सेक्स वर्कर्सना मिळणार मातृत्वाची पगारी रजा, विमा आणि पेन्शन; 'या' देशाचा क्रांतिकारी निर्णय

चेहऱ्यावर गंभीर भाव असलेल्या आणि कॅमेऱ्याकडे पाहणाऱ्या मेलचा फोटो. तिचे केस लांब, सोनेरी आणि नागमोडी आहेत. तिने व्ही-नेक लाल ड्रेस घातला आहे. ती आरशासमोर उभी आहे. छताला साखळी लटकलेली आहे आणि निऑन लाइट्स देखील फोटोमध्ये दिसत आहेत.
फोटो कॅप्शन, नव्या कायद्याने सेक्स वर्करचे जीवनमान सुधारेल असं सांगणारी मेल
    • Author, सोफिया बेटिझा
    • Role, जेंडर आणि आयडेंटिटी प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
    • Reporting from, ब्रुसेल्स

(सूचना - या बातमीत काही लैंगिक वर्णनं आहेत.)

“नऊ महिन्यांची गरोदर असतानाही मला काम करावं लागत होतं. बाळाला जन्म देण्याच्या एक आठवडा आधी मी क्लाइंटबरोबर सेक्स करत होते,” बेल्जियममध्ये सेक्स वर्कर असलेल्या सोफी त्यांची कहाणी सांगत होत्या.

पाच मुलं सांभाळत हे काम करण्यासाठी त्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागते.

सोफी यांनी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांची गोष्ट सांगितली. पाचवं मूल झालं तेव्हा त्यांचं सिझेरियन झालं होतं. डॉक्टरांनी सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला. पण जबाबदाऱ्यांचं ओझ डोक्यावर होतं. त्यामुळं त्यांना लगेचच काम सुरू करावं लागलं.

“मला पैशांची एवढी गरज होती की, थांबणं शक्यच नव्हतं," असं सोफी म्हणाल्या.

त्या ज्यांच्यासाठी काम करतात त्यानं जर सोफी यांना डिलिव्हरीसाठी पगारी सुटी (मातृत्वाची सुटी) दिली असती तर कदाचित त्यांना एवढा संघर्ष करावा लागला नसता.

पण सोफी यांना दिलासा मिळाला नसला तरी, त्यांच्यासारख्या इतर सेक्सवर्कर महिलांना मात्र आता याबाबतीत दिलासा मिळू शकतो.

कारण बेल्जियममध्ये एक नवा कायदा संमत झाला आहे. त्यानुसार तिथं सेक्स वर्कर्सना अधिकृत नोकरीचे करार, आरोग्य विमा, पेन्शन आणि मातृत्वाची रजाही मिळणार आहे. म्हणजे या कामालाही इतर कामांसारखाच दर्जा मिळणार आहे. अशाप्रकारचा हा जगातील पहिला कायदा आहे.

“माणूस म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी मिळालेली ही संधी आहे,” असं सोफी म्हणाल्या.

बॅनर घेऊन आंदोलन करणारे लोक. हे बॅनर बेल्जियन युनियन फॉर सेक्स वर्कर्सचे (UTSOPI) आहे.

फोटो स्रोत, UTSOPI

फोटो कॅप्शन, कोविडनंतर सेक्स वर्कर्ससाठी कामगार कायदे असावेत या मागणीसाठी झालेले आंदोलन

इंटरनॅशनल युनियन ऑफ सेक्स वर्कर्सने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 50 कोटी 20 लाख सेक्स वर्कर्स आहेत.

बेल्जियममध्ये 2022 साली हा व्यवसाय गुन्हेगारीच्या कक्षेतून वगळण्यात आला.

तुर्किये आणि पेरू या देशांतही हा व्यवसाय कायदेशीर आहे. पण, करार आणि नोकरीचे अधिकार देणं हे मात्र जगात पहिल्यांदाच घडत आहे.

“हे फारच क्रांतिकारी आणि जगभरात आजवर उचललेलं सर्वोत्तम पाऊल आहे,” असं ह्युमन राइट्स वॉचमधील संशोधक एरिन किलब्राईड म्हणाले.

“जगातल्या प्रत्येक देशानं या दिशेनं पावलं उचलावी, अशी आमची इच्छा आहे,” असंही ते म्हणाले.

मात्र, विश्लेषकांच्या मते या व्यवसायाचे तस्करी, छळ आणि पिळकवणूक असेही काही परिणाम आहेत. ते कायद्यामुळे कमी होणार नाहीत.

लाल रेष
लाल रेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“मुळातच ज्या व्यवसायात हिंसेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, तो व्यवसाय मुख्य प्रवाहात येणं हे अतिशय धोकादायक आहे,” असं मत ज्युलिया क्रुमिअर यांनी मांडलं. बेल्जियममध्ये रस्त्यावर काम करणाऱ्या सेक्स वर्कर्सना मदत करणाऱ्या इसला या सामाजिक संस्थेबरोबर त्या काम करतात.

अनेक सेक्स वर्कर्स हे काम गरजेपोटी करतात. त्यामुळं हा कायदा पूर्वीच यायला हवा होता.

मेल याही एक सेक्सवर्कर आहेत. एका ग्राहकानं त्यांच्याकडं कंडोमचा वापर न करता, मुखमैथुनाची मागणी केली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यावेळी त्या जिथं काम करत होत्या, तिथं अनेकांमध्ये लैंगिक संबंधाद्वारे होणारे रोग पसरत होते. पण असं असलं तरी त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.

“एकतर काहीही पैसे कमवायचे नाहीत किंवा रोग पसरवायचा,” हे दोनच पर्याय होते, असं त्यांनी सांगितलं.

मेल 23 वर्षांच्या असल्यापासून देहव्यापारात अडकल्या होत्या. त्यांना पैशाची गरज होती, अचानक अपेक्षेपेक्षा जास्त पैसे त्यांना मिळू लागले. सोन्याची खाण हाती लागली, असं त्यांना वाटलं. पण शरीर संबंधांमुळं होणाऱ्या रोगांनी त्यांना पुन्हा जमिनीवर आणलं.

मेल सध्या त्यांना नको असलेल्या ग्राहकांना नाही म्हणू शकतात. म्हणजेच त्यांना आधीही वेगळ्या पद्धतीनं परिस्थिती हाताळता आली असती.

“मला जर कायद्याचं संरक्षण असतं, तर मी मॅडमला (बॉस) म्हणू शकले असते कीस तुम्ही या कायद्याचा भंग करत आहात, तुम्ही या पद्धतीनं वागायला हवं.”

व्हिक्टोरिया यांचा फोटो. या फोटोत त्या किंचित हसत कॅमेराकडे पाहत आहेत. त्यांचे केस सरळ आणि काळेभोर आहेत. त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले आहे आणि जॅकेटला फरचे गोल हूड आहे. त्यांनी गळ्यात पांढऱ्या रंगाचे स्कार्फ घातलेले आहे. त्यांचा हा फोटो एका उद्यानात घेतलेला आहे. त्यांच्या मागे झाडे, गवत दिसत असून गवतावर झाडांची पानं पडलेली आहेत.
फोटो कॅप्शन, व्हिक्टोरिया सेक्स वर्कला समाजसेवा मानतात.

कोव्हिड काळात सेक्स वर्कर्संना कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळालं नाही. त्यामुळं बेल्जियममध्ये अनेक महिने आंदोलनं सुरू होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

बेल्जियम युनियन ऑफ सेक्स वर्कर्सच्या अध्यक्ष व्हिक्टोरिया या आंदोलनाच्या प्रमुक होत्या. त्या गेल्या 12 वर्षांपासून सेक्स वर्कर म्हणून काम करतात.

त्यांच्यासाठी हा वैयक्तिक लढा होता. व्हिक्टोरिया यांच्या मते, वेश्याव्यवसाय ही एख प्रकारची समाजसेवा आहे. त्यात सेक्सचा वाटा फक्त 10 टक्के आहे.

“लोकांना महत्त्वं देणं, त्यांचं म्हणणं ऐकूण घेणं, त्यांच्याबरोबर केक खाणं, नाचणं हासुद्धा वेश्याव्यवसायाचा एक भाग आहे. शेवटी हे सगळं एकटेपणासाठी आहे,” असं त्या म्हणतात.

2022 पर्यंत त्यांचं काम बेकायदेशीर होतं. त्यामुळं त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्या असुरक्षित वातावरणात काम करत होत्या, ग्राहकांच्या निवडीबद्दल त्यांच्याकडे अधिकार नव्हते. त्यांच्या कमाईचा मोठा भाग त्यांची एजन्सी घ्यायची.

एवढंच काय पण, एका ग्राहकाला त्यांचं वेड लागलं होतं. त्यानं व्हिक्टोरिया यांच्यावर बलात्कारही केला होता.

त्या पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र तिथली महिला अधिकारी व्हिक्टोरिया यांच्याशी उर्मटपणे वागली. “त्या म्हणाल्या की, सेक्स वर्कर्सवर बलात्कार होऊ शकत नाही. माझाच सगळा दोष असल्याचं त्यांनी मला जाणवून दिलं.” त्या पोलीस स्टेशनमधून रडत रडत बाहेर गेल्या.

आम्ही जितक्या सेक्स वर्कर्सशी बोललो त्यापैकी प्रत्येकीनं एकदातरी मनाविरुद्ध कृत्य करावं लागल्याचं सांगितलं.

त्यामुळं नवीन कायद्यामुळं आयुष्य बदलेल असं व्हिक्टोरिया यांना प्रकर्षानं वाटतं.

“कायदा नसेल आणि तुमचं काम बेकायदेशीर असेल, तर तुमची मदत करण्यासाठी कोणतेही प्रोटोकॉल नाहीत. कायद्यामुळं लोकांना किमान सुरक्षित वाटतं.”

अलेक्झांड्रा आणि क्रिस यांचा फोटो. अलेक्झांड्रा डावीकडे असून हसत आहे आणि तिने क्रिसच्या खांद्यावर हात ठेवले आहेत. तिचे केस खूप लांब आणि काळे आहेत. तिच्या हातावर टॅटू काढलेले आहेत. ती कानातले घातलेले आहेत. तिच्या शर्टवर बिबट्याची नक्षी आहे. फोटोत क्रिस देखील हसत आहे. त्याचे केस लहान आहेत आणि दाढीही कमी वाढलेली आहे. त्याने पांढरा शर्ट घातला आहे.
फोटो कॅप्शन, अलेक्झांड्रा आणि क्रिस यांनी सांगितलं की, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागतात.

देहव्यापारावर नियंत्रण असणारे दलाल आता कायद्याच्या कक्षेत आले आहेत. त्यांना कठोर नियमांचं पालन करावं लागेल. गंभीर गुन्ह्यात शिक्षा झाली असेल तर त्यांना सेक्स वर्कर्संना कामावर ठेवता येणार नाही.

“मला वाटतं अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागतील. कारण नोकरी देणाऱ्या अनेक लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे,” असं क्रिस रिकमान्स म्हणाले. ते आणि त्यांची बायको अलेक्झांड्रा बेकेव्रूत नावाच्या एका छोट्या गावात लव्ह स्ट्रीटवर एक मसाज पार्लर चालवतात.

आम्ही गेलो होतो तेव्हा ते पूर्णपणे बूक होतं. सोमवारी सकाळी एवढी गर्दी असेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्हाला उत्तम फर्निचर असलेल्या खोल्या दाखवल्या. तिथं मसाज बेड होते, फ्रेश टॉवेल्स आणि कपडे होते. तसंच एक हॉट टब आणि स्विमिंग पूलही होता.

क्रिस आणि त्यांच्या बायकोकडं 15 सेक्स वर्कर्स काम करतात. त्यांना मान सन्मानाने वागवलं जातं, त्यांचं संरक्षण केलं जातं आणि त्यांना योग्य पगार दिला जातो असं ते अभिमानाने सांगतात.

ह्युमन राइट्स वॉच या संघटनेच्या एरिक किलब्राईड यांचंही काहीसं असंच मत आहे. ते म्हणतात की, नोकरी देणाऱ्यांवर बंधनं घातल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांवर बंधनं येणार आहेत.

या फोटोत दुसरी एक महिला मेलचा फोटो काढत आहे आणि ती फोटो काढण्यासाठी पोज देत आहे. तिचे केस लांब सोनेरी आहेत आणि लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. या ड्रेसची बटणे पुढील बाजूला आहेत. तिने काळे बूट घातलेले आहेत. तिच्या मांडीवर टॅटू आहे. फोटोत दुसरी महिला पाठमोरी दिसत आहे. त्या महिलेने काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. तिच्या पाठीवर ड्रेसच्या क्रॉस पट्ट्या दिसत आहेत. या महिलेचे केस कापलेले आहेत आणि तिने चष्मा घातलेला आहे. या महिलेच्या पाठीवर आणि हातावर टॅटू काढलेले आहेत. ती फोनमध्ये मेलचा फोटो काढत आहे. खोलीच्या भिंती लाल रंगाने रंगवलेल्या आहेत आणि भिंतीवर आरसाही आहे.
फोटो कॅप्शन, सेक्स वर्कला काळोखातून बाहेर काढणं महिलांना मदत करणारं ठरेल, असं मेलचं मत आहे

मात्र ज्युलिया क्रुमिर म्हणतात की, त्या ज्या महिलांना मदत करतात त्यांच्यापैकी बहुतांश बायकांना हा व्यवसाय सोडायचा आहे. त्यांना दुसरी एखादी नोकरी करायची आहे. हक्क नको आहेत.

“हाडं गोठवणाऱ्या वातावरणात एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर सेक्स करून, शरीर त्याला देण्याचे पैसे त्यांना नको आहेत.”

बेल्जियमच्या नवीन कायद्याप्रमाणे ज्या खोलीत लैंगिक सेवा दिल्या जातात तिथं एक अलार्म बटण असणं आवश्यक असेल. त्याद्वारे सेक्स वर्करला संबंधित व्यक्तींशी संपर्क साधता येईल.

ज्युलिया यांच्या मते, सेक्स वर्करला सुरक्षित ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही.

“कोणत्या नोकरीत तुम्हाला पॅनिक बटणाची गरज भासते? हा जगातील सर्वांत जुना व्यवसाय नाही, ही जगातली सर्वांत जुनी पिळवणूक आहे,” असं त्या म्हणतात.

सेक्सच्या उद्योगाचं नियमन ही जगातील एक जटिल समस्या आहे. मेल यांच्या मते मात्र, आशेचा हा किरण महिलांसाठी महत्त्वाचा आहे.

“बेल्जियम याबाबतीत फार पुढं आहे याचा मला अभिमान वाटतो. आता मलाही भविष्य आहे,” असं त्या म्हणाल्या.

(लोकांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी काही नावं बदलली आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)