कोरोना व्हायरस 'चीनच्या लॅब'मधून पसरल्याची शक्यता, अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA चा दावा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हॉली हॉन्डरिक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, वॉशिंग्टन
कोव्हिड-19 च्या प्रवाभाने संपूर्ण जगात दहशत पसरवली होती. लाखो लोकांचे जीव यात गेले, कित्येकांनी आपल्या प्रियजनांना डोळ्यादेखत गमावले. या महासाथीचा उद्रेक कसा झाला याबाबत अमेरिकन गुप्तहेर संस्था (CIA) शनिवारी (25 जानेवारी) एक अहवाल जारी केलाय.
CIAने सादर केलेल्या या अहवालानुसार कोरोना विषाणूचा प्रसार प्राण्यांपासून नव्हे तर चीनमधील लॅबमधून झाल्याची जास्त शक्यता आहे. मात्र, त्यांना या अहवालावर पूर्ण खात्री नसल्याचे म्हटले आहे.
याबाबत बोलताना सीआयएचे प्रवक्ते म्हणाले की, उपलब्ध अहवालांच्या आधारानुसार या महासाथीचा उद्रेक नैसर्गिकरीत्या नव्हे तर तो 'संशोधनादरम्यान पसरल्याची' शक्यता अधिक आहे, असं दिसून येतं.
मात्र, चीनने यापूर्वीच अशा दाव्यांवर आक्षेप नोंदवला आहे. याआधीही चीनवर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. मात्र, कोरोना विषाणू लॅबमधून पसरला नसल्याचं म्हणत हे आरोप त्यांनी फेटाळले होते.
दरम्यान, CIAचे नवे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी हा नवीन अहवाल जाहीर केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच त्यांची CIAच्या संचालकपदी नियुक्ती केली.
गुरुवारपासून त्यांनी संस्थेचा कार्यभार स्वीकारला असून यानंतर त्यांनी घेतलेल्या त्यांच्या पहिल्या निर्णंयापैकी हा एक आहे.
या अहवालात काय म्हटलंय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात रॅटक्लिफ यांनी राष्ट्रीय गुप्तहेर संचालक म्हणून काम पाहिले होते.
ते बऱ्याच काळापासून लॅब लीक सिद्धांताचे समर्थन करत आहेत. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये गळती झाल्यामुळे कोव्हिड विषाणू पसरला असावा, असा त्यांचा दावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही संस्था ह्यूनान वेट मार्केटपासून 40 मिनिटांच्या अंतरावर आहे, जिथे कोरोना संक्रमणाचा पहिला क्लस्टर आढळून आला होता.
शुक्रवारी ब्रेइटबार्ट न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत रॅटक्लिफ म्हणाले की, CIAने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबद्दल आपली तटस्थ भूमिका सोडावी आणि सक्रिय होऊन काम करावं, अशी त्यांची इच्छा आहे.
रॅटक्लिफ म्हणाले, "मी ज्या मुद्द्यांबाबत वारंवार बोलत आलोय, त्यापैकी एक म्हणजे चीनकडून येणाऱ्या धोक्यांना विविध स्तरांवर सामोरं जाण्याशी आहे. तसेच, 10 लाख अमेरिकन नागरिकांचा मृत्यू का झाला? त्यामागचं कारण समजून घेण्याची गरज आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे बोलताना ते म्हणाले, "केंद्रीय गुप्तहेर संस्थेने पाच वर्षांपर्यंत कोव्हिडच्या उद्रेकाबाबत कोणतंही मूल्यांकन का केलं नाही? ते गप्प का राहिले," असा सवाल उपस्थित केला.
तर अधिकाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितले की, नवा अहवाल कोणत्याही नव्या गोपनीय माहितीवर आधारित नाही. ट्रम्प प्रशासनाचे हे अगोदरपासूनच म्हणणे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असं म्हटलं जातंय की या पुनरावलोकनाचा आदेश जो बायडन प्रशासनाच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता आणि सोमवारी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच याचे हा अहवाल तयार करण्यात आला.
तथापि, शनिवारी सादर करण्यात आलेला अहवालावर पूर्णपणे खात्री नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की या निष्कर्षाला पाठिंबा देणारी गुप्तहेर माहिती अपूर्ण, अनिश्चित किंवा विरोधाभासी आहे.


कोव्हिड उद्रेकाच्या उत्पत्तीवर एकमत नाही
काही लोक कोव्हिड महासाथीचा उद्रेक 'नैसर्गिकरीत्या झाल्याच्या सिद्धांताचे समर्थन करतात. त्यानुसार, कोरोनाचा विषाणू कोणत्याही लॅबमधून पसरलेला नसून तो प्राण्यांमधून नैसर्गिकरीत्या पसरल्याचंही म्हटलं गेलंय.
लॅबमधून गळती झाल्याच्या बाबींवर शास्त्रज्ञांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. या विषाणूचा प्रसार लॅबमधून झाल्याच्या बाबीचे समर्थन करण्याबाबतचे कोणतेही ठळक पुरावे नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तत्पूर्वी, चीननेदेखील लॅबमधून गळती झाल्याचा दावा 'राजकीय हेराफेरी' म्हणत फेटाळून लावला होता.
तरीदेखील या वादग्रस्त लॅब लीक सिद्धांताला अनेक गुप्तचर संस्थांकडून दुजोरा मिळत राहिला.
दरम्यान, एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी 2023 साली फॉक्स न्यूजला सांगितलं होतं की, त्यांच्या ब्युरोच्या अंदाजानुसार "या महामारीचा उद्रेक लॅबमधून झाला असल्याची शक्यता आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











