टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय, त्यातून बाहेर कसं पडायचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, प्रतिनिधी
मुंबईच्या मीरा रोड परिसरात लिव्ह-इन-पार्टनरने महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचं प्रकरण माध्यमांमध्ये गाजलं.
तसेच दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
दिल्लीत राहणाऱ्या या तरुणाने भररस्त्यात मुलीची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा तरुण बेधडकपणे हत्या करत असल्याचं दिसून येतंय.
एक समाज म्हणून आपल्यासाठी या बातम्या धक्कादायक तर आहेतच पण आपण हिंसक, अमानुष आणि भ्याड असल्याचीही ही बातमी आहे.
माहितीनुसार, हा तरुण आणि अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमाचं नातं होतं. भाववेगातून त्याने ही हत्या केल्याचं म्हटलं जातंय. मग त्याच्या प्रेमात रानटीपणा होता असं म्हणायचं का? प्रेमाची भावना इतकी हिंसक असू शकते का?
या घटनेच्या निमित्तानं आपण 'टॉक्सिक रिलेशनशिप'बाबत अधिक जाणून घेऊ. यापूर्वी दिल्लीतच घडलेल्या 'श्रद्धा वालकर हत्या' प्रकरणावेळी बीबीसी मराठीनं ही बातमी केली होती. ती इथे पुन्हा देत आहोत.
यापूर्वी श्रद्धा वालकर या महाराष्ट्रातील तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरनं दिल्लीत हत्या केली आणि 35 तुकडे करून दिल्लीत ठिकठिकाणी फेकले. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता.
ही हत्या कशी झाली, याबाबत बीबीसी मराठीनं याआधी बातमी केलीय. ती इथे वाचू शकता.
पण या निमित्ताने एक गंभीर प्रश्न समोर आला आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली होती.
अनेकजण हे म्हणत आहेत की, श्रद्धा त्या नात्यात खुश नव्हती, तिच्यावर संशय घेतला जात होता, तो तिला मारहाण करत होता तर ती त्या नात्यातून वेळीच बाहेर का पडली नाही, तिच्या हे लक्षात कसं आलं नाही.

पोलिसांनी सांगितलं की, दोघांचं नातं हे अनेकवेळा तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं. तिने तिच्या मित्रांना देखील सांगितलं की, मला आफताबसोबत सुरक्षित वाटत नाहीये, पण श्रद्धाने काहीच पाऊल कसं उचललं नाही. हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे.
श्रद्धा ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती, पण तिला त्यातून तिची सुटका करुन घेता आली नाही. पुढे जे घडलं ते तर आपल्यासमोर आहे.
नात्यात जीव तर गुदमरत नाहीये ना?
नुसरत फतेह अली खानची कव्वाली आहे एक. त्यातले बोल आहेत, 'ये इश्क नही आसान, एक आग का दर्या है और डुब के जाना है...'
प्रेम करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आगीतून पोहून तुम्हाला पैल तीरावर पोहाचावं लागणार आहे. प्रेमात असताल तर प्रेयसी किंवा प्रियकरासाठी वाट्टेल ते करण्याची, वाट्टेल ते सहन करण्याची व्यक्तीची तयारी होते.
काव्यातील अतिशयोक्ती जर सोडली तर अनेक बाबतीत ते सत्यदेखील आहे. पण ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीने तर तुमचं आयुष्य हे 'आग का दर्या' केलेलं नाही ना.
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात असताना व्यक्तीसह अडचणींचा सामना करणे एक गोष्ट आहे आणि ती व्यक्तीच अडचण बनणे वेगळी गोष्ट आहे. नातेसंबंधात छोट्या-मोठ्या तक्रारी आणि कुरबुर वेगळं पण त्या नात्यात जीव गुदमरतोय या गोष्टी वेगळ्या हे कसं ओळखायचं.
हा विषय सध्या समाजमाध्यमं असो वा मित्रपरिवारात चर्चिला जाऊ लागला आहे. टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय, ती कशी ओळखावी आणि त्यातून सहीसलामत सुटून आपलं आयुष्य पुन्हा ट्रॅकवर कसं आणावं हे आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
जर तुम्ही मानसिक छळाचे किंवा शारीरिक हिंसाचाराचे बळी ठरत असाल तर कुणाला संपर्क साधायचा हे देखील यात आपण पाहू.
सर्वप्रथम आपण पाहू टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय?
'तू कुठे आहेस, तू ऑनलाईन तर दिसतीयेस मग इतका वेळ झाला माझ्या मेसेजला रिप्लाय का दिला नाही, तुझे जीपीएस लोकेशन पाठव, व्हीडिओ कॉल करून दाखव की सध्या तू कुठे आहेस?'
हे वाक्य कशाचं निदर्शक आहे. या गोष्टीचं कुणी असंही समर्थन करू शकेल की तिचं किंवा त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की माझ्या बारीकमधील बारीक हालचालींची माहिती तिला/ त्याला हवी असते. किंवा माझ्या साथीदाराला माझी खूप काळजी वाटते.
पण समोरची व्यक्ती या माध्यमातून तुमच्यावर नियंत्रण किंवा ताबा तर मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीये ना, हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. हे काळजीपोटी एखादेवेळी झालं आहे की वारंवार होत आहे याचा विचार देखील करणे आवश्यक आहे.
ऑक्सफर्ड डिक्शनरीने टॉक्सिक रिलेशनशिपची व्याख्या अशी केली आहे की, एखादं वेदनादायी, दुःखकारक नातं, जिथे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण हवं असतं आणि त्या नात्यात दुसऱ्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
म्हणजे समोरच्या व्यक्तीचं नियंत्रण मिळवण्यासाठी गैरप्रकारांचा देखील वापर केला जाऊ शकतो. एक उदाहरण आपण पाहू. सुरुवातीला स्वप्नवत असणारं नातं दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनी कसं जातं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, ANI
स्वप्नवत वाटणारं नातं टॉक्सिक कसं होतं?
बीबीसीने याच विषयावर एक बातमी केली होती. इंग्लंडमध्ये अॅना नावाच्या एक अभिनेत्रीची (नाव बदलले आहे) तिच्याहून अधिक प्रसिद्ध अभिनेत्याशी ओळख झाली. त्याला आपण थॉम म्हणुया. दोघांची ओळख वाढली.
ते कॉफी प्यायला, डिनरला सोबत गेले. तो अभिनेता यशस्वी होता त्याच बरोबर तो त्या अभिनेत्रीला वेळ द्यायचा. तिची विचारपूस करायचा. अभिनेत्रीलाही वाटलं की हाच माझ्या स्वप्नातील राजकुमार आहे. अॅनाला वाटले की याआधी भेटलेल्या मुलांपेक्षा हा कितीतरी वेगळा आहे.
मग थॉमने अॅनाला आपल्या घरी राहण्यासाठी विचारले. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. त्यानंतर दोन महिने अतिशय आनंदात गेले. नंतर हळुहळू त्यांच्यात छोट्यामोठ्या कारणावरुन वादविवाद होऊ लागले.
सुरुवातीला समजूतदार असलेला थॉम आता मात्र हळुहळू तापट होताना दिसू लागला. तुझ्यामुळे मला माझ्या कुटुंबीयांना वेळ देत येत नाही, मित्र परिवार, नातेवाईकांना भेटता येत नाही असे तो म्हणू लागला. त्यातून अॅनाच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपल्यामुळे तो त्याच्या लोकांना दुरावतोय असं तो म्हणू लागला.

सुरुवातीला त्याने तिला तिच्या जुन्या नात्यांविषयी विचारले. तिने प्रामाणिकपणे सर्व काही सांगितले पण नंतर तो ती गोष्टीबद्दल तिला वाईट बोलायचा. त्याच्या मनात तिच्या जुन्या साथीदारांविषयी ईर्ष्या निर्माण झाली. फक्त इतकेच नाही तर भूतकाळात एखाद्या गोष्टीने ती आनंदित झाली असेल आणि तो अनुभव तिने सांगितला तरी थॉमला दुःख होत असे. त्याला वाटत असे की आपण त्यावेळी सोबत का नव्हतो.
तिच्या करिअरबद्दलही तो अनुत्सुकतेने बोलू लागला. जर ते साधं बोलत असतील तर तो भांडण उकरून काढू लागला. मेसेजेसला त्वरित रिप्लाय नाही दिला तर तो भांडण सुरू करेल अशी भीती अॅनाला वाटू लागली होती.
मग तो म्हणाला की तुझ्यामुळे माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत आहे. ती आणखी घाबरली आणि आपण एक भयंकर नात्यात अडकलो याची तिला जाणीव झाली. पण तरी देखील तिला त्याला सोडता आलं नाही मग बराच काळ गेला आणि तिने निश्चय केला की हे नातं तोडायचं.

फोटो स्रोत, Getty Images
'अशा नात्यांमुळे कधी कधी खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते'
पण अॅनाला जे जमलं ते सर्वांनाच जमू शकेल असं नाही. कधी कधी त्याची किंमत खूप मोजावी लागते.
मुक्त पत्रकार भक्ती चपळगावकर यांनी 2007-08 या काळात एका घटनेवर वार्तांकन केलं होतं.
त्यात त्यांना आलेले अनुभव त्यांनी बीबीसीला सांगितले, भक्ती सांगतात की "एका निर्मात्याने एका उदयोन्मुख अभिनेत्रीला सहा-सात महिन्यासाठी डांबून ठेवले होते. तिला तिच्या घरी सुद्धा संपर्क करू दिला जात नव्हता. आधी त्यांच्यात मैत्री होती नंतर त्यांच्यात नातं निर्माण झालं. तुला अभिनेत्री असं देखील तो म्हणाला. नंतर तो चित्रपटाबद्दल काहीच बोलत नव्हता. त्यातून वाद निर्माण होऊ लागले.
"मग तिला मारहाण होऊ लागली. तिच्या पालकांनी माध्यमांशी पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा आम्ही सर्व त्यांच्या फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा ती मुलगी अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती आणि आपणच गुन्हा केला आहे अशी भावना तिच्या मनात होती.
"आई-वडिलांना सोडून आपण आलो आहोत, जर चित्रपट मिळाला नाही ते हे सर्व व्यर्थ जाईल असे वाटत राहिल्यामुळे ती सर्व सहन करत राहिली.
"कधी मुली लग्नासाठी थांबतात तर कधी अन्य कारणासाठी पण जेव्हा नात्यात एखादी मागणी असते तेव्हा जर दुसऱ्या साथीदाराने अत्याचार केला तरी अनेक जण ते नातं तोडू शकत नाहीत.
"माध्यमात आलेल्या वृत्तांनुसार, श्रद्धा-आफताबच्या प्रकरणातही आपण हेच पाहिलं की श्रद्धाला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण त्याला नव्हतं करायचं आणि तो तिचं शोषण करत राहिला पण ती त्याला सोडू शकली नाही," भक्ती यांनी त्यांचं निरीक्षण मांडलं.
आपण टॉक्सिक नात्यात आहोत ही देखील कल्पना बऱ्याच वेळा काही जणांना नसते. टॉक्सिक रिलेशनशिपची लक्षणं काय असतात ते समजून घेणं आवश्यक आहे.

टॉक्सिक नात्यात आहोत हे कसे ओळखायचे?
इंग्लडमधील महिला सहकार्य समितीच्या सह-प्रमुख अॅडिना क्लेअर यांनी ही लक्षणं कशी ओळखायची याबाबत सांगितले आहे. बीबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी हे सांगितलं.
त्या म्हणतात की एखाद्या व्यक्तीचे भावनिक शोषण करणे हा देखील घरगुती हिंसाचार आहे. त्यामुळे याची लक्षणं त्वरित ओळखून समोरच्या व्यक्तीच्या धाकदपटाशातून बाहेर पडणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीच्या नियंत्रणात राहण्याची गरज नाहीये हे समजणं आवश्यक आहे.
- लव्ह बॉम्बिंग - म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपल्या मनासारख्या गोष्टी करून घेण्यासाठी खूप जास्त प्रेमाचा वर्षाव करणे. हे नात्याच्या सुरुवातीच्या काळात केलं जातं.
- टोकाची ईर्ष्या
- शिवीगाळ करणे
- वस्तूंची तोडफोड करणे
- अपूर्ण कामांसाठी दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार धरणे
- तुमच्या यशाला हीन समजणे
- गॅसलाइटिंग - म्हणजे तुम्हाला मनोविकार आहे असं भासवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न करणे
अॅडिना सांगतात की जर तुम्ही दबावात आहात, तुम्हाला तुमची वागणूक बदलण्याचा सल्ला दिला जात आहे, इतर नातेवाईक मित्र मैत्रिणींना भेटू दिले जात नाही तर तुम्हाला असंही वाटू शकतं की त्या व्यक्तीचं मन राखण्यासाठी तसं करावं पण एक ध्यानात घ्या तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात.
निरोगी निकोप नात्यासाठी आदर आणि विश्वास महत्त्वाचा असतो. दबाव आणि नियंत्रणाला तिथे स्थान नसावे.

फोटो स्रोत, Getty Images
'तुमचा नात्यात अनादर होत असेल तर..'
हार्वर्ड हेल्थ या संकेतस्थळाने प्रकाशित केलेल्या एका लेखात अशा तणावपूर्ण नात्याची काही लक्षणं सांगितली आहेत.
- संवादानंतर थकवा येणे, तणाव येणे.
- नात्याबद्दल सातत्याने नकारात्मक विचार येणं
- हे नातं असंतुलित आहे असं वाटणं - एक व्यक्ती जास्त करते, स्वतःचं हित बाजूला ठेवून काम करते.
- साथीदाराचा अनादर करणे, तुमच्या मताचा आदर न करणे
या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या नात्यात दिसत असतील तर त्यावर विचार करणे आवश्यक आहे.
नात्यामध्ये समज-गैरसमज, थोडा तणाव या गोष्टी होणं साहजिक आहे पण त्यावर प्रौढ व्यक्तींप्रमाणे तोडगा काढता येणे, आणि आपल्या समस्येकडे वस्तूनिष्ठपणे पाहता येणे आवश्यक आहे अन्यथा त्या नात्यात आणखी दुरावा निर्माण होऊ शकतो.
नातं सुधारण्यासाठी आवश्यक तो वेळ घ्यावा आणि प्रयत्न करावेत असं बीबीसी फोरच्या एका कार्यक्रमात तज्ज्ञांनी सांगितले.
जर सातत्याने वाद होत असतील तर वादविवाद न ठरता प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीची चर्चा हवी असं तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी योग्य तऱ्हेने आपले मुद्दे मांडता येणं, समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेता येणं महत्त्वाचं आहे.
साथीदार आणि तो प्रश्न यांना विलग करून पाहता येणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मूल असेल तर त्याचा यावर काय परिणाम होईल यादृष्टीने विचार करता येणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सुचवतात.

फोटो स्रोत, Getty Images
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडणे कठीण का बनते?
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर लवकर बाहेर न पडता येण्याची कारणे समुपदेशक डॉ. तेजस्विनी कुलकर्णी यांनी सांगितली आहेत.
डॉ. तेजस्विनी सांगतात, "टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये संपूर्ण काळ हा वाईट वागणूक वा छळ असा नसून मध्ये-मध्ये काही चांगले क्षण, प्रेमाचे, भावनिक, कौतुकाचे पुरावे देणारेही काही क्षण असतात. त्या अधून मधून येणाऱ्या चांगल्या अनुभवांमुळे व भावनांमुळे त्यामुळे आपल्या मेंदूलाही त्या पॅटर्नची सवय होते. काही जण या पॅटर्नला जुगाराच्या सवयीची उपमा देतात. याला इंटरमिटंट रिएनफोर्समेंट म्हणतात. 10 वेळा हरलो आणि त्यानंतर एकदा जिंकलो तरी त्या पुढे जास्त वेळा जिंकू या आशेने असेल किंवा मेंदूला होणाऱ्या सवयीमुळे असेल, मात्र अनेक लोक या दुष्टचक्रात अडकतात. आपला जोडीदार बदलेल या आशेत ते राहतात."
याबाबतचे दुसरे कारण डॉ. तेजस्विनी सांगतात की, "अशा प्रकारच्या नात्यांमधे राहण्याचं अजून एक कारण म्हणजे कमी स्वाभिमान. स्वाभिमान किंवा सेल्फ इस्टिम कमी असेल तर त्यांना आपण या वागणुकीला पात्र नाही हे पटकन समजत नाही. मी अशीच वागणूक डिझर्व करते/करतो/ असा काहीसा समज त्या व्यक्तीचा असतो. . त्यामुळे मी निरोगी प्रेमाला, आदरपूर्ण वागणुकीला पात्र आहे असे विचार ते फार ठळकपणे पाहू शकत नाहीत. या गोष्टीला एक सामाजिक असमानतेची छटा देखील आहे ती म्हणजे स्त्रीच्या बाबतीत हा घटक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपण याच वागणुकीस पात्र आहोत किंवा हे असंच असतं. नवरा म्हणजे त्याचा मार आपण सहनच करायचा असतो असा समज निम्न आर्थिक स्तरातील च नाही तर काही ठिकाणी उच्चभ्रू वर्गातही पहायला मिळतो."
एकटेपणाची भीती हे देखील एक कारण असल्याचं डॉ. तेजस्विनी सांगतात, "अनेक संशोधनांनुसार हे स्पष्ट आहे की ज्या व्यक्ती कमी स्वाभिमानी आहेत त्या नात्यांमधे जाण्याची आणि त्याच नात्यांमधे जास्त काळ राहण्याची शक्यता जास्त असते. अनेकजण एकटेपणाच्या भीतीने अशा नात्यांमधे राहणं निवडतात. नातं तोडून एकटं राहण्यापेक्षा वाईट नात्यात राहणं पसंत करतात. एकटं राहणं हे अवघड वाटतं, एकटेपणा वेदनादायक वाटतो त्यामुळे ओळखीच्या वेदना सहन करणं काही व्यक्ती पसंत करतात. एकटं राहण्याचे आर्थिक व सामाजिक परिणामही यावेळी विचारात घेतले जातात."
अशा नात्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे?
या नात्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल असे विचारले असता डॉ. तेजस्विनी सांगतात, "एक सत्य डोळसपणे स्वीकारलं पाहिजे ते म्हणजे कोणत्याही व्यक्ती एका रात्रीत बदलणार नाहीत. किंबहुना स्वतःची प्रबळ इच्छा असल्याशिवाय व स्वतःवर मेहनत घेण्याची तयारी असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती तुमच्यासाठी बदलण्याची शक्यता फार कमी असते. ते बदलणार नाहीत या सत्याचा स्वीकार करून तुम्हालाच स्वतःला बदलावं लागेल हे लक्षात घ्या."
"नात्यात होणारा मानसिक वा शारीरिक छळ निपूटपणाने सहन करण्याऐवजी तुमच्या जवळच्या, विश्वासातल्या व्यक्तींशी बोला. कोणीच नसेल तर अशा अनेक संस्थांच्या हेल्पलाईन उपलब्ध असतात. त्यांना फोन करून बोला. नात्यातून बाहेर पडायचं की नाही हा निर्णय घेणं अवघड जात असेल तर तणांचं मार्गदर्शन घ्या. मानसतज्ञ, समुपदेशक, मनोविकारतज्ञ यांपैकी कोणालाही भेटून त्यांचा सल्ला घ्या," असे डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात.
वेळीच मदत घ्या - महत्त्वाचे हेल्प लाईन नंबर
जी नाती सुधारता येणं शक्य आहे त्यावर प्रयत्न करणे ठीक आहे पण जर साथीदाराकडून हिंसाचार होत असेल तर त्यासाठी महिलांनी त्वरितपणे पोलीस किंवा महिला आयोगाकडून मदत घ्यायला हवी, असं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे.
देशातील महिलांसाठी - संपूर्ण देशात जर एखादी महिला अडचणीत असेल तर ती या नंबरवर फोन करू शकते. तिला मदत उपलब्ध होऊ शकते - 1091
घरगुती हिंसाचार - ही हेल्पलाईन घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांचे प्रश्न निवारण करण्यासाठी आहे त्यांना या हेल्पलाईनची मदत होऊ शकते. पतीकडून, सासरच्या व्यक्तीकडून अथवा लिव्ह इन पार्टनरकडून मारहाण, हिंसाचार झाल्यास त्या या नंबरवर संपर्क साधू शकतात - 181
राष्ट्रीय महिला आयोगाची हेल्पलाईन - महिला आयोगाने पूर्ण देशासाठी ही हेल्पलाईन दिली आहे. तेव्हा अडचणीत असलेली महिला मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकते - 7827170170
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची हेल्पलाईन - 155209
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








