एकटं वाटतंय? उदास वाटतंय? मग हा उपाय करुन पाहा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जुलिया होत्झ
आदिम काळापासून माणसाचं निसर्गाशी घट्ट नातं होतं. माणसाच्या शारीरिक आणि मानसिक गरजा निसर्गात पूर्ण होत होत्या.
मात्र गेल्या काही दशकांमध्ये माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यातच धकाधकीचं, स्पर्धेचं जीवन, नातेसंबंधांमधील ताणतणाव याचा अनेकांच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो आहे.
अनेकांना एकाकीपणा जाणवतो आहे. अशावेळी निसर्गाचा सहवास, सामूहिकपणे निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ याचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? याबद्दल माहिती देणारा हा लेख.
माणसाच्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांच्या बाबतीत निसर्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी दिवसेंदिवस वाढतेच आहे. आता संशोधकांचं म्हणणं आहे की एकाकीपणावर देखील 'निसर्ग' औषध ठरू शकतो.
काय अझिझ (Kye Aziz) हे काही स्वत:ला मोठा निसर्गप्रेमी मानत नव्हते. मूळचे इंडोनेशियातील असणारे अझिझ आता मेलबॉर्नमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी काही काळ उंचावरच्या प्रदेशात आणि बाहेरच्या भागात घालवला होता.
मात्र जेव्हा त्यांनी समाजात मिसळण्यासाठी पिकनिकला जाण्यास सुरूवात केली आणि बागकामाशी निगडीत सहलींना जाऊ लागले त्यानंतर निसर्गाकडे ते एका नवीन दृष्टीकोनातून पाहू लागले.
अझिझ म्हणतात, "तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला एका वेगळ्याच जगात नेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाश्चात्य संस्कृती राहणं खूपच एकाकीपणाचं आणि व्यक्तीवादी असू शकतं. मात्र जेव्हा आपण बाहेरच्या दुनियेत बसतो, हसतो आणि एकत्र येणं अनुभवतो, तेव्हा ते अगदी घरासारखंच वाटतं."
जंगलात, निसर्गात वावरण्याचं महत्त्व
मात्र अशी भावना मनात येण्यामागे एक विज्ञान आहे. 1980 च्या दशकात, शहरी भागातील तणावग्रस्त कामगारांना निसर्गाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य मिळवून देण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्याच्यासंदर्भातील प्रयत्नांअंतर्गत जपान सरकारनं "शिनरिन्योकू" (shinrinyoku)या मोहिमेला सुरुवात केली.
"शिनरिन्योकू"चा शब्दशः अर्थ होतो जंगलस्नान. ही एक प्राचीन जपानी थेरपी आहे. यात जंगलात जाऊन शांतपणे निसर्गाचा आनंद घेतला जातो.
"सुरुवातीच्या टप्प्यात हे विज्ञान नव्हतं, तर ती एक भावना होती," असं किंग ली म्हणतात. ते डॉक्टर आहेत आणि टोकियोतील निप्पॉन मेडिकल स्कूलमध्ये क्लिनिकल प्राध्यापक आहेत.
मात्र अलीकडच्या दशकांमध्ये किंग ली आणि इतर संशोधकांनी या जंगलस्नानाच्या संकल्पनेचा वापर रक्तदाब कमी करणं, मज्जासंस्था स्थिर करणं, तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी करणं, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, चिंता, नैराश्य, राग आणि थकवा कमी करणं या गोष्टींसाठी केला जातो आहे.


दिवंगत निसर्गशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांच्या मते, आरोग्याला होणारे हे फायदे "बायोफिलिया"मुळे होतात. बायोफिलिया म्हणजे निसर्गावरील आपलं जन्मजात प्रेम. हे प्रेम वनस्पती, झाडं, पशुपक्षी आणि इतर मानवांशी संवाद साधण्याच्या जगभरात सर्वत्र आढळणाऱ्या प्रवृत्तीला चालना देतं.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यामुळे आपल्याला शांत वाटतं आणि तणाव दूर होत तुम्ही वर्तमानात जगू लागता. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे एकाकीपणा आणणाऱ्या आत्मघातकी विचारांवर मात करण्यास मदत होते. अर्थात ही बाब वस्तुनिष्ठ नसते तर ती व्यक्तीपरत्वे येणारा अनुभव असतो.
एका अभ्यासातून असं दिसून आलं की निसर्गात वेळ घालवल्यानं सबजेनुअल प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील मज्जातंतूंची क्रिया कमी होते. मेंदूचा हा भाग नकारात्मक विचार, चिंता करणं आणि एकाकीपणाशी संबंधित असतो.
निसर्गाच्या आधारे समाजात मिसळण्याचा हा जागतिक पातळीवरील अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. त्याची व्याप्ती इक्वेडोर पासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत आहे.
या प्रयोगातून सुरुवातीच्या टप्प्यात समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, इतरांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास त्यामुळे आरोग्य, आरोग्यसेवा आणि एकाकीपणामध्ये नाट्यमय बदल घडू शकतो.

फोटो स्रोत, Nerkez Opacin Recetas Melbourne
जिल लिट या अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात पर्यावरणीय अभ्यास आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांच्या संशोधक आहेत.
लिट म्हणतात, "जेव्हा लोक घराबाहेर निसर्गात असतात, तेव्हा ते निवांतपणाबद्दल बोलतात, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून, आयुष्यातील ताणतणावांपासून दूर राहण्याबद्दल बोलतात आणि तसं राहिल्यानं त्यांना किती छान वाटतं हे देखील सांगतात."
"मानवाला बदलांसाठी तयार करण्यास आणि नवे अनुभव घेण्यासाठीचा खुलेपणा मानवात आणण्यात निसर्ग खूप उपयुक्त ठरतो."
2019 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे एकाकीपणा ही एक जागतिक पातळीवरील आरोग्याची समस्या झाली. मात्र तसं होण्यापूर्वीच या समस्येवर मात करण्यासाठी त्यावर उपाय शोधण्याची लिट यांची कल्पना होती.
सामुदायिक बागकामाच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांचं निरीक्षण करत असताना, "मातीचे भरलेले हात आणि इतरांबरोबर राहणं खरोखरंच किती महत्त्वाचं आहे", हे लिट यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर, पक्षी निरीक्षण, निसर्गात पायी फिरणं यासारख्या निसर्गातील गटानं करण्यात येणाऱ्या इतर कृतींबद्दल लिट यांच्या मनात कुतुहल निर्माण झालं.
तसंच विक विद्यापीठ या बार्सिलोनातील केंद्रीय विद्यापीठात डॉक्टर असलेल्या आणि सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील संशोधक असलेल्या लॉरा कॉल-प्लानस यांचं सह-लेखन असलेला एक शोधनिबंध वाचल्यानंतर, एकाकीपणावर मात करण्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात करण्यात येणाऱ्या या मानवी कृतींच्या क्षमतेबद्दल लिट यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
"निसर्गाचं महत्त्वं समजून त्याच्याशी जोडून घेणं, घराबाहेरच्या म्हणजे निसर्गातील किंवा मोकळ्या जगातील कृतींमध्ये भाग घेणं आणि अधिक सामाजिक होणं, एखाद्या गटाशी जोडून घेणं, जर या तीन गोष्टी आपण एकत्र करू शकलो तर काय होईल?"
रेसेटस नावाचं संशोधन
बार्सिलोनातील कॉल-प्लानस आणि प्राग, मार्सिले, हेलसिंकी, मेलबॉर्न आणि क्युएन्का (इक्वेडोअर) मधील इतर संशोधकांचा समावेश करून लिट यांच्या टीमनं एक संशोधन प्रस्ताव तयार केला. या अभ्यासाला ते 'रेसेटस' (Recetas)असं म्हणतात.
रेसेटस म्हणजे एकाकीपणा दूर करण्यासाठी, आरोग्य वाढवण्यासाठी आणि आरोग्यसेवेवरील दबाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या आधारे रुग्णांना इतर समुदायाशी किंवा गटांशी जोडण्यासंदर्भात सहा देशांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी अभ्यास करण्याचा प्रकल्प.

फोटो स्रोत, Karla Vásquez Recetas Cuenca
रेसेटसचं हे चौथं वर्ष आहे. रेसेटस प्रकल्पात सध्या चाचण्या सुरू आहेत आणि स्थानिक आरोग्य व्यवस्थांकडून त्याला आधीच मदत मिळते आहे, असं लिट सांगतात.
त्या पुढे म्हणतात, "जर रेसेटस यशस्वी झाला तर आरोग्यसेवेच्या मॉडेलमध्ये खरोखरंच बदल होत ते अधिक व्यक्ती-केंद्रित होईल. त्यामुळे औषधोपचारांवरील अवलंबित्व कमी होईल आणि आरोग्याचं व्यवस्थापनाचा भाग म्हणून आपल्या समुदायांचा वापर होईल."
रेसेटसचा संशोधन प्रकल्प कॉल-प्लानस आणि लिट यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सुरू आहे. ते बार्सिलोना इस्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थमध्ये देखील काम करतात. रेसेटस हा अभ्यास पुराव्यांच्या दोन वाढत्या गटांवर आधारित आहे.
पाककलेच्या वर्गांपासून ते कलेच्या कार्यशाळांपर्यंत निसर्गाशी सामूहिकरित्या जोडून घेण्याचे सर्व मार्ग एकाकीपणाची भावना कमी करून शकतात असं अभ्यासातून दिसून आलं आहे. तर संशोधकांनी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यामुळे आरोग्याला होणाऱ्या अनेक फायद्यांची नोंद केली आहे.
उदाहरणार्थ, युकेतील एक्सेटर विद्यापीठामध्ये अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांना असं आढळलं की निसर्गाच्या सान्निध्यात सामूहिकपणे राहिल्यास त्या भाग घेणाऱ्या लोकांच्या आनंदात लक्षणीय वाढ झाली.
त्यांची चिंता कमी झाली आणि जीवनाविषयीच्या समाधानातदेखील लक्षणीय वाढ झाली. इतकंच नाही तर, त्यामुळे त्यांचा वैद्यकीय खर्चदेखील कमी झाला.
निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याचे फायदे
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात असं दिसून आलं आहे की निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास त्यामुळे रक्तदाब देखील कमी होतो.
मात्र निसर्गात सामूहिकरित्या वेळ घालवल्यास त्याचा एकाकीपणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठीच्या सर्वात मोठ्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न रेसेटसमधून विशेषकरून दिसून येतो.
कॉल-प्लानस म्हणतात, "आपल्या वेगवान, धावपळीच्या जगात इतर व्यक्तींबरोबर समोरासमोर दोन तास बसणं ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूपच क्रांताकारी आणि शक्तीशाली बाब आहे."
"मात्र अशाप्रकारचं संशोधन आम्ही बाहेर, खुल्या वातावरणात, निसर्गात पहिल्यांदाच करत आहोत. निसर्गामुळे एक वेगळ्याच प्रकारचे सामाजिक संबंध कसे तयार होतात, ते आपण आधीच पाहत आहोत."
यातील काही फायदे हे तुम्ही कशा वातावरणात राहतात त्यावरही अवलंबून असतात. एका अभ्यासात आढळलं आहे की ज्या लोकांच्या घराजवळ जास्त हिरवागार परिसर असतो, त्यांच्यात एकाकीपणा कमी प्रमाणात असतो.
त्याउलट जे लोक "एकाकीपण" निर्माण करणाऱ्या वातावरणात राहतात, जे कारवर अधिक अवलंबून असतात आणि ज्यांच्या घराभोवती झाडं किंवा हिरवागार परिसर नसतो, त्यांचे सामाजिक संबंध तुलनेनं कमकुवत राहण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
यासंदर्भातील आणखी एक दृष्टीकोन असं सुचवतो की निसर्गामुळे अद्भूतपणे आपलं लक्ष, दृष्टीकोन बदलतो. अशाप्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास आपण भूतकाळातील नकारात्मक संवादांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तमानात अधिक सकारात्मक सामाजिक संवाद साधण्यास प्रवृत्त होऊ शकतो.
"काहीजण आम्हाला सांगतात की ते बाहेर मोकळ्या जगात, निसर्गात असताना त्यांना खूपच छान वाटतं. मात्र जेव्हा ते घरी परतात, तेव्हा ते पुन्हा एकदा त्याच नकारात्मक मानसिक अवस्थेत येतात," असं कॉल प्लानस म्हणतात.
असं असूनही संशोधक याबाबत सहमत आहेत की आपल्याला आपल्या भूतकाळाची आठवण करून देण्याची निसर्गाची ताकद देखील मोठी असू शकते.
"एखाद्या गोष्टीची आठवण काढत असल्यासारखं निसर्गाबद्दल बरंचकाही बोलताना आम्ही लोकांना पाहिलं आहे. यातून त्यांना त्यांचं बालपण किंवा त्यांच्या आजीबरोबर घालवलेला वेळ किंवा इतर चांगले क्षण आठवतात," असं लिट म्हणतात.
नेर्केझ ओपासिन, ऑस्ट्रेलियातील रॉयल मेलबॉर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सामाजिक अभ्यासाचे संशोधक आहेत. त्याचं हेच ध्येय आहे.
ते 'मेनी कलर्ड स्काय' या एका स्थानिक रेसेटस समुदायाशी संलग्न आणि स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करतात. ही संस्था अझिझ सारख्या आश्रय शोधणाऱ्या समलैंगिकांसाठी काम करते.
नेर्केझ म्हणतात, "निसर्ग अनेकदा जुन्या आठवणी आणि घराच्या सुंदर आठवणी पुन्हा जिवंत करतो. जर आमच्या उपक्रमात सहभागी असलेले बरेचजण त्यांचं घर सोडून गेलेले असले तरी निसर्ग त्यांना तिथे सुरक्षित वाटत होतं त्या काळाची आठवण करून देतो. ही भावना नेहमीच एक सकारात्मक भावना असते."
आपलेपणा निर्माण करण्यासाठी निसर्गाची मदत
विशेषकरून जेव्हापासून ऑस्ट्रेलियातील आश्रय देण्यासंदर्भातील सेवा "एलजीबीटीआयक्यूए+ प्रकारातील आश्रय घेणाऱ्या व्यक्तींसाठी आणि निर्वासितांसाठी खरोखरंच आव्हानात्मक असू शकतात, तेव्हा या प्रकारची भावना निर्माण होऊ शकते."
"निसर्गाच्या सान्निध्यात मजेदार गोष्टींची" आखणी करणं आणि लोकांमध्ये "फक्त एकमेकांबद्दल नव्हे तर त्यांच्या नव्या घराबद्दल देखील" आपलेपणाची भावना निर्माण करण्यास मदत करणं, हेच त्यांचं ध्येय असल्याचं ओपसिन म्हणतात.
"आठ आठवड्यांच्या कालावधीत यात अनेक मजेदार गोष्टींचा समावेश आहे. त्यात वटवाघुळांचं निरीक्षण करणं, समुद्रकिनारी फेरफटका मारणं आणि "निसर्गात फिरत बाहेर जात वेगवेगळ्या वनस्पतींचा वास घेणं" ज्याला आम्ही "स्निफ-फारी" (sniff-fari) म्हणतात," असं ओपासिन सांगतात.
या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ओपासिन आणि इतर पाच सहाय्यक "सह-निर्मितीवर" लक्ष केंद्रित करतात. त्यात ते या उपक्रमात सहभागी झालेल्यांच्या आवडीनुसार आणि स्थानिक पातळीवर काय उपलब्ध आहे, यानुसार सामूहिक क्रियांची आखणी करतात.

फोटो स्रोत, Getty Images
काहीवेळा "अशा कृतींमध्ये निसर्ग खूपच निष्क्रिय असतो". उदाहरणार्थ जेव्हा ते बाहेर एकत्र जेवतात, असं ओपासिन म्हणतात.
"तो काही सुरुवातीच्या हस्तक्षेपाचा भाग नव्हता. मात्र एकत्र जेवणं हा आमच्या सदस्यांसाठी निसर्गात फिरण्याआधी फक्त पोट भरण्यापुरतीच आकर्षणाची बाब नव्हती, तर त्यांचा आपपसातील संभाषण सुरू करण्याचा, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल बोलण्याचा आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा तो एक मार्ग देखील होता," असं ओपासिन म्हणतात.
एकाकीपणा कमी करण्यास मदत करणं, हे रेसेटसचं ध्येय असलं तरी त्याबद्दल बोलणं हे एक आव्हान असं असू शकतं, असं ओपासिन म्हणतात.
"याबाबत आम्ही अधिक आग्रही न होण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही जर सतत एकाकीपणाबद्दल बोलत राहिलात तर लोकं खूप भावनाविवश होतात. त्यामुळे आम्ही समाजात मिसळणं, मित्र जोडणं आणि आपलेपणा वाटणं म्हणजे काय याबद्दल बोलतो," असं ते पुढे म्हणतात.
अझिझसाठी ते उपयुक्त ठरलं. कोणत्याही एका व्यक्तीबरोबर मैत्री करण्यापेक्षा ते एका संपूर्ण गटाशी जोडले गेल्याचं अझिझ सांगतात. तसंच त्या गटात त्यांना जो दिलासा आणि आपलेपणा जाणवला त्याबद्दलदेखील ते सांगतात.
"जेव्हा आमचा तो गट विभक्त होत होता, तेव्हा आपण काय गमावणार आहोत, आपल्याला कसली उणीव भासणार आहे याची मला जाणीव झाली. दर आठवड्याला त्याच लोकांना भेटण्याची, निसर्गाच्या सान्निध्यात काहीवेळ घालवण्याची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारी त्या दीनचर्येची मला आठवण येणार आहे, त्याची उणीव भासणार आहे. या दिनचर्येनं, त्यांच्याबरोबर निसर्गात वेळ घालवण्यामुळे माझा एकाकीपणा संपला," असं अझिझ म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











