कोव्हिडनंतरची पाच वर्षं, महासाथीनंतर आपण काय धडा घेतला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इसाबेल कारो
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली याच काळात संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं होतं. कोव्हिड-19 या महासाथीमुळं संपूर्ण जगातील मनुष्यप्राण्यांवर संकट आलं होतं. लॉकडाऊन, क्वारंटाईन, लस (व्हॅक्सिन) हे शब्द त्यावेळी परवलीचे झाले होते.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोव्हिडला 11 मार्च 2020 रोजी याला 'महासाथ' घोषित केलं होतं.
यानंतर, या काळात सरकारनं सुमारे 260 कोटी लोकांना लॉकडाऊनमध्ये ठेवलं. या लोकांना अनेक महिने क्वारंटाईनमध्ये राहावं लागलं होतं.
या संघटनेच्या म्हणण्यानुसार, 77 कोटी 70 लाखांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आणि 70 लाख लोकांचा यात मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रानुसार, मृतांची संख्या 1 कोटी 50 लाखांच्या पुढे गेली आहे.
या साथीच्या आजाराचे घातक परिणाम अजूनही जगाला दिसत आहेत. परंतु काही विश्लेषक या भीषण काळातील काही सकारात्मक गोष्टींकडे लक्ष वेधत आहेत.

तणाव-ट्रॉमाचे तज्ज्ञ आणि बेल्जियममधील व्रीज विद्यापीठातील आरोग्य मानसशास्त्राचे प्राध्यापक एल्के व्हॅन हूफ यांनी लॉकडाउनला 'इतिहासातील सर्वात मोठा मानसिक प्रयोग' म्हटलं आहे.

या काळात शास्त्रज्ञांनी जगभरातील लसीकरणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. सार्स-कोव-2 विषाणूचा सामना करण्यासाठी अवघ्या नऊ महिन्यांत लस तयार करण्यात आली.
सिंथेटिक मेसेंजर आरएनए (एम आरएनए) वापरून मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम विकसित करण्याचा अभ्यास अनेक वर्षांपासून सुरू होता. परंतु, कोव्हिड-19 दरम्यान त्याचा विकास वेगानं झाला.
एम आरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून, फायजर (यूएसए), बायोएनटेक (जर्मनी) आणि मॉर्डना (यूएस) यांनी त्यांच्या लसींचं विक्रमी वेळेत उत्पादन केलं. त्यामुळं लाखो लोकांचे वेळेवर लसीकरण करता आले.
ब्रिटनमधील मार्गारेट कीनन या 90 वर्षीय महिलेला 8 डिसेंबर 2020 रोजी पाश्चात्य जगात पहिली कोरोना लस देण्यात आली. ही लस तयार करणारे कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन या शास्त्रज्ञांना 2023 मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
WHOच्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. मार्गारेट हॅरिस यांनी लस बनवण्याच्या या स्पर्धेचं वर्णन कोरोना महामारीच्या काळातील सर्वात मोठा सकारात्मक वारसा म्हणून केले आहे.
"आम्ही अविश्वसनीय वेगानं तांत्रिक प्रगती पाहिली आहे," असं डॉ. हॅरिस यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
त्या म्हणतात, "मेसेंजर आरएनए तंत्रज्ञान आधीच माहीत होतं. परंतु, आता आपण कर्करोगासह इतर लसींमध्ये त्याचा वापर पाहत आहोत."
'प्रिव्हेंटेबलः हाऊ अ पॅनडेमिक चेंज्ड द वर्ल्ड अँड हाऊ टू स्टॉप द नेक्स्ट वन' या पुस्तकाच्या लेखिका आणि एडिनबर्ग विद्यापीठातील प्राध्यापिका, देवी श्रीधर म्हणतात की, साथीच्या आजारातून मिळालेल्या धड्यामुळं नवीन विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेगानं शोध घेण्यात आणि तो ओळखण्यात मदत झाली आहे.

त्या म्हणतात, "आमच्या वैज्ञानिक क्षमतेत सुधारणा झाली आहे. आमचे प्लॅटफॉर्म सतत प्रगत होत आहेत. या महामारीच्या सुरूवातीस आमच्यासमोर एखादी लस येईल का असा प्रश्न होता. पण आता परिस्थिती अशी आहे की, 'आम्ही किती लवकर लस बनवू शकतो?"
त्या म्हणाल्या की, यातून आम्हाला पुढील महामारीसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार राहण्याचा धडाही मिळाला आहे.
उदाहरणार्थ, ज्या देशांनी "चांगली कामगिरी केली आहे, ते असे देश आहेत ज्यांची लोकसंख्या या साथीच्या रोगापूर्वी निरोगी होती."

कोव्हिड -19 दरम्यान शाळा बंद झाल्यामुळं जगभरातील मुलांवर नकारात्मक परिणाम झाला.
इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँकेच्या (आयडीबी) शिक्षण विभागाचे प्रमुख मर्सिडीज माटेओ यांच्या मते, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शाळा सोडण्याचं प्रमाण आणि शिक्षणातील विलंब यात मोठी वाढ झाली आहे. ही साथीच्या आजारातील सर्वात खोल जखमांपैकी एक आहे.
असं असूनही, माटेओ यांना शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतात. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "21 व्या शतकातील शिक्षणावरील चर्चेला पुढं नेणं आणि शिक्षण प्रणालींचा पुनर्विचार करणं याचा खूप सकारात्मक परिणाम झाला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणाल्या, "साथीच्या रोगाच्या काळात हे स्पष्ट झालं की, शिक्षण क्षेत्र हे सर्वात कमी डिजिटल क्षेत्रांपैकी एक आहे. त्यात बदल करण्यासाठी खूप अडथळे आले. पण कोविड-19 ने ते आणखी लवचिक आणि हायब्रिड होण्यास भाग पाडले.
"याचाच परिणाम म्हणजे क्लासेस किंवा वर्गामधूनच शिक्षण देण्याचा विचार मागे पडल्याचं मोटेओ सांगतात. या काळात, शाळा झपाट्यानं बंद झाल्यामुळं, अनेक देशांमध्ये शिक्षण राजकीय अजेंड्यावर आले आहे. साथीच्या रोगानं समाजातील शाळांच्या भूमिकेबद्दलही अधिक जागरूकता निर्माण केली," माटेओ यांनी सांगितलं.

कोव्हिड-19 चा सर्वात गंभीर परिणाम थेट युवा आणि महिलांच्या रोजगारावर झाला. कोरोना साथीमुळं रोजगाराच्या संधी कमी झाल्या आणि गरिबी वाढली. जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील हे आता सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे.
लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशासाठी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयातील कामगार अर्थशास्त्र तज्ज्ञ गेर्सन मार्टिनेझ म्हणतात की, कोरोना काळातील सुट्ट्यांमुळे देशांना मंदी टाळण्यास प्रभावीपणे मदत झाली.
या धोरणांमुळे आर्थिक सुधारणांना वेग आला आहे यात कोणतीही शंका नाही.

फोटो स्रोत, Getty Images
नोकऱ्यांमध्ये झपाट्याने सुधारणा झाली असली तरी, भू-राजकीय तणाव, हवामान बदल आणि वाढत्या राष्ट्रीय कर्जासारख्या आर्थिक दबावांमुळे ही सुधारणा मंदावत असल्याचा इशारा आयएलओनं नुकत्याच दिलेल्या अहवालात दिला आहे.
कोविड-19 दरम्यान रिमोट आणि हायब्रिड कामात झालेला बदल स्पष्ट आहे. कार्यालयात जाऊन काम करण्याचा दबाव असतानाही अनेक जागतिक कंपन्या हायब्रीड कामाच्या ठिकाणाचा फायदा घेत आहेत.
अनेक देशांनी कार्यालयाबाहेरून काम करण्यासाठी कायदेही केले आहेत. यासाठी आयर्लंड आणि फ्रान्स सारख्या देशांचं उदाहरण देता येईल. या देशांमध्ये 'डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार' सारख्या कायद्यांचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त, तांत्रिक क्रांतीने उत्पादकता वेगाने वाढवण्याची "सुवर्ण संधी" देखील आणली आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास आता विविध उद्योगांमध्ये एआयचा वापर सुरु झाला आहे.

या साथीच्या आजारानं जगाला अनिश्चितता, एकटेपणा, भीती आणि वेदना यांच्या वेदनादायक तुरुंगात बदललं आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) सारख्या संस्थांनी साथीच्या आजारानंतर नैराश्य, चिंता विकारात वाढ, आत्महत्येचे वर्तन आणि विचारांच्या व्यापकतेवर सखोल अभ्यास केला आहे.

मानसशास्त्रज्ञ लॉरा रोजास-मार्कोस या चिंता, तणाव आणि नैराश्य यातील तज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात की, "साथीच्या आजारानं आपल्या भावनिक स्मरणशक्तीवर आणि आपल्या नातेसंबंध तयार करण्याच्या पद्धतीवर परिणाम केला आहे. परंतु, तो केवळ दुःखाचाच नाही तर शिकण्याचाही एक टर्निंग पॉइंट ठरला आहे."
त्या म्हणतात, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या महत्त्वाबद्दल आता आपण अधिक जागरूक झालो आहोत, "हे शरीरापासून वेगळं नाही, तर पूर्णपणे जोडलेले आहे."
त्या पुढं म्हणतात, " लोकांना त्यांच्या आयुष्यात मागं वळून पाहण्याची संधी मिळाली. या काळात ते स्वतःचं किंवा पर्यावरणाचं अस्तित्व हलक्यात न घेण्यास शिकले."

फोटो स्रोत, Getty Images
एक तृतीयांश लोकांना महामारीपूर्वीच्या तुलनेत आता बरं वाटतंय, असं बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिसने 30 देशांमध्ये ग्लोबस्कॅनद्वारे केलेल्या 2022 च्या सर्वेक्षण अभ्यासात आढळून आलं आहे.
यापैकी बऱ्याच लोकांनी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवणं, समाज आणि निसर्गाशी चांगल्या पद्धतीनं जोडलं जाणं आणि त्यांच्या एकूण प्राधान्यांबद्दल अधिक स्पष्टपणे जाणून घेण्याबद्दल चर्चा केली.
या बदलांचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
या संकटामुळं मानसशास्त्रज्ञांच्या उपचार पद्धतीत कायमस्वरूपी आणि क्रांतिकारक बदल झाला. यामध्ये व्हिडिओ कॉलिंगचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यात आला आहे.
साथीच्या आजारानं आम्हाला लवचिकता आणि मानवी करुणेबद्दल विचार करण्यास भाग पाडलं. तो आपल्या स्वभावाचा गाभा आहे. या शोकांतिकेत एकतेचे हे उज्ज्वल क्षण होते, असं रोजस-मार्को यांना वाटतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











