लहान मुलांना HMPV विषाणूपासून जास्त धोका आहे का? काय काळजी घ्यावी?

HMPV

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय.

चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रुग्णांपैकी बहुतेक सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही म्हणजेच ही लहान मुलं कुठूनही दूरचा प्रवास करून आलेली नव्हती.

मग लहान मुलांना HMPV ची लागण कशी झाली?

लहान मुलांना या विषाणूपासून जास्त धोका आहे का?

कोव्हिडनंतर आता हा ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस जगाला मेटाकुटीला आणणार का?

असे नाना प्रश्न अनेकांना पडले आहेत. यातल्या लहान मुलांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेऊ.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

HMPV विषाणू नवा आहे का?

HMPV व्हायरस नवा नाही. जुनाच आहे.

2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू माणसात आढळला. या विषाणूची उत्पत्ती 200 ते 400 वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती. पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. आता या विषाणूमुळे चिमण्यांना संसर्ग होत नाही.

माणसाला HMPV ची लागण होऊ शकते, हे 2001 मधे कळलं. आणि तेव्हापासून हा विषाणू अस्तित्वात आहे.

डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याकडे या आजाराचे जवळपास 172 रुग्ण प्रयोगशाळांना आढळल्याचं डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलंय.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

HMPV व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

HMPV ची लक्षणं आणि गांभीर्य

आपल्याला होणारा सर्दी-खोकला, श्वसनासंबंधी आजार या व्हायरसमुळे होतात.

या HMPV व्हायरसमुळे श्वसनमार्गाच्या वरच्या भागामध्ये संसर्ग होतो. त्यामुळे सर्दी-खोकला होतो. हा संंसर्ग श्वसनमार्गाच्या खालच्या बाजूला सरकून न्यूमोनिया होण्याचं प्रमाण कमी आहे.

या विषाणूचा इन्क्यूबेशन पीरियड साधारणपणे तीन ते सहा महिने असतो. पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो. संसर्ग किती गंभीर आहे, यावर ते अवलंबून असतं.

HMPV व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

HMPV आणि SARS-CoV-2 यामध्ये साम्य आहे का?

HMPV आणि SARS-CoV-2 मुळे होणारा कोव्हिड हे दोन्ही श्वसनमार्गाचे विकार आहेत. या दोन्हींच्या संसर्गाचं संक्रमण होण्याचे मार्ग सारखे आहेत. काही प्रमाणात लक्षणं सारखी आहेत.

पण कोव्हिडची काही लक्षणं वेगळी आणि अधिक गंभीर असतात. शिवाय, कोव्हिडमधून पुढची गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आहे. त्या तुलनेत HMPV सौम्य आहे.

HMPV ची लक्षणं काय?

  • नाक गळणं
  • घसा खवखवणं
  • खोकला आणि ताप
  • थकवा

गंभीर संसर्गाचं निष्पन्न ब्राँकायटीस वा न्यूमोनियात होऊ शकतं.

HMPV संसर्गाचा लहान मुलांना अधिक धोका का आहे?

5 वर्षांपेक्षा लहान मुलं, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या संसर्गाचा धोका अधिक असतो.

याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय महिंद्रे यांनी सांगितलं, "लहान मुलांमध्ये होणाऱ्या कॉमन व्हायरल इन्फेक्शन्सपैकी HMPV एक आहे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.

HMPV व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे HMPV च नाही तर कुठल्याही व्हायरल आजारांची तीव्रता लहान मुलांमध्ये जास्त असते. शिवाय आईकडून आलेली इम्युनिटी ही पहिल्या सहा ते बारा महिन्यांमध्ये ही हळुहळू संपते.

त्यामुळे बाळाला जेव्हा पहिल्यांदा HMPV च इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याची लक्षणं आणि तीव्रता जरा जास्त असू शकते."

HMPV चा संसर्ग कसा पसरतो?

  • खोकताना - शिंकताना उडणाऱ्या तुषारांमुळे
  • संसर्गग्रस्त व्यक्तीचा स्पर्श, गळाभेट, हस्तांदोलन
  • शिंकताना - खोकताना उडलेल्या तुषारांना स्पर्श झाल्याने. स्पर्श केलेला हात नाका-तोंडाला - डोळ्यांना लावल्याने

या HMPV संसर्गावरच्या उपचारांसाठी कोणतंही विशिष्ट औषध नाही. डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, "या आजारामुळे किंवा नावामुळे घाबरून जायचं कारण नाही.

खरं म्हणजे याच्याकरित कोणतं औषध नाही आणि औषधाची गरजही नाही.

ज्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो, तसं सर्दी-खोकल्याकरता गरम पाण्याच्या मीठ टाकून केलेल्या गुळण्या, वाफ घेणं, काढा आणि बाकीच्या गोष्टी या पुरेश्या आहेत.

मुळात हा आजार होऊ नये यासाठी कुठल्या लशीचीही गरज नाही. कोणतीही लस नाही आणि गरजही नाही. हा इतका सौम्य स्वरूपाचा आजार आहे."

प्रतिबंधक उपाय म्हणून काय करावं

  • वेळोवेळी हात धुवा.
  • डोळ्यांना - नाकाला पुन्हा पुन्हा हात लावू नका.
  • सर्दी-खोकला असेल तर मास्क वापरा.
  • बाहेर जाणं कमी करा. लोकसंपर्क टाळा.
  • शिंकता - खोकताना रुमाल वापरा.
  • पौष्टिक आहार घ्या.
  • पुरेशी झोप काढा.
HMPV व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

HMPV व्हायरसमध्ये बदल होतायत का?

हा एक RNA व्हायरस आहे. यात म्युटेशन्स म्हणजे बदल होतात. कोव्हिडचा व्हायरस Sars Cov 2 देखील RNA व्हायरस होता. त्यामुळे आताच्या HMPV व्हायरसमध्ये बदल झालाय का, हे जिनोम सिक्वेंसिंगनंतरच कळू शकेल.

हा विषाणू सध्या सौम्य आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)