इन्फ्लुएन्सरकडून विकल्या जाणाऱ्या PCOS च्या उपचारांवर डॉक्टर आक्षेप का घेत आहेत?

फोटो स्रोत, Kourtney Simmang
- Author, जेकी वेकफिल्ड
मासिक पाळीतल्या असह्य वेदना, न थांबणारी वजन वाढ, नैराश्य आणि सततचा थकवा… जवळपास 12 वर्ष सोफी अशा लक्षणांतून जात होती. पॉलिसिस्ट ओव्हरी सिन्ड्रोम (PCOS) या आजाराचं निदान तिला झालेलं.
संप्रेरकांच्या अव्यवस्थित स्रावामुळे निर्माण होणारी ही स्थिती प्रत्येक 10 पैकी एका महिलेमध्ये दिसते. पण वैद्यकीय मदत मिळवायला सोफीला बराच त्रास झाला.
तिचं आरोग्य सुधारण्यासाठी तिने स्वतःच काहीतरी प्रयत्न करायला हवेत असं तिला वाटू लागलं. तेव्हाच कर्टनी सिमंग यांच्या नावाचं पेज तिच्या इन्स्टाग्रामवर झळकलं.
संशोधकांना अजूनही सापडलं नसलं तरी पीसीओएसचं मूळ कारण बरं करण्याचं वचन कर्टनी देत होत्या. काही चाचण्या, एक आरोग्याची नियमावली, विशिष्ट आहार आणि काही पूरक पदार्थ त्या ग्राहकांना विकत होत्या. या सगळ्याचा खर्च 3,600 डॉलर्स. सोफीने नोंदणी केली. याशिवाय कर्टनी यांनी दिलेल्या काही लिंक्सवरून पूरक पदार्थ विकत घेण्यासाठी आणखी काही डॉलर्स खर्च केले.
पण तपासण्या करायला सांगण्यासाठी कर्टनी मान्यताप्राप्त नाहीत असं स्त्रीरोगतज्ञ आणि महिला आरोग्य प्रशिक्षक डॉ. जेन गंटर सांगतात. शिवाय, कर्टनी विकत होत्या त्या तपासण्यांचा फारसा काही उपयोगही नाही.
वर्षभरानंतरही सोफीला लक्षणांपासून आराम मिळाला नाही. तेव्हा तिने कर्टनी यांनी सांगितलेले उपाय करणं सोडून दिलं.
"मी त्या उपाययोजना करणं सोडलं, तेव्हा माझं माझ्या शरीरासोबतचं आणि अन्नासोबतचं नातं इतकं खराब झालं होतं की आता मला पीसीओएस कधीच बरा करता येणार नाही असंच वाटू लागलं," सोफी सांगते.
आम्ही कर्टनी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
वैद्यकीय प्रशिक्षण न घेतलेल्या अशा इन्फ्लुएन्सर्सचे लाखोंमध्ये फॉलोवर्स असतात. पीसीओएससारख्या आजारावर सोपे उपचार उपलब्ध नाहीत या परिस्थितीचा फायदा घेऊन ते स्वतः त्या विषयातले तज्ज्ञ म्हणून पुढे येतात आणि खोटे उपाय विकतात.
काही लोक त्यांना पोषणतज्ज्ञ किंवा चक्क संप्रेरकतज्ज्ञ प्रशिक्षक असं म्हणतात. पण ही असली नावं ऑनलाईन काही आठवड्यातंच मिळवता येतात.
सप्टेंबर महिन्यात पीसीओएस या हॅशटॅगखाली सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टीकटॉक आणि इन्स्टाग्रामवरचे व्हीडिओ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने पाहिले. त्यातले अर्धे व्हीडिओ खोटी माहिती पसरवणारे होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, पीसीओएस असलेल्या महिलांपैकी जवळपास 70 टक्के महिलांचं निदान झालेलं नाही. ज्यांचं निदान झालं आहे त्यांनाही योग्य ते उपचार मिळवण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो.
"अशा पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रात जिथे दरी निर्माण असते त्याचा फायदा हे लोक घेतात," डॉ. गंटर सांगतात.

या इन्फ्लुएन्सर्सकडून सांगितल्या जाणाऱ्या काही दिशाभूल करणाऱ्या गोष्टी :
- आहारात बदल करून, पूरक पदार्थ खाऊन पीसीओएस बरा करता येऊ शकतो.
- कमी कार्बोहायड्रेट, जास्त फॅट्स असणारा किटो आहार करून पीसीओएस बरा करता येऊ शकतो.
- गर्भनिरोधक गोळ्यांनी पीसीओएस होतो किंवा त्यामुळे आजाराची लक्षणं तीव्र होतात
- वैद्यकीय उपचारांनी पीसीओएस दाबला जातो पण त्याने आजाराच्या मूळ कारणावर काम होत नाही.


कॅलरी खूप कमी असलेल्या आहाराने काही सकारात्मक बदल होतो, याबद्दलचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पण किटो आहाराने लक्षणं तीव्र होतात हे मात्र पाहण्यात आलं आहे. गर्भनिरोधक गोळ्यांनी पीसीओएस होत नाही. उलट त्या गोळ्या सगळ्यात नाही, पण अनेक बायकांना फायदेशीर ठरतात. पीसीओएसचं मूळ कारण आजवर कोणालाही कळालेलं नाही आणि त्यामुळेच त्यावर उपायही शोधता आलेला नाही.
लोकांना इजा पोहोचेल अशी कोणतीही दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती टीकटॉकवर टाकण्याची परवानगी दिली जात नाही असं या सोशल मीडिया ॲपचे प्रवक्ते म्हणाले.
तर महिलांच्या आरोग्याबद्दलचा मजकूर कोणत्याही बंधनांशिवाय टाकण्याची परवानगी असते असं मेटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. आरोग्याबद्दलची चुकीची माहिती काढून टाकण्यासाठी काय करायचं याबद्दल त्यांची चर्चा सुरू आहे, असंही ते पुढे म्हणाले.
पीसीओएस म्हणजे काय?
पीसीओएस ही खरंतर संप्रेरकांवर दीर्घकाळ परिणाम करणारी स्थिती असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास 8 ते 13 टक्के महिलांना त्याचा त्रास होतो.
खूप वेदनादायी आणि अनियमित मासिक पाळी, वजन वाढ आणि अंगावरच्या केसांची जास्तीची वाढ अशी पीसीओएसची लक्षणं इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सिस्टिमने सांगितली आहेत.
महिलांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढण्याचं पीसीओएस हे महत्त्वाचं कारण आहे असं एनएचएस पुढे म्हणते. पण उपचार घेऊन अनेक महिला यशस्वीपणे मूल जन्माला घालू शकतात.
केनिया, नायजेरिया, ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधल्या 14 वेगवेगळ्या महिलांनी इन्फ्लुएसर्सने सांगितेल्या उत्पादनांचा वापर केल्यानंतरचे अनुभव बीबीसीला सांगितले.
त्यातल्या बहुतेक जणींने टॅलन हॅक्टोरियन यांचं नाव घेतलं. टीकटॉक आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे २० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
नोंदणीकृत आहारतज्ज्ञ म्हणून टॅलन 219 डॉलर्स किमतीचे पूरक पदार्थ विकत असतात. त्यांच्या वजन कमी करण्याच्या योजनेसाठी त्या प्रत्येक महिन्याला 29 डॉलर्स फी घेतात. गर्भनिरोधक गोळ्या, मेटफॉर्मिनसारख्या डायबेटिसच्या गोळ्या अशा औषधांविरोधात त्या बोलत असतात. पण प्रत्यक्षात याच गोळ्यांनी पीसीओएस असणाऱ्या महिलांना मदत होते.

पूरक आहारातून नैसर्गिकपणे बरे होण्याचा सल्ला टॅलन प्रेक्षकांना देत असतात. त्या वजनावर नको तितका भर देतात. पोटाच्या घेराला 'पीसीओएस बेली' म्हणतात.
तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडून मदत मिळणं अवघड झालं तेव्हा उत्तर आर्यलँडच्या एमीने टॅलनचे काही सल्ले पाळण्याचा निर्णय घेतला.
"वाढलेल्या पोटाच्या घेरानं मला खरोखर खूप असुरक्षित वाटायचं," एमी सांगत होती.
ग्लूटन आणि डेअरीची उत्पादनं वापरू नका आणि किटो आहार घ्या असा सल्ला टॅलन देत असत. चांगल्या आहाराने पीसीओएसच्या लक्षणांमध्ये फरक पडत असला तरी ग्लुटन आणि डेअरी उत्पादनाने नकारात्मक परिणाम होतो याबद्दल कोणताही पुरावा नाही.
किटो आहाराने एमी वारंवार आजारी पडू लागली. ग्लूटन आणि डेअरी उत्पादनं आहारातून काढून टाकणं तिच्यासाठी फार अवघड होतं.
"तुम्ही हारलात अशी भावना यातून तुमच्या मनात येते," ती म्हणाली. "काही दिवसांपुर्वी माझं वजन एवढं नव्हतं. पण हे लोक तुमच्या मनात स्वतःबद्दल वाईट भावना निर्माण करतात. त्याने मला आणखी आहार नियंत्रण करावं वाटे आणि जास्त पूरक आहार विकत घ्यायला भाग पाडलं जाई."
इन्फ्लुएन्सर्सच्या अशा आहाराच्या नियमांमुळे माणसाला अक्षरशः भस्म्या होऊ शकतो असं डॉ. गंटर सांगतात.
बीबीसीच्या प्रश्नांवर टॅलन यांनीही प्रतिक्रिया दिली नाही.
लक्षणं कमी करण्यासाठी एमीच्या डॉक्टरांनी तिला गर्भनिरोधक गोळ्या दिला. पण त्यापुढे काय उपचार द्यायचे याची माहिती त्यांना नव्हती. गरोदर होण्याची इच्छा असेल तेव्हा परत उपचाराला ये असं त्यांनी तिला सांगितलं.
उपचार उपलब्ध नसल्यास रुग्णाला फार असहाय्य वाटू लागतं, डॉ. गंटर म्हणतात. चुकीच्या माहितीने रुग्ण वैद्यकीय मदत घ्यायला अनेकदा उशीर करतात आणि त्यामुळेच आजार जास्त वाढतो. अनेकदा हेच टाईप 2 डायबेटिसमागचं कारण ठरतं.

नायजेरियाची वैद्यकीय शिक्षण घेणारी मेडलीन पीसीओएसबद्दलच्या काही चुकीच्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करते. अनेक पद्धतीचे आहार आणि पूरक पदार्थ तिनेही वापरून पाहिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता इतर महिलांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जावं आणि संशोधनावर आधारलेलेच उपचार घ्यावेत यासाठी मेडलीन प्रोत्साहन देते.
"पीसीओएसचं निदान होतं तेव्हा त्यासोबत कलंकाची भावना तुम्हाला येऊन चिकटते. तुम्ही आळशी आहात, स्वतःची काळजी घेऊ शकत नाही आणि तुम्हाला कधी मूलही होणार नाही, असा विचार लोक करायला लागतात. मग कोणालाही तुमच्याशी मैत्री करण्यात, तुमच्याशी लग्न करण्यात रस नसतो," मेडलीन म्हणते.
पण आता पीसीओएसमुळे शरीरात झालेले बदल ती वाखाणते. "माझ्या पीसीओएसचा, नको तिथे वाढलेल्या केसांचा, वाढलेल्या वजनाचा स्वीकार करणं माझ्यासाठी फार अवघड होतं. पण याच गोष्टी माझं वेगळेपण आहेत," ती म्हणते.
अमेरिकेतल्या पीसीओएस चॅलेंज या धर्मदाय संस्थेच्या साशा ओटी म्हणतात की योग्य ते उपचार घेतले तर महिला गर्भधारणाही करू शकतात.
"पीसीओएससोबत जगणाऱ्या महिलांनाही इतर महिलांसारखीच आणि तितकीच मुलं होतात," त्या म्हणतात. त्यासाठी फक्त थोड्या मदतीची गरज असते असं त्या पुढे सांगतात.
त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडून काही मदत मिळत नसेल तर महिलांनी विशेषतज्ज्ञांकडे जायला हवं असं डॉ. गंटर म्हणतात.
"आजाराची जास्त माहिती असणाऱ्या आणि आधुनिक उपचार देणाऱ्या विश्वासू एंडोक्राइनोलॉजिस्ट, प्रसुतीतज्ज्ञ किंवा स्त्रीरोगतज्ज्ञाकडे महिलांनी जायला हवं," त्या सांगतात.
सोफी आणि तिचे डॉक्टर तर तिच्या शरीरावर काम करणारे चांगले उपचार कोणते याचा अजूनही शोध घेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











