व्यायाम करताना केलेल्या 'या' चुका ठरु शकतात जीवघेण्या? वाचा

पुनीत राजकुमार

फोटो स्रोत, TWITTER\@PUNEETHRAJKUMAR

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

कन्नड अभिनेता आणि 'यूथ आयकॉन' पुनीत राजकुमारच्या यांचा गेल्या वर्षी अचानक मृत्यू झाला.

पुनीत राजकुमार अत्यंत फिट असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र 46 व्या वर्षी झालेल्या त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं अनेकांना बुचकाळ्यात टाकलं आहे. एवढ्या फिट दिसणाऱ्या व्यक्तीचा असा मृत्यू कसा होऊ शकतो, हेच आश्चर्य सर्वांना वाटत होतं.

दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबर महिन्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला त्यावेळीही हाच प्रश्न उपस्थित झाला होता. 40 वर्षीय सिद्धार्थ प्रसिद्ध टीव्ही कलाकार आणि होस्ट होता. तो अत्यंत फिट दिसत होता.

पुनीत यांना जिममध्ये व्यायाम करताना छातीत वेदना सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कौटुंबिक डॉक्टर आणि प्रसिद्ध कार्डियॉलॉजिस्ट रमन्ना राव यांच्याशी संपर्क केला होता.

"मी त्यांची नाडी तपासली आणि रक्तदाब पाहिला. ते दोन्ही अगदी सामान्य होतं. एवढा घाम का येत आहे, असं मी त्यांना विचारलं तर त्यांनी व्यायाम करताना नेहमीच घाम येतो, असं सांगितलं. मी त्यांचा ईसीजी केला आणि लगेचच रुग्णालयात नेण्यास सांगितलं," असं राव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

विक्रम रुग्णालयातील कार्डियॉलॉजिस्ट डॉ. रंगनाथ नायर यांच्या मते, पुनीत यांना रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

या अशा काही घटनांमुळे चांगलं आरोग्य आणि पिळदार शरीर यासाठी जिममध्ये जाणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ही चर्चादेखील सुरू झाली.

सिद्धार्थ शुक्ला

फोटो स्रोत, @SIDHARTH_SHUKLA

12 वर्षांपूर्वी एसएपी इंडियाचे सीईओ रंजन दास यांना जिमहून परतल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांचं निधन झालं. 42 वर्षांच्या दास यांच्या मृत्यूनंतर 40 वर्षे वयाच्या लोकांनाही हार्ट अटॅक का येत आहे, असे प्रश्न उपस्थित झाले होते.

"लोक वजन उचलण्यासारखा व्यायाम करतात त्यावेळी स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. वजन उचलल्यामुळं शिरांवर जोर पडतो. खूप जास्त आणि मर्यादेपलिकडे व्यायाम हृदयाच्या वॉल्व्हसाटी चांगला नसतो," असं जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियो व्हस्कुलर सायंसेस अँड रिसर्च (एसजेआयसीएसआर) चे संचालक डॉ. सीएन मंजुनाथ यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

25-40 वयोगटात हार्ट अटॅक

एसजेआयसीएसआरद्वारे 2017 मध्ये दोन हजार जणांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात 25-40 वयोगटातील लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं असल्याचं, समोर आलं. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अशा प्रकरणांमध्ये 22 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

अभ्यासात 1500 रुग्ण कर्नाटकचे होते, तर 500 देशातील इतर राज्यांचे होते.

डॉ. मंजुनाथ यांच्या मते, या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजार नव्हते. शिवाय हार्ट अटॅकची शक्यता वाढणारी धुम्रपान, कौटुंबिक पार्श्वभूमी, मधुमेह, हायपरटेंशन आणि हाय कोलेस्ट्रॉल अशी इतर कारणंही नव्हती.

तरुणांमध्ये हार्ट अॅटॅक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तरुणांमध्ये हार्ट अॅटॅक

मात्र, पुनीत यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी म्हणजे अभिनेते शिवराजकुमार आणि अभिनेते तसंच निर्माते राघवेंद्र राजकुमार दोघांनाही हार्ट अटॅक आलेला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि चित्रपट सुष्टीशी संबंधित एचडी कुमारस्वामी राजकुमार कुटुंबाचे मित्र आहेत.

"दोघांनाही जिममध्ये हार्ट अटॅक आला होता. त्यांच्या कुटुंबाची तशी पार्श्वभूमी आहे,"असं कुमारस्वामी म्हणाले होते.

जिमचं वेड

आजच्या काळात तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन मसल्स तयार करण्याबाबत एक वेड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

"सध्याच्या काळात तरुणांमध्ये तपासणी न करता जिममध्ये जाणं आणि प्रोटीन सप्लिमेंट पावडर आणि प्रोटीन शेक घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे तरुण अशा जिम इन्स्ट्रक्टरच्या सांगण्यवरून प्रोटीन घेतात ज्यांच्याकडे सल्ला देण्याची क्षमताच नसते," असंही कुमारास्वामी म्हणाले.

जिम व्यायाम

फोटो स्रोत, Getty Images

''अनेक जिममध्ये तरुणांना स्टेरॉईड घेण्याचा सल्ला दिला जातो. स्टेरॉईड आरोग्यासाठी चांगले नसतात. भारतात अशा जिमची संख्या कमीदेखील असू शकते. पण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे," असं मत असोसिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अॅलेक्सेंडर थॉमस यांनी मांडलं.

"जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी प्रोटीन घ्यायला हवं अशी मान्यता आहे. मात्र, त्याला कसलाही आधार नाही. असं करणं चुकीचं आहे. डाएटमध्ये प्रोटीनची कमतरचा नसेल, तोपर्यंत सप्लिमेंट घ्यायची काहीही गरज नसते. जे लोक क्रीडा क्षेत्रांशी संबंधित असतात तेदेखील डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन घेतात," असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शीला कृष्णास्वामी म्हणाल्या.

व्यायाम किती करावा?

डॉ. मंजूनाथ सांगतात की, हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज (अधिक तणाव निर्माण होणारा व्यायाम) करण्यापूर्वी हृदयाची तपासणी करायला हवी.

व्यायाम

फोटो स्रोत, Getty Images

"लगेचच खूप जास्त व्यायाम सुरू करू नये. सुरुवातीला वॉर्म अप एक्सरसाईज करायला हवा. शिवाय हाय इंटेन्सिटी वर्कआऊट सुरू केल्यानंतरही तो रोज करू नये. त्यामुळं हृदयाशी संबंधित आजार सुरू होऊ शकतात." असं ते सांगतात.

जिममध्ये ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी एक रुटीन निश्चित करून त्याचं पालन करावं, असं फिजिओथेरपिस्टचं मत आहे.

"एका ठिकाणी किंवा बैठी लाईफस्टाईल असलेल्यांनी अनेक तपासण्या करायला हव्या. ते लवकर थकत तर नाहीत, हे त्यातून पाहायचं असतं. एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या व्यायामासाठी फिट आहे किंवा नाही, हे त्याद्वारे तपासायचं असतं," असं मेंगळुरूचे पीए इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीचे प्राध्यापक सजीश रघुनाथन म्हणाले.

"सुरुवातीला सावधगिरी बाळगण्यासाठी हाय इंटेन्सिटी वर्कआऊट सुरू केल्यानंतर तुम्हाला फार वेळ तर व्यायाम करत नाही, याकडं लक्ष द्यायचं असतं. बाहेरून निरोगी दिसणं म्हणजे तुमचं हृदयदेखील निरोगी असेलच असं नाही," असं डॉ. मंजूनाथ म्हणतात.

जिममध्ये लोकांच्या आरोग्यावर निगराणी ठेवण्यासाठी डॉक्टर असायला हवे, या कुमारस्वामींच्या मताशी डॉ. मंजूनाथ यांनी सहमती दर्शवली.

"मी तर सल्ला देईल की, जिममध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित लोक असायला हवे. त्यांना पुनर्जीवन उपकरणं चालवता यायला हवी, तसंच आपत्कालीन स्थितीत हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी डेफिब्रिलेटर शॉक देता आलं पाहिजे," असं ते म्हणाले.

"पुनीत जर आमच्याकडे दहा मिनिटं आधी आले असते तर कदाचित आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. आमच्याकडे असे रुग्ण येतात, जे रांगेत वाट पाहत असतात, त्यांना ही ट्रिटमेंट देण्यात आली आणि ते वाचले. त्यानंतर ते 20-30 वर्षे जगले," असं डॉ. मंजूनाथ सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)