पैलवान विक्रम पारखी याचा जिममध्ये मृत्यू; तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?

पैलवान विक्रम पारखी

फोटो स्रोत, Facebook/Mahesh Landage

फोटो कॅप्शन, पैलवान विक्रम पारखी
    • Author, रेणुका कल्पना
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक नामांकित कुस्ती स्पर्धा जिंकणारे तरुण पैलवान विक्रम पारखी यांचा जीममध्ये अचानक मृत्यू झाला.

मुळशी तालुक्यातल्या त्यांच्या माण गावात मंगळवारी सकाळी जीममध्ये बसलेल्या अवस्थेत ते अचानक खाली कोसळले.

पिंपरी चिंचवडमधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. पण उपचाराआधीच डॉक्टरांनी ते मृत असल्याचं घोषित केलं.

पोस्टमार्टमचे रिपोर्ट अजून यायचे असले तरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे.

मागच्या वर्षी मार्च महिन्यात कुस्तीपटू स्वप्नील पाडळे यांचाही अशाच पद्धतीने कुस्तीचा सराव करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. तेही मुळशीचेच रहिवासी होते.

तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतो आहे? काय काळजी घ्यायची?

फोटो स्रोत, Getty Images

अशा पद्धतीने व्यायाम करणाऱ्या, जीममध्ये नियमित जाणाऱ्या किंवा मैदानी खेळ खेळणाऱ्या तरूणांना हृदयाचा त्रास होऊन जागीच मृत्यू ओढावल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकदा अगदी चालताना किंवा नाचताही एखादा तरूण अशा पद्धतीने अचानक खाली कोसळल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकदा दिसतात.

अशा पद्धतीने तरूण वयात हृदयाविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय असू शकेल आणि ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, हे आपण समजून घेणार आहोत.

हा हृदयविकाराचा झटका नाही?

मुळातच, हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅकने) मृत्यू होतो असं आपण म्हणतो ते चुकीचं आहे, असं डॉ. अभिजीत वैद्य सांगतात.

ते हृदयरोगतज्ज्ञ आणि पुण्यातील संजिवनी कार्डिॲक केअर सेंटरचे संचालक आहेत. ते सांगतात की हृदयाचा त्रास होऊन माणूस अचानक अशा पद्धतीने खाली कोसळतो तेव्हा त्याला हृदय अचानक बंद पडणे (सडन कार्डिॲक डेथ) असं म्हणतात.

ही संज्ञा वैद्यकीय क्षेत्रातही नवीन असल्याने याआधी फारसं त्याबद्दल बोललं जात नव्हतं. अनेकदा इतर विशेषतज्ज्ञ डॉक्टरांनाही त्याबद्दल नीट माहिती नसते.

हृदयातली रक्तवाहिनी अरूंद बनत जाते आणि बंद पडते किंवा आतल्या आत फुटते तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद पडतो. रक्तपुरवठा होत नाही तो भाग मृत होत जातो आणि हृदयावरचा ताण वाढल्याने हृदयविकाराचा झटका येतो.

"ही लांबलचक प्रक्रिया असते. ती एका क्षणात, काही तासात किंवा एका दिवसांत होत नाही. त्यामुळे ती सहसा तरुणांमध्ये दिसण्याची शक्यता कमी असते," डॉ. वैद्य सांगतात. ही प्रक्रिया घडण्यासाठी घात घटक कारणीभूत ठरतात. वाढलेला रक्तदाब, रक्तातली वाढलेलं साखरेचं प्रमाण, वाढलेली चरबी, किंवा वाढलेलं वजन यासोबतच तंबाखू, धुम्रपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव अशा गोष्टींचा घात घटकांमध्ये समावेश होतो.

पण व्यायाम करणाऱ्या लोकांना असा त्रास होत असेल तर त्यामागे हृदयाचा झटका नाही तर कार्डिॲक अरेस्ट म्हणजे अचानक हृदयक्रिया बंद पडणं हे कारण असतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

"असं होण्याचं कारण म्हणजे बहुसंख्य वेळेला या लोकांना हृदयाच्या आतमध्ये काही आजार असतो. हा आजार विशेषतः हृदयाच्या स्नायूंचा असू शकतो. तो अनुवंशिक किंवा जनुकीयही असू शकतो. काही परिस्थितीत हृदयाच्या स्पंदनात दोष निर्माण झालेला असू शकतो," डॉ. वैद्य म्हणतात.

या आजारांचं निदान झालं नसेल तर ती व्यक्ती त्यासोबतच व्यायाम करत राहते. त्या व्यायामाने किंवा मानसिक ताणतणावाने आजाराला कळ बसते आणि अचानक हृदय बंद पडतं.

अशा पद्धतीने हृदय बंद पडलं आणि माणूस अचानक खाली कोसळला तर सीपीआर देऊन हृदय पुन्हा सुरू करता येऊ शकतं. त्यासोबतच लगेचच रुग्णवाहिका बोलावली तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. "सामान्य भाषेत त्याला हृदयाला मसाज करणं असं म्हणतात. ते कौशल्य समाजातल्या प्रत्येकाला अगदी लहान मुलांनाही शिकवलं पाहिजे," डॉ. अभिजीत वैद्य सांगतात.

काय काळजी घ्यायची?

हृदयाच्या आजारांमुळे होणारे बहुतेक मृत्यू टाळता येऊ शकतात, असं ते म्हणतात. एका चांगल्या दर्जाच्या टुडीएको या तपासणीनेही या आजाराचं प्राथमिक निदान करता येऊ शकतं.

"मुळातच आईच्या गर्भातल्या बाळाच्या हृदयाचं आरोग्य तपासण्यासाठी फिटल म्हणजे भ्रूण इको नावाची तापसणी असते. ती केली तर जन्मतःच हृदयात काही व्यंग नाही ना, हे समजतं. त्यानंतर बाळाच्या जन्मानंतरही एक इको तपासणी करून घ्यायली हवी," डॉ. वैद्य पुढे सल्ला देतात.

तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतो आहे? काय काळजी घ्यायची? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यापुढचा इको 12 ते 18 या वयात व्हायला हवा. नंतर 18 वर्षे वयानंतर पुढे दर पाच वर्षांनी एक इको करून घेणं महत्त्वाचं आहे.

या तपासणीत काही आढळलं तर त्याचं खोलवर निदान करण्यासाठी पुढे सीटी स्कॅन, एमआरआय करावा लागू शकतो. त्यानंतर प्रतिबंधक औषध घेऊन मृत्यू टाळता येतात.

"महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करणारे, खेळाडू, क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेणारे या लोकांनी आपलं करिअर सुरू करण्याआधी एक उत्तम 2डी इको करून घेतला पाहिजे. इतकंच नाही तर त्याने स्ट्रेस स्टेस्ट, कार्डिओग्राम अशा तपासण्याही करायला हव्यात," डॉ. वैद्य सांगतात.

तपासण्या सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या

फक्त खेळाडूंनी किंवा कुस्तीपटूंनीच नाही तर जीम किंवा तीव्र व्यायाम सुरू करण्याआधी कोणीही या आणि काही रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजेत, असं वैद्यकीय अभ्यासक, लेखक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.

हृदयरोग

फोटो स्रोत, Getty Images

"सध्या जीमचं फॅड आहे. सिनेमातल्या हिरोचे सिक्स ॲब्स पाहून अनेक मुलं जीमला जातात. त्याआधी तपासण्या करत नाहीत, त्यासाठीचा योग्य आहार घेत नाहीत," डॉ. अविनाश भोंडवे सांगतात. जीममधे किंवा व्यायामशाळेत असणारे प्रशिक्षक यांना पुरेसं वैद्यकीय ज्ञान नसतं, हेही ते लक्षात आणून देतात.

त्यामुळे थोड्या काळात खूप जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असा सल्ला ते देतात. करायचंच असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या यांची जोड त्याला असायला हवी.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

ही झाली अचानक हृदय बंद पडण्याबाबतची कारणीमीमांसा.. पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही वाढलं आहे, असं दोन्ही तज्ज्ञ सांगतात.

"काही वर्षांपूर्वी उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका हे आजार 60 वर्षे वय असणाऱ्यांमध्ये जास्त दिसत होते. नंतर ते प्रमाण 50 वर्षे वयाच्या रुग्णांमध्येही दिसून आलं. पुढच्या 10 वर्षांत चाळीशीतल्या रुग्णांनाच त्रास होऊ लागला. आता हा त्रास चक्क तिशीतल्या तरुणांनाही होत आहे," डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले.

हृदयरोग

फोटो स्रोत, Getty Images

"गेल्या दोन-तीन वर्षात माझ्याकडे येणाऱ्या 26 ते 30 वयोगटातल्या अनेक रुग्णांना खरोखर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तातडीने ॲंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करावी लागली," डॉ. वैद्य सांगतात. पण हे सगळं शोधण्याची बरीचशी साधनं आता आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या आजारांचा प्रतिबंध करता येणंही शक्य आहे.

त्यासाठी वेळोवेळी तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. काही त्रास होत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे न जाण्याची सवय अशावेळी घातक ठरू शकते.

तरूणींना धोका नाही?

हृदयाचा त्रास होऊन मृत्यू झाल्याच्या बातम्यांमध्ये बहुतेक तरूण मुलेच दिसतात. कोणत्याही व्हीडिओमध्ये, बातमीत आजवर एकाही तरूणीचा हृदयविकाराने किंवा सडन कार्डिॲक डेथने मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही.

याचं एक कारण म्हणजे मुळातच धुम्रपान, तंबाखू अशा व्यसनांना स्त्रियांच्या तुलनेत पुरूष जास्त बळी पडतात. शिवाय, सिक्स ॲब्स, जीम, व्यायाम याबाबतचा ओढाही तरुण पुरूषांमध्ये जास्त दिसून येतो.

शिवाय, मासिक पाळी व्यवस्थित सुरू असेल तर इस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे महिलांना हृदयविकारापासून नैसर्गिक संरक्षण मिळत असतं. तरुण पुरूषांच्या तुलनेत पाळी येत असलेल्या तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी असतं, असं तज्ज्ञ सांगतात.

हृदयरोग

फोटो स्रोत, Getty Images

पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये कार्डिॲक अरेस्ट यायचं प्रमाणही कमी आहे. पण याचा अर्थ पाळी येत आहे म्हणून मला काहीही होणार नाही अशा संभ्रमात कोणत्याही मुलीने वा महिलेने राहू नये आणि वेळोवेळी तपासण्या करून घ्यावात असा सल्ला डॉ. अभिजीत वैद्य देतात. त्यांच्या पाहण्यात बाळंतपणात आणि त्यानंतरच्या काळात अनेक महिलांना कार्डिॲक अरेस्टचा त्रास सुरू झाल्याचं त्यांच्या पाहण्यात आहे. त्याची पुरेशी माहिती नसल्याने खेड्यात काही महिलांचे मृत्यू झाल्याचाही घटना घडत असतात, असं ते सांगतात.

"बदलेल्या जीवनशैलीमुळे स्त्रियांमध्येही वजन वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पोटाचा घेर, मांड्या अशा भागांत अतिरिक्त चरबी साठलेली दिसते. त्यामुळे महिलांमध्ये पीसीओएस आणि पीसीओडीसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे," डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात. मासिक पाळी व्यवस्थित नसेल किंवा थांबली तर महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण दुप्पट होऊ शकतं, अशी सूचना ते देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)