'हजारो' हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा 41 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा झाला?

डॉ. गौरव गांधी
फोटो कॅप्शन, डॉ. गौरव गांधी

जामनगरमधील सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी यांचं मंगळवारी (6 जून) निधन झालं. ते 41 वर्षांचे होते.

हृदयविकारासंदर्भात हजारो शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉ. गौरव गांधी यांचे प्राण हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. गौरव गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल हृदयासंदर्भातील 16 हजार शस्त्रक्रिया केल्याचं सांगितलं जातं. पण बीबीसी या दाव्याची पुष्टी करत नाही.

गेल्या काही वर्षांत तरुणांना नाचताना, खेळताना, चालताना हृदयविकाराचा झटका येऊन जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर अशा हृदयरोगाच्या रुग्णांवर उपचार करणारा एक तज्ज्ञ डॉक्टरच हृदयाच्या समस्येचा बळी ठरतो, तेव्हा याबाबत काळजी निर्माण होणं स्वाभाविक आहे.

त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि यासंदर्भातील इतर माहिती घेणं क्रमप्राप्त आहे.

छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, “डॉ. गांधी हे जामनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीस होते. यासोबतच ते एका खासगी रुग्णालयातही प्रॅक्टिस करत होते.

येथील एम. पी. शाह वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) डॉ. नंदिनी देसाई म्हणाल्या, “मंगळवारी पहाटे 4 वाजता डॉ. गांधी यांनी छातीत दुखत असल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर ते स्वतः जिथे प्रॅक्टिस करतात त्याच खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं.

हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कार्डिओग्रामनंतर त्यांच्यावर अॅसिडिटीसंदर्भात उपचार करण्यात आले. उपचारानंतर डॉ. गौरव यांना बरंही वाटलं. त्यामुळे त्यांना डिस्चार्जही देण्यात आला.

गांधी यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, उपचार घेऊन डॉ. गौरव घरी परतले. पण दोन तासांनी ते त्यांच्या बाथरूमजवळ खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात नेण्यात आलं. पण तिथे नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

याबाबत बोलताना डॉ. देसाई म्हणाले, “रुग्णालयात पोहोचल्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचं शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचे अहवाल येणं बाकी आहे. परंतु, प्राथमिक निरीक्षणावरून असं दिसतं की डॉ. गांधींना हृदयविकाराचा झटका आला होता.”

डॉ. गौरव गांधी यांच्या सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, “सोमवारपर्यंत ते पूर्णपणे निरोगी दिसत होते, आदल्या दिवशीही त्यांचं काम सुयोग्यरित्या सुरू होतं. सुदृढ दिसणाऱ्या एका डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय जगतात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.”

बीबीसी गुजरातीचे सहयोगी पत्रकार दर्शन ठक्कर यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.

ते म्हणतात, “डॉ. गौरव गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 16 हजार ऑपरेशन्स केल्याचं बोललं जातं. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

दर्शन ठक्कर यांच्या मते, “डॉ. गांधी सोमवारी रात्रीपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होते. त्यानंतर ते पॅलेस रोड येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गेले. घरी जाऊन त्यांनी जेवण केलं आणि झोपले.”

“पण, सकाळी सहा वाजता ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचार करूनही त्यांना वाचवता आलं नाही.”

डॉ. गांधी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.

तरुण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे माजी संचालक डॉ. दिलीप मावळणकर हे तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याच्या कारणांबद्दल बोलताना म्हणतात, "बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि जास्त वजन ही यामागची सर्वात मोठी कारणे असू शकतात."

“परंतु, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व गोष्टींची काळजी घेणारी व्यक्ती सर्व रोगांपासून पूर्णपणे मुक्त होईल, असं नाही. कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्यासह आरोग्याशी संबंधित समस्याही येऊ शकतात, हे यातून दिसून येतं.

हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

यावर उपाय सुचवताना डॉ. मावळणकर म्हणतात, “अकाली मृत्यूची कारणे शोधण्यासाठी सरकार आणि यंत्रणेने योग्य विश्लेषण केले पाहिजे आणि आवश्यक तेथे शवविच्छेदन केले पाहिजे. त्यानंतरच या प्रकारच्या मृत्यूची खरी कारणे समोर येऊ शकतात आणि त्याचा अभ्यासही लोकांसाठी उपयुक्त करू शकतो.”

ते पुढे म्हणतात की काही घटनांमध्ये सापडलेलं कारण हे व्यापक समस्या मानता येऊ शकत नाही. त्याचं सर्वसामान्यीकरण केलं जाऊ शकत नाही.

समाजात आरोग्यासंदर्भात अधिक संशोधन आधारित दृष्टीकोन असावा, असं त्यांना वाटतं.

याशिवाय, कोरोना काळानंतर लाँग कोव्हिडसंसंदर्भातील समस्यांचा अभ्यास करणंही आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं.

डॉ. गौरव गांधी हे निरोगी होते. तसंच स्वतः हृदयाशी संबंधित समस्यांचे तज्ज्ञ म्हणून काम करतो होते.

याविषयी बोलताना डॉ. मावळणकर म्हणतात, “एखादा व्यक्ती निरोगी आहे, किंवा तज्त्र आहे, यामुळे त्याला अशा समस्यांपासून संरक्षण मिळतं, असं नाही. अशा समस्या निर्माण होण्याच्या कारणांमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, ज्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे.”

अहमदाबादच्या चौधरी हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ. मुकेश चौधरी यांच्या मते, “लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीचा मोठा वाटा असतो.”

ते म्हणतात, “अनेक वेळा आहारातील व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसंच, हृदयाशी संबंधित समस्या पुढील काळात धोकादायक ठरेल, याचा अंदाज रुग्णाला सुरुवातीला येत नाही. त्यामुळे उपाचारात दिरंगाई होते.”

ते पुढे म्हणतात, “अनेक वेळा कार्डिओग्राम सामान्य असू शकतो. हृदयाशी संबंधित समस्यांचे निदान करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी चाचणी म्हणजे अँजिओग्राफी. ही चाचणी वेळेवर होणं गरजेचं असतं.”

“कधीकधी हृदयविकाराचा झटका इतका तीव्र असतो की अँजिओग्राफीसाठी वेळच मिळत नाही. हृदयविकारासाठी योग्य वेळी योग्य उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.”

हृदयरोग तज्ज्ञांना कामाचा तणाव?

जागतिक सर्वेक्षण अहवालातील निष्कर्षांनुसार, “जगभरात एक चतुर्थांश हृदयरोगतज्ज्ञ मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत.”

मानसिक समस्या हेसुद्धा हृदयविकाराच्या अनेक कारणांपैकी एक कारण मानलं जातं.

कोलंबसमधील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये संलग्न डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. लक्ष्मी मेहता म्हणतात, "मानसिक आरोग्य आणि हृदयविकार यांच्यातील संबंधांचा विचार न केल्यामुळे या गोष्टी निदर्शनास आलेल्या असू शकतात.”

सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार “यामध्ये 76 टक्के प्रकरणे मानसिक आरोग्य, मानसिक तणावाशी संबंधित आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये करिअर स्टार्टअप आणि महिलांचा समावेश होता. शिवाय, हृदयरोग तज्ञ मानसिक समस्येबद्दल बोलत नाहीत.”

डॉ. गांधीं यांच्या प्रकरणाबाबत डॉ. दिलीप मावळणकर म्हणतात, “डॉ. गांधी हृदयरोगतज्ज्ञ असल्याने त्यांच्या कामाची परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. अनेक डॉक्टरांना त्यांच्या दैनंदिन कामादरम्यान तणाव जाणवतो, हे वास्तव आहे.”

डॉ. मुकेश चौधरी हेसुद्धा तणाव हेच हृदयविकाराच्या झटक्याचं कारण प्रमुख कारण' असल्याचं मत व्यक्त नोंदवतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)