घरगुती हिंसाचारानंतरही महिला नात्यात अडकून का राहतात? वाचा एका महिलेची कहाणी

फोटो स्रोत, VISAGE
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एखाद्या नात्यात प्रेमाची जागा हिंसेनं घेतली, तरी महिला त्या नात्यातून बाहेर का पडत नाहीत? त्या का म्हणून सहन करतात, दुर्लक्ष करतात किंवा वारंवार माफ करून त्या सापळ्यात अडकत राहतात?
दिल्लीत राहणाऱ्या महाराष्ट्राच्या श्रद्धा वालकरच्या प्रकरणातही असेच प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांच्या मते, श्रद्धा अनेक दिवस घरगुती हिंसाचार सहन करत राहिली. अखेर तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिची हत्या करून तिचे 35 तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
सुशिक्षित, सबल, स्वतंत्र विचारांच्या महिलादेखील सन्मान मिळत नसलेल्या आणि मारहाण सहन कराव्या लागणाऱ्या नात्यांमध्ये कशामुळे अडकून राहतात?
दीपिकाला (बदललेलं नाव) तिच्या पतीपासून विभक्त व्हायला सात वर्षे लागली. पहिल्या थापडेपासून फ्रॅक्चरपर्यंत आणि पुढे नात्यातून बाहेर पडेपर्यंत तिला एवढा काळ का लागला?
तिला कोणी मदत केली? आणि नात्यातून बाहेर पडल्यानंतर काय? हे सर्व प्रश्न मी त्यांनाच विचारले आणि त्यांनीही अगदी मनमोकळेपणानं त्यांची आपबिती सांगितली.
(इशारा - या आत्मकथनात मानसिक आणि शारीरिक हिंसेचं वर्णन असून त्यानं तुम्ही विचलित होऊ शकता.)
"त्यांनी मला जीवे मारून टाकलं असतं. पण माझं नशीब चांगलं म्हणून, मी त्यापूर्वी या नात्यातून बाहेर पडू शकले."
आपल्याला संस्कारच असे दिले जातात की, आपण लग्न, प्रेम किंवा त्या नात्यावर घट्ट विश्वास ठेवत असतो. आपण सहन करू शकतो आणि सर्वकाही ठिक होईल, असं वाटत असतं.
माझ्याबाबतीतही अशीच सुरुवात झाली होती.
माझ्या पतीनं मला पहिल्यांदा थापड मारली तेव्ही मी स्वतःलाच समजावलं होतं. ते तणावात आहेत, हा फक्त राग आहे, काही वेळात शांत होईल, असं मला वाटलं.
आमच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. एका गर्भपातानंतर मला मुलगी झाली होती.

फोटो स्रोत, IMAGESBAZAAR
गर्भवती असताना वैद्यकीय कारणांमुळं मला चार महीने बेड रेस्ट घ्यावी लागली होती. मी आईच्या घरी गेले होते. पण ते माझ्या पतीला आवडलं नाही.
आमच्या मुलीचा जन्म साडेसात महिन्यांतच झाला, तेव्हा तणाव आणखी वाढला. त्यावेळी तिचं वजन केवळ दीड किलो होतं.
रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमधून रूममध्ये आल्यानंतर मी शुद्धीत येण्याआधीच ते ओरडू लागले होते, वस्तू फेकत होते आणि त्यांना शांत करण्यासाठी हॉस्पिटलच्या काही नर्सला बोलवावं लागलं.
त्यांना माझ्या आई-वडिलांचा राग येऊ लागला होता. त्यामुळं पतीनं माझ्या आई-वडिलांना माझ्यापासून दूर केलं. माझ्या जीवनात एकतर आई वडिल राहतील किंवा ते म्हणजे माझे पती राहतील असं सांगितलं.
ते रागात घर सोडून निघून गेले. मी अक्षरश: त्यांच्या परत येण्यासाठी भीक मागितली, कारण आमच्या चिमुकल्या मुलीला पित्याची गरज होती.
ते परतले, पण परत येतील तेव्हा माझ्या कुटुंबातील कोणीही नसेल, अशी त्यांची अट होती. त्यांना माझ्यावर संपूर्णपणे नियंत्रण हवं होतं.

फोटो स्रोत, IMAGESBAZAAR
पहिली थप्पड
मला त्यांच्या अंगात राक्षस संचारला असं वाटू लागलं होतं. माझ्या कुटुंबाबद्दल ते फार वाईट बोलायचे, त्यांचा वारंवार अपमान करायचे.
त्याला 'शाब्दिक अत्याचार' म्हणतात. पण मला त्याबाबत काहीही माहिती नव्हते. ते 2005 चं वर्ष होतं. त्यावेळी या मुद्द्यावर तेवढ्या मोकळेपणानं चर्चा होत नव्हती.
अखेर, एक दिवस शब्दांची जागा हिंसेनं घेतली. त्यांनी रागामध्ये मला पहिल्यांदा थापड मारली.
पण नंतर लगेचच माझ्या पायाशी लोटांगण घालत, माफी मागू लागले. स्वतःचा हात कापून घेण्याची धमकी दिली. नंतर माझ्यासाठी फुलं घेऊन आले.

फोटो स्रोत, EVGENIIA SIIANKOVSKAIA
मीदेखील विचार केला की, केवळ एक थापडच तर होती. तो फक्त त्यांचा राग होता, असं पुन्हा होणार नाही. मी त्यांना माफ केलं आणि आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो.
डॉक्टरांनी राग कमी करण्याचं औषध दिलं, पण माझ्या पतीनं तीन दिवस ते औषध घेऊन बंद केलं.
दुसऱ्याकडे गेलो तर त्यानं सल्ला दिला की, "तुम्ही पतीच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत राहा, तरच तणाव कमी होईल!"
पण हा काही मार्ग नव्हता. कारण, ज्यादिवशी मी माझ्या पतीचं ऐकलं नाही, तेव्हा त्यांनी मला पुन्हा मारहाण केली.
हिंसेच्या खुणा राहू लागल्या
मी पुन्हा गर्भवती झाले. मला मुलगा झाला. पण आमची भांडणं सुरुच होती. यावेळी माझ्या पतीनं जेव्हा मला थापड मारली होती, तेव्हा त्याचे निशाण (वळ) उमटले होते.
मी आई-वडिलांपासून ते लपवलं आणि ज्या शाळेत मी शिक्षिका म्हणून काम करत होते, तिथंदेखील काहीतरी कारण देत वेळ मारून नेली.
दोन मुलांना घेऊन घर सोडणं शक्य आहे, हा विश्वासच त्यावेळी माझ्यामध्ये नव्हता.
पण हेच चक्र सुरू झालं होतं. ते मला मारायचे, माफी मागायचे, तणावाचं कारण पुढं करायचे, मलाच कारणीभूत ठरवायचे आणि स्वतःचा जीव देईल, असं म्हणत स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे.
आम्ही आणखी एका समुपदेशकाकडे गेलो. ते म्हणाले, "प्रत्येक पती-पत्नीमध्ये असं होतं. हा कौटुंबिक हिंसाचार नाही. कारण ते तुम्हाला रोज मारत नाही. घरी जा, आणि नातं सुधारण्यासाठी प्रयत्न करा."
म्हणजे मी तीन वेळा तज्ज्ञांकडे गेले होते, पण दुर्दैवानं एकानंही मला योग्य मार्ग दाखवला नाही. उलट मी त्यांनी सांगितलेल्या चुकीच्या मार्गावर चालत राहिले.
मला मारहाण सुरुच होती. त्यानंतर जेव्हा माझ्या पतीनं मला मारलं, तेव्हा माझ्या मांडीवर आमचा दोन वर्षांचा मुलगा होता.
त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मी पडले आणि माझ्या डोक्यावर जखम झाली.
अखेर मी घर सोडलं. मुलांसह एका फ्लॅटमध्ये राहू लागले. आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, म्हणून हे करू शकले. पण मानसिकदृष्ट्या माझी पूर्ण तयारी नव्हती.

फोटो स्रोत, LUCY LAMBRIEX
मी अद्याप माझ्या आई-वडिलांना मारहाणीबाबत सांगितलं नव्हतं. केवळ वाद आणि भांडणांबाबत सांगितलं होतं. माझ्या कुटुंबीयांना माहिती आहे, हे समजलं तर माझे पती आम्हाला आणखी दूर सारतील, नाराज होतील आणि पुन्हा मारहाण होईल, असं मला वाटत होतं.
लग्नाच्या बंधनावर मला तेव्हा खूपच जास्त विश्वास होता. पण माझ्या या वैवाहिक नात्यामध्ये आता प्रेम नव्हे, तर फक्त भीती शिल्लक आहे, हे मला समजत नव्हतं.
एखाद्या नात्यात जेव्हा एका व्यक्तीचा हात उठतो, तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला सन्मान देणं बंद करतो. पहिली थापड किंवा पहिल्यांदा केलेली मारहाणच सहन करायला नको. आपण नातं जपत जातो, कारण तेच आपल्याला शिकवलेलं असतं.
मीदेखील स्वतःलाच दोष देत राहिले. स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत होते. मला वाटायचं की, मी पुन्हा सर्वकाही सुरळीत करू शकते.
माझ्या पतीचं तेच वागणं म्हणजे, रडणं, माफी मागणं, सुधारण्याच्या शपथा खाणं यामुळंदेखील वारंवार माझ्या मनात हे नातं टिकू शकतं, अशी आशा निर्माण होत होती.
त्यामुळं थांबून शांतपणे विचार करणं, योग्यरित्या समजून घेणं मला शक्य होत नव्हतं. त्याच आशेनं मी तीन महिन्यांनी घरी परत गेले.
घर सोडलं पण पुन्हा परत आले
काही दिवसांनंतरच माझा मुलगा तीन वर्षांचा झाल्यानंतर पुन्हा एकदा भांडणं झाली आणि यावेळी माझ्या पतीनं माझं डोकं भींतीवर आपटलं आणि मारहाण केली.
माझा गुडघा फ्रॅक्चर झाला. मी डॉक्टरकडं गेले आणि प्लास्टर केले. त्यावर मी नाटक करत आहे, असं म्हणत माझ्या पतीनं मला पुन्हा मारहाण केली.
मी खूप घाबरले होते. पण अखेर धाडस केलं आणि आई-वडिलांना मारहाणीबाबत सगळंकाही सांगितलं आणि पोलिसांत गेले.
मी पुन्हा वेगळी राहायला सुरुवात केली. माझ्या मुलांसाठी तो अत्यंत कठिण काळ होता. त्यांची दोन्ही बाजूंना ओढताण सुरू होती.
माझी नणंद आणि सासरे वारंवार मला फोन करत होते. माझ्या पतीचा स्वभाव बदलेल, मी परत घरी यावं असं ते म्हणत होते.
हे माझं दुसरं लग्न होतं आणि मला त्यात सर्वकाही ठिक हवं होतं.
पहिलं लग्न लव्ह मॅरेज होतं. 20 वर्षांची असताना योग्य पार्टनर निवडण्याची समज नव्हती. मी एका वर्षातच घटस्फोट घेतला होता.
त्यानंतर 16 वर्ष मी लग्नाचा विचार केला नाही. मी खूप आनंदी होते. स्वतःच्या पायावर उभी होते. शिक्षिकेच्या नोकरीमध्ये मला आनंद मिळत होता आणि मी स्वतंत्र जीवनही जगत होते.
नंतर आई-वडिलांनी दबाव आणला आणि डेटिंग साइटवर प्रोफाईल तयार केलं. माझ्या पतीची आणि माझी भेट तिथंच झाली.

फोटो स्रोत, DUA AFTAB / EYEEM
सुरुवातीला ते माझी खूप काळजी घ्यायचे. माझ्यासाठी स्वतःचं शहर सोडून माझ्या शहरात येण्याची त्यांची तयारी होती. त्यांना लग्नाची खूप इच्छा होती.
भेटल्यानंतर सात महिन्यांत आमचं लग्नं झालं. आमचं दोघांचं वय जास्त होतं त्यामुळं मूल लवकर हवं होतं. मी गर्भवती राहिले, पण सात महिन्यांत गर्भपात झाला.
मी जेव्हा जुन्या गोष्टी आठवते, तेव्हा मला जाणवतं की, तेव्हापासूनच सगळं काही बदलायला सुरुवात झाली होती. ते नाराज राहू लागले होते. कुणालाही माझ्याजवळ येऊ देत नव्हते. माझ्या आईलाही येऊ देत नव्हते. तेव्हा सगळे म्हणाले होते की, "लग्नानंतर नवीन, नवीन असं होत असतं."
तेव्हा ते मला मारत नव्हते. सामान फेकायचे. कप फोडला होता. प्लेट फेकून फोडली होती. घरात कायम तणावाचं वातावरण राहू लागलं होतं. हादेखील एकप्रकारचा हिंसाचारच होता. पण त्यांनी जेव्हा मला थापड मारली तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं होतं.
आता मागे वळून पाहिलं तर असं वाटतं की, समाजाच्या दृष्टीने असलेला सन्मान आणि विवाहाचं नातं टिकवण्याची इच्छा अशा अनेक गोष्टी कायम मला रोखत होत्या. मी स्वतःची काळजी घेण्याऐवजी, त्यांच्यात बदल होईल याची वाट पाहत राहिले.
फ्रॅक्चरनंतर दुसऱ्यांदा घर सोडल्यानंतरही मी याच आशेनं परत घरी आले होते. मी हे नातं टिकवण्यासाठी माझ्याकडून एक शेवटचा प्रयत्न करेन, असं ठरवलं होतं.
माझ्या वडिलांना मारहाण
जवळपास वर्षभर सर्वकाही ठिक होतं. पण नंतर माझ्या पतीची नोकरी सुटली आणि त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
जीवनातील तणाव वाढला तर त्यांनी पुन्हा मला मारहाण सुरू केली. मारहाण खूप वाढली होती. आता ते दर आठवड्याला एक-दोन वेळा मला मारहाण करू लागले.
त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर एवढी अवघड स्थिती होती की, मला त्यांना सोडताही येत नव्हतं किंवा त्यांनी मला पुन्हा मारहाण सुरू केल्याचं कुणाला सांगूही शकत नव्हते.
एका रात्री रागामध्ये त्यांनी माझ्यावर घरातल्या वस्तू फेकायला सुरुवात केली. बाटल्या, खुर्च्या हाती येईल ते फेकलं आणि नंतर गळा दाबत माझा जीव घेण्याची धमकी दिली.
हे सर्वकाही माझ्या पाच आणि सात वर्षांच्या मुलांसमोर घडत होतं. घराचं दारदेखील उघडं होतं. शेजाऱ्यांनीही पाहिलं आणि घरी आलेल्या माझ्या भावानंही पाहिलं.

फोटो स्रोत, Getty Images
पण मी त्या रात्री पोलिसांत जाण्याचं धाडस दाखवू शकले नाही. मी खूप घाबरले होते. माझ्या चिमुकल्या मुलांसाठी सर्वकाही खूप भीतीदायक होतं.
दोन दिवसांनंतर मी माझ्या मुलांना घेऊन वडिलांबरोबर जायला कारमध्ये बसले, तर माझ्या पतीनं कारसमोर उडी घेत आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर जे काही घडलं ते माझ्या सहन करण्याच्या पलिकडचं होतं. त्यांनी माझ्या 78 वर्षांच्या वडिलांना मारहाण सुरू केली. वडिलांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागलं होतं.
मी त्यांना घेऊन रुग्णालयात धावले आणि नंतर पोलिसांत गेले. कारण आता सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि सर्व आशादेखील धुळीस मिळाल्या होत्या.
2012 मध्ये म्हणजे, पहिली थापड मारल्याच्या घटनेच्या सात वर्षांनंतर आम्ही वेगळे झालो.
घटस्फोट मिळायला आणखी चार वर्षे लागली. तसंच मुलांच्या कस्टडीसाठी मला आमच्या फ्लॅटमधील माझा हिस्सा त्यांना देण्याची तयारी दाखवावी लागली. लग्न मोडलं पण हिंसाचार थांबलेला नव्हता.
घटस्फोटानंतरचा हिंसाचार
माझ्या वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं मी पतीवर कौटुंबिक हिंसाचाराची केस केली नाही आणि त्याचमुळं घटस्फोटानंतरही त्यांना आठवड्यातून दोन वेळा मुलांना भेटण्याचा हक्क मिळाला.
मी पोलिसांत गेले आणि मला माझ्यासह मुलांच्या सुरक्षेची भीती वाटत असल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी - ती तुमच्या पतीचीही मुले आहेत, भीती कशीची ? असा प्रतिप्रश्न मला केला.
पण माझी भीती अगदीच योग्य होती.
काही काळानंतर माझ्या मुलीने मला सांगितलं की, तिचे वडिल भेटतात तेव्हा तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतात. बाथरूममध्ये येतात आणि कपड्यांमध्ये हात टाकतात. तेव्हा ती सात वर्षांची होती.
मी अगदी खचले होते. माझ्या मुलीला तिच्या वडिलांपासूनच सुरक्षित ठेवण्याची वेळ आली होती.
मी मन घट्ट केलं आणि धाडस करून, पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार केली. त्यावर माझ्या पतीने उलट माझ्यावर बेजबाबदार आई असल्याचे तीन खटले दाखल केले.
पुराव्यांच्या अभावी कोर्टानं माझ्या मुलीच्या तक्रारीबाबत पतीला दोषमुक्त केलं. पण त्यादिवसानंतर त्यांचं मुलीबरोबरचं नातं कायमचं संपलं होतं.
माझ्या विरोधातील तिन्ही खटले ते सिद्ध करू शकले नाही, त्यांचा पराभव झाला.
माझे वकील बदलले होते. त्यांनी मला कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला.
कदाचित मी तसं केलं असतं. पण मला जीवनातला सर्वात मोठा धक्का बसला. माझा मुलगा शाळेत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तो अवघ्या 10 वर्षांचा होता.
असं वाटू लागलं होतं जणू शरिरातून भांडण्याची अथवा संघर्ष करण्याची संपूर्ण शक्तीच उडून गेली असावी.
मी खूप संघर्ष केला होता, पण आता मला थांबायचं होतं.
या दरम्यान मी एका नव्या काऊन्सिलरला भेटले त्यांनी मला सर्वात आधी स्वतःची काळजी घेण्याचं आणि त्यानुसार सर्व निर्णय घेण्याचं प्रोत्साहन दिलं.
कोणतंही पाऊल उचलण्याची योग्य वेळ मीच निवडावी आणि तीसुद्धा जेव्हा मी तयार आहे असं मला वाटेल तेव्हाच, असंही त्यांनी सांगितलं.
माझी मुलगी आता मोठी झाली आहे. ती म्हणते की आता ती लढा देईल. ती प्रौढ होईल तेव्हा तिच्या विरोधात झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात वडिलांच्या विरोधात लढेल आणि न्याय मिळवेल, असं ती म्हणते.
माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास, मी सर्वांना माफ केलं आहे. मला जेवढा संघर्ष करायचा होता तेवढा केला. आता मी निवांत, शांत आहे. जीवन अत्यंत छोटं आहे. मला ते राग आणि द्वेषामध्ये वाया घालवायचं नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी स्वतःला माफ केलं आहे. अत्यंत हिंसक नात्यातून बाहेर पडायला आणि माझ्या मुलांना त्यातून बाहेर काढायला मी जो वेळ वाया घालवला, त्याबद्दलची खंत आणि अपराधीपणाच्या भावनेतून मी बाहेर पडले आहे.
नशीब बलवत्तर म्हणून माझा जीव गेला नाही. वेळ लागला. त्रास झाला, ओरबडले गेले, पण आता मी आणि माझी मुलगी स्वतंत्र आहोत.
(महिलेच्या विनंतीवरून त्यांची ओळख लपवण्यासाठी नाव बदलले आहे.)
तुम्हीदेखील एखाद्या प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करत असाल, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन - +91 7827170170 - वर कॉल करा.
हिंसाचाराच्या प्रकरणांत मदतीसाठी - +91 8793088814 - वर कॉल करून, अक्स क्रायसिस लाईनकडेही मदत मागू शकता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








