24 दिवस, अनेक मृत्यू आणि एका गावाचं गूढ: हरियाणातील छांयसामध्ये नेमकं काय घडलं?

हारुणी
फोटो कॅप्शन, यकृत निकामी झाल्यामुळे मरण पावलेल्या दिलशादची आई हारुणी म्हणतात की, 48 तासांत सगळं संपले.
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

सकाळच्या थंड हवेत फज्रच्या नमाजची अजान कानावर पडत होती.

पण नल्हड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आयसीयूबाहेर बसलेल्या आशुबी दारावर नजर खिळवून बसल्या होत्या.

काही तासांपूर्वीपर्यंत, त्यांना खात्री होती की त्यांचा 14 वर्षांचा मुलगा, शारिक, लवकरच बरा होईल. कारण, त्यांच्या मुलाला फक्त ताप आला असल्याचं त्यांना वाटत होतं.

पण त्या दिवशी सकाळी, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता डॉक्टर काहीही करू शकत नाहीत. त्या अत्यंत कातर आवाजात सांगत होत्या, "काल रात्रीपर्यंत सर्व काही ठीक होतं... सकाळी उठून बघितलं तर डॉक्टर पम्पिंग करत होते."

चौदा वर्षांचा शारिक 25 जानेवारीच्या आधीपर्यंत पूर्णपणे बरा होता. त्यादिवशी मात्र तो अचानक आजारी पडला. त्याला ताप आला आणि त्यानंतर फक्त 48 तासांच्या आत त्याचा मृत्यू झाला. शारिकचं यकृत निकामी झालं होतं.

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छांयसा गावात गेल्या काही आठवड्यांपासून अशा गोष्टी घडत आहेत. अचानक आलेलं आजारपण, झपाट्याने खालावणारी तब्येत आणि त्यानंतर काही दिवसांतच मृत्यू.

19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान या गावात किमान 15 मृत्यू झाले आहेत, ज्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी यापैकी किमान सात मृत्यू हे काविळ आणि हिपॅटायटीस बी अशा आजारांमुळे झाल्याचं सांगितलं आहे.

आता, छांयसाच्या वातावरणात एका गूढ अनिश्चिततेचं आणि भीतीचं साम्राज्य पसरलं आहे.

गावात भीतीचं वातावरण आणि निर्माण झालेले प्रश्न

दिल्लीपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छांयसा गावात सुमारे सहा हजार लोक राहतात.

गावातली लहान मुलं रस्त्यावर खेळताना दिसतायत पण वडीलधारी आणि प्रौढांमध्ये मृत्यू आणि दहशतीचीच चर्चा वारंवार होत आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या गावातले अनेक लोक अचानक आजारी पडू लागले. मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की यापैकी बहुतांश जणांना सुरुवातीला फक्त ताप आला होता, काहींना पोटदुखी आणि काविळीची लक्षणं देखील दिसून आली आणि त्यानंतर अचानक त्यांची तब्येत खूप बिघडली.

गावकरी
फोटो कॅप्शन, गावातली लहान मुलं रस्त्यावर खेळताना दिसतायत पण वडीलधारी आणि प्रौढांमध्ये मृत्यू आणि दहशतीचीच चर्चा वारंवार होत आहे.

11 वर्षांच्या हुजैफाची आई म्हणते, "एका दिवशी अचानक ताप आला. औषध घेतल्यावर थोडं बरं वाटलं पण रात्री अचानक त्याची तब्येत बिघडली. दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणाले की यकृत निकामी झालंय."

जेव्हा डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला तेव्हा हुझैफाच्या आईने लगेच होकार दिला. पण त्यासाठीही वेळ नव्हता.

भरल्या डोळ्यांनी ती आई सांगत होती, "मी माझं यकृत दान करण्यास तयार होते, पण नंतर डॉक्टरांनी सांगितले की तुमचा मुलगा जगणार नाही."

48 तासांच्या आत मृत्यू आणि वाढती अस्वस्थता

बिना प्लास्टरच्या पत्र्याचे एक घर आहे. या घराच्या दरवाज्यातून एक जाड पडदा दिसतो.

दिलशाद 22 वर्षांचा होता. त्याचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्याच्या पत्नीला आता वैधव्य आलं आहे.

दिलशाद चेन्नईमध्ये काम करायचा आणि 9 फेब्रुवारीला तो घरी आला तेव्हा त्याला ताप होता. त्याच्या कुटुंबीयांनी आधी गावातच त्याच्यावर उपचार केले पण ताप कमी न झाल्याने त्यांना नल्हड मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं.

हकीमुद्दीन
फोटो कॅप्शन, हकीमुद्दीन म्हणतात की त्यांनी कधीही असं पाहिलेलं नाही की, एखाद्या व्यक्तीला ताप आला आणि त्याचा पुढच्या चार-पाच दिवसांत त्याचा मृत्यू झाला.

त्याची आई सांगते, "त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं... आणि 48 तासांच्या आत सर्व काही संपलं."

त्याचे वडील हकीमुद्दीन म्हणतात, "मी कधीही असा प्रकार बघितलेला नाही. आजारी पडलेल्या व्यक्तीला अचानक ताप येतो आणि त्यापुढच्या चार-पाच दिवसांत त्याचा मृत्यू होतो. "

मरण पावलेल्या इतर रुग्णांसारखंच दिलशादचं यकृत देखील निकामी झालं होतं.

या गावात मृत्यूच्या आकड्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होतायत. कोण म्हणतं पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे तर कुणी हा आकडा वीसच्या घरात असल्याचंही सांगतं.

शहनाज
फोटो कॅप्शन, शहनाज यांचा 11 वर्षांचा मुलगा हुजैफा याचंही यकृत निकामी झाल्यामुळे निधन झाले.

19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या काळात गावातल्या 15 लोकांचा मृत्यू झाल्याचं बीबीसी हिंदीला आढळून आलं आहे. यापैकी काहींचं त्यांच्या राहत्या घरीच वार्धक्याने निधन झालं आहे.

प्रशासनाने अचानक आजारी पडून झालेल्या किमान सात मृत्यूंची झाल्याची माहिती दिली. पण नेमकं या मृत्यूंमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

इथूनच तपासाला सुरुवात होते आणि अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण होतात.

प्रशासन काय करत आहे?

2 फेब्रुवारीपासून या गावात आरोग्य विभागाकडून एक शिबीर लावण्यात आलं आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत.

सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शर्मा म्हणतात, "सुमारे 1100 नमुने घेण्यात आले आहेत. 2100 हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे."

ते म्हणतात, "आम्ही गावात क्लोरीनेशन केलं आहे आणि 209 लोकांना हेपेटायटीस बीची लस दिली आहे जेणेकरून हा आजार रोखता येईल. आम्ही पाण्याची तपासणी आणि हेवी मेटल चाचण्या देखील करत आहोत."

डॉ. संजय शर्मा
फोटो कॅप्शन, सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शर्मा यांच्या मते, अंदाजे 1100 नमुने घेण्यात आले आहेत.

जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ म्हणतात, "आतापर्यंत सात मृत्यू झाले आहेत, मृतांपैकी चार जण हेपेटायटीस बी पॉझिटिव्ह होते. याशिवाय, तपासणीदरम्यान, गावात हेपेटायटीस सीचे 17 रुग्ण आढळले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे."

अधिकाऱ्यांचे दावे आणि गावात पसरलेली अस्वस्थता यामध्ये एक स्पष्ट अंतर दिसून येतंय. 'हे जुनं आजारपण असेल तर अचानक एवढे मृत्यू कसे झाले?' हा सवाल गावकरी विचारत आहेत.

पाण्यामुळे मृत्यू झाले का?

या गावच्या जमिनीखाली ताज्या पाण्याचा कसलाही स्रोत नाही. छांयसा गावातल्या बहुतांश घरांबाहेर पाण्याच्या टाक्या दिसतात.

शारिकची आई एका बादलीतून तांब्यात पाणी घेते आणि म्हणते की, "प्यायचं पाणी विकतच घ्यावं लागतं."

गावातल्या टाकीतून त्या रोज दोन बादल्या भरून पाणी आणतात. प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन तर आहे पण गावकरी म्हणतात की त्या पाइपमधून येणारं पाणी माणसं पिऊ शकत नाहीत.

दिलशादचे वडील हकीमुद्दीन म्हणतात, "पाणी हे देखील मृत्यूचं कारण असू शकतं. आमच्या गावात लोक शिळं पाणी पितात. महिन्यातून एकदाच टाकी भरली जाते आणि मग पुढचे तीस दिवस त्याच पाण्यावर जगावं लागतं."

या गावाच्या आजूबाजूला साचलेलं पाणी हीदेखील एक मोठी समस्या आहे. गावाबाहेर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे.

गावाजवळून जाणाऱ्या गुरुग्राम कालव्यातील पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त आहे.
फोटो कॅप्शन, गावाजवळून जाणाऱ्या गुरुग्राम कालव्यातील पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त आहे.

गावाजवळून वाहणाऱ्या गुरुग्राम कालव्याकडे बघितल्यावर गावकरी एवढे चिंतातुर का झाले आहेत ते कळतं. या कालव्यातलं पाणी काळं आणि दुर्गंधीयुक्त आहे.

स्थानिक कार्यकर्ते रामेश्वर म्हणतात, "या कालव्यात औद्योगिक रसायनं आहेत. या पाण्यात हात घातला तर लगेच खाज सुटते. छांयसा आणि आसपासच्या गावांमधली सुमारे पन्नास हजार एकर जमीन पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. हे पाणी तिथेच साचलं आहे, त्याला बाहेर काढता येत नाही."

या पाण्याचा आणि यकृत निकामी होण्याचा काही संबंध आहे की नाही? याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अजूनही खात्रीलायक काही सांगितलेलं नाही.

मात्र जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ म्हणतात, "आम्ही पाण्याची चाचणी केली आहे, अहवाल अजून आलेला नाही."

छांयसा आणि आसपासच्या गावांमधील पन्नास हजार एकर जमीन पावसाच्या पाण्यात बुडाली आहे.
फोटो कॅप्शन, छांयसा आणि आसपासच्या गावांमधील पन्नास हजार एकर जमीन पावसाच्या पाण्यात बुडाली आहे.

गावाबाहेर पावसाचं पाणी साचलंय. शेतांमध्ये पाणी भरलंय. काही शेतकरी म्हणतात की यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

एका स्थानिकाने म्हटलं की, "इथे वर्षभर पाणी साचलेलं असतं, सगळी शेती बरबाद झाली आहे."

या गावाचं भौगोलिक स्थान आणि पर्यावरण यामुळे या आजाराच्या चर्चेत आणखी भरच पडली आहे.

स्थानिक काँग्रेस आमदाराचे पुत्र नाझीम चौधरी म्हणतात, "या समस्येचं मूळ कालव्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यात आहे. या भागात औद्योगिक कचऱ्याने जमिनीवर थर तयार केला आहे आणि जमीन पाणी शोषण्यास असमर्थ आहे. जोपर्यंत हे घाणेरडं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत या समस्या तशाच राहतील."

आर्थिक तरतुदीच्या प्रतीक्षेत

जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ यांचा दावा आहे की, सरकार लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.

डॉ. वशिष्ठ म्हणतात, "मुख्यमंत्र्यांच्या सूचना स्पष्ट आहेत: जिथे जिथे असं प्रदूषित पाणी येईल तिथे एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) बांधले पाहिजेत. सरकार यावर काम करत आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला जलशुद्धीकरण संयंत्रे बसवण्यासाठी अधिकचा निधी मिळेल, जेणेकरून पाणी स्वच्छ केल्यानंतरच आम्ही ते शेतात आणि सार्वजनिक वापरासाठी पाठवू शकू."

जिल्हा उपायुक्त
फोटो कॅप्शन, जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ

पण नाझीम चौधरी म्हणतात की जोपर्यंत दिल्लीतून प्रदूषित पाण्याचा प्रवाह थांबत नाही तोपर्यंत या ग्रामीण भागातील प्रदूषित पाण्याची समस्या सुटणार नाही.

असं असलं तरी पलवलच्या गावांमध्ये होणारे हे मृत्यू आणि हे साचलेलं पाणी किंवा यमुनेचं प्रदूषण यांचा थेट संबंध जोडणारा एकही वैज्ञानिक अहवाल सध्या उपलब्ध नाही.

गावात सरकारी दवाखाना तर आहे पण भोंदू डॉक्टर उपचार करतायत

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता कच्चा आहे. केवळ रस्ताच कच्चा नाही तर गावकरी सांगतात की इथे डॉक्टरांचं दर्शन सुद्धा दुर्मिळ आहे.

या गावात राहणारे मुस्तकीम म्हणतात, "या दवाखान्यातल्या रस्त्यावर नेहमीच पाणी साचलेलं असतं. आम्ही कसेबसे जरी तिथे पोहोचलो तर डॉक्टर नसतात मग गावातल्या भोंदू (झोलाछाप) डॉक्टरकडून इलाज करून घेण्याशिवाय पर्याय नसतो."

तिथले इतर काही गावकरी देखील असे आरोप लावतात.

मुस्तकीम म्हणाले, "सगळे म्हणतायत की दूषित पाण्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे एक कारण असू शकतं पण या भोंदू डॉक्टरांकडून हे संक्रमण पसरलं असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही."

प्राथमिक आरोग्य केंद्र
फोटो कॅप्शन, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पाण्याने भरलेला आहे आणि लोक रुग्णालयात पोहोचण्यात यशस्वी झाले तरी डॉक्टर तिथे नसतात.

मागच्या काही दिवसांमध्ये मृत पावलेल्या बहुतेक लोकांमध्ये एक समान धागा दिसून येतो आणि तो म्हणजे त्यांनी पहिल्यांदा अशा भोंदू डॉक्टरांकडे उपचार केले आहेत.

सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय शर्मा म्हणतात, "आम्ही बनावट डॉक्टरांवरही कारवाई करत आहोत, त्यांच्याकडून संसर्ग पसरला का याचीही चौकशी केली जात आहे."

प्रशासन हे मृत्यू चुकीच्या उपचारांशी जोडलेले असण्याची शक्यता नाकारत नाही.
फोटो कॅप्शन, प्रशासन हे मृत्यू चुकीच्या उपचारांशी जोडलेले असण्याची शक्यता नाकारत नाही.

जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ म्हणतात, "हिपॅटायटीस बी आणि सी हे रक्तातून होणारे संसर्ग आहेत. अशीही शक्यता आहे की या भोंदू डॉक्टरांनी एकाच सिरिंजचा वारंवार वापर केला असेल. आम्ही काही बनावट डॉक्टरांवर कारवाई देखील केली आहे."

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या पथकानेही मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयातील पथकांनीही गावाला भेट दिली आहे.

डॉ. वशिष्ठ म्हणतात, "कधीकधी जेव्हा एखादा साथीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्याचं त्वरित निदान करणं सोपं नसतं, कारण मृत्यू आधीच झालेले असतात. सगळ्या टीम तिथे आहेत, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची टीम तिथे आहे, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय नलहारच्या टीमनेही नमुने घेतले आहेत, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या टीमनेही भेट दिली आहे. सर्व डॉक्टर आणि साथीचे रोग तज्ञ त्यांचं काम करत आहेत."

ते म्हणतात, "सर्व अहवाल येईपर्यंत, या अचानक झालेल्या मृत्यूंचे खरे कारण काय आहे हे निश्चितपणे सांगता येणार नाही."

'माझा मुलगा सर्वात निरोगी होता'

काविळ, हिपॅटायटीस बी आणि यकृत निकामी झाल्यामुळे होणारे हे अचानक मृत्यू फक्त छायंसा गावापुरते मर्यादित आहेत.

जिल्हा उपायुक्त डॉ. हरीश वशिष्ठ आणि आरोग्य अधिकारी संजय शर्मा यांच्या मते, आजूबाजूच्या गावांमधून असा कोणताही रुग्ण आढळलेला नाही.

आशूबी
फोटो कॅप्शन, आशूबी को यकीन ही नहीं हो रहा कि उनके बेहद तंदुरुस्त बेटे की यूं मामूली से बुख़ार से मौत हो गई

सध्या छांयसा गावात मृत्यूची मालिका थांबली आहे पण प्रश्न अधिक गंभीर होतो की एकाच गावात अचानक इतके मृत्यू कसे झाले?

गावातील ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

आशुबी विचारतात, "माझा मुलगा तंदुरुस्त आणि निरोगी होता, त्याच्या वडिलांना त्याला पैलवान बनवायचं होतं. तो तापाने गेला हे मी कसं मानू? त्याचं यकृत अचानक कसकाय निकामी झालं?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)