लग्न करायचं वचन देऊन सेक्स केला आणि लग्न केलंच नाही, हा कायद्याने गुन्हा ठरतो का?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

लग्नाचं वचन देऊन एखाद्या महिलेसोबत तिच्या संमतीने (consent) सेक्स केला आणि जर लग्न केलंच नाही, किंवा काही कारणावश झालं नाही, तर तो कायद्याने गुन्हा ठरतो का?

त्या केसमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो का?

हे प्रश्न उद्भवायचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झालेली एक केस. नव्या मुंबईत राहाणाऱ्या एका महिलेने पोलिसात तक्रार केली होती की एका पुरुषाने मला लग्नाचं वचन देत माझ्याशी संबंध ठेवले आणि लग्न केलं नाही.

त्या पुरुषाचं आधीच लग्न झालं होतं.

2008 ते 2017 या काळात त्या महिला व पुरुषात संबंध होते, त्यानंतर संपुष्टात आले.

लग्नाचं वचन दिलं, सेक्स केला आणि लग्न केलं नाही म्हणून या महिलेने पुरुषाविरोधात पोलिसात तक्रार केली. त्या पुरुषाला अटक झाली व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

आरोपी पुरुषाने एफआयआर रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टाने ती याचिका अमान्य केली.

महिलेचं म्हणणं होतं की तिने सेक्ससाठी दिलेली संमती ही त्या पुरुषाने दिलेल्या लग्नाच्या वचनावर आधारित होती. त्या पुरुषाने तिची संमती मिळवण्यासाठी खोटं सांगितलं, आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 नुसार चुकीची माहिती देऊन किंवा खोटं सांगून जर एखाद्या महिलेची सेक्ससाठी संमती (consent) मिळवली असेल तर तो बलात्कार ठरतो.

पण याची सुनावाणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, “या विशिष्ट केसमध्ये ती महिला आणि पुरुष 2008 ते 2017 एवढ्या दीर्घकाळासाठी रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याकाळात अनेकदा शारिरीक संबंध आले असतील. जरी सुरुवातीला खोटं सांगून शारिरीक संबंधांसाठी संमती मिळवली असेल, सकृतदर्शनी तसे पुरावे कोर्टासमोर आलेले नसले तरी, एकवेळ तसं गृहीत धरलं तरी, नऊ वर्षांच्या संबंधात दरवेळी महिलेची संमती खोटं बोलून मिळवली आणि महिलेला एकदाही संशय आला नाही किंवा तिने प्रतिकार केला नाही, अशा संबंधांना हरकत घेतला नाही. नऊ वर्षांचा कालावधी केल्याने महिलेले याचिकेत उल्लेख केलेल्या गुन्ह्याची (खोटं सांगून संमती मिळवणे) तीव्रता कमी होते."

सुप्रीम कोर्ट
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुरुष पक्षकारांच्या वकील ॲड मृणाल बुवा यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या संदर्भामध्ये अजिबात अन्यायकारक नसून केवळ या संबंधित केसच्या वस्तुस्थितीला धरून आहे."

त्या पुढे म्हणतात, "या मागचे प्रमुख कारण म्हणजे महिलेने तक्रारीमध्ये स्वतः सांगितले होते की तिचे संबंधित पुरुषासोबत 9 ते 10 वर्ष सहमती संबंध होते, तक्रारदार महिलेला संबंधित पुरुष विवाहित असल्याची प्रथमपासूनच पूर्ण कल्पना होती, संबंधित पुरुष तक्रारदार महिलेला आर्थिक मदत करत होता. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवण्यात आले असा कोणताही मुद्दा तक्रारीमध्ये न्यायालयास दिसून आला नाही. या उलट हे संबंध एकमेकांच्या संमतीने होते, त्यामुळे संमतीने असलेले संबंध संपल्यानंतर, बलात्काराचा गुन्हा दाखल करणे चिंताजनक आहे असे विचार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले."

तक्रारदार महिलेला संबंधित पुरुष विवाहित असून कायद्यानुसार तो पहिली पत्नी हयात असताना, दुसरा आपल्याशी दुसरा विवाह करत नाहीये याची पूर्ण कल्पना असूनही तक्रारदार महिलेने 9 ते 10 वर्षे स्वसंमतीने शारीरिक संबंध ठेवल्याने त्यास misconception of facts म्हणजे वस्तुस्थिती संदर्भातील गैरसमज असे म्हणता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, अशी माहिती मृणाल बुवा यांनी दिली.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

यात गुंतलेली महिला, आरोपी पुरुष तसंच त्या पुरुषाची पत्नी यांच्या झालेल्या व्यवहार, तसंच संबंध याचे तपशील बरेच गुंतागुतींचे आहेत. पण अशा प्रकारची ही पहिलीच केस नाही.

लग्नाचं वचन देऊन किंवा आमिष दाखवून महिलेची शारीरिक संबंधांसाठी संमती मिळवली आहे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या कोर्टात त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निकालही आले आहेत.

त्यामुळे या विशिष्ट केसच्या तपशीलात न शिरता आपण तज्ज्ञांच्या मदतीने हे जाणण्याचा प्रयत्न करू की जेव्हा एखाद्या महिलेला लग्नाचं वचन देऊन, किंवा लग्न करतो असं सांगून तिच्याशी तिच्या संमतीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले तर तो कायद्याने गुन्हा ठरतो का? असेल तर कितपत गंभीर? आणि कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होतो?

नागपूरचे एक पोलीस अधिकारी यावर बोलताना सांगतात की, “अशा प्रकारची केस आमच्याकडे आली की आमची प्रोसिजर अशी आहे की 376 (भारतीय दंडसंहितेतलं बलात्काराचं कलम) लावायचं. 420 (फसवणुकीचं कलम) ही लागतं.”

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

एफआयआर नोंदवली गेली तर ही कलमं लागतात. त्यानुसार पुढे कारवाई होते आणि कोर्टात केस उभी राहिल्यावर प्रत्येक केसमध्ये असलेली तथ्थं आणि तपशीलांनुसार, तसंच कोर्टासमोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार सुनावणी होते.

ॲड. रंजना गवांदे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात काम करतात. त्या म्हणतात, “कोर्टाने पूर्वी निकाल दिलेत की, अशा प्रकारच्या केसेसमध्ये कन्सेंट व्हॅलिड नाहीये, आणि रेप धरलेलं आहे. पण अलीकडच्या काळात दोन तीन जजमेंट आलेत जिथे कोर्टाने म्हटलंय की जर दीर्घकाळासाठी जर ते एकत्र राहात असतील तर तो रेप धरता येणार नाही. पण लिव्ह-इनमध्ये राहाणाऱ्या महिलेला डोमेस्टिक व्हायलन्सखाली केस दाखल करता येऊ शकते.”

दीर्घकाळाची व्याख्या ठरवणं हे कोर्टकेसच्या परिस्थितीनुसार ठरतं असंही गवांदे म्हणतात.

पुण्यातल्या वकील ॲड. रमा सरोदे हे मान्य करतात की अशा बाबतीत प्रत्येक केसचे तपशील वेगळे असतात, आणि त्यात एक सरसकट नियम लावता येणार नाही.

“हे खूप सब्जेक्टिव्ह असतं. जसं लग्न झाल्यानंतर अनेक घटस्फोट घेतात, कधी लग्न ठरतं पण मोडतं. त्याला अनेक कारणं असतात. त्यात घरच्यांच्या मागण्या, एकमेकांशी न पटणं, आर्थिक कारणं काहीही असू शकतं आणि लग्न मोडतं. त्याला प्रत्येकवेळी फसवण्याचा अँगल नाही देता येत. हो, असंही अशू शकतं, की सुरुवातीपासूनच माहिती होतं की मी हिच्याशी लग्नच करणार नाही आणि तिला आमिष दाखवणं, अशा वेळेस गंभीर स्वरूपाची कलमं लागू शकतात.”

हे कोर्टाने समोर आलेल्या तथ्यांचा लावलेला अर्थ आणि कोर्टाच्या विवेकावर असतं.

लग्न

फोटो स्रोत, Getty Images

रमा सरोदे पुढे म्हणतात, “कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये इंटेन्शन (उद्देश) महत्त्वाचं असतं.

जर लग्न करण्याचं इंटेन्शन त्याने दाखवलेलं असेल तर मग ती क्रिमिनल केस ठरत नाही. पण त्याचं इंटेन्शन सुरूवातीपासूनच नसेल, तर मग कोर्ट त्याचा वेगळा विचार करू शकतं. पण इथे महिलांनी सतर्क असणंही महत्त्वाचं आहे. पण होतं काय की आपण एवढा प्रॅक्टिकल विचार करू शकत नाही. प्रेमात असतो, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते.”

बलात्कार आहे की नाही, याची व्याख्या करताना कोर्ट कन्सेंट (संमती) विचारात घेतं.

भारतीय दंडसंहितेनुसार खालील परिस्थितीमध्ये ळी झालेला सेक्स किंवा तत्सम शारिरीक क्रिया बलात्कार ठरते.

  • महिलेच्या इच्छेविरुद्ध
  • महिलेच्या संमतीविना
  • स्वतःच्या किंवा जवळच्या कोणा व्यक्तीला इजा होईल किंवा मारून टाकलं जाईल या भीतीने महिलेने संमती दिली असेल तर
  • हा माणूस आपला नवरा आहे, त्याच्याशी आपलं लग्न झालं आहे असं समजून तिने संमती दिली असेल तर
  • मानसिक संतुलन ढळलेलं असताना किंवा नशेत असताना महिलेने संमती दिली असेल तर
  • पुरुषाने गुंगीचं औषध देऊन संमती मिळवली असेल तर
  • अशा परिस्थितीत जेव्हा महिलेला आपण कशाला संमती देतोय आणि त्याचे काय परिणाम असतील हे कळत नसेल तर
  • जर तिचं वय अठरापेक्षा कमी असेल तर तिच्या संमतीविना किंवा संमतीसह
  • आणि शेवटचं म्हणजे तिची संमती आहे की नाही हे तिला सांगता येत नसेल किंवा व्यक्त करता येत नसेल तर
vg

फोटो स्रोत, Getty Images

याखेरीज भारतीय दंडसंहितेचं कलम 90 म्हणतं की की भीती किंवा चुकीच्या धारणेमुळे (misconception of facts) दिलेली संमती असेल तरीही तो बलात्कारच असतो.

पण यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे शारिरिक संबंध प्रस्थापित करताना पुरुषाला माहिती असेल की ही संमती भीती किंवा चुकीच्या धारणेमुळे मिळाली आहे, आणि तरीही त्याने शारिरीक संबंध प्रस्थापित केले असतील तर.

याच अनुषंगाने भाष्य करताना करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, “misconception of facts तेव्हा म्हणता येईल जेव्हा लग्नाचं वचन खोटं होतं आणि ज्याने दिलं त्याचा सुरुवातीपासूनच हे वचन पाळण्याचा कोणताही इरादा नव्हता. फक्त शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसं सांगितलं गेलं. पण लग्नाचं वचन देऊन मोडलं, पण सुरुवातीला तसा उद्देश नव्हता, परिस्थितीमुळे तसं करावं लागलं, मग त्याला misconception of facts म्हणता येणार नाही.”

पण मग अशा परिस्थितीत महिलांना कायद्याचा कोणताच आधार नाही का? तर नाही, सरकारने नवीन आणलेल्या भारत न्याय संहितेत लग्नाचं वचन देऊन शारिरीक प्रस्थापित करणं आणि ते न पाळणं यासाठी नवीन कलम आलेलं आहे.

काय आहे हे कलम ?

1 जुलै 2024 पासून पूर्वीच्या भारतीय दंडसंहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे.

यात असं म्हटलंय की एखाद्या महिलेला फसवून, तिला नोकरी, नोकरीत बढती, किंवा लग्नाचं आमिष दाखवून, ते पाळण्याचा कोणताही उद्देश नसताना, जर शारिरीक संबंध प्रस्थापित केले तर तो कायद्याने गुन्हा ठरेल.

“हा तांत्रिक बदल आहे. पूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद फक्त बलात्कारांच्या कलमाखाली होत होती, आता त्यासाठी नवं कलम आहे आहे,” दिल्लीतल्या वकील सीमा कुशवाह म्हणतात.

“अशा प्रकारच्या घटनांमध्ये महिलांना खूप त्रास होतो. जर लिव्ह-इन-रिलेशनशिप असेल, आणि लग्नाचं वचन दिलं असेल. ते पाच-सात वर्षं राहात असतील. सतत दिल्या जाणाऱ्या लग्नाच्या वचनासाठी ती महिला या नात्यात राहिली असेल, आणि मग पुरुषाने अचानक लग्नाला नाही म्हटलं, तर मग ती महिला कुठे जाणार? तिला कोणता पर्याय राहातो? म्हणून हा कायदा महत्त्वाचा आहे,” सीमा कुशवाह पुढे म्हणतात.

या गुन्हासाठी जास्तीत जास्त दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

पण अशा प्रकारचे शारिरीक संबंध बलात्कार म्हणता येणार नाहीत असंही हा कायदा म्हणतो.

या कायद्यावरून वादही आहेत.

ब्रेकअप

फोटो स्रोत, Getty Images

वीणा मुंबईच्या वकील आहेत. त्यांच्यामते लग्नाचं खोटं वचन देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित करणं हा गुंतागुंतीचा विषय आहे.

“तुम्ही इंटेन्शन (उद्देश) कसा सिद्ध करणार. म्हणजे महिला पुरुषाचं एकमेकांवर प्रेम असेल, पण काही काळाने ते प्रेम राहिलं नाही, म्हणून लग्न करायचं नसेल, तर त्या पुरुषावर लग्न करण्याची जबरदस्ती करता येणार नाही, बरोबर?”

त्या पुढे म्हणतात, “आमच्यासारख्या अनेकांना असं वाटतं की कायद्यात ही तरतूद नको. कारण शारिरीक संबंध या क्रियेसाठी संमती आहे. कोणत्याही गोष्टीचं गुन्हेगारीकरण करताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो. आपल्याला अतिगुन्हेगारीकरणही करायचं नाहीये. मग सरकार, व्यवस्था आणि पोलिसांच्या हातात अति ताकद जाते.”

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

पण दुसरीबाजू तेवढीच महत्त्वाची आहे हेही त्या मान्य करतात.

“फेमिनिस्ट लोकांसाठी हा विषय गुंतागुंतीचा आहे कारण एक म्हणजे तुम्ही महिलेचं अंतिम साध्य लग्न आहे असं म्हणून योनीशुचितेचं महत्त्व वाढवताय. महिलांना फक्त लग्नसंस्थेतच शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी आहे असं म्हणत तुम्ही पितृसत्तेची तळी उचलताय. पण ग्रामीण भागात अनेक महिलांची फसवणुक होतेय हेही तितकंच खरं आहे. त्या महिलांनी लग्नाचं वचन/आमिष नसतं तर शारिरीक संबंधांना कधीच संमती दिली नसती.”

आपण कधी प्रतिगामी आहोत, कधी मॉरल पोलिसिंग करतोय आणि कधी महिलांच्या हक्कांविषयी बोलतोय याच्यातली सीमारेषा इथे धुसर आहे असं वीणा यांना वाटतं.

काही लोकांना या कायद्याची गरज वाटते, काही याला विरोध करतात. कारण सत्ता, जात, वर्ग, प्रभाव अशा गोष्टीपण महिला-पुरुषांच्या शारिरीक संबंधात महत्त्वाची भूमिका बजवतात. म्हणूनच कायद्याने पण हे कोर्टाच्या विवेकावर सोडलंय असावं असं त्या म्हणतात.

“पण जगभरात कुठेही लग्न करण्याचं वचन देऊन लग्न केलं नाही ही गोष्ट जगभरात कुठेही गुन्हा मानली जात नाही,” वीणा नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)