवू लागला.
ब्रिटनमधील शेफिल्ड हॅलम युनिव्हर्सिटीमध्ये एकाकीपणाबद्दल शिकवणाऱ्या अँड्रिया विगफिल्ड म्हणतात की, एकटेपणा ही एक अस्वस्थ करणारी भावना आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तुमचे संबंध तुम्हाला हवे तसे नाहीत असं वाटतं तेव्हा एकटेपणा जाणवतो.
असं तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा तुम्ही तुमच्या नातेसंबंधांची तुलना इतरांशी करता आणि तुमची मैत्री तितकीशी मजबूत नाही, असं तुम्हाला वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
जर तुम्ही एकटे असाल, तर तुम्हाला लवकरच एकटेपणा जाणवू शकतो. मात्र, हेही सत्य आहे की, गर्दीतही तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो.
विगफील्ड इशारा देतात की, आपण आपले नसल्यासारखं वाटणं किंवा आपले संबंध फारसे मजबूत नसल्यासारखं वाटणं यामुळंही आपल्याला दुःखी आणि एकटेपणा वाटू शकतो.
काही भाषांमध्ये लोक एकटेपणा आणि स्वतःहून एकटं राहण्यासाठी समान शब्द वापरतात.
परंतु, स्वतःहून एकटं राहणं थोडं वेगळं आहे. कारण सामान्यपणे काही काळ एकटं राहिल्यानं शांतता आणि आरामाची भावना येते, जाणीव होते.
ब्रिटनमधील डरहॅम युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे (सायकोलॉजी) सहयोगी प्राध्यापक थुई वाय गुयेन म्हणतात की, एकटं राहणं म्हणजे इतरांशी न बोलता एकट्यानं वेळ घालवणं आणि सोशल मीडियावरही कोणाशी संवाद न साधणं.
एकटेपणाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे.
केंब्रिज विद्यापीठाच्या अलीकडील अभ्यासात असं आढळून आलं आहे की, एकटेपणामुळे हृदयरोग, स्ट्रोक (मेंदूला रक्तपुरवठा खंडित होणं) आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
यासोबतच संसर्ग होण्याची शक्यताही वाढते.
विगफिल्ड म्हणतात की, एकटेपणामुळं स्मरणशक्ती कमी होणं, नैराश्य, चिंता आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. याबाबतचे पुरावेही मिळाले आहेत.
असं असलं तरी, एकटेपणामुळे आरोग्याचे नुकसान का होते हे स्पष्ट नाही.

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टरांच्या मते, एकटेपणामुळे शरीरावर अधिक ताण येतो आणि मानसिक कार्य कमी होते.
यामुळं मानसिक आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. एकटेपणा ही एक मोठी समस्या आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, चारपैकी एक वृद्ध व्यक्ती स्वतःला सामाजिकदृष्ट्या एकटं समजतो. त्याच वेळी, 5 ते 15 टक्के किशोरवयीन मुलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो.
काही विशेष समूहांमध्ये त्यांचं वय कितीही असलं तरी त्यांना एकटेपणाचा धोका जास्त असतो.
यात स्थलांतरित, वांशिक अल्पसंख्याक लोक, शरणार्थी, एलजीबीटीक्यू लोक आणि आरोग्य समस्या असलेल्या लोकांचा समावेश आहे.
एकटेपणावर आपण मात कशी करू शकतो?
अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक देशांतील सरकारांनी एकाकीपणाच्या किंवा एकटेपणाचा सामना करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
आता हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कारण आरोग्य सेवा, सामाजिक सेवा आणि अर्थव्यवस्थेतवर याचा खूप पैसा खर्च होत आहे.
संशोधनातून असं दिसून आलं आहे की, दुसऱ्यांची सेवा (व्हॉलिंटियर) केल्यानं एकटेपणा टाळण्यास मदत होऊ शकते.
हाँगकाँगमध्ये, 375 स्वयंसेवकांवर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, तुमचा मोकळा वेळ तुम्हाला आवडेल असं काहीतरी काम करण्यात घालवल्यानं एकटेपणा कमी होऊ शकतो.
विशेषतः वृद्धांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स एकाकीपणा कमी करण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबत आहेत.
ते वृद्ध आणि तरुणांना समुदाय केंद्रे किंवा निवासी क्षेत्रांसारख्या ठिकाणी एकत्र वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनमध्येही 'सोशल प्रिस्क्रिबिंग'ची प्रथा वाढत आहे. तिथं, औषधं देण्याऐवजी, डॉक्टर आता अशा कार्यक्रमांची शिफारस करू शकतात जे एकाकी किंवा एकट्या लोकांना इतरांशी जोडण्यास मदत करतात.
हॉलन लिआंग, एक बाल आणि किशोरवयीन मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, जिथं लोक एकत्र काम करतील आणि प्रत्येक जण तिथं स्वतःला मूल्यवान समजेल, असा सर्वसमावेशक समुदाय तयार करणं महत्वाचं आहे.
"इतरांची ख्याली-खुशाली जाणून घेणं, दयाळू असणं आणि इतरांना मदत करणं यामुळं एकटेपणा टाळण्यास मदत होऊ शकते," असं लिआंग म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, प्रत्येकाने आपल्या नातेसंबंधात आणि मैत्रीत किती आनंदी आहोत हे तपासणं महत्त्वाचं आहे.
तुम्ही एकटेपणाच्या लक्षणांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, जसं की बऱ्याच काळापासून उदास राहणं, लोकांशी भेटण्याची इच्छा नसणं किंवा घरी जास्त वेळ घालवणं.
याशिवाय इतर लक्षणांमध्ये इतरांपासून अलिप्त राहणं किंवा तुमच्या सभोवतालच्या ठिकाणांशी संबंध नसल्यासारखं राहणं यांचा समावेश होतो.
स्वेच्छेनं एकटं राहणं चुकीचं आहे का?
प्रोफेसर गुयेन यावर भर देतात की, मानव हा सामाजिक प्राणी आहे, ज्यांना मजबूत, आश्वासक संबंधांची आवश्यकता आहे. त्यामुळं ते जिवंत राहण्यासाठी काही नियमांचे पालन करतात.
त्या म्हणतात की, "एकट्यानं वेळ घालवणं वाईट आहे, असं लोक नेहमी विचार करतात. कारण आपण एकत्र राहण्याच्या महत्त्वावर जास्त लक्ष केंद्रित करतो. परंतु, एकटं राहिल्यानं आपल्याला शांत आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते."
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगनं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, याचे चांगले आणि वाईट दोन्ही फायदे असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांनी 178 प्रौढ लोकांचे 21 दिवस निरीक्षण केले. या वेळी, त्या लोकांच्या तणावाची पातळी, आनंद, स्वातंत्र्य आणि एकटेपणाच्या भावनांचा मागोवा घेण्यासाठी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
या प्रयोगातून असं दिसून आलं की, एकट्यानं जास्त वेळ घालवल्याने आपला ताण कमी होतो आणि आपल्याला मोकळं वाटतं.
संशोधकांच्या मते, यावरून असं दिसून येतं की एकटं राहिल्यानं शांततेची भावना जाणवते.
दरम्यान, ज्या दिवशी त्या लोकांनी जास्त वेळ एकट्यानं घालवला. त्या दिवशी त्यांना स्वतःला एकाकी आणि कमी समाधानी वाटलं.
स्वतःसाठी चांगले क्षण कसे शोधायचे?
अभ्यास सांगतो की, एकट्यानं वेळ घालवल्याने तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि मोकळेपणास मदत होते.
जेव्हा तुम्हाला खूप तणाव वाटत असेल तेव्हा हे विशेष उपयुक्त ठरू शकते.
एकट्यानं वेळ घालवल्यानं तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकतं आणि तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतं. परंतु, एकट्यानं वेळ घालवणं काही लोकांसाठी कठीण ठरु शकतं.
प्रोफेसर गुयेन यांनी एकट्यानं वेळ घालवण्याची नियमित सवय बनवण्याचा सल्ला दिला आहे. फोन किंवा स्क्रीन न वापरता स्वतःसोबत वेळ घालवण्याचा सल्ला त्या देतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रोफेसर गुयेन म्हणतात, "जेव्हाही लोक मला विचारतात की एकटं राहण्याचा फायदा कसा घ्यावा, मी नेहमी लहान गोष्टींपासून सुरुवात करण्याचा सल्ला देते. म्हणजे दिवसातून फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढा."
या अल्प काळात, तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला काय करायला आवडतं यावर लक्ष ठेवू शकता. जसजसं दिवस जातील तसतसं तुम्ही हा एकटा वेळ मिनिटा-मिनिटानं वाढवू शकता.
"कधीकधी लोकांना काही दिवस त्यांचा स्क्रीन टाइम किंवा सोशल मीडियाचा वापर कमी करायचा असतो. यामुळं त्यांना त्रास होऊ शकतो आणि त्यांना भविष्यात पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा राहत नाही," असं त्या म्हणाल्या.
एकटं राहण्याच्या काही मर्यादा आहेत का?
युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या डेटावरून असं दिसून आलं आहे की, ज्या दिवशी लोक जास्त वेळ एकटेपणात घालवतात. तेव्हा त्यांना जास्त एकटेपणा आणि आनंद किंवा उत्साहात कमतरता जाणवते.
जरी त्यांनी एकटं राहणं स्वेच्छेनं निवडलं असलं तरी यामुळं त्यांना चांगलं वाटत नाही. मात्र, अनेक दिवस या भावना त्यांना जाणवत नाहीत.
गुयेन यांच्या मते, एकटेपणाच्या वेळेचे योग्य संतुलन तयार करण्यासाठी तासांची कुठलीही संख्या निश्चित नाही. त्याऐवजी, वेळ किती चांगली आणि सकारात्मक आहे यावर ते अवलंबून आहे.
त्या म्हणतात की, काही संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जेव्हा आपण जागे असण्याच्या दरम्यान 75 टक्के वेळ एकटे असतो तेव्हा एकाकीपणाची सुरुवात होते.

गुयेन म्हणाल्या की, एकटं राहण्याची योग्य वेळ प्रत्येकासाठी वेगळी असते आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला कसं वाटतं यावर ते अवलंबून असतं. पण तुम्ही एकटे असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?
तज्ज्ञ अशा गोष्टी करण्याची शिफारस करतात, ज्या तुमचं मन सक्रिय ठेवतात आणि तुम्हाला आराम करण्यास मदत करतात.
यासाठी आपल्याकडे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. जसं वाचन, बागकाम, निसर्गात फिरणं, गाणी ऐकणं, स्वयंपाक करणं आणि सजावटीच्या वस्तू बनवणं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











