चालता-फिरता अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण का वाढलं आहे?

हृदयविकाराचा झटका

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हल्ली चालता चालता, डान्स करताना हार्टअटॅकला बळी पडलेल्या लोकांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

अशाच एका व्हीडिओमध्ये एक व्यक्ती लग्नात नाचता नाचता घेरी येऊन जमिनीवर पडते, तर दुसऱ्या एका व्हीडिओत एका कार्यक्रमात एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन जात असताना चक्कर येऊन पडताना दिसते.

असाच एक तिसरा व्हीडिओ, ज्यात मित्रांसोबत चालत असताना एक व्यक्ती चक्कर येऊन जमिनीवर पडते.

असे असंख्य व्हीडिओ व्हायरल होत असताना ट्विटरवर #heartattack हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलाय. लोकांच्या अशा आकस्मिक मृत्यूबद्दल कमेंट सेक्शनमध्ये चिंता व्यक्त होते आहे.

काही महिन्यांपूर्वी कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याचादेखील कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. त्यावेळी तो जिममध्ये व्यायाम करत होता.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे देखील जिममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं होतं, त्यानंतर ते बाजूला पडले. डॉक्टरांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं, पुढच्या काही दिवसांत त्यांचा मृत्यूही झाला.

या वाढत्या घटना कार्डियाक अरेस्टच्या असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, हृदयाचा आकार वाढल्याने तसेच त्या भागातील स्नायू वाढल्याने, तिथल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आल्याने तसेच हृदयाने रक्त पंप करायचं बंद केल्याने कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. कधीकधी आनुवंशिक कारणांमुळे देखील कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो.

कार्डियाक अरेस्ट आहे हे कसं ओळखायचं?

डॉ. ओपी यादव हे नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटचे सीईओ आणि चीफ कार्डियाक सर्जन आहेत. ते सांगतात की, जर तुम्हाला तुमच्या शरीरात काही अनएक्सप्लेन्ड लक्षणे दिसली तर वेळीच सावध व्हा.

हृदयविकार

फोटो स्रोत, Alamy

काय आहेत लक्षणे?

  • पोटात मुरडा येणे
  • पोटाच्या वरच्या भागात ब्लोटिंग झाल्यासारखं वाटणे, ओटीपोटात जडपणा वाटणे
  • गॅस किंवा अॅसिडिटी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका
  • छातीत ताण आल्यासारखं वाटणे
  • घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणे
  • शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये अचानक बदल होणे. म्हणजे दिवसात तुम्ही जर तीन मजले चढत असाल पण कधीतरी हे करताना अचानक थकवा जाणवणे.
  • कधीकधी वेदना हृदयापासून पाठीपर्यंत गेल्यासारखं वाटणे
  • अचानक दात किंवा मान दुखू लागल्यावर दुर्लक्ष करणे अशा गोष्टी घडतात.
  • कुटुंबातील एखाद्या सदस्याचा वयाच्या 30-40 व्या वर्षी मृत्यू झाला असेल किंवा अचानक मृत्यू झाला असेल, तर तुम्हाला कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त आहे.
हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीस्थित मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सिनिअर कार्डियोलॉजिस्ट डॉ. विवेका कुमार सांगतात, "हार्ट अटॅकमध्ये रुग्णाला अर्धा तास किंवा त्याहून जास्त वेळ छातीत दुखू लागतं. ही वेदना डाव्या हातापर्यंत होत असते, त्यानंतर रुग्णाला भरपूर घाम येतो. जर वेळीच उपचार केले नाहीत तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो."

सोबतच ते सांगतात की, हॉस्पिटलच्या बाहेर जर एखाद्याला कार्डियाक अरेस्ट आला तर यात जीव वाचण्याचे तीन ते आठ टक्केच चान्सेस असतात.

कोरोना, वॅक्सिन आणि कार्डियाक अरेस्ट यांचा संबंध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोव्हीड साथरोग आल्यानंतर बऱ्याचशा अशा बातम्या आल्या की, ज्या लोकांना कोरोना झालाय आणि ज्यांनी लस घेतलीय अशांमध्ये कार्डियाक अरेस्ट येण्याची शक्यता जास्त आहे.

यावर डॉ. ओ.पी. यादव सांगतात की, "जर तुम्हाला नुकताच कोव्हीड होऊन गेलाय आणि त्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल तर या दोन्हींमध्ये काहीतरी सहसंबंध असण्याची शक्यता जास्त आहे. पण नेहमीच असं होईल या गोष्टीसाठी काही पुरावा आढळलेला नाही. पण ज्या व्यक्तीला कोव्हीड झाला होता त्याचं रक्त गोठण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत आम्ही रुग्णाला रक्त पातळ व्हावं अशी औषधं देतो, त्यांना व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पण प्रत्येक हार्ट अटॅक हा कोव्हीडमुळेच आलाय असं म्हणणं चुकीचं ठरेल."

कोव्हीडमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात यावर डॉ. ओ.पी. यादव आणि डॉ. विवेका कुमार यांचं एकमत आहे. या गुठळ्या फुफ्फुसात, हृदयात, पायांच्या नसा आणि मेंदूमध्ये तयार होऊ शकतात. पण या गुठळ्या होऊ नये, रक्त पातळ व्हावं यासाठी रुग्णांना औषध दिली जातात.

डॉ. विवेक कुमार यांच्या मते, "कोव्हीड वॅक्सिन घेणं म्हणजे एकप्रकारे कोव्हीडचा संसर्ग झाल्यासारखंच आहे. कोव्हीड हा संसर्गजन्य आजार असून त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅकची शक्यता वाढते. सोबतच या गुठळ्या मेंदूपर्यंत गेल्यास ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. तरुणांमध्ये अशी प्रकरणं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामागे स्ट्रेस, धूम्रपान, मद्यपान ही कारणं सुद्धा आहेत."

हृदयविकार

फोटो स्रोत, Getty Images

स्त्रियांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त

डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे, महिलांमध्ये इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन असतं तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नामक हार्मोन असतं.

जोपर्यंत स्त्रियांना मासिक पाळी येत असते, तोपर्यंत त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी खूप जास्त असते.

त्यामुळे जोपर्यंत स्त्रियांना पाळी येत असते तोपर्यंत या हार्मोनमुळे त्यांना हार्टअटॅक येण्याची शक्यता खूप कमी असते. पण मेनोपॉज नंतर त्यांच्यातही हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

डॉ. ओ.पी. यादव सांगतात, "पंचेचाळीशी उलटून गेलेल्या स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. हे प्रमाण 10 :1 असं आहे. याचा अर्थ दहा पुरुषांच्या तुलनेत एका महिलेला हार्ट अटॅक येऊ शकतो."

त्यांच्या मते, स्त्रियांची इस्ट्रोजेनची पातळी कमी होताच त्यांना मेनोपॉज होतो. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 60 वर्षांच्या स्त्री पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता समान पातळीवर असते. 65 वर्षांनंतर स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत आणखीनच वाढते.

त्यामुळे महिला असो वा पुरुष, दोघांनीही त्यांच्या आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला डॉक्टर देतात.

तरुणींमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या प्रश्नावर डॉ. ओ.पी. यादव सांगतात,"महिलांच्या जीवनशैलीतील जे काही बदल झालेत त्यामुळे त्यांना अशा आजारांना सामोरं जावं लागतंय. धुम्रपान, मद्यपान, मैद्याचे पदार्थ यामुळे अशा आजारांचा धोका वाढतोय. दुसरीकडे घरी असणाऱ्या महिला व्यायामाकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीत."

व्यायाम

फोटो स्रोत, Getty Images

जिम, सप्लिमेंट्स आणि कार्डियाक अरेस्ट

डॉक्टर सांगतात की, बऱ्याचदा होतं असं की, तुमच्या शरीराला जिमच्या व्यायामाची सवय नसते. आणि अशी सवय नसलेले व्यायाम केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

त्यामुळे जिम करताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणात हे व्यायाम सुरू करावेत. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यापूर्वी मेडिकल चेकअप करून घ्या.

जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर जास्त पाणी प्या, शरीरात मीठाची कमतरता भासू देऊ नका. अल्कोहोल, तंबाखू आणि ड्रग्ज सारख्या गोष्टींमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

डॉ विवेका सांगतात, "एनर्जी मिळणाऱ्या किंवा मसल्स तयार होतील असे ड्रिंक्स घेणं टाळा. कारण यामध्ये काही अशाप्रकारची औषधं असतात, ज्यामुळे तुमच्यात उत्तेजना येते. त्यामध्ये सिंथेटिक कंपाउंडस असतात, ज्यामुळे शारीरिक नुकसान होतं."

त्यामुळे रिटायरमेंट नंतर नाही तर त्याआधी, तारुण्यातही आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नियंत्रित आहार आणि व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)