दमा आणि COPD वर नवीन औषध शोधण्यात संशोधकांना 50 वर्षांनंतर आले यश

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
तुम्हाला किंवा जवळच्या नातेवाईकांना दमा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दम्याचा झटका येणं यावर गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नवीन औषध सापडलं असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
या नवीन औषधाचा वापर रोग प्रतिकार यंत्रणेतील ठराविक भागावर केला जातो. दमा आणि फुफ्फुसांच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (COPD) नावाच्या आजाराचा त्रास वाढल्यानंतर हाच भाग अधिक सक्रिय होण्याची शक्यता असते.
बेन्रालिझुमॅबचा वापर आधीपासूनच अधिक गंभीर रुग्णांसाठी केला जात आहे. पण नवीन संशोधनावरून असं लक्षात येत आहे की, युकेमध्ये दरवर्षी दम्याचा झटका येण्याच्या जवळपास 20 लाख प्रकरणांमध्ये त्याचा वापर केला जात आहे.
लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील संशोधकांच्या पथकाच्या मते, हे नवीन औषध 'गेम चेंजर' ठरू शकतं. याचा वापर करून वैद्यकीय सेवा क्षेत्रात क्रांती येऊ शकते.
हे निष्कर्ष यावरून काढण्यात आले आहेत की, दमा किंवा COPD चे झटके हे कधीही एकसारखे नसतात. त्याउलट वेगवेगळ्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकार संस्थेचे वेगवेगळे भाग हे अधिक प्रतिक्रिया देत असतात.
किंग्जच्या प्राध्यापक मोना बाफाढेल यांच्या मते, "सूज येण्याचे वेगवेगळे पॅटर्न असल्याचं आता आपल्या लक्षात येऊ लागलं आहे. आपण अधिक स्मार्टपणे याचा विचार करून योग्य रुग्णाला योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतो."
बेन्रालिझुमॅब हे इओसिनोफिल नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशींना लक्ष्य करतं. यामुळंच सूज येणे आणि फुफ्फुसांची हानी होण्याची शक्यता असते.
इओसिनोफिल हे दम्याच्या जवळपास अर्ध्या केसमध्ये आणि COPD वाढण्याच्या एक तृतीयांश प्रकरणासाठी कारणीभूत असते.
जर श्वास घेण्यास त्रास होणं, घरघरणं, खोकला आणि छाती अडकल्यासारखी होणे अशा प्रकारच्या म्हणजे झटक्यांत नेहमीच्या इनहेलरनं त्रास नियंत्रणात आणणं शक्य नसेल तर डॉक्टर सध्या स्टेरॉइड्सचा कोर्स करण्याचा सल्ला देत आहेत.


गेम चेंजर ठरू शकतं औषध
एका अभ्यासात 158 रुग्णांचं निरीक्षण करण्यात आलं. तीन महिने त्यांच्या या त्रासाच्या उपचाराची नोंद ठेवण्यात आली.
लँसेट रेस्पिरटरी मेडिसिनच्या निष्कर्षानुसार उपचारात अपयश येण्याचं प्रमाण हे स्टेरॉइड्स घेत असताना 74% होतं तर
नवीन उपचार पद्धतीचा वापर करून ते फक्त 45% टक्के एवढं असल्याचं समोर आलं.
नव्या पद्धतीनं उपचार केलेल्या लोकांना तुलनेनं रुग्णालयात दाखल करावं लागण्याची, पुन्हा उपचार घ्यावं लागण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक बापाढेल यांच्या मते, यामुळं लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. कारण एका वर्षात 20 लाख लोकांना दम्याचा झटका येणं हा काही लहान आकडा नाही.
"हे औषध गेम चेंजर ठरू शकतं. आपल्या उपचार पद्धतीत गेल्या 50 वर्षांत बदल केलेला नाही. त्यामुळं प्रचंड त्रास होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याच्या पद्धतीत यामुळं क्रांती येऊ शकते," असं प्राध्यापक बापाढेल म्हणाले.
यासाठी करण्यात आलेल्या चाचणीत भाग घेतलेल्यांनीही नवीन औषधामुळं त्यांच्यात सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे.
श्वासच घेता न येणं हे भीतीदायक
ऑक्सफर्डशायरच्या 55 वर्षीय अॅलिसन स्पूनर यांनीही या चाचणीत सहभाग घेतला होता. त्यांना बालपणापासून दम्याचा त्रास आहे. पण गेल्या पाच वर्षांमध्ये याची तीव्रता प्रचंड वाढली होती. या काळात त्यांना तीन वेळा दम्याचे मोठे झटके आले.
"प्रकृती फारच गंभीर व्हायला लागल्याचं त्यांना वाटू लागलं होतं. श्वासोच्वासाला त्रास होऊ लागला होता. जेव्हा तुम्हाला दम लागतो आणि श्वासच घेता येत नाही, तेव्हा प्रचंड भीतीदायक स्थिती असते," असं त्या म्हणाल्या.
पण नवीन औषधाचं इजेक्शन घेतल्यानंतर प्रचंड फरक जाणवल्याचं अॅलिसन म्हणाल्या. त्या अजूनही इनहेलर वापरतात पण तसं सांगितलं आहे म्हणूनच त्याचा वापर करत असल्याचं त्या म्हणतात.
"दुर्दैवानं कोणतंही औषध दम्यापासून पूर्णपणे सुटका करू शकत नाही. हे त्यातल्या त्यात अधिक प्रभावी औषध आहे. माझ्या मते ते काहीसं चमत्कारिक आहे," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
आशादायी चित्र
बेन्रालिझुमॅब हे व्यापक स्तरावर वापर करण्यासाठी उपलब्ध नाही.
त्याला अजूनही खूप चाचण्यांना सामोरं जावं लागणार आहे. 2025 मध्ये या चाचण्याची सुरुवात होईल. त्यासाठी जवळपास दोन वर्षे लागतील. त्यानंतरच नेमका अंदाज बांधता येईल. ज्यांना यापूर्वी ही औषधं देण्यात आली आहेत, त्यांना त्याचा वापर पुढे सुरू ठेवता येईल.
या संशोधनासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज घेणंही अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मोनोक्लोनल अँटिबॉडीज सारखी औषधं ही महागडी असतात.
मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. संजय रामकृष्णन म्हणाले की, आतापर्यंत झालेलं काम पाहता यातून "मोठ्या आशा" निर्माण झाल्या आहेत. कारण जगभरात रुग्णांच्या मृत्यूचं मोठं कारण असलेल्या COPD चा उपचार हा अजूनही 20 व्या शतकातच अडकलेला आहे.

फोटो स्रोत, Geoffrey Pointing
स्टेरॉइडच्या दीर्घकालीन वापराचया दुष्परिणामांमध्ये वजन वाढणे, मधुमेह आणि हाडं कमकुवत होणं याचा समावेश आहे.
या चाचणीत सहभागी झालेले ऑक्सफर्डशायरचेच 77 वर्षीय जेफरी पॉइंटिग यांच्या मते,"स्टेरॉइड्सच्या गोळ्यामुळं होणारे दुष्परिणाम मला यामुळं झाले नाहीत.
"मी स्टेरॉइड्स घेतल्यानंतरच्या रात्री कधीही झोपू शकलो नव्हतो. पण या चाचणीनंतरच्या पिहल्याच रात्री मी शांतपणे जोपू शकलो. मला कोणत्याही समस्यांशिवाय आरामात जीवन जगता येत आहे."
युकेमध्ये दररोज दम्यामुळं अंदाजे 4 तर COPD मुळं अंदाजे 85 जणांचा मृत्यू होतो.
वैद्यकीय श्रेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. समांथा वॉकर यांच्या मते, हे निकाल म्हणजे मोठी बातमी आहे.
"दमा आणि COPD चे झटके येणाऱ्या रुग्णांसाठीच्या उपचार पद्धतीत गेल्या 50 वर्षांतील हा पहिलाच नवा शोध असणं हे महत्त्वाचं आहे," असंही त्यांनी म्हटलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











